आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pranav Sakhdev Article About Marriage–Smart Strategies, Divya Marathi

सहजीवन फुलवण्याचे 'स्मार्ट' मार्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज अनेक जोडप्यांना वैवाहिक जीवनातली समस्या कळत असते; त्यासाठी काम करावं लागणार, हेही समजत असतं; पण बरेचदा कशी आणि कुठून सुरुवात करायची, हे कळत नसतं. चेन्नईस्थित सायकिअ‍ॅट्रिस्ट असलेल्या विजय नागास्वामी यांनी आपल्या ‘24Ÿ7 मॅरेज : स्मार्ट स्ट्रॅटेजीज फॉर गुड बिगिनिंग्ज’ या पुस्तकात तार्किक पद्धतीने पण खेळकर शैलीत सहजीवन कसं फुलवावं, हे सांगितलं आहे. लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो; पण त्यातल्या गाभ्याकडे म्हणजे दोन व्यक्तींच्या सहजीवनाकडे दुर्लक्ष होऊन, बाकीच्या गोष्टींकडेच जास्त लक्ष दिलं जातं. नागास्वामी सुरुवातीलाच अत्यंत मूलभूत प्रश्न उपस्थित करतात की, जसं इंजिनिअर होणार्‍या मुलाला त्याच्या क्षेत्राबद्दल माहिती आणि ज्ञान दिलं जातं, तसं संसार करणं हेही जीवनातलं एक क्षेत्र आहे; तरी या क्षेत्राबद्दलची व्यवस्थित माहिती कोणीही कोणाला देत नाही, असं का? आणि याच उद्देशाने हे पुस्तक लिहिलं गेलं असावं, असं ते पुस्तक वाचल्यावर जाणवतं. या पुस्तकातलं सगळं विवेचन नागास्वामी यांनी आजच्या पिढीच्या संदर्भात केलं आहे. आजच्या पिढीची करिअर्स, त्यांच्या समस्या-अपेक्षा यांचा ऊहापोह यात केला आहे. प्रत्येक प्रकरणात त्यांनी केस-स्टडीज दिल्या आहेत, त्यातल्या व्यक्तींचे व्यवसायही आजचे आहेत. त्यामुळे ही उदाहरणं खूप जवळची वाटतात. त्यांची मांडणीही गोष्टीसारखी केली आहे आणि गोष्ट सांगता सांगताच नागास्वामी आपल्याला मूळ विषयाच्या गाभ्यात नेतात. त्यामुळे हे विवेचन मौलिक आणि विचारप्रवृत्त करणारं असलं तरी जड होत नाही, हे विशेष.

नागास्वामी प्रथमच स्पष्ट करतात की, त्यागाच्या किंवा ‘प्लॅटोनिक’ गोष्टींमुळे सहजीवन फुलत नाही. त्याऐवजी ‘स्मार्ट’ लग्नाची संकल्पना सहजीवनासाठी अधिक उपयुक्त ठरू शकते. जसं आत्ताच्या काळात कोणत्याही क्षेत्रात ‘हार्डर्वकिंग’ असण्यापेक्षा ‘स्मार्ट असणं’ अधिक उपयुक्त ठरतं, तसंच लग्नाच्या बाबतीतही आहे. म्हणजे बर्‍याच जणांना वाटतं की लग्न फुलावं, बहरावं यासाठी खूप कष्ट करावे लागतात, आणि मग त्यागमय वृत्ती बाणवली जाऊन भावनिक ओलावा किंवा उत्स्फूर्तता हरवून बसते. त्याएवजी काही कौशल्यं आत्मसात केली तर तुमचं सहजीवन बहरू शकतं. प्रेम, विश्वास, आदर आणि आपुलकी-जवळीक हे संसाराचे चार आधारस्तंभ असून कोणत्याही लग्नाचा पाया सुरुवातीलाच भक्कम केला तर नंतर त्यावर पक्की इमारत उभी राहते, असं नागास्वामी म्हणतात.

जागतिकीकरणानंतर आणि शिक्षणाच्या प्रचार-प्रसारामुळे नव्या पिढीमध्ये उदयाला आलेल्या ‘करिअरिस्टिक दृष्टी’चा विचार या पुस्तकात केला आहे. या दृष्टीमुळे वैवाहिक आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीही बदलली असल्याचं नागास्वामी नमूद करून नव्या पिढीला जुन्या पिढीप्रमाणे लग्न अपरिहार्यच आहे, असं वाटत नाही; हे लक्षात घेणं आवश्यक असल्याचं ते म्हणतात. त्यानंतर आपल्याला हवा असलेला जोडीदार कसा शोधावा, याबाबतचं विवेचन येतं. नागास्वामी स्पष्टपणे लिहितात की, आईवडलांना सूनबाई हवी किंवा नातू-नात हवी किंवा असल्या कारणांसाठी लग्न करून टाकू नये! तर आपल्या आशा-अपेक्षा नीट समजून घेऊन त्या परस्परांशी बोलूनच योग्य तो निर्णय घ्यायला हवा, असं ते म्हणतात.

लग्नानंतर सर्वप्रथम दोघांनीही एकमेकांना खासगी स्पेस दिली पाहिजे आणि ती जपली पाहिजे, असं नागास्वामी म्हणतात. यात जर अतिरिक्त ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप होत असेल तसं स्पष्टपणे एकमेकांना सांगितलं पाहिजे. त्यानंतर दोघांची मिळून एक एकत्र स्पेस असली पाहिजे आणि त्यासाठी दोघांनाही वेळ काढला पाहिजे. या स्पेसमध्ये इतरांची लुडबुड होणार नाही, याची काळजी दोघांनीही घ्यायला पाहिजे. त्यानंतर सोशल स्पेसही महत्त्वाची असते. तुमचे मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईक अशा वर्तुळांनाही जपता आलं पाहिजे. या सगळ्या स्पेसेसच्या सीमारेषा दोघांनीही आखून घेतल्या पाहिजेत. या पुस्तकात सासर आणि माहेरच्या कुटुंबीयांनाही कसं जोडून घ्यायचं, एकमेकांचा आदर कसा करायचा, इतकंच नाही तर सासू-सून, सासू-जावई किंवा जावई-सासरे अशा नात्यांबाबतही महत्त्वपूर्ण विवेचन नागास्वामी यांनी केलं आहे. तसेच सेक्सबाबतचे समज-गैरसमज आणि सेक्शुअल जीवन अधिक चांगलं आणि सुदृढ व्हावं यासाठी काय करता येईल, हेही यात आहे. कोणत्याही नात्यात भांडणं होणं हे नॉर्मल असून तुम्ही भांडणांकडे कसं पाहता, ही गोष्ट अधिक महत्त्वाची ठरते. भांडणांकडे एकमेकांना समजून घेण्याचं एक टूल म्हणून पाहिलं तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. भांडणं सोडवताना त्याकडे जास्तीत जास्त विवेकनिष्ठ दृष्टीने पाहिल्यास त्यामुळे तुमच्या सहजीवनात कडवटपणा येत नाही. यासाठी निकोप व मोकळा संवाद महत्त्वाचा असतो.

प्रवाही भाषा आणि विनोदी-खेळकर शैली यांमुळे हे पुस्तक वाचनीय झाले असून विशेष म्हणजे, हे पुस्तक कोणत्याही समस्येवरचा किंवा विषयावरचा ठोस उपाय सुचवत नाही किंवा कोणताही दावाही करत नाही. तर अनुभवांमधून जाणवलेली अंतर्दृष्टी आपल्यासमोर ठेवून आपल्याला आपले उपाय शोधण्यासाठी विचारप्रवण करतं; जे अत्यंत महत्त्वाचं आहे, असं वाटतं.
पुस्तकाचे नाव :The 24x7 Marriage–Smart strategies for good beginnings
लेखक : विजय नागास्वामी
प्रकाशक : वेस्टलँड
किंमत : 250 रु.