आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुजरा कर बरं मोरा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोहोचवले आहे, ते गणपत मसगे यांच्यासारख्या बुजुर्ग कलाकाराने. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा कोणतीही लिखित भाषा मानवाला अवगत नव्हती, त्या काळी चित्रांच्या भाषेचा जन्म झाला. विविध प्रकारची चित्रे काढून त्या द्वारे कथाकथन करण्याची कला मानवाने अवगत केली. गावोगाव भटकंती करून या चित्ररूपी ग्रंथाचे वाचन करणारा एक समाज तयार झाला; तो म्हणजे, चित्रकथी समाज. चित्र दाखवून कथाकथन करणा-या चित्रकथी समाजापैकी एक गणपत मसगे. गणपत मसगे यांच्या चित्रकथीची ख्याती इतकी दूरवर पसरली आहे की, देशी-विदेशी संशोधक आता चित्रकथीवर संशोधन करत आहेत.
चित्रकथीशी काही प्रमाणात साधर्म्य असलेली आणखी एक कला म्हणजे डक्कलवार समाजाची पुराणकथा.भटक्या विमुक्तांचे जीवन जगणारा हा डक्कलवार समाज हातात किंगरी घेऊन आणि बाड उलगडून पौराणिक कथा सांगत असतो. डक्कलवारांकडे असलेले हे बाड आणि चित्रकथी यात ब-याच अंशी साधर्म्य. मात्र एकीकडे चित्रकथीवर संशोधन होत असताना डक्कलवारांच्या बाडाचा ‘शोध’ घ्यावा लागत आहे. चित्रकथी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली असताना डक्कलवारांच्या बाडाला गावगाड्याबाहेरही किंमत उरलेली नाहीये. आज किंगरी घेऊन पुराणकथा सांगणारे किमान पाच-सहा तरी डक्कलवार महाराष्ट्राच्या काही भागांत सापडतील, परंतु
चित्रकृतीचा उत्कृष्ट नमुना असलेले बाड ज्यांच्याजवळ आहे, असे डक्कलवार शोधूनही सापडणार नाहीत. हजारो वर्षांपासून पिढ्यान्पिढ्या चालत आलेला एक मोठा सांस्कृतिक ठेवा आज जवळपास नष्ट झाला आहे.
डक्कलवार समाजावर असलेला जातीपुराणाचा जबरदस्त पगडा हाच या कलेला मारक ठरला असल्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे, त्यामुळेच कदाचित त्यांची कला ही जगासमोर आली नाही. अन्यथा डक्कलवारांचे किंगरी वादन, त्यांचे बाड उलगडणे, आणि त्यांचे कथाकथन ही एक अद्वितीय कला आहे, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.
डक्कलवारांचे किंगरी वादन
कोणे एके काळी एका खळ्यात मोर नाचू लागला, तेव्हा एका शिका-याने त्याला मारले. मोर घायाळ होऊन पडला असता त्या मोराला एका मातंगाने पाणी पाजले. मोर सावध झाला व त्याने ‘तुला केव्हाही कमी पडणार नाही’, असा आशीर्वाद दिला आणि ‘तुझ्यासंबंधीची कथा मी श्रवण करीन’ असे सांगितले. तेव्हापासून मोर डक्कलवारांच्या किंगरीवर बसला. डक्कलवार ज्या पुराणकथा सांगतात, त्या सगळ्या कथा किंगरीवर बसवलेल्या लाकडी मोराला सांगितल्या जातात. डक्कलवार मोराला श्रोता या नात्याने आवाहन करून कथा सांगत असतो.
‘सैंया झूठों का बडा सरताज निकला’ हे ‘दो आँखे बारह हाथ’मधले गाणे. अभिनेत्री संध्याच्या हातात या गाण्यामध्ये जे वाद्य दिसते, त्याचे नाव किंगरी. काही भागात त्याला ‘कोका’ असेही म्हणतात. मात्र डक्कलवारांकडे जे किंगरी नावाचे वाद्य आहे, ते या वाद्यापेक्षा सर्वस्वी वेगळं. तीन भोपळ्यांना एका बांबूच्या काठीने जोडून हे वाद्य तयार करतात. काठीवर दोन किंवा तीन तारा लावलेल्या असतात. तारांची टोके खुंट्यांना बांधलेली असतात. तारा अशा रीतीने बांधलेल्या असतात, की त्यांना बोटाने छेडून त्यातून नाद निर्माण करता यावा. टोकाच्या एका भोपळ्यावर एक मोर जोडलेला असतो. मोर म्हणजे लाकडाने तयार केलेली मोराची प्रतिकृती. मोराचे डोळे, चोच, त्याची पिसे इत्यादी कौशल्यपूर्ण रीतीने तयार केले जातात. त्याच्या पायाशी घुंगरू बांधलेले असतात. मोराचा खालचा भाग एका छोट्या लाकडी दांडीचा असतो, ही लाकडी दांडी भोपळ्याला छिद्र करून त्यात घालतात. दांडीच्या टोकाला एक दोरी बांधलेली असते. त्या दोरीला ओढून व सैल सोडून मोराला वर-खाली हलवता येते. असे केल्याने घुंगरू भोपळ्यावर आदळून त्याचा मंजुळ नाद ऐकायला येतो. मोराच्या वर-खाली होण्याबरोबरच पिसा-याचीही उघडझाप होते. म्हणजे, एकाच वेळी तंतुवाद्य, घुंगराचे वाद्य व भोपळ्यावर घुंगरू आपटल्यानंतर निर्माण होणारा नाद, असे तीन ध्वनी एकाच वाद्यातून निर्माण होतात. यालाच डक्कलवारांचे मोर नाचवणे असे म्हणतात.
पंडित शिवकुमार शर्मा यांनी नव्या स्वरूपातले संतुर वाद्य जन्माला घातले, ते जगभरात पोहोचले. नव्या फळीच्या निलाद्री कुमार याने सितार आणि गिटार यांचे मिश्रण असलेले ‘झिटार’ हे वाद्य जन्माला घातले. आज हे वाद्य शास्त्रीय वाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. परंतु ‘किंगरी’सारखे अफलातून वाद्य हे उपेक्षितांचे वाद्य असल्याने त्याला काही अभिजनांचा दर्जा प्राप्त होऊ शकला नाही. किंगरी किंवा कोकासारखी वाद्ये ही कायम फकीर, ट्रेनमधले भिकारी किंवा लोककलावंत यांच्याच हातात दिसली.
डक्कलवारांचे बाड
भटक्या विमुक्तांच्या माझ्या अभ्यासदौ-यात अनेक डक्कलवारांच्या भेटीगाठी झाल्या. किंगरी वादन ऐकले, पुराण कथा ऐकल्या; परंतु त्यांच्याजवळचे ऐतिहासिक बाड काही मला पाहता आले नाही. एका दुर्मीळ खजिन्याला मी मुकलो. मात्र, लोककला-लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रभाकर मांडे यांना त्यांच्या संशोधनात हे बाड पाहता आले. त्यांच्या ‘मांग आणि मागते’ या ग्रंथात त्यांनी म्हटले आहे, डक्कलवारांचे बसवपुराण तासन्तास चालते. हे पुराण सांगत असताना ते बाड उकलून त्यावरील चित्रे एका छडीने दाखवत असतात. डक्कलवारांचे बाड वैशिष्ट्यपूर्ण असते. जवळजवळ अडीच हात रुंद आणि 15 ते 20 हात लांब अशा पासोडीवर रंगीत चित्रे काढलेली असतात. हे बाड एका वेळूसारख्या काठीला गुंडाळलेले असते आणि पुराण सांगताना ते हळूहळू उकलले जाते. सगळे बाड उघडायला कित्येक दिवस लागतात. गुंडाळलेले बाड ठेवण्यासाठी शिंदीच्या पानांपासून तयार केलेली एक लांब आकाराची पिशवी असते. या बाडामध्ये सगळ्या जातींची उत्पत्ती आहे, असे म्हटले जाते.
डक्कलवारांचे कथाकथन
डक्कलवारांच्या पोतडीत असंख्य पुराणकथा असल्या तरी त्यापैकी सृष्टी कशी निर्माण झाली, यावर डक्कलवार खूप सुंदर भाष्य करतो. श्रेष्ठ, गहन, गूढ तत्त्वज्ञान आपल्या सहज शैलीत कमीत कमी शब्द वापरून सांगण्याची डक्कलवारांची शैली अद्भुतच म्हणावी लागेल. जातीपुराणाला प्रारंभ करतानाच डक्कलवार सृष्टीच्या निर्माणाची कथा सांगतो.
नमो गुरु देव/ परथम होता आंदकार, मग झाला धुंदकार
त्या ठिकाणी लोदाचा अवतार/ चौफेर लागला ला-यापरमान
मग जन्मला गोल्यापरमान/ ना रंग ना रूप, ना नाम ना धाम
असा त्या लोदाचा अवतार/ सोहंकार टाकिता आत्मा तयार झाला
हंकार टाकिता सीर पायदा झाले, धुमकार टाकिता हातपाय झाले
आकारात सर्व तयार झाला, असे त्या चार काराची निर्मिती
पाचवा निराकारात निराळा झाला
निराकारात येताच रामरामोला घाम फुटून नीर पायदा झाले
त्याचे आसवं त्याला आधार, निरामधी असता त्याच्यात त्याचं राहानं
त्यावर त्याचं आसनं...
(क्रमश:)
shivaprash@gmail.com