आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुझ्या पावसाने मलाही भिजू दे
ओल्या मिठीत मलाही भिजू दे
तप्त या भूमीवर बरसू दे जलधारा
रोमरोमी थेंबथेंब झरू दे!
अशा पावसाचा
तशा पावसाचा
भिजायचे त्याला
बहाणा कशाचा?
तुझ्या पावलांनी पालवी सजू दे!
अशा धुळवडीला
साथ वादळाची
तुझी थेंबझेप
अन् आडकाठी विजांची
तरीही चिंब-यात्रा घडू दे!
हे रानोरानी
कुणाचे इशारे
हा पानोपानी
रोमांच थरथरे
खडकांवरही ऋतू फुलू दे!
कुणाचा तुला विरह
साद ही कुणाची
धावतो वेगात वादळी
ओढ ही सांग लागली कुणाची?
ओढ ज्याची भेट त्याची घडू दे!
अशा वादळाला
पडते मेघ-भूल
चांदण्या रात्रीत
भिजवी भवताल
चमकू दे थेंब, तेजही दिसू दे!
ऋतू हा बदलला कसा
जलबिंदू क्षणी झाले उन्हाचे
गर्जनाही मेघांची की
आलाप निसर्गाचे
धारा-स्वर तुझा आसमंती घुमू दे !
तुझ्या नर्तनाच्या
विखुरल्या खाणाखुणा
भंबेरी उडाली फुलांची
उधळला शेतात दाणा
हिरवाईने तुझे रूप नटू दे!
परवा रात्री आली होती
कुजबूज कानी धारांची
चोरपावले दवांची अन्
दाद ठोठावणी गारांची
दार मनाचे तुजसाठी खुलू दे !
राबत्या हातांची आण तुला
व्याकूळ आसवांची आण तुला
तू भरभरून दे दान नभाचे
अर्पिल सोनं हे रान तुला
लेक तुझी नखशिखांत नटू दे!

प्रमोद चुंचूवार, मुंबई
pramod.chunchuwar@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...