आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुकलेले रंग... विस्कटलेले चेहरे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन वर्षे होत आली, परंतु आजही बहुरूप्यांची वस्ती मग ती राज्यातल्या कोणत्याही भागातली असो; ‘त्या’ घटनेने घाबरीघुबरी होते. ‘त्या’ घटनेने बहुरूप्यांच्या डोळ्यांच्या कडा आजही ओल्या होतात. मानवतेला काळिमा फासणार्‍या ‘त्या’ घटनेचे तीव्र पडसाद आज बहुरूपी समाजावर पडले आहेत. ‘त्या’ घटनेचा आघात इतका जबरदस्त होता की, आजही पोटाची खळगी भरण्यासाठी चेहर्‍याला रंग लावावा की नाही, या विवंचनेत तो भिंतीला पाठ टेकून हताशपणे तसाच बसून राहतोय... कधी चिल्ल्यापिल्ल्यांकडे, तर कधी सुकलेल्या रंगांकडे पाहत. खरं तर किती मोठा वारसा होता या बहुरूपी समाजाचा. इतिहासाच्या पानांवर या समाजाचा किती तरी वेळा उल्लेख झालाय. मात्र आज सगळं संपलंय, अशी परिस्थिती निर्माण झालीये...
काय होती ‘ती’ घटना...?
9 मे 2012
स्थळ - कळमाना परिसर, नागपूर
चेहर्‍यावर पावडर, लाली, गंध यांची रंगरंगोटी करून आणि अंगावर साडी चढवून सुपडा मगन नागनाथ, हसनराव दादाराव सोळंके, पंजाबराव भिकाजी शिंदे आणि पंजाबराव लक्ष्मण सोळंके हे चार बहुरूपी वस्तीबाहेर पडले. वास्तविक सोंग घेण्याच्या त्यांच्या परंपरेत साडी नेसून किन्नरांचे सोंग घेणे हे बसत नव्हते. परंतु बदलत्या काळानुसार आता तरुण पिढीने किन्नरांचे सोंग घ्यायला सुरुवात केली होती. रंगरंगोटी झाल्यावर त्यांनी लगेच एक रिक्षा थांबवली आणि ‘आम्हाला जवळच्या एखाद्या गरीब वस्तीत घेऊन चल’, असे सांगितले. अभिजनांची मनोरंजनाची व्याख्याच बदलल्यामुळे निदान गरीब वस्तीत तरी चार पैसे मिळतील, या भावनेपोटी हे बहुरूपी झोपडपट्ट्यांमध्ये शिरले होते. रिक्षावाला त्यांना कळमाना परिसरात घेऊन गेला. रिक्षावाल्याचे पैसे चुकते करून खाली उतरतात न उतरतात तोच प्रचंड मोठा जमाव ‘पकडा रे साल्यांना’ म्हणत त्यांच्यावर चाल करून आला. काय घडतंय, याचा विचार करण्यापूर्वीच ते चौघे वाट मिळेल त्या दिशेला पळू लागले. नवीन वस्ती, रस्ते माहीत नाहीत, गल्लीबोळ माहीत नाहीत, शिवाय साडी नेसल्याने वेगात पळताही येईना... प्रक्षुब्ध जमाव पाठीमागून दगड-विटांचा मारा करतोय. अशा भीषण परिस्थितीत चौघेही जमावाच्या तावडीत सापडले. जमाव या चौघांवर तुटून पडला. लाथा-बुक्क्यांपर्यंत ठीक होतं; परंतु बेभान झालेल्या जमावाने दगड-विटांनी ठेचायला सुरुवात केली.
आम्हाला का मारताय? आम्ही चोर नाही... आमच्यावर दया करा... आम्हाला सोडा... चौघांचे आर्त सूर शेकडोच्या संख्येने असलेल्या जमावाच्या कानात शिरतच नव्हते. जमाव हिंसक झाला होता. तेवढ्यात पोलिसांची व्हॅन आली. मात्र, तोपर्यंत सुपडा मगन नागनाथ, हसनराव दादाराव सोळंके यांचा खेळ खल्लास झाला होता. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून इतर दोघांना कसेबसे सोडवले आणि व्हॅनमध्ये बसवले. मात्र, आता जमावाने पोलिसांवरच हल्लाबोल करायला सुरुवात केली. व्हॅनमधून त्यांनी पंजाबराव शिंदेला खेचून बाहेर काढले आणि दगडांनी ठेचून मारून टाकले. काही जण व्हॅनमध्ये घुसले आणि पंजाबराव सोळंकेच्या पोटातच लोखंडी सळई खुपसली. पोलिसही हतबल झाले होते. कसाबसा मार्ग काढत पोलिसांची व्हॅन जखमी पंजाबरावला दवाखान्यात घेऊन जात होती, तर जमावाने व्हॅनवरच दगडांचा वर्षाव करायला सुरुवात केली. तरीही पोलिस एकट्या पंजाबरावला वाचवण्यात यशस्वी ठरले. मात्र, अवघ्या अर्ध्या तासात जमावाने तिघांना संपवून टाकले होते...
आजपर्यंत असं कधी घडलं नव्हतं, मग आजच एकाएकी असं का झालं?
मध्यरात्रीनंतर अंगाला ग्रीस चोपडलेले चोर येतात आणि चोर्‍या करून जातात, महिला-मुलींवर अतिप्रसंग करतात, म्हणून कळमाना परिसर गेल्या काही दिवसांपासून कमालीच्या दहशतीखाली होता. अनोळखी व्यक्ती दिसली रे दिसली की त्या व्यक्तीला नागरिक हाणत होते. रोज रात्री अफवा पसरायच्या... हातात सळई आणि दगड-विटा घेऊन नागरिक सबंध परिसरात रात्री-बेरात्री पहारा द्यायचे. अशातच साडी नेसून वस्तीत आलेले ते चौघे गुंडांच्या टोळीचेच सदस्य असावेत, असा ठाम संशय वाटल्याने जमावाने कसलाही विचार न करता चौघांवर हल्ला केला. त्यातच जमावाला जेव्हा हे समजले की, साडी नेसून आलेले ते चौघे किन्नर नसून पुरुषच आहेत, तेव्हा तर त्यांची खात्रीच झाली आणि ते अधिकच चेकाळले.
महाराष्ट्रातील या दुसर्‍या खैरलांजी हत्याकांडामुळे आज बहुरूपी समाजाचे आयुष्यच विस्कळीत झाले आहे. हे हत्याकांड फक्त तिघांचेच नव्हते, तर या घटनेने अनेकांचे बळी गेले. जिवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागल्या. अनेक कुटुंबे पोरकी झाली. वर्षानुवर्षे लोककला सादर करून आपल्या कुटुंबाची गुजराण करणार्‍या बहुरूपींसमोर आता जगायचं कसं, हा प्रश्न उभा ठाकला आहे. भटक्या विमुक्त प्रवर्गात मोडणारा हा नाथजोगी समाज भिक्षेकरी म्हणूनच आयुष्य जगतो. सगळेच भूमिहीन, त्यामुळे उदरनिर्वाहासाठी लोककला सादर करून भिक्षा मागण्यावाचून दुसरे साधनच नाही. हातात किंगरी, चौंडक, खंजिरी, नाल, संबळ अशी वाद्ये घ्यायची, चेहर्‍याला रंगरंगोटी करायची आणि राम-सीता-हुनमान, पोलिस, डॉक्टर, वकील, शिक्षक, शेटजी-भटजी किंवा साडी नेसून लैला-मजनू आणि किन्नराचे सोंग घ्यायचे आणि मग फिरायचे या गावातून त्या गावात...
एका जागी मुक्काम नाही, शिक्षणाचा पत्ता नाही, दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असूनही कोणाकडे बीपीएल कार्ड नाही की रेशनकार्ड नाही. कोणतीही शासकीय योजना यांच्या पालांपर्यंत पोहोचतच नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नाही. लोककलावंत म्हणून सार्‍या पंचक्रोशीत मिरवत असले, तरी लोककलावंत म्हणून मिळणारे शासनाचे मानधन यांच्या वाट्याला कधीच आले नाही. गावात काम मिळत नाही, शिकायचे म्हटले तर मानेवर रुळणारे लांब केस कापावे लागतात. शिकून पुन्हा नोकरी मिळेलच याची शावती नाही, म्हणून बापजादे त्यांच्या पोरांना शाळेतच पाठवत नाहीत. एकीकडे परंपरेचा अभिमान, तर दुसरीकडे जगण्याची कुत्तरओढ... ‘देवी गळ्यात हाये आमच्या, आमी वंगाळ काम करीत नायी. आमी चोर नायी, चोरीची लाज; जोगवा मांग्याची कायले लाज...’ असा एक समाजाचा मतप्रवाह, तर ‘आमच्या समाजाने आता बदलायला पाहिजे, साडीवर भिक्षा मागणं बंद केलं पाहिजे, मुलांना शिकवलं पाहिजे, तरच आमचा समाज काही प्रमाणात बाहेर पडू शकेल...’ असा समाजाचा दुसरा मतप्रवाह...
गंमत-जंमत करत, गावात वेगवेगळी सोंगं घेऊन करमणूक करणारा बहुरूपी... मस्करी करत समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर ताशेरे ओढणारा बहुरूपी... नकळत होणार्‍या चुका लक्षात आणून देणारा आणि चुकत असलेल्या माणसाच्या डोळ्यात अंजन घालणारा, त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देणारा बहुरूपी... असा हा बहुरूपी आज समाजव्यवस्थेने धारण केलेल्या मुखवट्यासमोर हतबल झाला आहे. या बहुरूप्याला समाजातला प्रत्येक माणूस ‘बहुरूपी’ वाटतोय.