आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हम उडेंगे... हम उडेंगे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एके दिवशी नसीम बागेतला चिनार उन्मळून पडला... उन्मळून पडलेल्या झाडामुळे काश्मिरी अस्मितेला तडा जातोय, हे तिच्या लक्षात आले... न राहवून तिने ते पडलेले चिनारचे झाड रंगवायला सुरुवात केली. तिच्यासोबत चित्रकार, गीतकार, पत्रकार, छायाचित्रकार, गिटार वादक, ड्रमर अशा कलावंतांची फौज या चिनारच्या अवतीभवती उभी राहिली. मात्र, ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांसाठी या कलावंतांनी चळवळ सुरू केली होती, त्याच हक्कांवर पुन्हा एकदा सरकारने गदा आणली आहे.
ही चळवळ टिपणाऱ्या ‘इन द शेड ऑफ फॉलन चिनार’ या फिल्मला व्यवस्थेच्या काटेरी कुंपणात अडकवून टाकण्यात आले...

झेलम नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या नसीम बागेतील शेकडो चिनारांच्या गर्दीतला एक चिनार वृक्ष उन्मळून पडला...
पण, खोऱ्यातील प्रचंड कोलाहलात, एके ४७च्या धडधडाटात, हॅन्डग्रेनेडच्या धमाक्यात, भिरकावलेल्या दगडांच्या माऱ्यात, निष्पाप जीव गमावल्यामुळे छाती पिटणाऱ्या आईवडलांच्या आक्रोशात, पॅलेट गन्सने छिन्नविच्छिन्न झालेल्या शरीरावरच्या जखमांच्या वेदनेत उन्मळून पडलेल्या त्या चिनार वृक्षाचा आवाज कुणालाच ऐकू गेला नाही. जवळपास पाच-सहा वर्षे चिनार तसाच जमिनीवर आडवा पडून होता. एकाकी, दुर्लक्षित आणि खूपसा अबोलही. काश्मीर युनिव्हर्सिटीही याच नसीम बागमध्ये. विद्यार्थ्यांची सतत वर्दळ, परंतु हा निपचित पडलेला चिनार कुणाच्या खिजगणतीतही नव्हता.
 
खैतुल अब्याद ही विद्यापीठाच्या व्हिज्युअल आणि परफॉर्मिंग आर्ट‌्सची विद्यार्थिनी. दररोज आपल्या मैत्रिणींसह डबा खायला याच परिसरात यायची. जवळपास सहाशे-सातशे झाडांमधून नेमके हेच झाड कसे काय पडले, याचे तिला नेहमी आश्चर्य वाटायचे. फक्त १८ महिन्यांची असताना तिच्या वडलांची, जे स्वायत्त काश्मीरचे एक नेते होते, अज्ञात व्यक्तींकडून हत्या झाली होती. आझादी, सैन्य, फुटीरवादी, दहशतवादी, कर्फ्यु, शोषण हे शब्द कोवळ्या वयापासूनच तिच्या मनावर कोरले गेले होते. मनाची घालमेल, खदखद, असंतोष खैतुलने हातात ब्रश घेऊन कॅनव्हासवर व्यक्त करायला सुरुवात केली.  उन्मळून पडलेल्या त्या झाडामुळे चिनार म्हणजेच काश्मिरी अस्मितेला कुठेतरी तडा जातोय, हे तिच्या कदाचित लक्षात आले असावे. न राहवून ती सरळ उठली आणि तिने चक्क ते पडलेले चिनारचे झाड रंगवायला सुरुवात केली. स्वत: बंडखोर चित्रकार असल्याने खैतुलने त्या झाडावर ‘व्यवस्थेच्या विरोधात, शांततेच्या शोधात’ अशी संकल्पना घेऊन काही म्युरल्स रंगवली. चिनारच्या बदललेल्या रुपड्याकडे आता कॅम्पसमधल्या अनेकांचे लक्ष वेधले गेले. खैतुलच्या या कृतीला मग आणखी काही विद्यार्थ्यांची जोड मिळाली. चित्रकार, गीतकार, पत्रकार, छायाचित्रकार, गिटार वादक, ड्रमर अशा कलावंतांची फौज या चिनारच्या अवतीभवती उभी राहिली.
 
१९९०नंतर जन्मलेली ही पिढी... काश्मीरच्या खोऱ्यातील हिंसाचार या पिढीने आपल्या श्वासाइतकाच अनुभवलेला. इन्सानियत (मानवतावाद), जम्हुरियत (लोकशाही), आणि कश्मिरियत (काश्मिरी अस्मिता) या तीन तत्त्वांना कसे धाब्यावर बसवले जात आहे, हे ही पिढी उघड्या डोळ्यांनी पाहात होती. मनात प्रचंड कोलाहल... डोळ्यात अंगार... रक्त पेटून उठलेलं... पण एका ठाम निश्चयावर मात्र ते सगळेच कायम... काहीही झालं तरीही हिंसेचा मार्ग निवडायचा नाही. कारण, अभिव्यक्त होण्याचा नवा मार्ग त्यांना सापडला होता. हे चिनारचे झाड त्यांच्यासाठी जणू बोधीवृक्ष बनले होते. आणि मग त्या चिनारच्या झाडामधून सूर उमटू लागले...
फिर से हम उठेंगे, फिर से हम उभरेंगे
सुरज की तरह डुबे है, सुरज की तरह उगेंगे
कभी बंदुकों की गुँजे, कभी पत्थरों की बारीश
अब की बरस ये तुफाँ हे, पर हम ना रुकेंगे
हम उडेंगे… हम उडेंगे
 
वीस वर्षांपूर्वी माझ्यासारख्याच कुणीतरी एका तरुणाने व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी हाती बंदूक घेतली होती. लढाई तर माझीदेखील आहेच, परंतु फरक इतकाच आहे की, माझ्या हातात बंदुकीऐवजी गिटार आहे... चिनारच्या आडव्या पडलेल्या झाडावर बसून अली सैफुद्दीन हा २४ वर्षांचा तरुण गिटारवादक त्याची भूमिका स्पष्ट करतो. तर ‘रॅपर’ म्हणून सबंध कॅम्पसमध्ये प्रसिद्ध असलेल्या अलीच्या गळ्यातून उद्वेग बाहेर पडतोय...
नो बडी बिलिव्हड इन मी, नो बडी टु ट्रस्ट मी
इट फील लाईक एव्हरी सिंगल कॉप इज
हिअर टु बस्ट मी, व्हॉट वेअर यु थिंकिंग?
आय वूड से कम हिअर अॅन्ड अरेस्ट मी
 
...ही सगळी घटना आहे गेल्या वर्षी जुलैमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हान वानीला ठार करण्यापूर्वीची... वानीच्या हत्येनंतर सलग पाच महिने काश्मीर खोऱ्यात उद्रेक उफाळून आला. विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून कधी नव्हे ते विद्यार्थिनीही हातात दगड घेऊन, तोंडाला मास्क लावून ‘संगबाज’ (दगडफेक करणाऱ्यांसाठी वापरण्यात येत असलेली संज्ञा) बनल्या. साहजिकच शाळा-कॉलेजसह काश्मीर विद्यापीठालाही टाळं लागलं. अनेकांची धरपकड झाली, विद्यार्थ्यांची पांगापांग झाली... चिनारचं ते झाड पुन्हा एकाकी झालं. मेरी आवाज सुनो, मुझे आजाद करो, इन्साफ दो... असा टाहो फोडणारा या तरुण कलावंतांचा आवाज पुन्हा एकदा हिंसाचाराच्या उद्रेकात दबून गेला.

मात्र, ‘इन द शेड ऑफ फॉलन चिनार’मुळे काश्मिरी कलावंतांचा दबलेला आवाज वर्षभरानंतर पुन्हा एकदा घुमू लागला आहे. या वेळी तो फक्त खोऱ्यात घुमत नसून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पटलावरही तो आवाज ऐकला जातोय. काश्मीरच्या संघर्षस्थितीचा अभ्यास करण्यासाठी शॉन सेबास्टिअन आणि फजील एन. सी. हे हैदराबादचे दोन तरुण दिग्दर्शक वानीच्या हत्येपूर्वी कॅम्पस परिसरात फिरत होते. शस्त्र किंवा दगड हाती न घेता अभिव्यक्त होण्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म निवडणारे हे काश्मिरी तरुण अर्थातच या दिग्दर्शकद्वयींच्या आकर्षणाचे भाग बनले होते. त्यांनी कलावंतांचा हा सर्जनशील एल्गार कॅमेऱ्यात बंदिस्त करायचे ठरवले आणि या सगळ्या तरुण कलावंतांशी बोलून, त्यांच्या कलाकृती टिपून तयार झाला ‘इन द शेड ऑफ फॉलन चिनार’ हा १६ मिनिटांचा लघुपट.
 
सेबास्टिअन म्हणतो, ‘इन द शेड ऑफ फॉलन चिनार’ ही काही राजकीय फिल्म नाही. या फिल्ममध्ये कोणीही आजादीच्या घोषणा देताना दिसत नाहीत. इथे कोणीही तोंडाला मास्क लावून आपला चेहरा लपविलेला नाही. या फिल्ममधल्या प्रत्येकाची व्यक्त होण्याची साधने निराळी आहेत. चिनार वृक्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात सुरू होत असलेली एक छोटीशी परंतु अनोखी चळवळ लोकांसमोर यायला हवी, या उद्देशाने ही फिल्म आम्ही तयार केली आहे.
 
याच चळवळीचा एक भाग म्हणून या तरुणाईने ‘मिझराब’ हे फक्त विद्यार्थ्यांसाठी असलेले पाक्षिक सुरू केले होते. काश्मीरचे पारंपरिक लोकवाद्य असलेल्या ‘रबाब’ची तार छेडण्यासाठी ज्या प्लेक्ट्रमचा वापर केला जातो, त्या प्लेक्ट्रमला काश्मीर खोऱ्यात मिझराब म्हटले जाते. मिझराब हा येथील युवा पिढीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक अाविष्कार आहे. येथील प्रसारमाध्यमांवर मर्यादा आहेत, त्यामुळे आमचे विचार व्यक्त करण्यासाठी आम्ही मिझराब सुरू केले. चिनारचे हे झाड आमच्यासाठी आता प्रेरणादायी बनलेय. खोऱ्यातल्या विविध भागांमधून आम्ही इथे एकत्र येतोय, कारण आमचे उद्दिष्ट एकच आहे. काश्मीर म्हणजे फक्त एक निसर्गरम्य लॅन्डस्केप पोर्ट्रेट नसून ते  जाणिवासंपन्नही आहे आणि म्हणूनच कलासंपन्नही. इथे प्रत्येकाकडे सांगण्यासारखे भरपूर काही आहे आणि त्यासाठी त्याचे त्याने स्वत:चे असे माध्यम निवडलेय. मिझराब या सगळ्यांचा मुक्ताविष्कार आहे, असे या पाक्षिकाची संपादक साबा नाझकी सांगते.
 
‘इन द शेड ऑफ फॉलन चिनार’ संवेदनशील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. दिग्दर्शक फजील एन. सी. म्हणतो की, काश्मिरी युवा कलाकारांचा हा वेगळा प्रवाह प्रेक्षक पहिल्यांदाच अनुभवत आहेत. आतापर्यंत प्रेक्षकांनी फक्त दहशतवादी, पत्थरबाज, आझाद काश्मीरची घोषणा देत तिरंगा जाळणारे असेच तरुण पाहिले होते, किंवा त्यांना मुद्दाम तसे तरुण दाखविण्यात येत होते. मात्र या युवा कलावंतांना पाहून प्रेक्षक प्रभावित होत आहेत. वानीच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार उफाळून आला, भारतीय सैन्य दलाविरुद्ध रस्त्यारस्त्यांवर तरुणाई उतरली होती आणि म्हणूनच एक वेगळा मार्गही असू शकतो, हे दाखवून देण्यासाठी आम्ही ‘इन द शेड ऑफ फॉलन चिनार’ युट्युबवर अपलोड केला. आतापर्यंत लाखभर प्रेक्षकांकडून तो पाहिला आहे. काही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या लघुपटाची आवर्जून दखल घेण्यात आली, पारितोषिके मिळाली.
 
मात्र आता पुन्हा एकदा ‘इन द शेड ऑफ फॉलन चिनार’ला व्यवस्थेच्या काटेरी कुंपणात अडकवून टाकण्यात आले आहे. ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांसाठी या कलावंतांनी चळवळ सुरू केली होती, त्याच हक्कांवर पुन्हा एकदा सरकारने गदा आणली आहे. काश्मिरी युवकांनी लष्करावर हल्ला करण्यासाठी दगडांच्या ऐवजी हाती बंदुका घेतल्या तर बरं होईल, म्हणजे आम्हाला योग्य ते प्रत्युत्तर देता येईल, असे विधान अलीकडेच आपले लष्करप्रमुख रावत यांनी केले होते. ‘इन द शेड ऑफ फॉलन चिनार’मधील तरुणांच्या हाती ना दगड आहेत ना बंदुका... त्यांच्या हाती आहे गिटार आणि पेंटिगचे ब्रश. मात्र तरीही सरकारने या कलावंतांची गळचेपी करायला सुरुवात केली आहे, ती या लघुपटावर एक प्रकारची बंदी टाकून. केरळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘द अनबेयरेबल बींग ऑफ लाईटनेस’ (रोहित वेमुला), ‘मार्च मार्च मार्च’ (जेएनयु) आणि ‘इन द शेड ऑफ फॉलन चिनार’ अशा तीन लघुपटांची निवड झाली होती. केरळ चलचित्र अकादमीतर्फे हा महोत्सव आयोजित केला जातो आणि ही अकादमी राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याच्या अखत्यारित येते. केरळ फिल्म महोत्सवात दाखविल्या जाणाऱ्या माहितीपट आणि लघुपटांना सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राची अट नसते, परंतु केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाचे परवानगी प्रमाणपत्र बंधनकारक असते. आयोजकांनी महोत्सवात दाखविले जाणारे तब्बल २०० लघुपट प्रसारण मंत्रालयाला पाठवले. मात्र सरकारने नेमक्या याच तीन लघुपटांना परवानगी नाकारली. तेही कोणतेही स्पष्टीकरण न देता. पण सुजाणांनी कारणही ओळखले आणि त्यामागचे हेतूही.
 
माणसाने विचार करणं किंवा स्वत:चाच शोध घेण्याची सुरुवात करणं ही प्रस्थापितांसाठी धोक्याची घंटा असते. ‘आम्ही काश्मिरी आहोत. काश्मिरियत ही आमची स्वतंत्र ओळख आहे आणि ही स्वतंत्र ओळख म्हणजेच आमचे स्वातंत्र्य...’ अली सैफुद्दीन, सय्यद शहरियार, साबा नक्वी, ओव्हेसी अहमद, मुआझम बट्ट, खैतुल अब्याद, ताबिया कारी या झपाटलेल्या कलाकारांनी ‘इन द शेड ऑफ फॉलन चिनार’मध्ये ही घंटा वाजवायला सुरुवात केल्यानेच सरकारने या लघुपटाच्या प्रक्षेपणाला परवानगी नाकारली, हे तर उघडच आहे. काश्मीरच्या या कलावंतांनी गाण्यातून, कवितेमधून, चित्रांमधून बंडखोरीची, विद्रोहाची संयत भाषा वापरली आहे; या भाषेला उदार संस्कृतीचा गंध आहे. परिवर्तनाची आस आहे. असे असताना  कलेतून मांडलेले विद्रोहाचे विचार दाबून टाकण्याची सरकारची ही कृती लष्करप्रमुखांच्या विधानापेक्षाही अधिक भयावह आहे, हे नक्की.
‘इन द शेड ऑफ फॉलन चिनार’

हा लघुपट पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=JBUwW5z6aNo
 
shivaprash@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...