आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक शिक्षणाचा राजकीय खेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकोणीसशे ब्याण्णवमध्ये भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासनाने एचआयव्ही एड्स या विषयावर जनजागृतिपर उपक्रम हाती घेतले. भारत हा देश सांस्कृतिकदृष्ट्या महान आहे. देशातील सर्व नागरिकहे एका उज्ज्वल परंपरेचे पाईक आहेत. एड्ससारखा आजार आपल्या देशात पसरूच शकणार नाही. तो पाश्चिमात्य देशातील आजार आहे. भारतात जर असेलच, तर तो वेश्याव्यवसाय करणार्‍या आणि तेथे जाणार्‍या थोड्याथोडक्याच लोकांमध्ये असेल, म्हणून त्यावर फार गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही, असा ठाम विश्वास समाज म्हणून पहिलं दशकभर आपण बाळगत आलो. परंतु गेल्या जवळजवळ दोन दशकांपेक्षा अधिक काळ समोर आलेली अनेक उदाहरणं पाहता एचआयव्ही/ एड्स हा आजार समाजातील सर्व स्तरांत पसरल्याचे दिसले आहे.

एचआयव्ही हा प्रामुख्याने लैंगिक संबंधांतून पसरणारा विषाणू आहे. म्हणून लैंगिक संबंधांबद्दल आपण काय भूमिका घेतो, यावर या विषाणूंचे नियंत्रण अवलंबून आहे. एचआयव्ही/ एड्सविरोधी मोहिमेसंदर्भात समाज म्हणून भारताकडून सुरुवातीपासूनच संदिग्ध भूमिका घेतली गेली आहे. अलीकडेच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या संदर्भात केलेलं वक्तव्य त्या अर्थाने आश्चर्यकारक म्हणता येणार नाही. भारतीय संस्कृतीत गूढत्वाला नेहमीच प्राधान्य दिलं गेलं आहे. ज्ञानापासून, चिकित्सेपासून सर्वसामान्य समाजाला दूर ठेवण्यातच आपण धन्यता मानत आलो आहोत.

रस्त्यात खड्डे कोठे आहेत, हे जर लोकांना सांगितले तर लोक मुद्दामच खड्ड्यात जाऊन पडतील, अशी भीती आपण बाळगत आलेलो आहोत. मूठभर ज्ञानात आणि बहुजन अज्ञानात, हा इथला शतकानुशतके नियम बनला आहे. म्हणूनच नैतिकतेच्या नावावर संस्कृतीच्या ओझ्याखाली व्यक्तीच्या वाढत्या शरीर आणि मनामध्ये होणार्‍या बदलांबद्दल, लैंगिक व्यवहाराबद्दल बोलणं निषिद्ध मानलं गेलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सर्व विषयांवर चर्चा होऊ शकते, लोकशिक्षण होऊ शकतं, असं म्हटल्यास आपण अनैतिक आणि संस्कृतिद्वेष्टे ठरू, या भीतीपायी लैंगिक शिक्षणाला नेहमीच विरोध होत आला आहे. तसे करताना लैंगिक शिक्षणाला नव्हे, तर अश्लीलतेचे प्रदर्शन मांडण्याला आमचा विरोध आहे, अशी सारवासारव केली जात आहे. मुळात, शरीराच्या लैंगिक अवयवांबद्दल निकोप चर्चा करण्यासाठी कोणतेही व्यासपीठ ठेवायचे नाही; अशी चर्चा होऊ लागल्यास त्याला अश्लील म्हणून दाबून टाकायचे; धर्म, संस्कृती, परंपरा यांचा चलाखीने वापर करत आपले राजकारण पुढे रेटायचे, हे सातत्याने होताना आपण पाहिले आहे. असे करण्यात आपल्याकडचे राजकीय आणि धार्मिक नेते धन्यता मानत आले आहेत. समाजशिक्षणासाठी प्रवाहाविरोधात जाण्याचे धारिष्ट र. धों. कर्वे यांच्यासारख्या फार थोड्या समाजसुधारकांनी दाखवले आहे.

हे खरे की लैंगिक शिक्षण द्या म्हणणे जितके सोपे आहे, तितके ते प्रत्यक्षात अवघड आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणामध्ये लैंगिक शिक्षणाचा समावेश करण्याच्या दृष्टीने ‘युनिसेफ’च्या पुढाकाराने एक स्तुत्य प्रयत्न महाराष्ट्रात झाला होता. यामध्ये शिक्षकांनी हा विषय संवेदनशील पद्धतीने कसा हाताळावा, यासाठीचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांबरोबर लैंगिक शिक्षण घेण्यासाठीचा अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य याची निर्मिती करण्यात आली होती. परंतु महाराष्ट्राच्या समाजव्यवहारात हा प्रयत्न टिकू शकला नाही. विद्यार्थ्यांना सजग करावे, जीवनमूल्ये समजावून सांगावीत, जीवनकौशल्य हस्तगत करण्यास मदत करावी, या हेतूने तयार झालेला हा अभ्यासक्रम तथाकथित पुरोगामी नेत्यांच्या अपरिपक्व भूमिकेमुळे बासनात गुंडाळला गेला.

मुलांसोबत या विषयावर चर्चा झाल्यास त्यांच्या मनावर अनिष्ट परिणाम होतील, अशी भीती आपल्या समाजधुरीणांनी बोलून दाखवली. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आखण्यात आलेला हा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक साहित्य यांमध्ये वस्तुत: कोणत्याही प्रकारची अश्लीलता नव्हती. लैंगिक अवयवांची दिलेली वैज्ञानिक माहिती सतत पिवळा चश्मा वापरणार्‍यांना अश्लील वाटू शकते. म्हणूनच रेखाचित्राद्वारे शरीराची ओळख आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींकडून हे साहित्य तयार करवून घेतले होते. तरीही यास विरोध झाला. परिणामी लाखो विद्यार्थी शालेय स्तरावर या माहितीपासून वंचित ठेवले गेले.

लैंगिक संबंधात निरोधचा वापर केल्यास एचआयव्हीचा संसर्ग टाळता येतो, असे विज्ञान सांगते. हे असे सांगण्यास कोणाचाही अटकाव असण्याचे कारण नाही. परंतु हे सांगितल्यास समाजात अनागोंदी आणि व्यभिचार माजेल, अशी हाकाटी मारत त्याला संस्कृतीच्या नावाखाली विरोध करायचा, हे अनाकलनीय आहे. शालेय जीवनात लैंगिक संबंध ठेवले जातात, विवाहपूर्व आणि विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवले जातात. उत्सव, समारंभ, जेथे मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, कामानिमित्त स्थलांतरित होतात, अशा ठिकाणी लैंगिक व्यवहारात वाढ झालेली दिसते, हे वास्तव अनेक अभ्यासांतून पुढे आलेले आहे. अशा वेळी एकपत्नीत्व, ब्रह्मचर्य यावर भर देऊन एचआयव्ही/ एड्स प्रतिबंधासाठी निरोध वापराला दुय्यम मानणे, हा भाबडेपणा ठरेल. नैतिक-अनैतिकतेबद्दल समाजव्यवहारात एकवाक्यता दिसत नाही. अशा वेळी वैयक्तिक जीवनात कमालीच्या विसंगतीत जगणार्‍या समाजात मूल्याधारित संदेश द्यावेत, असे म्हणणे म्हणजे वेड पांघरण्यासारखेच होईल. एचआयव्ही/एड्ससारख्या आजाराला रोखण्यासाठी आक्रमक आणि थेट संवादाची गरज असते. म्हणूनच ‘बलबीर पाशा’सारख्या थेट संवाद साधणार्‍या मोहिमा यशस्वी होताना दिसतात.

आजच्या डिजिटल युगात दररोज नवनवीन माहिती आणि तंत्रज्ञान येऊन आदळते आहे. माहितीच्या आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असतानाच वैयक्तिक आयुष्यात तरुण पिढीला प्रचंड पोकळीला सामोरे जावे लागते आहे. वयसुलभ होणारे शारीरिक व मानसिक बदल व त्यामुळे तयार होणारा गोंधळ यांना समजावून घेताना त्यांची दमछाक होताना दिसते आहे. या संदर्भात मार्गदर्शक ठरेल, अशा व्यासपीठांची वानवा असल्यामुळे राग, प्रेम, शारीरिक आकर्षण, लैंगिक भावना आदी गुंत्यांना सामोरे जाताना तरुणाईची घुसमट होत आहे. इंटरनेटच्या मायाजालात सारे काही अनावृतपणे समोर येत असताना लैंगिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी संस्कृतिरक्षणाचा झेंडा हातात घेऊन बाहेर पडणे, देशाचे आरोग्य जपणारे नव्हे तर बिघडवणारे ठरणार आहे.