आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय अपप्रवृत्तींचा जीवघेणा खेळ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अबीर गुलाल’मधील स्त्री-पुरुष संघर्ष मात्र जीवघेणा आहे. स्त्रीच्या मुळावर उठलेला पुरुष, असेच त्याचे स्वरूप आहे. या संघर्षातील शह आणि काटशह यांचे दर्शन नाटकात होते. नाटकाची कथा महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडलेली सत्यघटना असू शकते.
महिला सबलीकरणाचा डांगोरा पिटणारी समाजव्यवस्था विशेषतः राजकीय व्यवस्था, महिलांच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या हक्कांचा गळा दाबते. याचे दर्शन घडविणारे ‘अबीर गुलाल’ हे नाटक रंगभूमीवर आले आहे. हे नाटक राजकीय विषयावरील असले तरी ते कौटुंबिक चौकटीत घुटमळत राहते. कौटुंबिक चौकट असल्याने, हे नाटक चाकोरीतले वाटते.

स्त्री मतपेटीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधिमंडळ आणि संसदेचा कारभार सांभाळू लागली आणि तेथेच पुरुषी अहंकार नागासारखा फुत्कार सोडू लागला. त्याचे हे विषारी फुत्कार दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्यात स्त्रियांच्या घटनासिद्ध स्वातंत्र्याचा बळी जात आहे.

मिलिंद शिंदे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या या नाटकाची चौकट तशी पारंपरिकच आहे; पण कौटुंबिक स्वप्नरंजनाची बहुसंख्य नाटके रंगभूमीवर येत असल्याने, या राजकीय विषयावरील चौकटीतल्या नाटकाचेही वेगळेपण अधोरेखित झाले आहे. मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचे निर्माता आहेत, अशोक शिगवण. ‘अबीर गुलाल’ हे प्रतीक विजयाचे असे मानायचे, की गुलाल ही सत्प्रवृत्ती आणि अबीर ही दुष्ट प्रवृत्ती असे मानायचे, हा गोंधळ राहतोच. बहुधा अबीर आणि गुलाल हे दोन्हीही रंग राजकीय उन्मादाचे प्रतीक असल्याचे नाटककाराला सांगायचे असावे.

राजकारणाच्या आखाड्यातील स्त्री आणि पुरुष यांच्यातील द्वंद्वाची कथा या नाटकात आहे. नाहीतरी पुरुष आणि प्रकृती यांच्यातील संघर्ष, समन्वय आणि समरसता असे चित्र नेहमीच दिसते. ‘अबीर गुलाल’मधील स्त्री-पुरुष संघर्ष मात्र जीवघेणा आहे. स्त्रीच्या मुळावर उठलेला पुरुष, असेच त्याचे स्वरूप आहे. या संघर्षातील शह आणि काटशह यांचे दर्शन नाटकात होते. नाटकाची कथा महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडलेली सत्यघटना असू शकते.
संभाजी पाटील (मिलिंद शिंदे) हे राजकारणातील उगवते नेतृत्व. उर्मट, मस्तवाल आणि बेमुर्वतखोर. संभाजी पाटलाचे कमी शिक्षण आणि अरेरावी पाहता, श्रेष्ठी त्याला निवडणुकीचे तिकीट नाकारतात. पुरुषी अहंकार दुखावलेले हे नेतृत्व निवडणुकीच्या मैदानात उतरते. त्याचे आजोबा (अरुण मोहरे) जुनेजाणते स्वातंत्र्य चळवळीत काम केलेले नेते. ते आपल्या नातवाला राजकीय विद्वेषाच्या राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. पण, तरीही संभाजी पाटील आजोबाला न जुमानता विद्या पाटील (पल्लवी वाघ) हिच्या विरुद्ध निवडणूक लढ्यास सज्ज होतो. विद्या हमखास निवडून येईल, तिला श्रेष्ठींचा वरदहस्त आहे, असे लक्षात येताच, संभाजी पाटील सरड्यासारखा रंग बदलतो. विद्याबरोबर लग्न करण्याचा डाव आखतो. विद्याचा मित्र प्रभाकर याला धमकावतो. आंतरजातीय विवाहाचे परिणाम विद्याला निवडणुकीत भोगावे लागतील, अशी इशारावजा धमकी देतो. पत्रकार परिषद घेऊन विद्या आणि आपण नवरा-बायको असल्याचे नाटक संभाजी पाटील करतो. एका खुनाच्या आरोपाखाली आपल्याला अटक होईल, हे लक्षात येताच तो विद्यावर बाजी उलटवतो. श्रेष्ठींचे विद्याविषयी प्रतिकूल मत होते. तिला तिकीट नाकारण्यात येते. पुन्हा तिकीट संभाजी पाटीलकडे चालून येते. विद्या पुन्हा त्याच्याविरुद्ध खेळी करते. शेवटी संभाजी पाटील विद्यावर गोळ्या झाडतो. निवडणुकीतील विजयाने त्याच्या कपड्यांवर ‘अबीर गुलाल’ उधळलेला असतो. हा अबीर गुलाल निश्चितच पुरुषी उन्मादाचे लक्षण असतो.

‘अबीर गुलाल’ची कथा पाहता महिलांना ३३% आरक्षण मिळो अथवा ५०% आरक्षण मिळो, प्रश्न तिथल्या तिथेच राहतात. राजकारणातल्या पुरुषी उन्मादाला कोणीच आवर घालू शकत नाही, अशा प्रकारची मानसिकता तयार झालेला प्रेक्षक असहाय्यतेने हताश होऊन बाहेर पडतो. मिलिंद शिंदे यांनी राजकारणातील ही पुरुषी अहंकाराची समस्या आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडली आहे. मंगेश सातपुते यांनी या राजकीय खेळीच्या खेळाला दिग्दर्शनातून योग्य तो न्याय दिला आहे. त्यांचे दिग्दर्शन चाकोरीतलेच वाटते. कथावस्तू पाहता त्या पलीकडे दिग्दर्शकाची वेगळी झेप असू शकते असे नाही. मंगेश सातपुते यांनी चित्रपट दिग्दर्शनातील मेलोड्रामा ‘अबीर गुलाल’साठी वापरल्यासारखे वाटते. अर्थात, त्याने काही बिघडत नाही. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणे महत्त्वाचे असते, त्यासाठी नाट्यांतर्गत क्लृप्त्या कराव्या लागतात.

संभाजी पाटील आणि विद्या पाटील ही नाटकातील दोन प्रमुख पात्रे. मिलिंद शिंदे आणि पल्लवी वाघ यांनी आपल्या समर्थ अभिनयातून या दोन्हीही व्यक्तिरेखा छानपणे उभ्या केल्या आहेत. संभाजी पाटील याचा उन्माद आणि अहंकार, आणि विद्या पाटील हिचा स्त्री स्वाभिमान आणि निग्रह ताकदीनिशी उभा राहतो. नाटकातील इतर पात्रे संभाजी पाटील आणि विद्या पाटील या दोन मुख्य पात्रांच्या भोवती फिरत राहतात. त्यांचे तसे स्वतंत्र अस्तित्व नाही अथवा त्यांना आपल्या अभिनयाची विशेष चुणूक दाखविण्यास वावही नाही. ‘अबीर गुलाल’ हे नाटक चाकोरीतलं आणि व्यावसायिक नाटके पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी खास रंगभूमीवर आणलेलं नाटक वाटतं. आशय-विषय वेगळा असल्याने, तसं हे निर्मात्याचं धाडसच म्हणावं लागेल. आज रंगभूमीवर असलेली नाटके एक तर सिरीयलच्या वळणाची आहेत, प्रेक्षकांची नाट्य अभिरुचीही त्या पद्धतीने तयार होत आहे. अशा स्थितीत तेंडुलकरांच्या ‘कन्यादान’ची आठवण व्हावी, असे हे ‘अबीर गुलाल’ नाटक निश्चितच वेगळे आहे, त्याचे स्वागत व्हायला हवे.
prakash.khandge@gmail.com
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो....