आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक विशेष : कश्मिरीयतच्या धगधगत्या छटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वादग्रस्त मुद्द्यांचं गाठोडं घेऊन मी काश्मीरला दहा दिवसांसाठी गेलो. खरं म्हणजे, काश्मीरमध्ये तुम्ही निव्वळ पर्यटक म्हणून फिरूच शकत नाही. हे सगळे वादग्रस्त मुद्दे काश्मीरमधील कोणत्याही भागात जा, पदोपदी डोकं वर काढतच असतात. कुणाच्या तरी बोलण्यातून, दर शंभर मीटर अंतरावर एके-४७ घेऊन खडा पहारा देणाऱ्या जवानांकडे बघून, श्रीनगर विमानतळावरच किमान पाच वेळा तरी कसून तपासणी करून, सतत असुरक्षिततेची भावना मनामध्ये जागृत करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या देहबोलीतून किंवा नाक्या-नाक्यावर फरान घालून उभ्या असलेल्या तरुण पोरांच्या घोळक्याकडे बघून…

मुंबईला परतण्यासाठी श्रीनगर विमानतळाच्या दिशेने निघालो अन् गाडीत बसतो न बसतो तोच, जोरदार पावसाला सुरुवात झाली. तसा सकाळपासून हवामानात चिंताजनक बदल जाणवतच होता. साडेतीन तासांतच मुंबई गाठली. दहा दिवसांच्या थकव्यामुळे लगेच झोपी गेलो... दुसऱ्या दिवशी पेपर उघडताच ‘काश्मीरमध्ये पुन्हा पूरजन्य परिस्थिती’ अशा ठळक मथळ्याच्या बातम्या वाचल्या आणि छातीत चर्र झालं. दहा दिवसांच्या दौऱ्यात गेल्या वर्षी येऊन गेलेल्या महापुराच्या भयभीत आठवणी सांगणारे ड्रायव्हर कम गाइड परवेझ, हाउसबोटचा मालक बशीर अहमद, शिकाराची सैर करवणारा जावेद, हॉटेलचा वेटर शमी, गुलमर्गच्या बर्फावरून स्लेज ओढणारा वशीदभाई, पहलगामच्या खोऱ्यांमधून जिवावर उदार होऊन घोड्यावरून आम्हाला सैर करवणारा मुश्ताक… एकामागोमाग एक चेहरे समोर यायला लागले.

‘ये देखो साब… दिवार पर ये जो लाइन दिख रही है ना वहाँ तक पानी घुसा था… पांच दिन तक मै घर नही जा पाया। अपने ननिहाल में रुका था. बाप कहाँ है, माँ कहा हैं कुछ पता नही था… सैलाब खत्म होने पर जब घर लौटा तो कुछ नही बचा था…’ गाडीचे सारथ्य करणाऱ्या परवेझच्या डोळ्यांच्या कडा पुन्हा एकदा ओल्या झाल्या होत्या. परवेझ जे सांगू पाहत होता त्यात जराही अतिशयोक्ती नव्हती. त्याच्याच नव्हे, तर आजूबाजूच्या प्रत्येक घराच्या भिंतींवर मला १५ फुटांपर्यंतची पाण्याच्या पातळीच्या खाणाखुणा स्पष्टपणे दिसत होत्या…

एरवी बर्फाच्या चादरीत लपेटले जाणारे भारताचे हे नंदनवन सप्टेंबर महिन्यात न भूतो न‌् भविष्यति अशा प्रलयात वेढले गेले होते. तब्बल १३ दिवस झेलम नदीचे खोरे महापुराच्या पाण्याखाली होते. महापुराच्या तडाख्यात, सुमारे तीन हजार खेडी उद्ध्वस्त झाली होती. श्रीनगर शहराची तर पुरती वाताहत झाली होती. नागरिकांना एकाच जागी आठ-आठ दिवस जखडून राहावे लागले होते. जवळपास अब्जावधी रुपयांचे नुकसान त्या महाप्रलयामुळे झाले होते…

‘सहा महिन्यांपूर्वी पूर आला होता तेव्हा सैन्याने जिवावर उदार होऊन तुम्हा लोकांना वाचवले होते ना…?’
तोंडावर मास्क बांधलेले आणि एके-४७च्या ट्रिगरवर कायम एक बोट ठेवून प्रत्येक माणसाकडे भेदक नजरेने पाहणारे सीआरपीएफ आणि बीएसएफचे जवान वारंवार दिसत असल्यामुळे परवेझला मी जेव्हा हा प्रश्न विचारला, तेव्हा तो उसळलाच…

कौन कहता है… सब बकवास है।
पर मीडिया में तो इसी प्रकार की न्यूज आयी थी और हमने तस्वीरे भी तो देखी थी…
काश्मीरमधील प्रलयाच्या वेळी सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजेसची मी पुन्हा एकदा उजळणी केली. एकीकडे परवेझने गाडीची स्पीड वाढवली होता. त्याच्या चेहऱ्यावरचे रागाचे भाव मला सहजच कळत होते. आता परवेझच्या बोलण्यालाही स्पीड आली होती.
मीडिया किस के हाथ मे है, ये हम सब जानते है साब! सैलाब के वक्त सिर्फ और सिर्फ फौज ने कैसे अच्छा रोल निभाया इसी प्रकार की खबरे छपी थी, लेकिन सच बात तो ये है की, हमारे यहाँ फौज के प्रति काफी गुस्सा था उस वक्त। उन्होने सिर्फ व्हीआयपी, अमीर और टूरिस्ट पर ही ज्यादा ध्यान दिया। हम तो शिकारा और बोट हाउस की वजह से बच गये…और हमे बचाकर फौज ने कोई एहसान नही किया हम पर, वो तो इनका काम ही है। देश के किसी भी इलाके मे इस प्रकार की घटना हुई तो फौज राहतकार्य करती ही है ना? तो फिर सिर्फ कश्मीर के बारे में ही ऐसा भेदभाव मीडिया क्यो कर रही है, ये हम जानते नही क्या? उनके वर्दी पर हमारे लडकों के खून के धब्बे अभी मिटे नही है! सैलाब के पानी से यह दाग मिटाने की कोशिश फौज करना चाहती है और उसी तरह से उन्हे मीडिया मे पेश किया जा रहा है...
काश्मिरीयतशी (अस्मिता) असलेल्या घट्ट नात्यामुळे परवेझ कितीही पोटतिडकीने बोलत असला आणि काश्मीरच्या बाबतीतले राजकारण बाजूला ठेवले तर श्रीनगरच्या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये, घरांच्या छतावर, डोंगर-दऱ्यांमध्ये चोवीस तास अलर्ट असणाऱ्या सैन्याला खरोखरच सलाम करावासा वाटतो.

अगर फिरदौस बर्रुए-जमीनस्तो, हमीनस्त, हमीनस्त, हमीनस्तो… जन्नत अगर कही है तो यही है, यही है, यही तो है…!
‘काश्मीर की कली’पासून अगदी अलीकडच्या स्टुडंट ऑफ दी इयर, ये जवानी है दिवानी, जब तक हे जान, हायवे आणि हैदर या चित्रपटांचे शूटिंग काश्मीरच्याच खोऱ्यात झाले होते. त्याच्या खाणाखुणा आलेल्या पाहुण्यांना दाखवण्यात काश्मिरींना अभिमानही वाटत आला आहे. हिंदी चित्रपटांचे इतके ‘डाय हार्ड फॅन’ असणारे काश्मिरी पाहून मी परवेझला गाडी सिनेमागृहाकडे घेऊन जाण्यास सांगितले. पाच मिनिटांतच आमची गाडी श्रीनगरमधील सिराझ सिनेमागृहाबाहेर थांबली. गाडीतून उतरलो तर थिएटर बंद.

क्यों परवेझभाय थिएटर बंद क्यों है?
परवेझ हसला, साब ये तो पिछले २२ सालों से बंद है। ये ही नही, श्रीनगर मे टोटल बारा थिएटर है लेकीन सभी बंद है।
ऐसा क्यो?
सिक्युरिटी के तौर पर… ऐसे सरकार बताती है।
परवेझने सांगितलेली माहिती आश्चर्यकारक होती. नव्वदीच्या दशकात जेव्हा काश्मीर धुमसत होते, तेव्हा हीच थिएटर्स दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य ठरली होती. त्या वेळी अनेक थिएटर्समध्ये हॅण्डग्रेनेड फेकले गेले, थिएटर्स जाळली गेली. लष्करासोबत चकमकी घडल्या. तेव्हापासून सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवली गेलेली थिएटर्स आजतागायत सुरूच झालेली नाहीत. ‘खय्याम’ नावाचं थिएटर जिथे ‘शोले’ चित्रपटाने सिल्वर ज्युबली साजरी केली होती, तिथे आता रुग्णालय सुरू झालयं. तर काही ठिकाणी सैन्याने त्यांचे कार्यालय थाटलंय. १९९९मध्ये ब्रॉडवे, नीलम आणि रिगलच्या मालकांनी थिएटर पुन्हा सुरू करण्याची हिंमत दाखवली होती, परंतु तीन बॉम्ब फेकून दहशतवाद्यांनी त्यांचे इरादे नाकामयाब केले.

यहाँ पर किस की क्रेझ है?
सल्लूभाय और कतरिना की… परवेझ म्हणाला.
वास्तविक शाहरुख खानने काश्मीरच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट केले आहेत; मात्र तरीही सलमान का लाडका, असा प्रश्न मी परवेझला विचारला, तेव्हा त्याने दिलेले उत्तर मजेशीर होते...
‘शाहरुख बहोत ही अाखडू है, यहाँ पर तीन-चार बार आया, पर किसी से मिला ही नही। सल्लूभाय एक ही बार आये थे पर उसके आनेसे यहाँ का माहोल ही बदल गया था। आम लोगों के साथ सल्लूभाय बहोत अच्छे से पेश आये थे।

२६ मार्चला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाचा उपान्त्य फेरीचा सामना मी श्रीनगरच्या हॉटेलमध्ये बसून पाहिला. मॅच असल्यामुळे त्या दिवशी मी फिरणार नाही, असे गाईडला सांगून ठेवले होते. भारताने फार लवकर हाराकिरी पत्करल्यानंतर टीव्ही बंद करून मी बाहेर पडलोच… दाल लेकच्या फुटपाथवरून फेरफटका मारताना असंख्य काश्मिरी तरुण कॉमेंट्री ऐकत घोळक्याने उभे होते. लेकमध्ये शिकाऱ्याच्या रांगा लागल्या होत्या. एरवी पर्यटक दिसला की लगेच त्याच्याभोवती कोंडाळे करणारे शिकारा चालक माझ्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. मी असाच पुढे चालत जात असताना एका शिकाऱ्यामध्ये टीव्हीवर मॅच सुरू असल्याचे मला दिसले. टीव्हीभोवती मोठा जमाव गोळा झाला होता. मीदेखील त्या जमावाचा एक भाग बनलो. भारत हरणार, ही काळ्या दगडावरची रेघ असल्यामुळे माझे सगळे लक्ष त्या काश्मिरी तरुणांचे निरीक्षण करण्यावरच होते.

भारताची मॅच समोर सुरू असताना धोनी किंवा कोहली अशा उत्तराच्या प्रतीक्षेत, काश्मीर मे कौन से क्रिकेटर को ज्यादा पसंद करते है? असा घोळक्यातील एकाला प्रश्न विचारल्यानंतर ‘शाहिद आफ्रिदी’ असे अनेक जण एका सुरात ओरडले.
भारत हरत चालल्याचे कोणतेही दु:ख, कोणतीही निराशा मला त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हती. ‘साब, आज इंडिया हार गयी तो शॉपिंग जरुर करना, दाम उतरने वाले है’ असे एकाने हळूच माझ्या कानात सांगितले. तो असे का म्हणाला, हे मात्र मला शेवटपर्यंत कळले नाही…
मॅच संपल्यानंतर गाडीने मुघल गार्डनजवळ पोहोचतो न पोहोचतो तोच, धडाम असा जोरदार धमाका झाल्याने मी घाबरलोच. मात्र खिडकीतून बाहेर पाहिल्यानंतर कळलं, आवाज बॉम्बचा असला तरी तो फटाक्यांच्या बॉम्बचा आवाज होता.

इंडिया हार गई ना, इसलिये यहाँ के ‘पथ्थरबाज लडके’ एैसी हरकत कर रहे है… परवेझ माहिती पुरवण्यास तयार होताच…
ये पथ्थरबाज लडके वहीं है, जिन्हे पैसे देकर कुछ साल पहले घाटियों मे अशांती फैलाने का काम दिया गया था… सियासत करनेवाले ऐसे पथ्थरबाज लडकों का बडी खुबी से इस्तेमाल कर लेते है…
खोऱ्यात फिरताना मी मुद्दाम ड्रायव्हरला आडवाटेने, गावागावांमधून गाडी नेण्यास सांगत होतो. जिकडेतिकडे मला फक्त गरिबी आणि गरिबीच दिसली. प्रचंड काम करणाऱ्या बायका आणि वृद्ध यांच्या तुलनेत तरुण पोरं मात्र रिकामटेकडी किंवा चकाट्या पिटतानाच दिसत होती. गरिबीचे विदारक दर्शन झाल्यावर मी परवेझला विचारले, अरे इथे श्रीमंतांचा एरिया आहे का? मला पाहायचाय…
दल लेकच्या उत्तरेस साधारणत: दहा किलोमीटरच्या परिसरात परवेझने मला फिरवले. मुंबईत जसा मलबार हिल हा गर्भश्रीमंतांचा परिसर आहे, तसा तो काश्मीरमधला धनाढ्य लोकांचा एरिया होता. रांगेत मला करणसिंग महल, फारुख व ओमर अब्दुल्ला यांचे बंगले दिसले. खोऱ्यात फिरताना नरेंद्र मोदींचे बॅनर मला अनेक ठिकाणी दिसले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या काळातील ते बॅनर होते. मी ज्या हाउसबोटमध्ये थांबलो होतो त्याचा मालक होता, अहमद. हाउसबोटच्या लॉबीमध्ये रात्री उशिरापर्यंत बशीरभाईंशी राजकीय गप्पांचा फड रंगला…

देख लेना आनेवाले कुछ ही महिनों मे बीजेपी और पीडीपी का अलायन्स टुटनेवाला है… पीडीपी के साथ हाथ मिलाकर बीजेपी इस तरह फसी है, की अब उनको काफी भारी पड रहा है…
विधानसभा निवडणुकीत काश्मीर खोऱ्यात नरेंद्र मोदींना कशी एकही सीट जिंकता आली नाही, हे जणू बशीर मोठ्या अभिमानाने सांगत होता. मोदीजी यहाँ पर आते तो यहाँ भी गुजरात जैसा माहौल पैदा होता, असे तो बिनदिक्कतपणे सांगत होता. मात्र नॅशनल कॉन्फरन्सला शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या बशीरला पीडीपीबद्दल प्रचंड अपेक्षा आहेत.

बशीरभाईंनी आणखी एक मुद्दा असा सांगितला की, ‘स्वायत्तते’पेक्षा ‘सेल्फ रुल’चा पीडीपीच्या भूमिकेला इथे चांगला पाठिंबा मिळत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये एक सकारात्मक पूल म्हणून काश्मीरचे स्थान निर्माण करणे आणि पाकव्याप्त काश्मीर व जम्मू-काश्मीर यांच्यातील व्यापाराला चालना देणे, या पीडीपीच्या आश्वासनांचे लोकांनी स्वागत केले आहे.
हुरियतबद्दल इथे मला प्रचंड आत्मीयता दिसली. बशीर म्हणाला, ‘आप के यहाँ जैसे बाल ठाकरे को लोग मानते थे, वैसे ही यहाँ पर हुरियत का स्थान है।’

अफझल गुरूला जेव्हा फाशी दिली तेव्हा ऐन टुरिस्ट सिझन सुरू असतानाही हुरियतच्या एका हाकेसरशी कसा कडकडीत बंद पाळला गेला, हे त्याने काहीशा अभिमानाने सांगितलेच; पण अफझल गुरू के साथ अच्छा नही किया इंडियाने, हे सांगताना बशीरच्या डोळ्यातली आग लपून राहिली नाही…

shivaprash@gmail.com