आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ती फुलनदेवी होती म्हणून...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकाचे सामाजिक अन्याय-अत्याचार-शारिरीक बलात्कार आणि लोकसभेची खासदार म्हणून तितक्याच टोकाचे मान-सन्मान अनुभवलेली एकेकाळची 'डाकूरानी' फुलनदेवी विदारक शेवटानंतरही लोकस्मृतीतून गेली नाही... या घटकेला ती पुन्हा आठवणींत जिवंत झाली, तिच्या पश्चात आई आणि बहिणीच्या झालेल्या दैन्यावस्थेमुळे.... आसपासचा समाज सोडून द्या, तिचा वापर करून आपलं संख्याबळ वाढवलं, त्या समाजवादी पार्टीनेही या दोघींना बेदखल करून टाकलं आहे... जातीपातीत लडबडलेल्या ज्या समाजाने गेल्याच आठवड्यात सीआरपीएफच्या नट जमातीतल्या शहीद जवानाला अंत्यसंस्कारासाठी जमीन नाकारली, तोच समाज आज फुलनच्या आई-बहिणीलाही जगणं नकोसं करतो आहे... त्याचीच ही अंगावर काटा आणणारी कहाणी...

गरिबाने वाकायचं आणि श्रीमंताचे पाय धरायचे. गरिबाच्या तोंडी अन्नाचे काही कण जाणार, तर श्रीमंत आंब्यांवर ताव मारणार. गरिबाच्या पोटातल्या भुकेच्या वेदनेतूनच जन्म होतो भीती आणि शरणागतीचा. मीही शरण जाण्याचा प्रयत्न केला, वडिलांनी सांगितलं त्यानुसार, परंतु मला ते शक्य झालं नाही. मी आईसारखी होते, मी आतल्या आत संतापाने खदखदत होते....

तिच्या येण्याची नुसती चाहूल लागली तरी गावात पळापळ व्हायची. खिडक्या-दरवाजे घट्ट बंद करून जीव मुठीत धरून लोक लपून बसायचे. स्वत:च्या नावाचा पुकारा करतच ती गावात प्रकट व्हायची. खाकी पोशाख, डोक्याभोवती लाल रंगाची पट्टी, खांद्यावर बंदूक... शिव्यांची लाखोली वाहात एक पाय असा ऐटीत दगडांवर ठेवून ‘निकलो बाहर सालों, मै आयी हूँ’ अशी जेव्हा ती डरकाळी फोडायची, तेव्हा काही मिनिटांतच जीव मुठीत घेऊन बसलेले स्वत:हूनच तिच्या पुढ्यात हजर व्हायचे. पैसे, दागिने, धान्याची पोती अशा सगळ्या वस्तूंची तिच्यासमोर रास लागायची. दुसऱ्या बाजूला त्याच गावातल्या गरीब वस्त्यांवर मात्र दिवाळी साजरी व्हायची. उच्चजातीय जमीनदारांना लुटल्यानंतर खोऱ्यात परतताना ती या मागासलेल्या गरीब वस्त्यांना भरपूर काही देऊन जायची... अगदी रॉबीनहूड स्टाईल. खोऱ्यात परतताना तिच्याकडे लुटलेल्या ऐवजांसोबतच शेकडो गरिबांच्या आशीर्वादाची पुण्याई असायची. लपण्यासाठीचे चंबळ खोरे आणि लुटण्यासाठीची बुंदेलखंडच्या आजूबाजूंची गावं या प्रवासातच डाकू फुलनची फुलन देवी झाली... गरीब, अशिक्षित, दलित, खचलेल्या, गांजलेल्या, जमीनदारांच्या दबंगशाहीसमोर शरणागती पत्करलेल्या अतिमागास समाजाच्या लोकांनीच फुलनला देवीचा दर्जा देऊन टाकला होता. त्यांच्यासाठी ती दुर्गा माँ ठरली होती.

बहुतेक ते इंदिरा गांधी आवास योजनेची मदत घेऊन अर्धवट अवस्थेत बांधलेलं कच्चं पक्कं घर असावं. घराची अवस्थाच मुलादेवी आणि रामकली यांच्या हालाखीच्या जगण्याची साक्ष देते. आजूबाजूला सगळी निषाद आणि मल्लाह समाजाची घरं. उत्तर प्रदेशमधला हा अति मागास समाज... पारंपरिक पद्धतीने मासे पकडण्याचा त्यांचा पिढीजात धंदा आणि म्हणूनच या समाजाची वस्ती ही प्रामुख्याने नदीच्या किनाऱ्यालगत. यमुनेच्या तीरावर वसलेल्या काल्पी या जालौन जिल्ह्याच्या छोट्या तालुक्यातील शेखपुरगुढा हे एक खेडं आणि या खेड्यात निषाद-मल्लाह समाजाच्या लोकांच्या वस्तीच्या अगदी शेवटच्या टोकाला असलेलं मुलादेवीचं हे घर... गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाने या भागातील लोकांच्या तोंडचा घास पळवलाय. वयोवृद्ध आणि सतत आजारी असलेली मुलादेवी आणि पन्नासपेक्षा अधिक वय असलेली तिची रामकली ही मुलगी, दोघीच या घरात राहतात. रोज सकाळी रोजंदारीच्या शोधात जायचं आणि बऱ्याच वेळा हात हलवत परत यायचं. शंभर रुपये रोजंदारीवर कधी काम मिळतंदेखील, परंतु त्याचीही फारशी खात्री नाही. आता तर मुलादेवीने येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे हात पसरायलाही सुरुवात केलीये. गेल्या काही वर्षांपासून दारिद्र्यरेषेखालील योजनेंतर्गत बीपीएल कार्ड मिळावे म्हणून मायलेकी सतत तहसिलदाराकडे खेटा घालताहेत, परंतु दर वेळी प्रशासनाचे उत्तर ठरलेले...

तुम तो सासंद फुलनदेवी की माँ और बेहन हो,
तुम्हे कैसे मिल सकता है बीपीएल कार्ड...

बहमई हत्याकांडामुळे फुलनदेवीची ख्याती जगभरात पसरली होती. दबंगशाहीच्या जोरावर ज्या गावातील जातीयवादी ठाकूरांनी असहाय्य फुलनदेवीवर सामूहिक बलात्कार केले होते, त्याच बहमई गावात बंदूक हातात आल्यानंतर फुलनने तब्बल २२ ठाकूरांना एका रांगेत उभे करून गोळ्या घातल्या. आपल्यावरच्या अन्यायाचा बदला पूर्ण झाला, असे सुरुवातीला म्हणणाऱ्या फुलनने नंतर मात्र आपला या हत्याकांडाशी काहीएक संबंध नसल्याचे सांगितले होते. मात्र तरीही फुलनच्या अशा कारवायांमुळे पोलिस आणि प्रशासन हतबल झाले होते. फुलन व्यवस्थेच्या विरुद्ध त्वेषाने पेटून उठली होती. याच व्यवस्थेने तिच्या कोवळ्या आयुष्याची उलथापालथ करून ठेवली होती. वयाच्या अकराव्या वर्षीच वयाने दुप्पट असलेल्या माणसाशी लग्न आणि त्याच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक अत्याचार सहन न झाल्याने फुलन माहेरी परतली. इथे येण्यापेक्षा तिकडेच मरून का नाही गेलीस, हे आपल्या जन्मदात्याचे बोल फुलनच्या जिव्हारी लागले. बंडखोरी रक्तात भिनण्याची ती अगदी सुरुवात होती. स्वत: मरण्यापेक्षा व्यवस्थेलाच गाडून टाकण्याचा तिचा निर्धार, हा तिच्यावर गावातल्या दबंगांनी केलेल्या सामूहिक बलात्कारानंतर आला होता. डाकूंच्या टोळीकडून अपहरण आणि पुन्हा बलात्कार झाला. नंतर आता बंदूक हाती घेतल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही, या निर्धारावर येऊन ठेपलेली फुलनदेवी व्यवस्थेला अनेक वर्षे आपल्या बंदुकीच्या गोळ्यांवर सळो की पळो करून सोडत होती. चंबळच्या खोऱ्यात तिची दहशत वाढतच चालली होती. मागास जातींवर अन्याय करणारे जमीनदार, राजपूत आणि ठाकूर हे फुलनच्या निशाण्यावर होते. बहमई हत्याकांडानंतर उत्तर प्रदेश प्रशासनाने फुलनविरुद्धची मोहीम आणखी तीव्र केली. उत्तर प्रदेशचे पोलिस आपल्याला जिवंत सोडणार नाहीत, याची पुरेपूर खात्री असल्याने आणि आता टोळ्यांमधील इतर सहकारीही मारले गेल्यामुळे फुलनने मध्यप्रदेश सरकारसमोर आत्मसमर्पण करण्याचा निश्चय केला. फाशीची शिक्षा होणार नाही, या बोलीवरच तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांच्यासमोर बंदूक खाली ठेवताना फुलनने स्वत:च्या अटींवर आत्मसमर्पण केले होते. आत्मसमर्पण करते वेळी फुलनचे शब्द होते... तुरुंगात गेल्यानंतर माझ्या घरच्यांना पूर्ण संरक्षण, त्यांना कसायला जमीन, आणि माझ्या समाजातील मुलांना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे....

‘रामकली के अंदर भी फुलन जैसा खून है जिसकी गर्मी क्या कहर ढायेगी’ संतापलेली रामकली परिस्थितीपुढे इतकी हतबल झाली आहे की, आता तीदेखील फुलनप्रमाणे बंदूक हाती घेण्याची भाषा करू लागली आहे. किसी दिन हथियार उठाकर अपना इंसाफ खुद ही हासिल कर दूँगी... रामकलीचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. फुलन होती तेव्हा गावात इज्जत होती, तिच्या एका इशाऱ्यावर सरपंच आणि इतर गावकरी इथे घरात धान्याचा ढिग रचायचे; परंतु आता आम्ही मायलेकी रस्त्यावरून निघालो, की लोक दुसऱ्या दिशेला तोंड वळवतात. त्यांचंदेखील काय चुकतं म्हणा, आमच्याच कुटुंबीयांनी आम्हाला नेस्तनाबूत केल्यावर ती लोकं तरी किती दिवस पुरणार आम्हाला... आजूबाजूच्या घरांकडे बघत रामकली बोलत होती.

रामकली कामासाठी बाहेर पडल्यानंतर म्हाताऱ्या मुलादेवीच्या पोटापाण्याची काळजी आम्ही अनेकदा घेतली आहे. परंतु आता यांना मदत करायचीच नाही, असं गावकऱ्यांनी ठरवलं आहे, तिथेच असलेला एक शेजारी सांगत होता. या मुलादेवीचा मोठा मुलगा म्हणजे फुलनदेवीचा सख्खा भाऊ तिकडे मध्यप्रदेशमध्ये पोलिस खात्यात आहे. चांगला कमावतोय. सुरुवातीला यायचा, पण आता अनेक महिने झाले तो इकडे फिरकतच नाही. फुलनचा भाऊच या दोघींना बघत नाही म्हटल्यावर आम्हीदेखील किती दिवस यांना बघणार, म्हणूनच गावकऱ्यांनी आता मदत न करण्याचे ठरवले आहे.

मधल्या काळात मुलादेवीला मारहाण करण्यापर्यंत त्यांच्या नातलगांची मजल गेली होती. वडिलोपार्जित शेतजमीन, तीदेखील मोठ्या दिराच्या मुलाने लुबाडली. या जमिनीवर पाय ठेवायलाही तो देत नाही. जेव्हा त्याच्याविरुद्ध मुलादेवीने प्रशासनाकडे तक्रार केली, तेव्हा मोठ्या दिराच्या या मुलाने घरात घुसून मुलादेवीला मारहाण केली. ‘फुलन जेव्हा डाकू बनली आणि चंबळच्या खोऱ्यात निघून गेली, तेव्हा आम्हाला इथे पोलिसांचा खूपच त्रास झाला. फुलनचा ठावठिकाणा विचारण्याच्या बहाण्याने अनेकदा पोलिस इथे येऊन आम्हाला मारहाण करायचे. आता फुलन नाही तरी मारहाण सुरूच आहे’ मुलादेवीच्या आवाजात कंप जाणवत होता.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन झाले आणि आत्मसमर्पणापासून पुढच्या ११ वर्षांपर्यंत तुरुंगात असलेल्या फुलनदेवीची चाळीसहून अधिक गुन्ह्यांच्या आरोपांमधून निर्दोष मुक्तता झाली. डाकू फुलनदेवी ते खासदार फुलनदेवी, अशी तिची दुसरी इनिंग सुरू झाली. १९९६मध्ये मिर्झापूर मतदारसंघातून ज्या पक्षाने तिच्या डोक्यावर हात ठेवला, त्याच समाजवादी पक्षाच्या तिकिटावर ती निवडून आली. १९९८मध्ये पुन्हा झालेल्या लोकसभा निवडणुकीत फुलनदेवी दुसऱ्यांदा खासदार बनली. कांशीराम-मायावतीच्या झंझावातासमोरही फुलनला युपीतल्या अतिमागास समाजाचा मोठा पाठिंबा होता. मानमरताब, पैसा, गाडी-बंगला, नोकरचाकर... फुलनच्या दिमतीला आता सारं काही होतं. फुलन हाउस नावाचा तिचा दिल्लीत अालिशान बंगला होता. ‘आय फुलन देवी... द ऑटोग्राफी ऑफ इंडियाज बॅन्डिट क्वीन’ या नावाने तिचं आत्मचरित्र प्रकाशित झालं. अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले. कलात्मक दिग्दर्शक शेखर कपूरने फुलनच्या आयुष्यावर ‘बॅन्डिट क्वीन’ नावाचा चित्रपट काढला. फुलनचे नाव जगभरात पोहोचले. अतिशय नावाजलेल्या टाईम मासिकाने जगातील चौथी विद्रोही महिला म्हणून तिला गौरवले. तोपर्यंत फुलनदेवीने उमेद सिंगसोबत दुसरा विवाह करून आपला संसार थाटला होता. खासदार असताना ती गावी यायची, तेव्हा प्रशासन तिच्यासमोर झुकलेलं असायचं. गावासाठी फुलनने बरंच काही केलं. लोकांनी तिला दुर्गादेवीची उपमा दिल्यामुळे फुलनने गावात दुर्गादेवीचे मंदिर तर बांधलेच, परंतु मुद्दाम अति मागास समाजाचाच पुजारी नेमला. सगळं काही सुरळीत सुरू असतानाच २५ जुलै २००१ रोजी फुलनदेवीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. बहमई हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी शेरसिंग राणाने फुलनला संपवले, असे म्हणतात.

फुलनच्या हत्येचे सत्य कधीच बाहेर येणार नाही, कारण तिला संपवण्यात फक्त शेरसिंग राणाचाच नव्हे तर तिच्या अतिशय जवळच्या लोकांचाच हात असल्याचा आरोप मुलादेवी करते. अर्थात, इथे आमचेच खायचे वांदे झाले असताना आता आम्ही कुठे कोर्टकचेऱ्या करत बसणार. फुलन गेली, आमचं सर्वस्व गेलं. फुलन गेल्यानंतर अवघ्या वर्षभरातच या लोकांनी त्यांचे रंग दखवायला सुरुवात केली. तिच्या त्या नवऱ्याने सगळं लुबाडून नेलं, आमच्या वाट्याला काही एक येऊ दिलं नाही... समाजवादी पक्षाने फुलनच्या मृत्यूनंतर मोठमोठे वादे केले; पण आज आमच्या घरची चूल पेटवायला नेतेमंडळी जाऊ द्या, एखादा कार्यकर्ता तरी येतो का? पक्षाने फुलनच्या नावाचा वापर केला आणि तिला खड्यासारखं बाजूला फेकून दिलं. बरं ज्या मूलभूत गोष्टी मिळायला हव्यात, त्यादेखील अडवून ठेवल्या आहेत. माझं पेन्शन बंद झालयं, रेशनकार्ड देत नाहीयेत, दुष्काळ निवारण योजनेचा लाभ मला मिळू देत नाहीयेत, दर वेळी कचेरीत गेलं तर लाच तरी मागतात किंवा पोकळ आश्वासनं देतात...

कोई हमारा सहायतावाला बन जाये, कोई दीदी जैसे हमे ख्वाब दिखाने लगे हम उसी को अब दीदी मानने लगे है.. वो ही अब हमारे लिये भगवान है... रामकली सांगते, की लोकांना आजही वाटतं की, फुलनने कमावलेलं आमच्याकडे खूप काही आहे, पण तस असतं तर आज माझी आई दुसऱ्यांकडे भीक मागत नसती. देखो देखो फुलन की माँ आ रही है, हे सतत ऐकूनच आता उबग आलाय...

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत आणि आश्चर्याची बाब म्हणजे, फुलनदेवीच्या हत्येला १५ वर्षे उलटून गेल्यानंतरही तिच्या नावाचे राजकारण आजही सुरूच आहे. युपीतल्या अतिमागास समाजाच्या उन्नतीसाठी फुलनदेवीने तिच्या खासदारकीच्या कारकिर्दीत एकलव्य सेना उभारली होती. तिच्या नवऱ्याच्या मनमानीमुळे एकलव्य सेना फुटली आणि फुलनदेवीच्या हजारो कार्यकर्त्यांनी ‘फुलनदेवी जन जागरण सेवा’ या नावाने नवीन संघटना सुरू केली. युपीत या वेळच्या निवडणुकीत सगळ्या जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा या संघटनेचे प्रमुख आणि एकेकाळचे फुलनदेवीचे कट्टर समर्थक पप्पू निषाद यांनी केली आहे. मम्मीजी(फुलन देवी)च्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी निषाद काही वर्षांपासून करत जरी असले तरी मम्मीजींच्या माता-भगिनींच्या पोटाला पडलेले फाके कसे बुजवता येतील, याचा एकही कार्यक्रम या फुलनदेवी जन जागरण संघटनेच्या अजेंड्यावर नाही. मुलादेवी आणि रामकली यांना बीपीएल कार्ड मिळवून देणे, हे सत्ताधारी समाजवादी पक्षासाठी अगदीच किरकोळ काम; परंतु ते असे करणार नाहीत, कारण तसे केले तर पक्षाचीच अब्रू चव्हाट्यावर येईल, ही सपाच्या नेत्यांना भीती आहे. मोठं घर पोकळ वासा, अशी सध्या या मायलेकींची अवस्था झाली आहे.

फुलनदेवीने तिच्या आत्मचरित्रात एका ठिकाणी लिहून ठेवलंय... गरिबाने वाकायचं आणि श्रीमंताचे पाय धरायचे. गरिबाच्या तोंडी अन्नाचे काही कण जाणार, तर श्रीमंत आंब्यांवर ताव मारणार. गरिबाच्या पोटातल्या भुकेच्या वेदनेतूनच जन्म होतो भीती आणि शरणागतीचा. मीही शरण जाण्याचा प्रयत्न केला, वडिलांनी सांगितलं त्यानुसार, परंतु मला ते शक्य झालं नाही. मी आईसारखी होते, मी आतल्या आत संतापाने खदखदत होते....

रामकलीमध्येही फुलनचंच रक्त वाहतंय. आतल्या आत संतापाने
तीदेखील खदखदतेय. परिस्थिती आणखी अवघड झाली तर आता फक्त हथियार हातात घेण्याची भाषा बोलणारी रामकली काय करू शकेल, याचा अंदाज लावणे कठीण जाईल.
shivaprash@gmail.com

(छायाचित्र सौजन्य : शाह आलम)
संदर्भ : दै. भास्कर – रसरंग आणि www.countercurrents.org
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...