आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prashant Dixit About Narendra Modi, Rasik, Divya Marathi

ब्रँड मोदी, संचित आणि नवता...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मोदींच्या विजयाकडे विशिष्ट चश्म्यातून पाहणार्‍यांची गर्दी सध्या उसळली आहे. हा चश्मा डाव्या विचारसरणीचा आहे, तसाच उजव्या विचारसरणीचाही आहे. डाव्या व उजव्या अशा दोन्ही विचारधारा आपापल्या परंपरेला कुरवाळीत मोदींच्या विजयाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असल्याने, एका अर्थाने दोघेही प्रतिगामीच आहेत...'

लोकसभेसाठी झालेल्या झंझावाती प्रचारातून नरेंद्र मोदी हा नवा ब्रँड राष्ट्रीय स्तरावर स्थापन झाला. लोकसभेवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित करणारा विरोधी पक्षातील हा एकमेव ब्रँड.
नरेंद्र मोदी या ब्रँडची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांकडे न पाहता मोदींच्या विजयाकडे विशिष्ट चश्म्यातून पाहणार्‍यांची गर्दी सध्या उसळली आहे. हा चश्मा डाव्या विचारसरणीचा आहे, तसाच उजव्या विचारसरणीचाही आहे. मोदी विजयामुळे पोटभरू डाव्या बुद्धिमंतांचे पित्त खवळणे साहजिक आहे. त्यातही काँग्रेसच्या वळचणीला राहणार्‍यांना, उद्या पोट कसे भरावे याची चिंता पडल्यामुळे मोदींच्या विरोधात ते रान उठवत राहणारच. परंतु प्रामाणिक डाव्या विचारवंतांनाही या ब्रँडचे वैशिष्ट्य लक्षात आलेले नाही वा लक्षात येऊनही त्याचे प्रामाणिक विश्लेषण करण्याची त्यांची तयारी नाही. दुसर्‍या बाजूला, उजव्या बुद्धिजीवींमध्ये विजयाचा उन्माद दिसत आहे. परंपराग्रस्त विचारधारेवर भारतीयांचे शिक्कामोर्तब झाल्याचा ग्रह त्यांनी करून घेतला आहे. डाव्या व उजव्या अशा दोन्ही विचारधारा आपल्या परंपरेला कुरवाळीत मोदींच्या विजयाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असल्याने, एका अर्थाने दोघेही प्रतिगामीच आहेत.

मोदींनीही देशाच्या पूर्वपरंपरेचाच वापर करीत पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली आहे. परंतु हे करताना त्यांनी परंपरेचा धागा वर्तमान जीवनपद्धतीशी सफाईने जुळवला. यामध्येच त्यांच्या नेतृत्वाचे यश आहे. सध्याच्या भारतीय नागरिकाची नस त्यांनी उत्तम पकडली. या भारतीय नागरिकाच्या मनातील सुप्त व उघड प्रेरणांना थेट आवाहन करील असे प्रचारतंत्र आखले. त्याला तंत्रज्ञानाची जोड देत एकाच वेळी धर्म व तंत्रकुशलता यांचा धागा गुंफला. तंत्रज्ञान व धर्मनिष्ठा या दोन टोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी राष्ट्रप्रेमाचा वापर केला. भारतातील कोट्यवधी नागरिकांमध्ये आशा जागवली, उत्साह निर्माण केला व भाजपला मत देण्यास भाग पाडले.
挿मी हिंदू राष्ट्रवादी आहे,・असे स्पष्टपणे सांगत मोदींनी प्रचाराला सुरुवात केली. हिंदू राष्ट्रवादी काय करू शकतो, याचा आविष्कार गुजरात मॉडेलमधून लोकांसमोर उभा केला. त्यांचा प्रचार हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार होता. टिळेमाळा लावणारा, मध्ययुगातील वेशभूषा करून लोकांना नादी लावणार्‍या भंपक बुवा-बापूंसारखा हा हिंदू राष्ट्रवादी नव्हता. तर टाटा-अंबानींसारख्या उद्योजकांकडून वाहवा मिळवणारा, प्रचारात थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करणारा, व्यवस्थापनशास्त्रातील भाषेत बोलणारा असा हा हिंदू राष्ट्रवादी・होता. तो बजरंगी वा तोगडियावादी नव्हता तर उद्योजक होता. हिंदुत्वाचा अभिमानी असला तरी दैववादी नव्हता, तर प्रयत्नपूर्वक संपत्ती निर्माण करण्यावर भर देणारा होता. धार्मिक अहंगंडामुळे प्रचलित हिंदुत्ववाद्यांमध्ये प्रकट होणारी, जगातील अन्य देशांबद्दलची तुच्छतावृत्ती या राष्ट्रवादी हिंदूमध्ये दिसत नव्हती, तर जगातील प्रगतिशील व बलवान राष्ट्रांबद्दल आस्था होती. सर्व उत्तरे आम्हाला मिळाली आहेत, अशी खुळचट मुरली वाजवण्याची धडपड नव्हती, तर जगाकडून शिकण्याची वृत्ती होती. मोदी ब्रँडची ही वैशिष्ट्ये तरुणाईला भावली.

परंपरा व आजचे युग याचा मेळ मोदींनी उत्तम रीतीने साधला. तथापि, केवळ असा मेळ साधण्यात मोदी ब्रँडची ताकद नव्हती. ती ताकद होती निर्णय घेण्याच्या व काम करून दाखवण्याच्या कार्यशैलीत. गुजरातमध्ये ती ठसठशीतपणे दिसली. अन्य राज्यांतून गुजरातमध्ये पोटापाण्यासाठी जाणार्‍या लक्षावधी मजूर व कारकुनांनी ती आपापल्या राज्यांत पोहोचवली. उत्तर प्रदेशातील घराघरात मोदी पोहोचले ते केवळ अमित शहांमुळे, नव्हे तर स्थलांतरित मजुरांनी केलेल्या प्रचारामुळे. ब्ल्यूप्रिंटची बोलबच्चनगिरी करणारे नेते बरेच होते, पण ती प्रत्यक्षात उतरवणारे हिंदू राष्ट्रवादी・मोदी एकटेच होते.


प्रगतीकडे घेऊन जाणारे बदल घडवणार्‍या मोदींच्या कार्यशैलीला जोड मिळाली, ती प्रत्येक संकटाकडे संधी म्हणून पाहण्याच्या वृत्तीची. तरुणाई व मध्यमवर्गाबरोबर खेड्यापाड्यांतील भारतीय या वृत्तीमुळे भारून गेले. गेली बारा वर्षे प्रत्येक पातळीवर मोदींना प्रखर विरोध झाला. त्यांचे सैतानीकरण केले गेले. सरकारी चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे होता. त्यांना अटक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले. त्यांची अटक हेच एकमेव लक्ष्य असल्याचे कपिल सिब्बल यांनी 2009च्या निवडणूक निकालानंतर उघडपणे सांगितले. सीबीआय, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली एसआयटी, अशा अनेक तपास यंत्रणांनी खोदून खोदून चौकशी केली. कित्येक तास उलटतपासणी केली. पण मोदींविरुद्ध लहानसाही पुरावा मिळू शकला नाही. मोदींनी या सर्वाला शांतपणे तोंड दिले.

देशातील काँग्रेसनिष्ठ बुद्धिजीवी वर्गाने त्यांना सैतान ठरवले. अन्य पक्षांनी वाळीत टाकले. इतकेच काय, स्वपक्षीयांनीही प्रत्येक पायरीवर अडचणी उभ्या केल्या. पण मोदी सर्वांना पुरून उरले. मार्केटमधील प्रत्येक आव्हान परतवून लावीत स्वत:चे प्रॉडक्ट लोकांच्या मनावर ठसवणार्‍या कर्तबगार सीईओप्रमाणे मोदींनी राजकीय वाटचाल केली.

इच्छाशक्तीच्या या जबरदस्त आविष्काराकडेच कोट्यवधी नवमतदार खेचले गेले. सत्र न्यायालयाने क्लीन चिट देताच नवमतदारांमध्ये मोदींचा शेअर एकदम वधारला. हा माणूस रड्या नाही, त्वेषाने लढणारा आहे. हिंदू असल्याचा जसा त्याला अहंगंड नाही, तशीच हिंदू असल्याबद्दल खंतही नाही. एका पातळीवर हा हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगतो, आणि दुसर्‍या पातळीवर सध्याच्या युगालाही आपलेसे करतो. तो हिंदू असला तरी प्रतिगामी, बजरंगी हिंदू नसून, उत्तम प्रशासक व व्यवस्थापक आहे. ब्रँड मोदीची ही खासियत लोकांना आवडली.
आपला ब्रँड सर्व थरांतील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदींनी विविध प्रतिमांचा चाणाक्षपणे (टीकेखोरांच्या मते धूर्तपणे) वापर करून घेतला. हिंदू राष्ट्रवादी・म्हणून सुरुवात केल्यावर, गरिबीला कुठे धर्म असतो, असा सवाल करीत निवडणूक प्रचाराला विकासाच्या टप्प्यावर नेले.
(prashant.dixit@dainikbhaskargroup.com)