आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमाचा दिवटा जर्मनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रीकांना पुन्हा उभे राहण्याची संधी द्यावी, असे जगाने ठरविले आहे. कर्जातून बाहेर पडून स्वाभिमानाने पुन्हा उभे राहण्यासाठी आता ग्रीकांना काटकसरीने राहावे लागेल. पन्नाशीत निवृत्तीवेतन घेऊन रोज सायंकाळी मौजमजा करण्याचे दिवस आता संपले. मदत करणारे देश ग्रीसकडून पै अन‌् पैचा हिशेब मागणार आहेत. यात आघाडीवर आहे जर्मनी. ग्रीकांच्या कर्जाचा मोठा वाटा जर्मनीच उचलणार असल्याने, हिशेब मागण्याचा अधिकार त्यांनाच सर्वात जास्त असणार. जर्मनी बजावत असलेला हा अधिकार ग्रीकांना अर्थातच सहन होत नाही. त्याविरुद्ध जाहीर निषेध सुरू झाला आहे. कर्जफेडीचे कारण दाखवून जर्मनी सार्वभौमत्वावर घाला घालीत असल्याचा कांगावा ग्रीक नागरिक करत आहेत. परंतु ग्रीकांबरोबर युरोप-अमेरिकेतील अर्थशास्त्रीही अशीच भाषा बोलतात, तेव्हा त्याचे आश्चर्य वाटते. ग्रीकांची बेजबाबदार वागणूक, चैनशौकीचे जगणे व कामे करून उत्पादकता वाढविण्याऐवजी हक्कांची भाषा करणारे नागरिक, यामुळे ग्रीसची दैना झाली आहे. याबद्दल ग्रीक नागरिकांना चार खडे बोल सुनावण्याऐवजी जर्मनीच्या नावाने खडे फोडण्याचा उद्योग अमेरिकी वृत्तपत्रांतून सुरू झाला आहे.
हाच प्रकार अन्यत्रही अनेकदा होतो. गरिबांची बाजू घेताना अनेकदा त्यांच्यातील दोषांची चर्चा होत नाही. गरिबांची बाजू जरूर घ्यावी; पण त्यांच्यातील दोषही दाखवून दिले पाहिजेत. अन्यथा, आपली कर्तव्ये न करता फक्त हक्कांची मागणी करण्याची वृत्ती वाढीस लागते. स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर कर्तृत्ववान व्यक्तीच्या माथ्यावर फोडण्याची सवय लागते. एखादी व्यक्ती, समाज कोणत्या गुणांमुळे वैभवाला चढला, याचा अभ्यास न होता केवळ दोष दाखविण्याकडे लक्ष लागते. जर्मनीबाबत सध्या असेच होत आहे. अमेरिका व अन्य देशांतील अर्थशास्त्रींची पोटदुखी वेगळी आहे. ग्रीसच्या सार्वभौमत्वाचा पुळका येण्यामागे जर्मनीच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याबद्दल वाटणारा दुस्वास व भीती ही खरी कारणे आहेत. याचे कारण, जगातील सर्व प्रगत देश आर्थिक अडचणीत सापडले असतानाही जर्मनीची अर्थव्यवस्था नुसती शाबूत नसून, ग्रीसचे कर्ज फेडण्याइतकी सक्षम आहे.
जर्मनीचे हे सामर्थ्य पाहून अनेकांना बिस्मार्कच्या स्वप्नाची आठवण येते. युरोपभर जर्मनीचे साम्राज्य स्थापन करण्याची खंदी धडपड त्याने केली होती. बिस्मार्कचे स्वप्न लष्करी सामर्थ्याने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न दोन महायुद्धांत झाला. दोन्हीमध्ये जर्मनीचा पराभव झाला व मोठी आर्थिक वाताहात झाली. आता महायुद्ध व लष्करी डावपेच वा सामर्थ्य न वापरताही जर्मनी बिस्मार्कचे स्वप्न प्रत्यक्षात आणत आहे. बलाढ्य सत्तांना चाप लावण्याचे आर्थिक सामर्थ्य जर्मनीने पुन्हा मिळविले आहे. यामागे कारण आहे, ते जर्मन व्यक्तिमत्त्वातील गुण. या गुणांमुळेच राखरांगोळी होऊनही जर्मनी हा देश पुन:पुन्हा सामर्थ्याने उभा राहिला.
प्रत्येक गोष्टीचे पूर्वनियोजन, तपशिलाबाबत जागरुकता व तपशिलाचा बारकावा ठरविण्यासाठी वाटेल ती तसदी घेण्याची सवय, अभियांत्रिकीला दिलेले महत्त्व, अंगमेहनतीला प्रतिष्ठा, अचूकतेचा आग्रह, भाबड्या आशावादाला नकार आणि हे सर्व साधण्यासाठी शिस्तीला वा नियमांना दिलेले अतोनात महत्त्व, हे जर्मन सामर्थ्यामागचे खरे गुण आहेत. कोणत्याही कामाचे नियम बनविणे व त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, याविषयी जर्मन माणूस अतिशय दक्ष असतो. याबाबतची कुचराई त्याला सहन होत नाही. नियमांशी असे स्वतःला बांधून घेतल्यामुळेच जर्मन व्यक्ती अनेक कौशल्ये आत्मसात करू शकते. अभियांत्रिकी शास्त्र हे तर नियमांवरच उभे असते. अभियांत्रिकीची ही नियमबद्धता जर्मन लोकांनी केवळ व्यवसायात नव्हे, तर प्रत्येकाच्या आयुष्यात आणली. विज्ञान व तंत्रज्ञानच नव्हे तर अन्य अनेक विद्याशाखांमध्ये जर्मनीने आपली मोहोर उमटविली आहे. मेहनत घेण्याची वृत्ती जर्मन माणसात उपजतच आहे, म्हणूनच हे जमले. आयुष्य नियमांनी बांधलेले असेल, तरच मेहनत यशस्वी होते. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर किंवा अमिताभ बच्चन ही आपल्याकडील अशी जर्मन उदाहरणे. पण अशी उदाहरणे आपल्याकडे विरळा असतात, तर जर्मनीत ती सार्वत्रिक असतात. कौशल्य वाढविण्यावर दिलेला भर हे जर्मनीचे आणखी एक वैशिष्ट्य. अन्य देशांच्या तुलनेत जर्मनीतील मुले सर्वात कमी वेळ शाळेत जातात, पण कुमारवयापासून कंपनीत उमेदवारी करून अभियांत्रिकी कौशल्ये मिळवितात. आर्थिक मंदी आल्यावर जर्मनीत कामगारांचे कामाचे तास कमी करण्यात आले, पण कोणालाही नोकरीवरून काढण्यात आले नाही. उलट कामगारांना अधिक कुशल बनविण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या. कार्ल मार्क्सला जन्माला घालणाऱ्या जर्मनीत डाव्या कामगार संघटना बलवान आहेत. पण तेथील संघटनांनी जगाचे वारे ओळखून कामगारांना कुशल करण्यासाठी सरकारला मदत केली. या उलट ग्रीकमध्ये झाले. देश डबघाईला आला तरी कामगारांची हक्कांची भाषा संपली नाही.
जर्मनीत एकपक्षीय राजवट नाही. तेथील सरकारे अस्थिर असतात. डाव्या-उजव्यांचा राजकीय संघर्ष कायम सुरू असतो. नाझीवादाचे व्रण अद्याप कायम असल्याने सध्याचा जर्मन नागरिक राष्ट्रवादापासून स्वतःला थोडा दूरच ठेवतो. फुटबॉलचा विश्वचषक जिंकल्यावरही त्यांनी ‘राष्ट्रवादी राष्ट्रवादी’ पुकारा केला नव्हता. तरीही जर्मनी सामर्थ्यशाली होत आहे, तो तेथील नागरिकांच्या गुणांमुळे. रशिया व अमेरिकेने जर्मनीची वाताहात केली. रशियाने तर अनेक अत्याचार केले. परंतु, या दोन्ही महासत्तांशी जुळवून घेत जर्मनी दोघांच्याही पुढे गेला. फ्रान्स व रशियाशी शतकानुशतके युद्ध करणाऱ्या जर्मनीने उत्तर रशियातील नैसर्गिक वायू फ्रान्सला नेणारी पाइपलाइन समुद्रामार्गे जर्मनीतून टाकली व स्वतःचे भले करून घेतले. पाकिस्तानमधील व्यापार हस्तगत करून भारत आज हे करू शकतो, पण ती नजर ना आपल्या राजकर्त्यांकडे आहे, ना नागरिकांकडे. युरोच्या माध्यमातून जर्मनीने स्वतःचे चलन समृद्ध करून घेतले. हिटलर हा जर्मनीला मोठा शाप होता. नाझी इतिहासाची जर्मन माणसाला खंत वाटते. पण यामुळे त्याने स्वतःला पंगुत्व येऊ दिले नाही. इतिहासाची मढी त्याने डोक्यावर बसू दिली नाही. शिस्तबद्ध आयुष्याला विज्ञान-तंत्रज्ञानाची साथ दिली तर काळ्या इतिहासाला झुगारून वैभव परत खेचता येते, हे जर्मनीने जगाला दाखवून दिले आहे.
नाझी इतिहासाच्या आठवणीपेक्षा जर्मन माणसाला अधिक खंत वाटते, ती कर्जबाजारी होण्याची. कर्ज झाले तर तो स्वतःला नालायक समजतो आणि त्वेषाने मेहनत करतो. कर्ज काढून धंदा करण्यास तेथील कंपन्याही नाखुश असतात. म्हणूनच दिवाळखोरीची वेळ त्यांच्यावर सहसा येत नाही. कंपनीत अधिकाराच्या पदावर बिझिनेस स्कूलमधून आलेले चटपटीत एक्झिक्युटिव्ह ठेवण्यापेक्षा अभियंते ठेवण्यास जर्मन कंपन्या प्राधान्य देतात. एन््रॉनसारखी दिवाळखोरी म्हणूनच त्यांच्या वाट्याला येत नाही. कामप्रेरणेला नियमांचा दिवटा (मशाल) घेऊन जो मार्ग दाखवितो, त्याला मोक्षभूमीतील मोती मिळतात, असे ज्ञानदेवांनी गीतेतील सातव्या अध्यायावर भाष्य करताना म्हटले आहे. नियमांची मशाल ही जर्मनीच्या वैभवाची खूण आहे, तर नियमांना आडवाटा काढण्यात ग्रीकांसह आपण भारतीयही आघाडीवर आहोत. prashant.dixit@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...