आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचा कणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हायस्कूल आणि विद्यापीठातून घातलेला पाया आणि दर्जेदार विद्यापीठे म्हणजे अमेरिकेच्या प्रगतीचा कणा ठरतात. इतर कारणांबरोबर अशा विद्यापीठांमुळे, त्यातील संशोधनावरच्या खर्चाने, गुणवान संशोधकांमुळे अमेरिका हा सर्वसाधारणपणे पहिल्या क्रमांकाचा देश ठरतो...

मागील दोन लेखांत आपण अमेरिकन नैतिकता, मूल्ये आणि जीवन दृष्टिकोन याबाबत जाणून घेतले. नैतिकतेचे संस्कार लहानपणापासून कुटुंबात होतातच. त्याचबरोबर शिक्षणातूनसुद्धा या अंगांचा पाया घातला जातो.

अमेरिकेत शाळा दोन प्रकारच्या आहेत. पब्लिक स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल. पब्लिक स्कूल ही स्थानिक शासने चालवतात. या शाळांना फी नसते. अमेरिकेतील जवळपास सर्व मुले पब्लिक स्कूलमध्ये जातात. पैसे मुख्यतः स्थानिक शासन रियल इस्टेट प्रॉपर्टीवर लावलेल्या करातून देतात. शाळांमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर असतो. त्यामुळे अभ्यासक्रम, विषयांची व्याप्ती, शिकवण्याची पद्धत, गुणमापन करण्याची पद्धत या सर्वांचा  शास्त्रीय पद्धतीने विचार केलेला असतो. अभ्यासातील विषयांची व्याप्ती मोठी असते. उदाहरणार्थ, माझ्या मुलीच्या एका विषयात HDI ची  (Human Development Index) संकल्पना होती. अभ्यासक्रमात खेळ, कला, संगीत असतात. त्यांचे मार्कसुद्धा  सरासरीत धरत असल्याने, या अंगाकडेही जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. विषयांची व्याप्ती मोठी असल्याने  त्यातील किती गोष्टी खूप वर्षांनंतर डोक्यात टिकून राहतात, हा प्रश्न मला पडतो. हायस्कूलमध्ये नववी ते बारावीचे वर्ग असतात. इथे अभ्यासक्रमाबरोबर आपल्या आवडीप्रमाणे विविध ऐच्छिक विषय निवडावे लागतात. उदाहरणार्थ, सुतारकामासारखे व्होकेशनल विषय; आरोग्यशास्त्र, अकाउंटन्सी, संगीत यांसारखे विविध विषय;  कॉलेज लेव्हलचे अॅडव्हान्स वर्ग इत्यादीमध्ये ही खूप निवड स्वातंत्र्य असते.

सत्राच्या अंतिम परीक्षेबरोबर सत्रात चाचणी परीक्षा, गृहपाठ, रिसर्च, प्रोजेक्ट, प्रेझेंटेशन त्यांचे मार्क त्या त्या विषयात धरतात. प्रोजेक्टमध्ये एकच उत्तर नसते, त्यामुळे विद्यार्थी कल्पक होतात. शिक्षक या गोष्टीला प्रोत्साहन देतात. ग्रुपवर्कमुळे कामाच्या ठिकाणी लोकांशी वागण्याचे कौशल्य, नेतृत्व गुण यांचा पाया घातला जातो. एकमेकांचा आदर करणे महत्त्वाचे ठरते. संशोधनामुळे स्वतः माहिती शोधणे, तिचे आकलन, विश्लेषण करणे, आदी कौशल्य वाढते. माझी मोठी मुलगी पहिलीत होती, तेव्हा एक दिवस आली आणि मला म्हणाली की, तिला अन्ननलिकेवर रिसर्च करून प्रेझेंटेशन करायचे आहे! अर्थात हे सर्व वयानुरूप असले तरी मुलांचा आत्मविश्वास आणि मुलांची वृत्ती कशी विकसित होते, याची कल्पना यावी. सर्व विषयांचे मार्क सरासरीत धरत असल्याने, सर्व विषयांकडे लक्ष द्यावे लागते. कुठलीही बोर्ड एक्झाम नसते, सर्व गुण शाळेतच ठरतात. परंतु, शिक्षक सचोटीने मूल्यांकन करतात.

शाळेनंतर वेगवेगळे अभ्यासेतर क्लब असतात. उदा. नाटक, विज्ञान, बुद्धिबळ इ. हे ऐच्छिक असतात. तरीही  काही मुले इथे जातात. आंतर शालेय खेळांसाठी खूप मेहनत करतात. बरीच मुले स्वयंसेवा करतात. यात लहान मुलांच्या शाळेत काम करणे, शेजाऱ्यांना मदत करणे, वृद्धाश्रमात जाऊन आधार देणे, इत्यादी. हायस्कूलमधून पास होण्यासाठी काही अंशी स्वयंसेवा करावी लागते. कॉलेज अॅडमिशन ही साधारणपणे चार गोष्टींवर मिळते. १.  नववी  ते बारावीचे या चारही वर्षांचे सर्व विषयातील मार्क; २. अभ्यासेतर गोष्टी - खेळ, संगीत इ.; ३. अॅप्टिट्यूड टेस्ट आणि ४. भावी आयुष्याबद्दल निबंध. यामुळे एखाद्या वर्षी अभ्यासाचा ताण येत नाही. अमेरिकेत खासगी क्लासेस नसतात. खासगी ट्यूशनचे प्रमाण पण कमी असते. क्वचित मुले स्वयंसेवा म्हणून शाळेत गरजूंना ट्यूशन देतात. अभ्यासक्रमातून, गुणमापन पद्धतीतून एक सर्वांगीण विकास दिसतो. सचोटी, परस्परांविषयीचा आदर, लोकांशी वागण्याचे कौशल्य, नेतृत्व गुण, सामाजिक उत्तरदायित्व, छंद, देशाभिमान इत्यादींचा पाया घातला जातो.

अमेरिकेत कॉलेजचे दोन मुख्य प्रकार आहेत. शिवाय व्यवसायविमुख कोर्सेस देणाऱ्या संस्था आहेत. एक प्रकार म्हणजे, कम्युनिटी कॉलेज. ही स्थानिक शासनाच्या पैशातून चालतात. कुठल्याही स्थानिक मुलाला अॅडमिशन मिळते. इथली वाजवी फी कुणालाही परवडू शकते. व्यवसायाभिमुख किंवा विद्यापीठांचे कोर्सेस असतात. सुरुवातीस विद्यापीठात न जाता इथे काही कोर्सेस करून ते विद्यापीठात ट्रान्स्फर करतात.

इथला दुसरा महत्त्वाचा कॉलेज प्रकार म्हणजे, स्वायत्त विद्यापीठे. राज्य सरकारच्या अनुदानातून चालणारी विद्यापीठे सर्वसाधारणपणे दर्जेदार आहेत. एमआयटी, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली, कॅलटेक, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, अशी एकाहून एक दर्जेदार विद्यापीठे आहेत. नफ्यासाठी चालणाऱ्या खासगी विद्यापीठांच्या दर्जाबद्दल मात्र इथे खात्री देता येत नाही! ही विद्यापीठे परदेशात जाऊन श्रीमंत विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. परंतु सढळ देणग्यांतून बनलेली स्टॅनफोर्ड, हार्वर्डसारखी खासगी  विद्यापीठे दर्जेदार आहेत. ही विद्यापीठे म्हणजे, अमेरिकेच्या प्रगतीचा कणा आहेत. इथे संशोधनासाठी प्रचंड पैसे राखीव असतात. पण पैशांमुळे दर्जा येतोच, असे नाही. असे असले तरी शेवटी पैशांमुळे देशातून आणि परदेशातून गुणवान संशोधक विद्यापीठांना मिळतात. दर्जा उंचावतो. प्राध्यापकांना स्वातंत्र्य असते.

हे संशोधन साधारणपणे पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीएचडी पातळीवर होते. मात्र, अंडर ग्रॅज्युएट पातळीवरचा भर मात्र एक सुजाण, उदारमतवादी नागरिक बनवण्यावर असतो. विविध विषयांची जाण असलेला, विविध दृष्टिकोन समजावून घेण्याचा प्रयत्न करणारा, विविध पातळ्यांवरच्या लोकांशी संबंध ठेवू शकणारा, समाजाचे ऋण मानणारा, देशाप्रती प्रेम असणारा नागरिक बनवणे हे इथल्या शिक्षण व्यवस्थेचे ध्येय असते. या दृष्टीने बरीच विद्यापीठे जनरल एज्युकेशन अनिवार्य करतात. तुम्ही आर्ट््स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, विज्ञान यापैकी कुठलेही विद्यार्थी असलात तरी काही ऐच्छिक विषय घ्यावेच लागतात. या ठिकाणी प्रत्येक विद्यापीठ वेगळे असते. मी ज्या विद्यापीठात शिकवले, त्याचे उदाहरण घेतो. तिथे विषयांचे गट केले होते. प्रत्येक गटातून एक -दोन विषय निवडावे लागायचे. उदा. एकेक विषय कला गटातून (संगीत, चित्रकला इत्यादीत भाग घेणे किंवा त्याचा आस्वाद घेणे), तत्त्वज्ञान गटातून, अर्थशास्त्र गटातून, पदार्थविज्ञान (physical sciences), जैविक विज्ञान, समाजशास्त्र गटातून; दोन विषय humanities गटातून इत्यादी; एका थीममधील (धर्म किंवा परराष्ट्र संबंध वा स्त्रीवाद वा गुन्हेगारी इत्यादी) तीन विषय. मात्र, त्यामुळे तुमच्या मुख्य ब्रँचचे विषय कमी होतात. 

उदाहरणार्थ, अमेरिकेचा इंजिनिअर भारताच्या, तुलनेने इंजिनिअरिंग कमी शिकतो. पण ही उणीव पोस्ट ग्रॅज्युएटच्या वेळी भरून निघते. 

हायस्कूल आणि विद्यापीठातून घातलेला पाया आणि  दर्जेदार विद्यापीठे म्हणजे अमेरिकेच्या प्रगतीचा कणा ठरतात. इतर कारणांबरोबर अशा विद्यापीठांमुळे, त्यातील संशोधनावरच्या खर्चाने, गुणवान संशोधकांमुळे अमेरिका हा सर्वसाधारणपणे पहिल्या क्रमांकाचा देश ठरतो...

- डॉ. प्रमोद चाफळकर, Pramod.Chaphalkar@gmail.com
लेखक मिशिगन येथे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.
बातम्या आणखी आहेत...