आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी आणि ती : प्रेमाच्या फुलपाखरांची रुंजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाजच्या ‘फोर जी’च्या जमान्यात या पिढीचं अगदी नवं कोरं, हलकंफुलकं, ताजंतवानं नाटक लेखक-दिग्दर्शक शिवदर्शन साबळे यांनी रंगभूमीवर आणलं आहे. ‘मी आणि ती’ या नाटकाला आजच्या तरुणाईचा गंध आहे.
ही वैश्विक अवकाश असलेली कला असून जसं या कलेचं नातं पौराणिक, ऐतिहासिक, वर्तमानकालीन घटितांशी असतं, तसंच या कलेचं नातं एखाद्या विशिष्ट पिढीशीदेखील असतं. आजच्या ‘फोर जी’च्या जमान्यात या पिढीचं अगदी नवं कोरं, हलकंफुलकं, ताजंतवानं नाटक लेखक-दिग्दर्शक शिवदर्शन साबळे यांनी रंगभूमीवर आणलं आहे. ‘मी आणि ती’ या नाटकाला आजच्या तरुणाईचा गंध आहे. शिवदर्शन साबळे आणि तेजस्विनी लेले यांनी लिहिलेल्या या नाटकाचं कथानक अगदी हलकंफुलकं, ‘पॉपकॉर्नटाइप’ मसालेदार, चटकदार, आजच्या पिढीच्या भाषेत डोक्याला जास्त ‘शॉट’ न देणारं आहे. शिवदर्शन साबळे यांना आपले पिताश्री देवदत्त साबळे आणि आजोबा महाराष्ट्राचे शाहीर साबळे यांची थोर परंपरा आहे. साबळे कुटुंबाच्या कुशीत आणि मुशीत वाढल्यामुळे सर्वस्पर्शी कौशल्य शिवदर्शनच्या नसानसात आहे. लेखन, दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य सर्वच आघाड्यांवर हे कॉलेज कॅम्पसचं नाटक आहे, त्यामुळे या नाटकाची अपूर्वाई म्हणजे, सळसळती तरुणाई! ‘मी आणि ती’ हे प्रेमनाट्य आहे. प्रेमात पाडणारं पण प्रेमात पडणारं, धडपडणारं नव्हे, तर हसरं नाचरं प्रेम व्यक्त करणारं, असं हे नाटक आहे. मॅजिक अवर क्रिएशन, आध्या क्रिएशन आणि अथर्व निर्मित या नाटकात जणू मंगेश पाडगावकरांच्या ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते’ या कवितेचाच वस्तुपाठ वारंवार मिळतो.
आदित्य आणि इरा ही तरुण जोडी. अर्थातच एकमेकांच्या प्रेमात पडते पण, भिन्न स्वभावामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो, पण मग ‘का रे अबोला, का रे दुरावा, अपराध माझा असा काय झाला’ असा प्रेमराग ही जोडी आळवत नाही. कॉलेजच्या कट्ट्यावरचा आदित्य, त्याच्यावर फिदा असणारी त्याची बालमैत्रीण. तिला सोडून तो इराच्या जाळ्यात ओढला जातो. वडिलांच्या एका इमारतीचं काम इंजिनिअर म्हणून इरा पाहते, हे आदित्यला माहीत नसतं. जेव्हा त्याला ते कळतं, तेव्हा त्याच्यात आणि इरामध्ये ‘आंबटगोड’ गप्पा सुरू होतात. खरोखरच त्या आंबटगोड असतात, कारण इराला चिंचा आवडतात. आदित्य कोकणातील आपल्या गावी इराला चिंचा काढून देतो. असो, इरा चित्रकार असते व चित्रांच्या एका प्रकल्पासाठी परदेशात जाते. ती आदित्यला फोन करीत नाही. कधी गेली, काय करते वगैरे काही सांगत नाही, मग रुसवे-फुगवे व पुन्हा दोघांचे मनोमिलन.
आपल्या डोक्याला काहीच ताप नाही. कारण संपूर्ण नाटकभर आदित्यचे मित्र आणि त्याच्या मैत्रिणी हुंदडत असतात. आपल्याला आपल्या कॉलेजच्या जीवनाची आठवण होते. आताची पिढी फार शार्प. थांबायला, लाजायला वेळ नाही, सगळं कसं इन्स्टंट, फास्ट फूडसारखं. फास्ट फूड, फास्ट प्रेम, आइस्क्रीम वगैरे मुलं सतत संगीताच्या ठेक्यावर नाचत बागडत असतात. आपण म्हणजे, निवृत्तीकडे झुकलेले, आपल्या नातवंडाच्या ‘बर्थ डे’ पार्टीतच आहोत की काय? असा फिल या नाटकाने येतो. हे नाटक संगीतप्रधान आहे, नृत्यप्रधान आहे. कॉलेजकट्ट्याच्या आठवणी देणारे आहे. नाटकाला गीत, संगीत दिलंय देवदत्त साबळे यांनी. बऱ्याच वर्षांनी देवदत्त साबळे यांच्या एव्हरफ्रेश संगीताची जादू या नाटकामुळे ऐकता आली. ‘ही चाल तुरू तुरू उडती केस भुरू भुरू’ हे देवदत्त साबळे यांचं गीत एकेकाळी तरुणाईच्या ओठी होतं. या गीताची इतकी जादू होती की, आकाशवाणीच्या ‘कामगार सभा’ या कार्यक्रमात हमखास हे गीत लागायचं. ‘मी आणि ती’ या नाटकात एकूण पाच गाणी आहेत. त्यातील एक गाणं चक्क ४५ वर्षे आधी रचलं गेलेलं आहे. नाटकाचे नृत्य दिग्दर्शन प्राजक्ता साठे, शिवदर्शन साबळे आणि हेमराज साबळे यांनी केले असून खरोखरचं नृत्यामुळे नाटक केवळ हसरे नाही, तर नाचरेही झाले आहे. शिवदर्शन साबळे यांचा भाऊ हेमराज साबळे प्रमुख नायकाच्या म्हणजे, आदित्यच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अगदी महाविद्यालयील एकांकिका स्पर्धेतदेखील हेमराजने काम केलेले नाही. या पहिल्याच नाटकात त्याने आपण पुढे मोठा हीरो होऊ, अशा त्याच्या आणि आपल्या आशा पल्लवित केल्या आहेत.
हेमराज साबळे, चिन्मयी स्वामी, ऐश्वर्या तपाडिया, विक्रम पाटील, करण बेंद्रे, सायली बंदरकर, निकिता नार्वेकर, अक्षय भोसले, अंकुश काणे, प्रणाली कदम, गीता घाग, अवधेश भोसले, अशोक ढगे, अमोल पणजी, शमा शिंदे, चंदन जमदाडे आणि मिलिंद उके या सर्वांच्या भूमिका सुरेख. नाव ठेवायला जागा नाही. कारण नाटकात या सर्वांचा सामुदायिक खेळ सुरू असल्याने आपणही कॉलेजच्या पिकनिकला आलो आहोत, असे वाटते.
‘ऑल दि बेस्ट’सारख्या नाटकांनी तरुणाईच्या नाटकांची वेगळी परंपरा निर्माण केली. मध्ये विनय आपटे यांचे ‘कबड्डी कबड्डी’ हे असेच एक नाटक आले होते, ज्यात तरुणाईच्या कबड्डी खेळाचं थ्रील होतं. शिवदर्शन साबळे, हेमराज साबळे हे परळच्या आंबेकर नगरमध्ये वाढले. या भागात रंगकर्मींची मोठी पलटण एकेकाळी होती. आजही आहे. शिवाजी साटम, माया जाधव, शहाजी काळे, स्वतः शाहीर साबळे, देवदत्त साबळे, केदार शिंदे, चारूशीला साबळे, पलीकडे अभ्युदय नगर काळाचौकीला आदेश बांदेकर, सुहास भालेकर, राजा मयेकर या सर्व मंडळींमध्ये एक समान दुवा आहे. हा समान दुवा म्हणजे, समकालीन संदर्भ घेऊन त्यावर प्रहसनात्मक भाष्य करणाऱ्या नाटकांमध्ये या सर्वांनी आपली कारकिर्द घडविली.
गिरणगावच्या कामगार रंगभूमीची ऊर्जा घेऊन या सर्वांनी आपले अढळ स्थान आजच्या व्यावसायिक रंगभूमीवर, चित्रपटात निर्माण केले. शिवदर्शन साबळे असाच नव्या उमेदीचा लेखक, दिग्दर्शक असून ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’, ‘कॅनव्हास’, ‘रंग मनाचे’सारखे चित्रपट त्याने केले आहेत. परंपरा डॉट कॉम, मी आणि ती, तळ्यात मळ्यात सारखी नाटके त्याने दिग्दर्शित केली आहेत. एकूणच शिवदर्शन साबळे, वैजयंती साबळे, संतोष काणेकर या निर्मात्यांचे ‘मी आणि ती’ नाटक निश्चितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, यात शंका नाही.
prakash.khandge@gmail.com
बातम्या आणखी आहेत...