आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी एक मानसशास्त्रीय उकल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंतर्विरोध मोदींमध्ये नव्हे, तुमच्यात आणि माझ्यात आहे. त्यांच्यासाठी धावा होणे गरजेचे आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर एकेरी, दुहेरी, लेगबाय, बाय, चौकार, षटकार... यांपैकी कोणताही मार्ग त्यांना वर्ज्य नाही...

राजकीय नेते नव्वद टक्के प्रसंगांत अभिनयाच्या अंगानेच जनतेला सामोरे जात असतात. अभिनयाचाच आधार घेत लोकांपुढ्यात परिस्थिती मांडत असतात. ती मांडताना समोरचा ऑडियन्स, त्याचा बुद्ध्यांक, त्याचा भावनांक याचं अचूक भान ठेवत असतात. त्यानुरूप आवाजातले चढ-उतार, पॉझ हे सारं जुळवून आणत असतात. प्रत्येक यशस्वी राजकीय नेत्यामध्ये हा अभिनयाचा अंश कमी-अधिक प्रमाणात सापडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा त्याला अपवाद नाहीत.

मोदींचे व्यक्तिमत्त्व नि:संशय वर्चस्ववादी स्वरूपाचे आहे. अलीकडच्या काळात त्यांच्याइतका प्रभावी वक्ता जनतेने अनुभवलेला नाही. टार्गेट ऑडियन्स ओळखणे, हेतूंनुसार मांडणी, उदाहरण आणि संवादाचा विषय बदलत राहणे यात त्यांचा हातखंडा आहे. कुठे बुद्धीचा वापर करायचा, कुठे भावनिक व्हायचे, कुठे निष्ठुर व्हायचे, कुठे व्यवहार पाहायचा, याच्या त्यांच्या जागा बदलत्या आहेत. जनतेची भावनिक नस ओळखण्यात अजून तरी त्यांना अपयश आलेले नाही. संकटातून संधी साधण्याची त्यांची क्षमता विरोधकांना असूया वाटावी अशी आहे. परंतु आजच नव्हे, कारकिर्दीच्या प्रारंभापासूनच ‘जैसी जरुरत, वैसा परफॉर्मन्स’ हे तत्त्व ते अवलंबत आले आहेत. त्यांच्या बाजूने ‘रिझनिंग’मध्ये कमतरता जाणवत असली तरीही त्याचे म्हणून त्यांचे एक प्रेझेंटशन आहे. शिवाय ‘लॉजिक ऑफ इमोशनल अपील’मध्ये ते सहसा चुकत नाहीत. म्हणूनच जनतेचा चटकन त्यांच्या म्हणण्यावर विश्वासही बसतो. तो का बसतो? काही लोक म्हणतात, काकडी खा, टोमॅटो खा, कांदा खा. काही लोक म्हणतात, सँडविच खा. असे म्हणण्याची चतुराई दाखवणाऱ्या मोजक्यांमध्ये मोदी मोडतात. एखादी साधीशीच गोष्ट आकर्षक वेष्टनात पेश करण्याची त्यांची हातोटी विरोधकांना बुचकळ्यात पाडते. ‘विकासपुरुष’ या आपल्या प्रतिमेचा त्यांना कधीच विसर पडत नाही.

‘सेल्फसेंट्रिक डिसिजन मेकिंग’ हा अनेकांना मोदींचा सगळ्यात मोठा अवगुण वाटतो. पण ते हरघडी स्वत:च्या निर्णयात सामान्य माणसाला जोडून घेण्याची राजकीय चतुराई दाखवतात. या संदर्भात त्यांचे ३१ डिसेंबर २०१६चे देशाला उद्देशून केलेले भाषण आठवावे. या भाषणाची त्यांनी अशी काही मांडणी केली की, नोटाबंदीच्या निर्णयाने ज्यांची गैरसोय झाली, ज्यांच्यावर आपत्ती कोसळली, ज्यांनी दु:ख अनुभवले तेही खूश झाले. एरवी मोदी एखाद्याला वॉर्निंग देतात, पण त्यातही इमोशनल कॉर्ड हरवू देत नाहीत. ‘वॉर्निंग वुइथ इमोशन्स’ हे मानसशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी अस्त्र ठरते. यात ते इंदिरा गांधींच्या पंक्तीत नेमके बसतात. इंदिराजींनाही भावनांच्या वापराचे अचूक भान होते.

जागतिक नेत्यांची नाडी त्या अचूक ओळखून होत्या. त्यानुसार आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून संबंधित नेत्याला आपलेसे करत होत्या. मोदी हेच करतात. ‘वो कहते है मोदी को हटाओ, मैं कहता हूँ काले धन को हटाओ...’ हे त्यांचे अलीकडचे वक्तव्य तर इंदिराजींच्या ‘वो कहते है इंदिरा हटाओ, मैं कहती हूँ गरिबी हटाओ...’ या भावूक वक्तव्याची पुरेपूर आठवण करून देणारे ठरते.
प्रत्येक नेता आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अनुयायांपुढे शत्रू उभा करत जातो, त्यालासुद्धा मोदी अपवाद नाहीत. मोदींनी उभे केलेले तीन शत्रू आहेत. पाकिस्तान, गरिबी आणि भ्रष्टाचार. हे तिन्ही राष्ट्रीय मुद्दे आहेत. गरजेेनुसार ते यापैकी एकाला किंवा एकाच वेळी तिघांनाही एकत्र आणून विरोधकांना भांबावून टाकतात आणि अनुयायांना प्रभावित करतात. पोलिटिकल-सोशल सायकॉलॉजी याकडे ‘जनरलाइज्ड मोटिव्ह’ या नजरेतून पाहते. असे करून ते आपली व्होट बँक विस्तारतातच, जशी एकेकाळी कांशीराम-मायावतींनी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग साधून विस्तारली होती, परंतु त्याहीपेक्षा मोदी सर्वसामान्यांना तात्पुरता का होईना, एक उद्देशही देतात.

वक्तृत्व हे मोदींचे सगळ्यात मोठे बलस्थान. पण हेच मोदी विरोधकांनी कितीही धिंगाणा घातला तरीही संसदेत मात्र अहंकाराची झालर असलेला हटवादीपणा (स्टबर्ननेस) दाखवतात. चेहऱ्यावर सौम्य नव्हे, कठोर भाव आणतात. त्या वेळचे किंवा इतर प्रसंगांतले  त्यांचे मौन विरोधकांमध्ये एकाच वेळी चीड, संताप आणि असुरक्षितता निर्माण करते. मुळात ज्या प्रतिसादामुळे आपले त्रैराशिक  बिघडेल, असे त्यांना काहीही करायचे नसते. याचे एक कारण म्हणजे, विरोधकांना प्रहार करण्याची त्यांना कोणत्याही परिस्थितीत संधी द्यायची नसते. प्रहार महत्त्वाचा असतो. प्रतिप्रहार  बेमतलब असतो, याचे त्यांचे भान सुटत नाही. 

मानसशास्त्र मोदींसारख्या नेत्याची नार्सिसिस्ट अर्थात आत्मप्रेमात गढलेल्या माणसांमध्ये नक्कीच मोजदाद करते. मात्र, "नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ स्वरूपाचा त्यांना आजार जडलेला आहे, असे म्हणत नाही.  कारण, नार्सिसिस्ट असणे हे मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचे  केवळ एक अंग आहे. कविता करणे, सत्तेची अभिलाषा धरणे, आकर्षणाचा केंद्रबिंदू राहण्याची धडपड करणे हीसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाची इतर अंगे आहेत. अशा माणसांना स्वत:ची स्तुती ऐकायला आवडते. लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होणे आवडते. ही लाट कमी होऊ लागली की, अशी माणसे अस्वस्थ होतात. त्यात ती बहुसंख्य वेळा विरोधी मताच्या युक्तिवादावर विश्वास ठेवणारी नसतात. मोदीसुद्धा ज्यांना मानतात, केवळ त्यांच्याच विरोधी मताला (काऊंटर आर्ग्युमेंट) किंमत देतात. बुद्धिजीवींचे त्यांना एका मर्यादेनंतर फारसे महत्त्व नसते. तसे ते आपल्या कृतीतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दाखवूनही देत असतात. कारण, सुरुवातीला म्हटले तसे मोदी रिझनिंगमध्ये उणे पडतात, पण म्हणून ते बुद्धिजीवीवर्गाला समजवायला जात नाहीत वा त्यांच्या शंका-संशयाचे निराकरणही करत नाहीत. कारण, १० टक्के बुद्धिजीवींना पटवून देण्यात शक्ती व्यर्थ घालवण्यापेक्षा ९० टक्के सामान्य लोकांना भावनिकदृष्ट्या जोडून घेणे एक राजकारणी म्हणून त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. इथेसुद्धा ते व्यवहाराचे गणित पाहात असतात. परंतु मोदीच कशाला, आजवर जितके ताकदवान नेते झाले आहेत, त्यातील बहुतेकांनी विरोधी मताला फारशी किंमत दिलेली नाही, हेही तितकेच खरे असते.

मोदी एका व्यासपीठावर एक बोलतात, दुसऱ्यावर दुसरे बोलतात. बऱ्याचदा टीकाकारांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अंतर्विरोध जाणवतो. त्यांचे व्यक्तिमत्व अतिवर्चस्ववादी (ओव्हरपॉवरिंग), अधिकारशाहीवादी (अथॉरेटेरियन), अतिमहत्त्वाकांक्षी  (ओव्हरअॅम्बिशिअस) या त्रिदोषांनी भरलेले असल्याचे जाणवते. परंतु माझ्या मते, अंतर्विरोध मोदींमध्ये नव्हे, तुमच्यात आणि माझ्यात आहे. त्यांच्यासाठी धावा होणे गरजेचे आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर एकेरी, दुहेरी, लेगबाय, बाय, चौकार, षटकार कोणताही मार्ग त्यांना वर्ज्य नाही. असुरक्षितता ही प्रत्येक माणसामध्ये असते. तशी ती मोदींमध्येही आहे. पण असुरक्षिततेचा अचूक अंदाज घेऊन त्या हिशेबाने ‘करेक्टिव्ह मेशर्स’ घेण्यात सध्या तरी ते वाकबगार असल्याचे दिसत आहे.

मोदींचा कामाचा झपाटा, परिस्थितीवर एकछत्री अंमल राखण्याचा स्वभाव आणि सत्तेवरची पक्की मांड पाहता अनेकांना असाही प्रश्न पडतो की, उद्या जेव्हा कधी सत्ता जाईल, तेव्हा मोदींचे काय होईल? ते त्या परिस्थितीला कसे सामारे जातील? साधारणपणे सत्ता मग ती कुठच्याही स्वरूपाची असो, ती हातची गेली की माणसामध्ये नैराश्य येते. तो निराशेच्या खोल गर्तेत सापडतो. ही शक्यता अनेकांमध्ये असते. पण जर मोदींमधला राजकारणी माणूस आतून खंबीर असेल, अध्यात्मिकतेशी स्वत:ला जोडून घेणारा असेल, महत्त्वाचे म्हणजे, पोलिटिकल डाऊनफॉल हा इंडिव्हिज्युअल डाऊनफॉल नाही, हे ओळखणारा असेल तरच तो सन्मानपूर्वक तगून राहील...
- डॉ. प्रशांत भिमानी
बातम्या आणखी आहेत...