आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्यूबा : स्वस्थतेकडून अस्वस्थतेकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्यूबातील सृष्टीसौंदर्य जितके भुरळ पाडणारे आहे, तितकेच त्या देशाचे अंतरंग गोंधळात टाकते. मेक्सिकोच्या आखातातील हा ठिपक्याएवढा देश. किना-यापासून फक्त 90 मैलांवर भांडवलशाही सुबत्तेची भुरळ घालणारे अमेरिकेचे फ्लोरिडा. क्यूबाच्या नागरिकांना हरत-हेने वश करण्याची धडपड करणारे अमेरिकी सरकार. अमेरिकेच्या या प्रयत्नांना दाद न देणारे, देशासमोर अनेक आर्थिक समस्या असताना, रोजचे राहणीमान कठीण होत असतानाही भांडवलशाही भुरळ नाकारणारे स्वाभिमानी क्यूबन. चोपन्न वर्षांची एकपक्षीय राजवट असूनही हुकूमशाहीचा दर्प नसणारे सरकार. सोविएत रशियाच्या पतनानंतर चीनमध्ये आडमार्गाने भांडवलशाहीने प्रवेश केल्यानंतरही कल्याणकारी सोशॅलिस्ट राजवटीचे उदाहरण जगासमोर ठेवणारे क्यूबा. येथे भव्य कारखाने नाहीत, मोटारगाड्यांची चैन नाही, पगारवाढीची धावपळ नाही, बाजारपेठ ताब्यात घेण्याची गळेकापू स्पर्धा नाही, ऐशआरामाची साधने नाहीत, स्पर्धेच्या शिडीत सर्वोच्च स्थानी जाण्याची धडपड नाही. पण क्यूबात मोफत आरोग्यसेवेची हमी आहे. शिक्षण फुकट आहे आणि भरणपोषण होईल इतके रेशन प्रत्येक कुटुंबांना नक्की मिळत आहे.
राहणीमान बेताचे असेल, पण सुरक्षित व स्वस्थ आयुष्य जगण्याची हमी आहे. मात्र ही स्वस्थता टिकविण्यासाठीही पैसा लागतो. शिवाय माणूस स्वप्ने पाहतो. त्याला काहीतरी वेगळे करायचे असते. त्यासाठी स्वातंत्र्य लागते. हे स्वातंत्र्य क्यूबात नाही. स्वातंत्र्याची एक गंमत असते; ते मिळाले की स्वस्थता जाते आणि नाही मिळाले तरी मन बंड करून उठते. बंड करण्याच्या मन:स्थितीत क्यूबा नाही. अन्न, शिक्षण, आरोग्य व निवास यातून येणा-या सामाजिक सुरक्षेची स्वस्थता त्याला प्रिय आहे. मात्र ही सुरक्षा टिकविण्यासाठी लागणारी समृद्धी (वेल्थ क्रिएशन) कशी साधायची, या प्रश्नाने क्यूबा अस्वस्थ होत आहे.
अटलांटिक महासागर पार केल्याबरोबर होणारे क्यूबाचे दर्शन मन प्रसन्न करणारे असते. लाल माती, रेखीव शेते, टुमदार घरे, आखीव रस्ते, गर्द झाडीमुळे आलेली हिरवाई, स्वच्छ आकाश, प्रदूषणमुक्त हवा, झगझगीत सूर्यप्रकाश, सभोवताली समुद्र असूनही दमटपणाचा अभाव; यामुळे उल्हसित अवस्थेत आपण हवाना विमानतळावर उतरतो. विमानतळावरून बाहेर पडताच कोकणातील खेड्यासारखी शांत स्वस्थता आजूबाजूला जाणवते. मग पहिला धक्का बसतो तो रस्त्यावरील मोटारी व टॅक्सी पाहून. रस्त्यांवर व्हिंटेज मोटारींचीच वर्दळ दिसते. फोर्ड, शेवर्ले यांची 1960सालापूर्वीची मॉडेल्स अजूनही फिरत असतात. इंपाला दिसते. जुनीपुराणी मर्सिडिस असते. नव्या गाडीचे दर्शन अगदी तुरळक. रस्ते छान, पण वाहतूकच कमी. गाड्या जुन्या का, याचे उत्तर म्हणजे क्रांतीनंंतर गेल्या 50 वर्षांत क्यूबाने गाड्या बनविलेल्याच नाहीत. अमेरिकी नागरिक व उद्योजकांनी सोडून दिलेली गाड्यांची मालमत्ता अजून वापरात आहे. चीनमधून येणा-या स्पेअर पार्टवर या गाड्या तगून आहेत.
एका भव्य 23 मजली हॉटेलात क्यूबन संगीताने स्वागत होते. सुडौल बांध्याच्या हस-या चेह-याच्या रिसेप्शनिस्ट स्वागत करतात. सुडौल, रेखीव पण थोडा थोराडपणाकडे झुकणारा बांधा हे क्यूबन स्त्रियांचे वैशिष्ट्य. अल्पवस्त्रांकित राहण्याची हौस तरुणींमध्ये अधिक. पुरुषांचेही शरीरसौष्ठव उठून दिसणारे. मोबाइलवर बोलणारे सहसा आढळत नाही. कारण मोबाइल परवडत नाही. हाच प्रकार इंटरनेटचा. हॉटेल विशाल म्हणावे असे होते, पण सुविधा मामुली होत्या. वाय-फाय असण्याचा प्रश्नच नव्हता. ब्लॅकबेरी विमानतळावरच बंद पडला होता. तासाला दोन डॉलर हा इंटरनेटचा दर आहे. क्यूबन नागरिकाचे मासिक वेतन 20 डॉलर असते. त्यामुळे इंटरनेट फक्त पर्यटकांना परवडते. क्यूबात स्पॅनिश संस्कृतीच्या खुणा नजरेत भरत होत्या. पण उंच इमारती मोजक्याच होत्या. क्रांतीनंतर उंच इमारती बांधलेल्या नाहीत. ज्या आहेत त्या अमेरिकन्सनी बांधलेल्या आहेत. शहरात अनेक ठिकाणी पडक्या इमारती दिसतात. स्पॅनिश धाटणीचे उत्कृष्ट नमुने आढळतात. पण त्यांची पुनर्बांधणी झालेली नाही. 1960च्या दशकात आपण वावरतो आहोत, असे वाटू लागते.
मात्र शहरी सुविधांचा अभावही दिसत नाही. शहरी बस सतत येत असतात. बसची टंचाई असल्याने आता भारताने 50 बस भेट दिल्या आहेत. मात्र सध्या असलेल्या बसची सेवा धडपणे चालत असलेली आढळली. आत्यंतिक गरजेच्या जीवनावश्यक गोष्टींवर चालणारे संथ व स्वस्थ जीवन, हे क्यूबाचे वैशिष्ट्य. जगण्यात गती नाही. ईर्षा नाही. ईर्षा एकच; सोशॅलिस्ट जीवनशैली जोपासण्याची. जीवनावश्यक गोष्टी मुबलक नसतील; पण त्यांचा अभावही नाही. दिल्ली, मुंबई सोडा; नगर, लातूरसारख्या ठिकाणी आढळणा-या अनेक सुविधा वा वस्तू क्यूबात दिसतही नाहीत. पण अभावाची, दारिद्र्याची मानसिकताही आढळत नाही.
क्यूबाचे हे व्यक्तिमत्त्व घडविण्यात मोलाचा वाटा आहे तो फिडेल कॅस्ट्रो यांचा. अन्य हुकूमशहांप्रमाणे फिडेलची पोस्टर्स कुठे झळकत नाहीत, त्यांच्या नावाचा गजर होत नाही, वा त्यांचे वचननामे सांगणा-या भिंती रंगलेल्या आढळत नाहीत. ते आता सक्रिय राजकारणातही नाही. पण क्यूबाच्या हवेत कॅस्ट्रोचे अस्तित्व जाणवते. फिडेल हे क्यूबाचे अंत:करण आहे. फिडेल या हुकूमशहाची जातकुळी वेगळी असल्यामुळेच जगभर कम्युनिझमचे पतन झाल्यावरही क्यूबा टिकून राहिला. मुळात फिडेल सोशॅलिस्ट नाही. मी सोशॅलिस्ट आहे, अशी घोषणा फिडेल यांनी क्रांतीनंतर चार वर्षांनी केली. क्रांती झाली त्या वेळी तेथील पीएसपी या कम्युनिस्ट पक्षाने बुर्झ्वा अशी फिडेलची संभावना केली होती. क्यूबाच्या परंपरेतून, दोनशे वर्षे चाललेल्या संघर्षातून तावूनसुलाखून निघालेल्या परंपरांचे दोर घट्ट धरून फिडेल यांनी क्रांतीचा व त्यानंतरच्या राजवटीचा स्वतंत्र घाट तयार केला. तो मार्क्सवादाला जवळ जाणारा असला तरी त्याला लेनिनिस्ट वा स्टॅलिनिस्ट म्हणता येत नाही. क्यूबन कॉफीचा अस्सल दरवळ हे या सोशॅलिझमचे वैशिष्ट्य आहे. क्यूबाचा इतिहास व परंपरेशी त्याची नाळ जोडली गेली आहे. रशिया वा चीनमधून आयात केलेल्या विचारांचे कलम फिडेल यांनी केले नाही. क्यूबाच्या मातीत त्यांनी सोशॅलिझम रोवला व त्या मातीच्या स्वभावानुसार त्याला आकार दिला. अवर रिव्होल्युशन इज अ‍ॅज क्यूबन अ‍ॅज पाम ट्री, हे त्यांचे वाक्य क्यूबन राजवटीचे वैशिष्ट्य सांगून जाते. क्यूबाचे मॉडेल निर्यात करता येणार नाही, असे तेथील नेते पूर्वीपासून स्पष्टपणे सांगतात.
सोविएत रशियाच्या मदतीमुळे क्रांतीनंतर क्यूबा टिकला, हे खरे असले तरी रशियाच्या पतनानंतर 1991मध्ये क्यूबा विलक्षण अडचणीत सापडला. एका वर्षांत राष्ट्रीय उत्पन्न 35 टक्क्यांनी घटले. जीवनावश्यक वस्तूंबरोबरच वीज, पेट्रोल यांची तीव्र टंचाई झाली. रशियापाठोपाठ युरोपातील अनेक देशांनी कम्युनिस्ट विचारांना सोडचिठ्ठी देत भांडवलशाही राजवट आपलीशी केली. चीनही बदलला; पण क्यूबा बदलला नाही. साम्यवादी विचारधारा सोडावी, असे क्यूबाच्या नागरिकांना वाटले नाही. फिडेल कॅस्ट्रो यांची संवादी भूमिका, योग्य वेळी योग्य कृती करण्याची कला आणि बोले तैसा चाले ही जीवनशैली यामध्ये याचे बीज सापडते. हलाखीची स्थिती असूनही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज क्यूबाने घेतले नाही आणि सार्वजनिक सेवा मार्केटच्या हाती दिल्या नाहीत. यामुळे अन्न, औषधे, शिक्षण व घरे ही सामान्य नागरिकांच्या आवाक्यात राहिली. नागरिकांच्या मासिक वेतनाच्या 20 टक्क्याहून अधिक घरभाडे असणार नाही, याकडे आजही लक्ष दिले जाते. भारताप्रमाणे मार्केट फोर्सेसचे कारण देऊन लोकहिताच्या कामातून सरकारने हात झटकले नाहीत. याचा मोठा परिणाम जनतेवर झाला. याच वेळी फिडेल व त्यांचे सहकारी लोकांमध्ये सतत फिरत होते. त्यांना समस्या समजावून सांगत होते. फिडेल यांचे भाषण म्हणजे क्यूबाच्या समूहमनाचे प्रकटीकरण असते. फिडेल व त्यांची क्रांती यांचे हेच शक्तिस्थान आहे. क्यूबाच्या परंपरेचे ते प्रकटीकरण आहे. रशिया-चीनमधून आयात केलेल्या विचारांचे नाही. क्यूबात विरोधी पक्ष नाहीत, पण जनता व सरकार यांच्यात दरीही नाही.
फिडेल कॅस्ट्रोंनी केलेल्या क्रांतीत चुकाही ब-याच झाल्या. संपत्ती निर्माण करण्याकडे दुर्लक्ष झाले. फिडेल यांचा करिश्मा असला तरी त्याला संस्थात्मक रूप आले नाही. यामुळे क्रांतीच्या तटबंदीला थोडे तडे जाऊ लागले आहेत. संपत्ती निर्माण करण्यासाठी थोड्या प्रमाणात खासगीकरणाला मुभा द्यावी लागली. पण यातून मध्यमवर्ग तयार होऊ लागला व त्या पाठोपाठ आर्थिक असमतोलही. काटकसरीचे साधे आयुष्य तरुण वर्गाला मानवत नाही. त्याला पैसा हवा आहे व अमेरिकेत तो बक्कळ मिळतो, हे कळते आहे. अमेरिकेच्या वकिलातीत व्हिसा मागणा-यांची संख्या दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढत आहे. मुळात ज्या व्यक्तिगत व सामाजिक मूल्यांनी क्रांती घडविली, ती मूल्ये आता अस्तंगत होत आहेत. सध्याचे अध्यक्ष व क्रांतीमध्ये फिडेल यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे त्यांचे लहान बंधू राऊल यांनी दोन महिन्यांपूर्वी केलेल्या भाषणात घसरत्या सार्वजनिक मूल्यांबद्दल चिंता व्यक्त केली व क्यूबाच्या नागरिकांना खडे बोल सुनावले. जैव तंत्रज्ञान व कृषी या क्षेत्रात क्यूबाने वेगळे काम केले असले तरी त्यातून पैसा निर्माण करणे त्यांना अद्याप साधलेले नाही. क्यूबाचे राज्यकर्ते अय्याशी नाहीत. जनता व त्यांच्या राहणीमानात फार अंतरही नाही. आरोग्य, शिक्षण यांसारख्या कल्याणकारी सेवा ते उत्तम देतात. पण तरुणांच्या वाढत्या अपेक्षा व तरुणांचा खिसा यांचा मेळ कसा घालायचा, या विवंचनेत ते आहेत. या विवंचनेमुळे स्वस्थ क्यूबामध्ये अस्वस्थतेने चोरपावलाने प्रवेश केला आहे. आणि क्यूबाच्या राज्यकर्त्यांची ही विवंचना हा सोशॅलिझम संपविण्यासाठी घायकुतीला आलेल्या अमेरिकेचा नवा आधार आहे.
prashant.dixit@dainikbhaskargroup.com