आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अथांग आणि चिरंतन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग म्हणजे आसने, एवढीच मर्यादित समज बहुतेकांची झालेली असते. आज योग दिन साजरा करताना जगभर आसनांचे सोहळे साजरे होतील. खरे तर आसने उपयुक्त आहेतच, पण ती योगाचे मुख्य अंग नाहीत. योगाची मुख्य भूमी मन ही आहे. म्हणूनच आसनाचार्यांना योगाचार्य मानणे ही मोठीच चूक आहे. योग भारतीय संस्कृतीतले असले तरीही त्यावर फक्त आपलाच हक्क आहे, असे म्हणणे म्हणजे तर योगदर्शन समजले नाही, अशी कबुलीच देणे आहे...

योग म्हणजे आसने, हा समज सर्वांच्या मनात पक्का बसला आहे. आज योग दिन साजरा करतानाही जगभर आसनांचे सोहळे साजरे होतील. उत्तम शरीरप्रकृतीसाठी आसने उपयोगी आहेत, यात शंकाच नाही; पण योगाचे ते एक अगदी लहानसे अंग आहे. पतंजलींच्या सर्व १९५ सूत्रांमध्ये फक्त एक सूत्र आसनांसाठी आहे. शरीराला स्थिरता व सुख देणारी अवस्था म्हणजे आसन, इतकेच पतंजली म्हणतात.

अर्थातच पतंजलींचा योग हा फक्त आसनांचा योग नव्हे, तर ते एक दर्शन आहे. किंबहुना भारतीय ऋषींनी जगासमोर ठेवलेल्या अद्वैत दर्शनाचे प्रायोगिक अंग म्हणजे योग दर्शन. चराचर विश्वात एकमेव चैतन्य भरलेले आहे व प्रत्येक माणूस हा त्या चैतन्याचा एक आविष्कार आहे, असे अद्वैत दर्शन सांगते. या एकमेव चैतन्याचा साक्षात अनुभव देणारा हमखास मार्ग, म्हणजे योग.

योग ही मनाची भूमी आहे. पाच इंद्रियांबरोबर मनालाही आतमध्ये वळविले आणि विचारांच्या उगमाचा खोलवर वेध घेतला की चैतन्याची द्वारे उघडतात, असे योगदर्शन सांगते. ही आत वळण्याची प्रक्रिया कशी घडवावी, याचे मार्गदर्शन योगसूत्रे करतात. ती अत्यंत संक्षिप्त आहेत, पण त्यामध्ये अथांग अर्थ भरलेला आहे. मुख्य म्हणजे, त्यानुसार आचरण केले तर काय फळ मिळते, हे त्यामध्येच सांगितले आहे. तेथे विश्वास, श्रद्धा असल्या गोष्टींंना स्थान नाही. उदाहरणार्थ समाधीच्या सविर्तक, सविचार, सानंद व सास्मित अशा चार अवस्था आहेत. प्रत्येक अवस्थेत काय अनुभव येतील, हे स्पष्टपणे सांगितले आहे. प्रयोग करा आणि अनुभव घेऊन पाहा. प्रत्येक सूत्र म्हणजे एक पायरी आहे व त्या पायरीवर पक्के उभे राहिले की काय दिसेल, हेही सांगितले आहे. मोजक्या भाषेत जगण्याचे असे शास्त्र अन्य कोणी सांगितलेले नाही.

हे शास्त्र सांगताना व्यक्ती आणि समाज या दोन्हींचा विचार अत्यंत सहजतेने केला आहे. उदाहरणार्थ, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या यमांचा विचार करा. यातील अहिंसा सर्व राष्ट्रांनी अमलात आणली तर युद्धसामग्रीवरील अब्जावधी रुपये समाजासाठी वापरता येतील. (अपरिग्रह म्हणजे आवश्यक तितकेच जवळ बाळगणे, हा आचरणात आणला तर जगात कधीच आर्थिक मंदी येणार नाही. आजच्या अर्थव्यवस्थेच्या घातक चक्राला कारण अर्थशास्त्राचे नियम नसून माणसाची आत्यंतिक हाव हे आहे. पण ही हाव कोणालाच सोडायची नसल्याने माणूस पुन्हा पुन्हा या घातचक्रात फसत आहे.)

यमांबरोबर सांगितलेले तप, संतोष, स्वाध्याय, शौच, ईश्वरप्रणीधान हे नियम व्यक्तीच्या जीवनाला दिशा व स्थिरता देणारे आहेत. स्वाध्याय म्हणजे कोणत्याही विषयाचा अभ्यास. मग ती कला असेल, विज्ञान असेल, वा व्यवहारशास्त्र असेल. शौच म्हणजे स्वच्छता. इथे बाह्य स्वच्छतेबरोबर मानसिक स्वच्छतेलाही महत्त्व आहे. संतोष हा तर फार मोठा गुण आहे. योगदर्शनातील ईश्वरप्रणिधानाचे सूत्र जिज्ञासूंनी, विशेषत: ईश्वराला हद्दपार करू पाहणाऱ्यांनी समजून घेण्यासारखे आहे. ईश्वर या शक्तीची काटेकोर व्याख्या फक्त योगदर्शनात मिळते. क्लेश, कर्म, विपाक, आशय तसेच देश, काल, वस्तू यांच्या अतीत म्हणजे याहून वेगळी अशी जी ऊर्जा त्याला ‘ईश्वर’ हे संबोधन आहे. ही शास्त्रीय व्याख्या आहे. ईश्वराची काव्यात्मक ‌व्याख्या नासदीय सूक्त आणि अमृतानुभवात मिळते.

व्यक्तीमधील सात प्रेरणांचा योगदर्शनात जसा विचार झाला आहे, तसा तो आजच्या आधुनिक मानसशास्त्रातही आढळत नाही. प्रेप्सा, जिहासा, िचकिर्षा व जिज्ञासा या उघड दिसणाऱ्या चार प्रेरणा. काही हवेसे वाटणे ही प्रेप्सा, काही नकोसे वाटणे, ही जिहासा. हवेसे वाटणारे हस्तगत करण्यासाठी धडपड करण्यास भाग पाडणारी चिकिर्षा आणि नवीन काय ते शोधणारी वा कुतूहल शमविण्यास उद्युक्त करणारी ती जिज्ञासा. मोकळेपणे विचार केला, तर जगाचा सर्व खेळ या चार प्रेरणांवरच सुरू असतो.

तथापि, यांच्याही पलीकडे दडलेल्या शोक, भय आणि अतृप्ती या तीन मूलभूत प्रेरणा आहेत, ज्या जगाला हलवित असतात. मागील घटना आठवताना वाटणारी हळहळ किंवा ‘मी असे करायला हवे होते किंवा मी तसे केले असते तर...’ अशा विचारांतून किंवा हातातून काही निसटून गेल्यावर मनाला व्यापून राहणारी भावना तो शोक. या उलट उद्या काय होईल, माझे नीट चालेल ना, मला, माझ्या कुटुंबाला काही होणार नाही ना, अशी सतत ग्रासणारी आशंका म्हणजे भय. आणि कितीही मिळविले तरी समाधान न मिळवून देणारी अतृप्ती. यातील शोक व भय हे काल(टाइम) या संकल्पनेशी निगडित असतात, तर अतृप्ती ही चित्ताची कायमस्वरूपी अवस्था असते.

योगदर्शन असे सांगते की, अविद्येचा कणा मोडला की, अतृप्ती घालविता येते. स्वत:चे खरे स्वरूप व्यक्तीला कळले, ‘द्रष्टा स्वरूपात अवस्थित झाला’ की अतृप्ती, भय, शोक हे आपोआप नाहीसे होतात. अन्य कोणत्याही उपायांनी त्यांना दूर सारता येत नाही. आनंदाचा उगम हा आपल्या मनात असतो, बाहेरच्या वस्तू वा परिस्थितीत नसतो, हा भारतीय तत्त्वज्ञानाचा ठाम सिद्धांत आहे. एकदा आतला आनंद मिळाला, की वर उल्लेखलेल्या यम-नियमानुसारच माणूस वागतो आणि त्याच्या मनात व समाजात कैवल्याचा म्हणजे निष्कपट आनंदाचा आविष्कार सतत होत राहतो.

मनातील कैवल्याचा ठेवा शोधण्यासाठी योगदर्शनात तीन प्रमुख मार्ग सांगितले आहेत. संयम, प्रतिप्रसव आणि ईश्वरप्रणिधान. यातील संयम म्हणजे स्वत:वर नियंत्रण, हा अर्थ इथे नाही. संयम म्हणजे ध्यान, धारणा, समाधी यांचा संगम किंवा बोलीभाषेत एखाद्या विषयाशी बराच काळ तादात्म्य साधण्याची, एकतान होण्याची कला. जगाची कोडी उलगडणारा आइनस्टाइन सारखा शास्त्रज्ञ जेव्हा चिंतनात गढलेला असतो, किंवा एखादा प्रतिभाशाली कवी वा संगीतकार रचना करीत असतो, ती अवस्था योगदर्शनातील संयमाच्या ज‌वळपास जाते. योगात स्वत:च्या चित्तावर, म्हणजे मनाच्या अगदी सूक्ष्म कारभारावर, उलाढालींवर संयम साधायचा असतो. म्हणजेच स्वत:ची ओळख करून घ्यायची असते. संयमाला जोड द्यायची असते, ती प्रतिप्रसवाची. प्रतिप्रसव म्हणजे कार्याचा कारणात विलय करणे. विचाराची गुंडाळी उलटी करीत मूळ रूपात घेऊन जाणे म्हणजे प्रतिप्रसव. हे अतिशय कठीण काम आहे. एक वेळ जमिनीवर सांडलेल्या पाऱ्याला एकत्र करता येईल, पण विचाराला पकडून त्याचा उलटा माग घेणे महाकठीण. हे जमण्यासाठी विचारांची गर्दी कमी झाली पाहिजे. त्यासाठी वैैराग्य. डोक्यातील व्यवधाने कमी असतील तर विचारांचा माग घेणे व स्वच्छ विचार करणे सोपे जाते. वैराग्य हे आनंदासाठी हवे व तो आनंद आपल्या आत असतो. पण आपण आनंद बाहेरच्या गोष्टीत आहे असे मानतो व अपरिग्रहाच्या ऐवजी जास्तीत जास्त साठवण करीत राहतो.

तथाकथित पुढारलेल्या जगाला आज दोन रोगांनी झपाटले आहे. ते रोग शरीराचे नसून मनाचे आहेत व या रोगांवर खूप मोठे संशोधन सुरू आहे. अतृप्ती (क्रॅव्हिंग) व चित्तविक्षेप (डिस्ट्रॅक्शन) हे ते दोन रोग. यातील अतृप्तीवर अलीकडेच ‘इकॉनॉमिस्ट’ या विख्यात साप्ताहिकाने विशेष लेख केला होता. हावरेपणा व चंचलता या रोगांनी प्रत्येक तथाकथित आधुनिक समाजाचा व त्यातील कुटुंबांचा ताबा घेतला आहे. अगदी आपल्या आजूबाजूलाही याच दोन रोगांचे थैमान आढळेल. मोबाइल व असंख्य टीव्ही चॅनेल्स आणि चैनबाज संस्कृती या रोगांचा फैलाव करण्यास जबरदस्त हातभार लावीत आहेत. त्यात भर पडते आहे ती, अर्थव्यवस्थेची. आपला आर्थिक व सामाजिक विकासही हावरेपणावर अवलंबून राहू लागला आहे. अमेरिका तर निश्चितपणे हावरेपणाचे तत्त्वज्ञान मांडणारी आहे व आपण तिला बळी पडत आहोत.

हावरेपणा व चंचलता हे मनातील दोन रोग शारीरिक पातळीवर उतरतात आणि अनेक रोगांना जन्म देतात. आपण त्याला जीवनशैलीतून येणारे रोग (लाईफस्टाईल डिसिज््) असे गोंडस नाव देतो व भरपूर औषधे घेत त्याकडे दुर्लक्ष करतो. पण त्याचे मूळ आपल्या विचारांत असते. आनंद मिळविण्यासाठी समाजात स्थान हवे (अविद्या), ते स्थान मिळविण्यासाठी पैसा हवा व गरिबी नको (प्रेप्सा व जिहासा), पैसा मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारे धडपड हवी (चिकिर्षा) किंवा पैसा मिळविण्याची साधने हुडकायला हवीत (जिज्ञासा) अशा चक्रात आपण फसतो. पैसा मिळविण्याची धडपड करताना काही रोग शरीरात येणारच, असे धरून चालतो. पण ही धडपड कधीही समाधान देत नाही. अतृप्त अवस्थेतच आपण जगाचा निरोप घेतो. कारण आनंद बाहेर आहे, हे मूळचे गृहीतकच चुकलेले असते.

गृहीतक चुकले की, जगणे क्लेशदायक होते. योगदर्शन हे क्लेशमुक्तीसाठी आहे. शारीरिक क्लेशमुक्ती ही फार छोटी गोष्ट आहे. खरी क्लेशमुक्ती मानसिक आहे. क्लिष्ट व अक्लिष्ट असे जगण्याचे दोन मार्ग आहेत, असे योगदर्शनात स्पष्ट म्हटले आहे. ‘मी कोण’ हे मूळचे गृहीतक चुकले की मानसिक शक्ती त्रासदायक होतात, जशा त्या आता झाल्या आहेत. मात्र गृहीतक बरोबर झाले की त्याच शक्ती कैवल्याकडे घेऊन जातात. भय, शोक, अतृप्ती हे दूर झाले तर आपल्या रोजच्या जगण्यातही किती मजा येईल, याची थोडी कल्पना तरी करून पाहा.
भय, शोक, अतृप्ती दूर करणारे योगदर्शन जगाला सांगितले पाहिजे, नुसती आसनांची कसरत नव्हे. आसने उपयोगी आहेत, पण ती योगाचे मुख्य अंग नाहीत. म्हणून आसनाचार्यांना योगाचार्य समजण्याची चूक समाजाने करू नये. अतिशय कठीण अशी आसने करणाऱ्यांचे कौतुक जरूर करावे; पण शेवटी ती कसरत आहे, योगाची मुख्य भूमी मन ही आहे, हे लक्षात ठेवावे. भय, शोक व अतृप्ती यापासून मुक्त झालेला योगाचार्य होतो. आपल्या भोवतीचे आसनाचार्य तसे झाले आहेत का, याची तपासणी करावी.

अरविंद, जे कृष्णमूर्ती, रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद हे असे योगाचार्य होते आणि त्यांना योगाचा प्रसार करावा लागला नाही. जग त्यांच्याकडे चालत आले. ज्ञानेश्वर हे तर योगियांचा राणा. जगातील आपले काम झाले हे लक्षात आल्याबरोबर स्वत:हून उठून जाणारे. वैराग्य म्हणजे रुक्षता, असे आपण समजतो. पण योगी जगणे किती रसपूर्ण करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून ज्ञानेश्वरांच्या काव्यरचनेकडे पाहावे. योगी व्यक्तीचे वैराग्य हे सुंदर असते, रसपूर्ण असते, जगण्यातील आनंदाला थेट भिडणारे असते. ‘भूता परस्परे पडो, मैत्र जिवांचे,’ अशी प्रार्थना फक्त योगीच करू शकतो. कारण मैत्री या भावनेला योगसूत्रात महत्त्वाचे स्थान आहे.

असे योगदर्शन भारतात जन्मले, हे आपले भाग्य. पण म्हणून त्यावर फक्त आपला हक्क आहे, असे म्हणणे म्हणजे योगदर्शन समजले नाही, अशी कबुली देणे. योगदर्शन हे माणसांसाठी आहे. भय, अतृप्ती व शोक आदी विकार-भावनांनी जगातील प्रत्येक, अगदी प्रत्येक माणसाला वेढले आहे. योगदर्शन, भगवद‌्गीता, उपनिषदे सांगितली गेली, तेव्हा लोक एकमेकांना हा हिंदू, हा यवन, हा ख्रिश्चन म्हणून ओळखत नव्हते. तशा व्याख्या पडल्या नव्हत्या. त्या वेळचे ऋषी फक्त माणूस म्हणून स्वत:चा व लोकांचा अभ्यास करीत होते. म्हणून योगदर्शन हे माणसांचे, म्हणजे तुमचे व आमचे आहे. आनंदाने जगायला शिकविणारे आहे.

(मुख्य संदर्भ : योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर यांचा "भारतीय मानसशास्त्र अर्थात पातंजल योगदर्शन' हा अद्वितीय ग्रंथ.)
(prashant.dixit@dbcorp.in)
बातम्या आणखी आहेत...