आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prashant Pawar Article About Mahatma Gandhi And Ramsigh Chhara

महात्मा... बकरी आणि रामसिंह छारा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा गांधींवर हजारो पुस्तके आणि ग्रंथ निघाले, त्यांच्यावर अनेक देशी-विदेशी इतिहासकारांनी संशोधन केले; परंतु माझी शंभर टक्के खात्री आहे की, इतिहासाची कितीही पाने चाळा; ‘रामसिंह छारा’ हे जे नाव आहे, या नावाचा उल्लेख कोणत्याच पुस्तकात वा ग्रंथात वा समीक्षेत आढळणार नाही. इतकेच काय, तर महात्मा गांधी यांनी स्वत: लिहिलेल्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ या चरित्रामध्येही रामसिंह छाराच्या नावाचा पुसटसादेखील उल्लेख नाही.

रामसिंह छारा या व्यक्तीने जर वेळीच तोंड उघडले असते, तर नक्कीच त्याचेही नाव इतिहासात नोंदविले गेले असते. परंतु, या माणसाने त्याचा आणि महात्मा गांधींचा कसा संबंध होता, हे गुपित कित्येक वर्षांपासून दडवून ठेवले होते. एकीकडेविदारक सत्य, कटू आठवण, अपराधीपण, पश्चात्तापाची भावना; तर दुसरीकडे अपरिहार्यता, इतरांच्या चेहर्‍यावरचा आनंद, अनेकांचे आशीर्वाद आणि समाजकार्य अशा दोन्ही प्रकारच्या भावना घेऊन रामसिंह छारा कित्येक वर्षे जगत होता. कदाचित इतकी वर्षे मनात हे द्वंद्व सुरू असल्यामुळेच रामसिंहने कित्येक वर्षे ही घटना लपवून ठेवली असावी...

प्रख्यात लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ती महाश्वेता देवी, प्रख्यात भाषातज्ज्ञ आणि आदिवासी-भटक्या विमुक्तांचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश देवी आणि साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी जर रामसिंह छाराला बोलते केले नसते,

तर आजही अणि कदाचित भविष्यातही एका अविस्मरणीय सत्यघटनेला आपण मुकलो असतो.
गुजरातमधील छारानगर... छारा समाजाची वस्ती. साबरमती किनार्‍याला लागूनच आणि महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे छारा नगर. ब्रिटिशांनी ज्या जातींवर चोर-गुन्हेगार असल्याचा शिक्का मारला, त्यापैकीच छारा ही एक जमात. अशा लोकांची एक मोठी वस्तीच ब्रिटिशांनी इथे छारानगरमध्ये उभारली आणि सभोवताली तारेचे कुंपण उभारून या समाजाला कैद करून टाकले. कंजर, कंजरभाट, नट, बाँछडा, बेडिया आणि छारा हे सगळे एकच. परंतु राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र आदी राज्यांत या समाजाला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. चोर-लुटारू-बदमाश आणि हातभट्टीची दारू गाळणारे असा छारा समाजावर ब्रिटिशांनी ठेवलेला ठपका, आज इतक्या वर्षांनीही तसाच कायम; म्हणूनच समाजापासून वंचित, शिक्षणापासून वंचित, सुधारणेपासून वंचित, शासकीय योजनांपासून वंचित...
रामसिंहला नेमका काळ आठवत नाही; परंतु तो ज्या काही घटना सांगतो, त्यानुसार साधारणपणे महात्मा गांधींनी ज्या मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात साबरमती आश्रमापासून केली, तोच हा काळ असावा. रामसिंह तेव्हा दहा-बारा वर्षांचा असेल. ‘वैष्णव जन तो तेणे कहिए’ या प्रार्थनेचे सूर रोज पहाटे त्याच्या कानावर पडायचे, मात्र त्याचा अर्थ समजण्याचे रामसिंहचे वय नव्हते. दिवसभर दंगामस्ती करण्यातच त्याचा वेळ जायचा. कधी कधी साबरमतीच्या किनारी महात्मा गांधी हातात काठी घेऊन फिरायचे, तेव्हा त्यांचा अवतार बघून रामसिंह आणि त्याचे मित्र ‘देखो देखो लाठीवाला बाबा आया, नंगा बाबा आया’ असे चिडवायचे. माझी चेष्टा करणारी ही मुलं कोण आहेत, असे एकदा गांधीजींनी आपल्या एका अनुयायाला विचारले. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, ही मुलं इथल्याच छारानगरची आहेत. भारतातल्या अनेक भटक्या आणि आदिवासी जातींवर ब्रिटिशांनी जन्मजात गुन्हेगारांचा शिक्का मारून त्या सगळ्यांना पकडून इथे सेटलमेंटमध्ये ठेवले आहे. एक प्रकारचे हे एक खुले कारागृह असून या सगळ्यांना दिवसातून कित्येक वेळा पोलिसांना हजेरी द्यावी लागते. गांधीजी दु:खी झाले. ते म्हणाले की, हे सगळं भयंकर आहे. ब्रिटिश सरकार एखाद्याला जन्मजात गुन्हेगार कसे काय ठरवू शकतात? तुम्ही एक काम करा... या वस्तीतल्या चार-पाच मुलांना आश्रमात अभ्यासासाठी बोलावून घ्या. कदाचित चार बुकं वाचून ते आपल्या समाजासाठी काही तरी करू शकतील...
दुसर्‍या दिवसापासून छारानगरातील चार-पाच मुलं रोज सकाळी उठून साबरमती आश्रमात जाऊ लागली. या मुलांमध्येच रामसिंह छारादेखील होता. चुणचुणीत रामसिंहला गांधीजींनी या सगळ्यांचा लीडर बनवून टाकले. काही तरी खायला मिळेल, या आशेपोटी ही मुलं रोज आश्रमात यायला लागली. हळूहळू रामसिंहला आश्रमाची गोडी वाटायला लागली. तो पाहत होता की, या माणसाची जादू काही औरच आहे. सगळे जण याला नमस्कार करतात, याचेच ऐकतात, कितीही श्रीमंत असो; प्रत्येकालाच इथे सूत कातायला चरख्यावर बसवले जाते...

रामसिंह आणि त्याच्या मित्रांना एका कोपर्‍यात जागा दिली होती. तेथे गांधीजी या मुलांना इंग्रजी आणि गुजराती अक्षरे गिरवायला शिकवत होते. परंतु दर वेळी शिकवता शिकवता गांधीजी मध्येच उठायचे, आपल्या खोलीत जायचे, एक डबा घेऊन यायचे आणि डब्यातला काजू-बदामचा सुकामेवा हातात घेऊन त्यांच्या लाडक्या बकरीला भरवायचे. बकरीदेखील हा सुकामेवा अगदी आनंदाने खायची. हा दिनक्रम रोज चालायचा. आपल्याला एका वेळचे अन्न मिळत नाही आणि इथे हा बाबा रोज या बकरीला सुकामेवा खायला घालतोय... रामसिंहला वाईट वाटायचं. त्याला त्या बकरीचा हेवा वाटायचा. तो आपल्या मित्रांना म्हणायचा, ‘हा बाबा एकदम चमत्कारिकच दिसतोय. या बकरीला सुकामेवा खायला घालतो आणि रोज सकाळी याच बकरीचं दूध पितो. म्हणूनच या वयातही तो इतक्या वेगाने चालू शकतो... या बकरीचे दूध प्यायल्यामुळेच त्याची सगळे जण हाजी हाजी करतात.’

दिवसामागून दिवस जात होते. पावसाचा पत्ता नसल्यामुळे दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली होती. दारिद्र्य, बेकारी, कुपोषण, आजार, भूकबळी यामुळे छारानगरवर अवकळा पसरली होती. एकेका दाण्यासाठी छारानगर मोताद झाले होते. घरातली चूल चार-पाच दिवसांपासून पेटली नसल्याने रामसिंहदेखील उपाशी होता, भुकेने कळवळत होता. अशातच रामसिंहला एक कल्पना सुचली. त्याच्या नजरेसमोर गांधीजी आणि सुकामेवा खाणारी त्यांची बकरी दिसू लागली. पोटाला फाके पडले होते आणि हे फाके बुजवण्याचा दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता. रामसिंहने आपल्या मित्रांना सांगितले की, आता एकच पर्याय दिसतोय तो म्हणजे बापूंची ती बकरी...रामसिंहची कल्पना त्याच्या मित्रांनीही उचलून धरली. आज रात्रीच बकरीला उचलायचे ठरले. बापूही गेल्या काही दिवसांपासून आश्रमात नव्हते. त्यांनी त्यांचा मोठा दौरा आखला होता. रामसिंह आणि त्याचे सवंगडी रात्री लपतछपत आश्रमात शिरले. चोरी करणे, शिकार करणे हे त्यांच्या रक्तातच होते. त्यामुळे त्यांना बकरी उचलणे सहज शक्य होते. रामसिंहने हळूच जाऊन बकरीला धरले आणि तिचा जबडा खेचला, तितक्याच चपळाईने त्याच्या मित्रांनी बाभळीचे काटे बकरीच्या जिभेला टोचले. शिकार मिळवण्याचा हा पहिला नियम होता. एकदा का जिभेच्या आरपार बाभळीचा काटा रुतला की, कितीही मोठे जनावर असले तरी त्याला आरडाओरड करता येत नाही. रामसिंह आणि त्याच्या मित्रांचे काम फत्ते झाले होते. तशीच त्यांनी ती बकरी खांद्यावर उचलली आणि आश्रमातून पोबारा केला. वस्तीवर जाईपर्यंत रामसिंहच्या मनात एकच विचार घोळत होता, आपण केले ते बरोबर की चूक? परंतु त्याच्या डोळ्यासमोर वस्तीतल्या निरागस मुलांचे भुकेले चेहरे आले आणि त्याची पावले वेगाने वस्तीच्या दिशेने पडू लागली. वस्तीवर येताच सर्वप्रथम कुत्र्यांना चाहूल लागली. ते जोरजोरात भुंकायला लागले. वस्तीला जाग आली. हळूहळू रामसिंह एक बकरी घेऊन आला आहे, ही वार्ता सबंध वस्तीवर पसरली. सगळे जण रामसिंहभोवती गोळा झाले. काही मिनिटांतच त्या बकरीचा फडशा पाडला गेला आणि रामसिंहच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवत सगळ्यांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिले. रामसिंहने त्या दिवसापासून आश्रमात जायचे बंद केले; पण जेव्हा गांधीजी आश्रमात परतले, तेव्हा आपली बकरी गायब झाल्याचे कळल्यानंतर ते प्रचंड संतापले. आपली लाडकी बकरी नसल्याचे आणि तिचे दूध आता पिता येणार नसल्याने ते दु:खी झाले. ‘हे काम नक्कीच त्या छारानगरातील मुलांचे असले पाहिजे. खबरदार जर यापुढे ती मुलं आश्रमात दिसली तर...’ असे म्हणून गांधीजींनी छारानगरला साबरमती आश्रमाचे दरवाजे कायमचे बंद करून टाकले.
काही वर्षांपूर्वी भटक्या-विमुक्तांसदर्भात छारानगरीत एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाश्वेतादेवी, डॉ. गणेश देवी, लक्ष्मण गायकवाड यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. व्यासपीठावर सगळे मान्यवर बसले होते आणि कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी निवेदकाने रामसिंह छाराला व्यासपीठावर आमंत्रित केले. त्याची ओळख करून देताना रामसिंह छारा हा आमच्या समाजाचा ‘नायक’ असून त्याचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करावा, अशी विनंती निवेदकाने केली होती. कार्यक्रम संपल्यानंतर मात्र या सगळ्या अभ्यासकांनी रामसिंहला घेरले आणि तब्बल 60-70 वर्षांपासून लपवून ठेवलेली ही गोष्ट रामसिंहने या सगळ्यांना सांगितली. छारानगरीत
मला ‘गांधीजींचा बकरी चोर’ याच नावाने ओळखले जाते आणि प्रतिकूल परिस्थितीत मी या सगळ्यांचे पोट भरू शकलो म्हणून हे मला ‘नायक’ म्हणतात, असे रामसिंह म्हणाला...
(shivaprash@gmail.com)

गोष्ट संपली... आता खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या...
1) वैष्णव जन तो तेणे कहिए, जे पीड पराई जाणे रे... या प्रार्थनेत जो दुसर्‍यांचे दु:ख समजू शकतो, त्यात सहभागी होऊ शकतो, तोच खरा वैष्णव. मानवतेचे दुसरे नाव म्हणजेच वैष्णव. असे असताना साबरमती आश्रमापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छारानगरीचे डोंगराएवढे दु:ख महात्मा गांधींना का दिसले नाही?
2) साबरमतीच्या या विचारधारेचा एकेक थेंब पिऊन सबंध भारतात अहिंसक क्रांती झाली. मग जे भटके इंग्रजांविरुद्ध गनिमी काव्याने लढले, ज्या भटक्या-विमुक्तांना इंग्रजांनी जन्मजात गुन्हेगार ठरवले, ज्या समाजाचा ब्रिटिशांनी कैदखान्यात डांबून अतोनात छळ केला, त्या भटक्यांच्या छारानगरीत साबरमतीची ही विचारधारा का नाही पोहोचू शकली? आजतागायत छारानगरीवर असलेला चोर-गुन्हेगारीचा कलंक का पुसला गेला नाही? देश स्वतंत्र झाला, परंतु स्वातंत्र्याची किरणे छारानगरीत का पोहोचू शकली नाहीत?
3) पोटाला फाके पडले असतानाही एका बकरीला स्वत:च्या हाताने काजू-बदाम खायला घालणार्‍या महात्मा गांधींबद्दल छोट्या रामसिंहच्या मनात काय भावना आल्या असतील?
4) आपल्या वस्तीला निदान एक वेळच्या खाण्याची व्यवस्था करणारा रामसिंह छारा हा नायक की खलनायक?
5) एक बकरी चोरीला गेली म्हणून रामसिंहला आश्रमाचे दरवाजे कायमचे बंद करून टाकणार्‍या महात्मा गांधींनी छारानगरीत त्यांचे ‘सत्याचे प्रयोग’ का नाही राबवले?