आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी अभिमानयात्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी पुण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबातला एकुलता एक मुलगा. एकुलता एक असल्यामुळे घरातल्यांचं
आणि नातेवाइकांचं नेहमीच माझ्याकडे लक्ष असायचं, अजूनही आहेच.
लहानपणापासून आई म्हणते ते योग्यच असणार, असे मानून मी चालायचो. बाबांनी घरात एखादा निर्णय स्वतंत्रपणे घेतल्याचे मला कधी आठवतच नाही. मला चांगली संगत लागावी, यासाठी तिची नेहमी धडपड चालायची. कितीतरी वर्षे माझे स्वत:चे असे मत नव्हतेच मुळी. शाळेतही अगदी गुणी मुलगा म्हणून ओळख. भांडणे आणि दंगामस्तीपासून चार हात लांब. माझी मस्ती म्हणजे तोंडाची वाफ. अखंड बडबड, स्वत:शीच. घरी जाताना न सांगता खाल्लेल्या चिंचा-बोरांपर्यंत मस्तीची लक्ष्मणरेषा. लहानपणापासून खूप बहिणींसोबत आणि मैत्रिणींच्या घोळक्यात वाढलो मी. त्यामुळेही असेल कदाचित; आईबाबांशी माझा संवादही बेताचाच असायचा. शाळा, अभ्यास याच्या चौकशाच जास्त असायच्या.
आयुुष्यात पहिल्यांदा दुस-या पुरुषाचा स्पर्श मी चौथीमध्ये अनुभवला. थोडंसं कोड्यात टाकणारी घटना होती. त्या वेळी त्या घटनेचं वाईट असं वाटलं नाही. वयात येताना वर्गमित्र स्वप्नातल्या मुलींबरोबर केलेल्या क्रीडेचे वर्णन करायचे. मला ते काहीतरी विचित्र आणि घाणेरडं बोलताहेत, असं वाटायचं. कारण माझ्या स्वप्नात मुली नव्हत्याच कधी. माझं माझ्या वर्गमित्राबद्दल आणि इंग्रजीच्या सरांबद्दलचं आकर्षण, असं सगळंच वेगळं होतं. कितीतरी वर्षं मला पुरुषांविषयीच्या भावना या चुकीच्या आहेत, आपण काहीतरी घृणास्पद करतोय, असंच वाटायचं. मग घरातल्या संस्कारांप्रमाणे देवाची माफी मागणं चालू केलं, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. हळूहळू जाणवायला लागलं, मी वेगळा आहे. मला इतर मुलांप्रमाणे खास मैत्रीण नव्हे, तर मित्र हवा होता. इंजिनिअरिंग सुरू झालं होतं... खूप अभ्यासाची गरज होती. पण अभ्यासात लक्षच नसायचं. सतत मित्राचे विचार डोक्यात फिरायचे. अगदी पेपर लिहितानाही ते माझ्या डोक्यात फेर धरून नाचायचे. याचा परिणाम मार्कांवर होत होता. आपलं काहीतरी चुकतंय, हे जाणवत होतं; पण बोलायला कोणीच नव्हतं. हिंमत करून मी माझ्या आतेबहिणीकडे माझ्या भावनांविषयी बोललो. तिने माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि सांगितलं, मुलींमध्ये रस घेत जा, सुरुवातीला कठीण जाईल; नंतर नीट होईल सगळं.
मग नवं चक्र सुरू झालं. स्वत:ला समाजाच्या चौकटीत बसवण्यासाठी बदलण्याचे प्रयत्न. पण या प्रयतनांना यश येत नव्हतं. उलट जास्त त्रासच होत होता. कितीही प्रयत्न केला, तरी मित्रांमध्येच गुंतून पडावंसं वाटत होतं. माझी होणारी घुसमट मी माझ्या जवळच्या मित्रांना सांगितली आणि जवळचे मित्र कधी परके झाले, कळलंच नाही. याला मी स्वत:लाच जबाबदार धरलं व स्वत:ला त्रास करून घेतला.
काळाबरोबर काही गोष्टी उलगडत होत्या, तर काहींचा अधिक गुंता होत होता. याच काळात माझा डेटिंग साइटशी संबंध आला. माझी गरज आता मानसिक होत चालली होती. मला माझ्या आयुष्यात माझी व्यक्ती हवी होती. प्रयत्न केले प्रेम मिळविण्यासाठी, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. नंतर जाणवलं, प्रेम हे ठरवून होत नाही, ते व्हायचं तेव्हा होणार. बरेच नवीन मित्र भेटले, त्यांच्याकडूनच माझी ‘प्रयत्न’ या समलिंगींसाठी असणा-या ग्रुपशी ओळख झाली. आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या समलैंगिक पुरुषांना मी भेटलो. मी एकटा नाहीये, हे त्या दिवशी मला जाणवलं.
माझ्यात एक विश्वास आला. अभ्यासातही लक्ष द्यायला सुरुवात केली. यात माझ्या चुलत बहिणीची खूप मदत झाली. ती माझ्या आयुष्यातली पहिली व्यक्ती, जिने माझा स्वीकार मी आहे तसा केला. अर्थात, एवढे घडूनही मनातील नकारात्मक विचारांचा गोंधळ कायम होता. शेवटी कौन्सिलिंग घेतलं, त्याचा छान फायदा झाला. या कौन्सिलिंगमधून कळलं, मी समलिंगी (गे) आहे व यात चूक काहीच नाही. तो एक आयुष्यातला भाग आहे. त्यात गुंतून न पडता करिअरला महत्त्व दिलं पाहिजे आणि स्वत:वर प्रेम करायला शिकलं पाहिजे. पुढे
‘तो-ती-ते’ या नाटकाच्या ग्रुपशी ओळख झाली. माझ्यातल्या लेखनकलेला वाव मिळू लागला. मलाही काहीतरी करता येईल, ही भावना निर्माण झाली.
24 नोव्हेंबर 2013 हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस. माझी पहिली समलिंगी ‘अभिमान पदयात्रा’ (एलजीबीटी प्राइड वॉक) ज्यात मी भाग घेतला. अर्थात जावं की जाऊ नये, असा तळ्यात-मळ्यात खेळ चालू होता. कोणी मला पाहिलं तर, याची धाकधूक मनात होती. मला कोणी ओळखू नये, म्हणून मी मुखवटा (मास्क) घातला. पदयात्रा सुरू झाली आणि सारी भीती, चिंता, स्वत:बद्दलची लाज कुठच्या कुठे पळून गेली. तो दिवस मी स्वत:साठी जगलो. त्या दिवशी मला खूप हलकं वाटलं. मला कधीही वाटलं नव्हतं इतकं हलकं, आनंदी आणि प्रसन्न.
आता मागे वळून पाहताना गंमत वाटते. नेहमी आई-बाबांना दोष देणारा मी, सतत दुस-याकडून अपेक्षा करणारा मी आणि आताचा मी, आणि हा प्रवास माझा मलाच सुखावतो. आई-बाबांना माझ्या वेगळेपणाची कल्पना असावी असे काही प्रसंग घडले; पण इतक्यात मी त्यांना काही सांगणार नाहीये. सध्या तरी करिअरवर लक्ष केंद्रित करत स्वत:ला वेळ देतोय. कुणास ठाऊक, आयुष्याच्या पुढच्या वळणावर काय गुपित दडलंय ते...
Samapathik@hotmail.com