आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : ऐसी रंग दे रंग नाही छूटे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होलिकोत्सव म्हणजे रंगोत्सव. वसंत ऋतूचं स्वागत निरनिराळ्या रंगांची उधळण करून आपण तर करतोच. त्याबरोबर हिरवी कोवळी पालवी, आंब्याच्या मोहोराचा सुगंध, मोगरा, बहावा, पांगारा, पळस इ. विविध रंगांची फुले लेऊन वसुंधराही नटलेली असते.
प्रल्हादाच्या सत्प्रवृत्तीने त्याला अग्निदिव्यातूनही सफलता मिळाली तर ‘वरदान’ मिळालेली असूनही दुष्टप्रवृत्तीने होलिकेचा नाश झाला. ‘अहंभाव’, ‘मी’पणा व जे जे अनिष्ट ते ते सर्व जाळून त्याची होळी करा जाळून नष्ट करा, असा संदेश त्यातून मिळतो. हे वैचारिक पर्व समजले जाते.
पूर्वी प्रत्येक गावातून होळी पेटवण्याचा मान बहुधा पोलिस पाटलाचा असे. वाजतगाजत मिरवणुकीने येऊन पूजा, नैवेद्य झाल्यावर मोठी माणसे घरी जात व नंतर शेलक्या शिव्यांनी तरुणांचा ‘शिमगा’ सुरू होई. दुसºया दिवशी धुळवड. त्यात शरीराला हानिकारक काही नसे; पण फजिती असे. रंगाबरोबर आणखी बरेच काही असे, अगदी गटारातील घाणसुद्धा. ज्यांनी अशी ‘धुळवड’ पाहिली त्यांनाच निवडणुकीतील (शाब्दिक) धुळवड म्हणजे काय ते समजते. पण हल्ली मात्र दोन्ही प्रकारच्या धुळवडीत खूप बदल झालाय त्यामुळे गंमत संपलीये, शरीराला व मनाला इजा पोहोचवणारा ‘राडा’ उरलाय.
माझ्या लहानपणी शेतावरील लमाण मजूर होळीच्या दिवशी आमच्या घरी येऊन गाणे म्हणून नाच करीत. माझ्या वडिलांच्या अंगावरचा शर्टच त्यांना हवा असे. तो त्यांना भाग्याचा वाटे. म्हणून माझे वडील नवीन पांढरा नेहरू शर्ट घालून त्यांना सामोरे जात व नवीन शर्ट (अंगावरचा) काढून देत. त्यांच्या म्होरक्याला फार अभिमान वाटे, शर्ट व पुरणपोळी घेऊन त्यांचा ताफा परत फिरे. त्यांच्या पद्धतीने ‘शिमगा’ (बोंब मारणे) करीत जात.
नांदेडला गुरुद्वारातून शिखांची धार्मिक मिरवणूक निघते त्याला ‘महीला’ असे म्हणतात. त्यात मुख्य देवता पांढरा देखणा घोडा असतो. त्याला सोन्याचांदीच्या अलंकारांनी सजवतात. त्या घोड्यावरील जीनसुद्धा सोन्याने मढवलेलं असतं असे म्हणतात. ते ठरावीक रस्त्याने पळत जातो. त्याच्या बाजूने तलवारी घेतलेल्या मानाच्या व्यक्ती (बहुधा पंचप्यारे) धावत असतात.
काही ठिकाणी आदिवासी लोक नवीन निघालेले गहू, हरभरा इ. धान्य मडक्यात घालून ते मडके जमिनीत पुरून त्यावर होळी पेटवतात. काही दिवसांनी ते बाहेर काढतात त्याला ‘हूडा’ म्हणतात. हे धान्य पौष्टिक असतं, असं मानतात. शिवाजी महाराजांच्या काळातही रायगडावरील पेटलेल्या होळीतून सोन्याचा नारळ जो कोणी काढेल त्याला राजे सोन्याचं कड देऊन मानाचा फेटा बांधीत असत, असे सांगतात. रायगडावरील त्या जागेला आजही ‘होळी’चा माळ असेच म्हणतात.
परंतु हल्लीच्या धुळवडीने सगळी मजाच गेलीय. कुठे सिल्व्हर पेंट, तर कुठे झेरॉक्सची शाई किंवा आणखी घातक रसायने वापरली जातात, ज्यामुळे मनाला व शरीराला इजा पोहोचते ‘ऐसी रंग दे रंग नाही छूटे... धोबिया धोए सारी उमरिया’ या ओळी वेगळ्या अर्थाने खºया होताहेत. आपण भारतीय अग्निपूजक आहोत, त्याचं प्रतीक म्हणून होळी पुजली जाते. समता, एकात्मता व बंधुत्वाची शिकवण देणारी होळी खिलाडू वृत्तीनेच साजरी व्हावी एवढीच इच्छा.
वसंत ऋतूचे आगमन म्हणजे ऋतू परिवर्तनाची चाहूल. या परिवर्तनाचे म्हणजेच येणाºया उन्हाळ्याचेही हसतमुखाने स्वागत करूया. कारण उन्हाच्या झळा सोसल्याशिवाय वर्षा ऋतूचे सुख कळणार नाही.