आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prashant Pawar Palawarchya Goshti Article About Tribal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुझे मत मारो साब..!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या छारानगरमध्ये शिरताक्षणी हातभट्टीच्या दारूचा वास यायचा, त्याच छारानगरात नाटकाचे वारे वाहायला लागले. मुलांना जगण्याचा एक नवा शोध लागला होता. नाटकाच्या निमित्ताने देशभरातले इतर भटके विमुक्त समाज, त्यांचे प्रश्न याबद्दलचे आकलन वाढत गेले. बुधन थिएटर हा त्यांचा श्वास बनला. चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या, दारू गाळणाऱ्यांच्या मुलांना नाटकात त्यांचं जगणं सापडलं होतं. बुधन थिएटरने मग अनेक वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविरुद्ध नाटकाद्वारे आवाज उठवण्यास सुरुवात केली.

मुझे मत मारो साब ऽऽऽ मुझे मत मारो… आर्त किंकाळी आणि आक्रोश काळजाचा थरकाप उडवतो. बुधन सबर आणि त्याची पत्नी श्यामली सबर बेंबीच्या देठापासून टाहो फोडत असतात.
माझा काय गुन्हा होता, मी फक्त भटक्या विमुक्त समाजाचा आहे हाच माझा गुन्हा? का माझ्या बायकोला विधवा केले? का माझा मुलगा अनाथ झाला? बुधनची हतबलता हेलावून सोडते…
एकही भन्साली भटक्या विमुक्तांमध्ये जन्माला आला नाही…
एकही हर्षद मेहता भटक्या विमुक्तांमध्ये जन्मला नव्हता…
भटक्या विमुक्तांमधला एकही जण देशभरातल्या घोटाळ्यांमध्ये सहभागी नव्हता…
मग भटक्या विमुक्तांकडून घडलेल्या किरकोळ गुन्ह्याची शिक्षा थेट मृत्युदंड का असते…?
आम्ही या देशाचे दुय्यम नागरिक का…?
आम्हालाही सन्मान हवाय… आम्हालाही सन्मानाने जगायचंय…
आवाजाची धार वाढत जाते, आणि नाटक संपतं...
पश्चिम बंगालमधील ‘सबर’ या भटक्या विमुक्त जातीतल्या बुधन सबरला पोलिस घेऊन जातात आणि दुसऱ्याने केलेला गुन्हा बुधनने स्वीकारावा म्हणून झालेल्या मारहाणीत बुधनचा मृत्यू होतो. काही स्वयंसेवी संस्थांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर शेवटी बुधन हा निर्दोष होता, हे न्यायालयात सिद्ध होते, परंतु वेळ गेलेली असते. केवळ गुन्हेगार जमातीचा शिक्का असलेल्या भटक्या विमुक्त जातीत जन्माला आल्यामुळेच बुधनला या जगातून संपवून टाकण्यात आलेले असते… ‘बुधन’ नाटकाची ही कथा.

टाळ्यांच्या कडकडाटात हजारो प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारत सगळे कलाकार अर्धवर्तुळात उभे राहतात. प्रत्येकजण आपली ओळख करून देतो… दक्षिण छारा, कल्पना छारा, जीतेंद्र छारा, आतिश छारा. नावं वाढतच जातात, मात्र प्रत्येकजण आपल्या नावासोबत ‘छारा’ या शब्दाचा उल्लेख करायला विसरत नाही. ‘छारा’ म्हणताना, त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला असतो आणि डोळ्यात एक वेगळीच चमक असते.

महाश्वेतादेवींचा बुधनवरचा लेख वाचल्यानंतर दक्षिण बजरंगे छाराला हे नाटक सुचलं. दक्षिण हा छारा समाजातला, अहमदाबाद येथील छारानगरात राहणारा, एक सुशिक्षित तरुण. छारानगर म्हणजे, छारा लोकांची वस्ती आणि छारा म्हणजे भटका विमुक्त समाज. आपल्याकडच्या पारध्यांसारखा… त्यांच्याप्रमाणेच छारांवरही ब्रिटिशांनी जन्मजात गुन्हेगार असल्याचा शिक्का मारलेला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी गुन्हेगारीचा शिक्का असलेले सगळेच समाज मुक्त केले असले, तरी प्रत्यक्षात या समाजाच्या हातापायांतल्या बेड्या कधीच निघाल्या नाहीत. उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, त्यामुळे जगण्यासाठी चोरीमारीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पोलिस सतत मागावर, सततची मारहाण आणि तुरुंगाच्या वाऱ्या अशा चक्रव्यूहात या समाजाच्या पिढ्यान््पिढ्या अडकलेल्या. आपल्याकडे पोलिसांच्या अभ्यासक्रमात आजही पारधी हा गुन्हेगारी समाज असल्याचे शिक्षण दिले जाते, तसेच छारा समाजाच्याबाबतीत आहे. अहमदाबाद पोलिसांनी, तर तसा एक गुप्त अहवालच तयार केला आहे. पोलसांच्या गाडीतली मागची सिट ही फक्त छारांसाठीच राखीव असायची, अशी छारानगरची परिस्थिती.

दक्षिण अशाच वातावरणात वाढला होता. चोऱ्या करण्यासाठी जाणारे वडील, त्यांच्या टोळ्या… सट्टा-जुगार चालवणारे नातेवाईक… हातभट्टीची दारू गाळणारी आई… वेळीअवेळी पडणाऱ्या पोलिसांच्या धाडी… पोलिसांची मारहाण, त्यांचे हप्ते आणि त्यातच पांढरपेशा समाजाकडून मिळणारी अवहेलना… छारानगरातील घराघरात हेच दृश्य दिसत होते. बुधनची कथा वाचल्यानंतर दक्षिण भारावून गेला. असे कित्येक निर्दोष बुधन छारानगरमध्ये पोलिसांच्या अत्याचाराला बळी पडले होते. छारा समाजातील अशा कित्येक बुधनला न केलेल्या गुन्ह्यांची जबरी शिक्षा मोजावी लागत होती. नसानसात भिनलेल्या बुधनला मोकळं करण्यासाठी दक्षिणने सांस्कृतिक चळवळीसाठी आजवरच्या इतिहासात यशस्वी ठरलेल्या पथनाट्य शैलीची निवड केली. कारण, या अन्याय-अत्याचाराविरोधात केवळ दक्षिणलाच मोकळं व्हायचं नव्हतं, तर छारानगरमधील जवळपास प्रत्येक तरुण-तरुणीला अभिव्यक्त व्हायचं होतं. हळूहळू एक सामूहिक अविष्कार तयार होत गेला. नाटकाचा कोणताही अनुभव नसला, तरी बुधनचे दु:ख त्यांचे दु:ख होते. पोलिसांकडून मिळणारी वागणूक ही त्यांची दुखरी जागा होती. त्यामुळेच बुधन सबरची वेदना ते प्रभावीपणे मांडू शकत होते. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर लढणारे डॉ. गणेश देवीसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक दक्षिण आणि त्याच्या साथीदारांसोबत होतेच. गणेश देवी यांनी त्यांच्या बोली भाषा संशोधन केंद्राच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात ‘बुधन’ या पथनाट्याचा प्रयोग आयोजित केला. हजारोंच्या प्रेक्षकांमध्ये रोमिला थापर, गायत्री चक्रवर्ती स्पिवाकसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त इतिहासतज्ज्ञ उपस्थित होत्या. पहिलाच प्रयोग तुफान गाजला. हळूहळू या पथनाट्याचे प्रयोग गुजरातच्या आयआयएमए, पोलिस मुख्यालय आणि अनेक सरकारी कार्यालयाच्या ठिकाणांसोबत दिल्ली, पुणे, भोपाळ, मुंबई या ठिकाणी होऊ लागले. नाटकाला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांच्या लक्षात यायला लागले की, छारा समाजाचे, भटक्या विमुक्तांचे अनेक प्रश्न आपल्याला अशाच पद्धतीने मांडता येतील. ‘बुधन’सारख्या अनेकांच्या दबलेल्या आवाजाला वाट देण्यासाठी मग छारानगरमध्ये ‘बुधन थिएटर’ची स्थापना झाली. ३१ ऑगस्ट १९९८ हा तो दिवस. (१९५२ मध्ये याच ३१ ऑगस्टला नेहरूंनी आजपासून हा समाज विशेष मुक्त म्हणजे विमुक्त आहे, अशी घोषणा केली होती).
ज्या छारानगरमध्ये शिरता क्षणी, हातभट्टीच्या दारूचा वास यायचा, त्याच छारानगरात नाटकाचे वारे वाहायला लागले. छारानगरातील मुलांना जगण्याचा एक नवा शोध लागला होता. नाटकाच्या निमित्ताने देशभरातले इतर भटके विमुक्त समाज, त्यांचे प्रश्न याबद्दलचे आकलन वाढत गेले. बुधन थिएटर हा त्यांचा श्वास बनला. चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या, दारू गाळणाऱ्यांच्या मुलांना नाटकात त्यांचं जगणं सापडलं होतं. बुधन थिएटरने मग अनेक वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविरुद्ध नाटकाद्वारे आवाज उठवण्यास सुरूवात केली. महाराष्ट्रात पारधी समाजाच्या पिन्या हरी काळेचा पोलिसांच्या मारहाणीत तुरुंगात कसा मृत्यू झाला, यावरचे ‘पिन्या हरी काले की मौत’, बारामतीमध्ये पारधी समाजाच्याच दीपक पवारवर झालेल्या अत्याचारांवरचे ‘दीपक तनुजा पवार’, वडोदऱ्यामधल्या साँसी समाजावरचे ‘बुलडोझर’, गुजरात दंगलीवरचे ‘मजहब हमे सिखाता, आपस मे बैर रखना’, निरपराध भटक्या विमुक्तांचा पोलिसांच्या मारहाणीत होत असलेल्या मृत्युसंदर्भातील ‘मुझे मत मारो साब’ अशा अनेक नाटकांची निर्मिती बुधन थिएटरने केली. सगळीकडूनच या नाटकांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत गेला. भटक्या विमुक्त समाजाची मुलं नाटक सादर करताहेत, ही बाब नाटक पाहणाऱ्यांसाठीही अप्रुपाची होती. समाज त्यांना नाट्यकलावंत म्हणून ओळखायला लागला होता.
अर्थात ‘बुधन थिएटर’ला इतक्या सहजासहजी यश (यश म्हणण्यापेक्षा अभिव्यक्त होण्याचे व्यासपीठ म्हणूया) मिळेल ती आपली व्यवस्था कसली? ज्या व्यवस्थेने पथनाट्य चळवळीचे अध्वर्यू सफदार हाश्मींचा बळी घेतला, त्या व्यवस्थेसाठी दक्षिण छारा म्हणजे अगदीच मामुली…आणि झालेही तसेच. देशभरातल्या शोषितांचा, वंचितांचा आवाज समाजापर्यंत पोहोचवण्याचा बुधन थिएटरचा प्रयत्न व्यवस्थेने अगदी पद्धतशीरपणे हाणून पाडायला सुरुवात केली. छारानगर येथे घडलेल्या कुठल्या तरी गुन्ह्यावरून ११ मे २००३ मध्ये पोलिसांनी दक्षिणला उचलून नेले. वास्तविक ज्यादिवशी हा गुन्हा घडला, त्यादिवशी दक्षिण छारानगरमध्ये नव्हताच, तो त्यावेळी गांधीनगर येथे होता. मात्र तरीही पोलिसांनी त्याला बळजबरीने तुरुंगात अडकवले. तब्बल १५ दिवस दक्षिणला तुरुंगात खितपत पडावे लागले. ‘बहुत नाटक कर रहे हो, पोलिस के खिलाफ…यहां पर नाटक मत करना, नही तो यहीं पर मरेगा तू’ अशी धमकी त्याला पोलिसांकडून तुरुंगात मिळायची. दक्षिणसाठी हा अनुभव खूपच भयावह होता. मात्र या एका तुरुंगवारीमुळे त्याच्या मनावर सखोल परिणाम झाला. त्याच्यामध्ये एक जिद्द निर्माण झाली. तुरुंगातून बाहेर पडलेला दक्षिण आता हाडाचा कलावंत होऊन बाहेर पडला होता...
असाच आणखी एक प्रसंग…डॉ. गणेश देवींनी दक्षिणला त्यांच्या भाषा संस्थेने आदिवासी अकादमीसाठी भटक्या-विमुक्तांच्या संशोधनाचे काम दिले होते. या कामानिमित्त ‘भरवाड’ या समाजाच्या मेळाव्यासाठी दक्षिण आणि त्याचे सहकारी गुजरातच्या बनासकाठा तालुक्यातील थराद गावी गेले होते. भोलेनाथच्या मंिदराच्या अनावरणाचा कार्यक्रम होता. कॅमेरामधून दक्षिण छायाचित्रे काढत असतानाच मंिदराशी संबंधित माणसं काठ्या घेऊन आले आणि दक्षिण हा छारा समाजाचा असल्याचे कळताचक्षणी दक्षिणवर चोरी करायला आला असेल म्हणून तुटून पडले. अशा अनेक अनुभवांमुळे दक्षिण हताश होत नाही, तर त्याला त्यामुळे अधिक बळ मिळते.
बुधन थिएटरमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक जण अशाप्रकारच्या व्यवस्थेचा कधीनाकधी बळी ठरलेलाच होता, मात्र नाटक करणं त्यांनी सोडलं नाही. जितेंद्र इंदेकर म्हणतो, नाटकाची तालीम करून रात्री घरी आलो. मध्यरात्री तीन वाजता पोलिसांनी झोपलेल्या वडलांना लाथाबुक्क्यांनी तुडवत उचलून नेले. दुसऱ्या दिवशी मी वडिलांचे जेवण घेऊन गेलो, तेव्हाही माझ्या वडिलांचे हात बांधून त्यांना बेदम मारहाण केली जात होती. मी एका षंढासारखा नुसताच पाहत होतो. जेव्हा जेव्हा मी नाटकामध्ये माझ्या वाट्याला आलेली भूमिका करतो तेव्हा पोलिस ठाण्यात माझा बाप मार खातोय, हा प्रसंग मी आठवतो आणि माझी भूमिका जगतो. बुधन हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. विश्वाची निर्मिती जशी शुन्यातून झाली आहे, तशी माझी बुधनमधून झाली आहे. एखाद्या कोऱ्या कागदावर जसे शब्द लिहून तो भरला जातो, तसे माझ्या आत्म्यावर नाटकाने शब्द लिहिले आहेत. आता ते कधीही पुसले जाणार नाहीत. पृथ्वीसाठी सूर्याचे जे महत्त्व आहे तेच माझ्यासाठी नाटकाचे आहे. नाटक माझा आत्मा आहे, आणि आत्मा अमर असतो, असे म्हणतात…
इथल्या व्यवस्थेशी दोन हात करण्यासाठी बुधन थिएटर म्हणजे, आमच्यासाठी अहिंसात्मक लढाईचे साधन आहे असे दक्षिण सांगतो. त्याची थिअरीच वेगळी आहे. तो म्हणतो की, आमच्याकडच्या चोरी करणाऱ्या छारांचा हिंसेवर विश्वास नाही, त्यामुळे खून वगैरे ही लांबची गोष्ट राहिली. आमचे चोर हे भुरटे चोर आहेत. समोरच्याला बोलण्यात गुंग करायचे आणि त्याच्याजवळचा माल लंपास करायचा हे आमच्याकडच्या चोरांचे कौशल्य. चुकीच्या कृत्यासाठी असलेले हेच संभाषण कौशल्य मग आम्ही नाटकासाठी वापरण्याचे ठरवले.
इतका निर्धार, इतकी तीव्रता जर छारानगरच्या या मुलांमध्ये असेल तर का नाही त्याचे चीज होणार. बुधन थिएटरच्या स्थापनेला आज जवळपास १५ वर्षे उलटून गेली. बुधन थिएटरचा व्याप आता वाढला आहे. बुधन थिएटरची दोन मुलं दिल्लीच्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाची पदवी घेऊन आले आहेत. बुधन थिएटरमध्ये नाटक आता शिकवले जाते. छारानगरमध्ये बुधन स्कूल ऑफ थिएटर आर्ट्स अन्ड जर्नलिझम अन्ड मीिडया स्टडीज सुरू झाले आहे. अभिनय, नृत्य, संगीत हे छारांच्या रक्तातच असल्यामुळे जेव्हा त्यांना संधी प्राप्त झाली त्याचे त्यांनी सोनं केलं. बुधन थिएटरचे अनेक कलावंत गुजराती मालिका, व्यावसायिक नाटकं आणि सिनेमांमध्ये काम करत आहेत. बुधन थिएटरचे काही कलावंत पत्रकारितेत शिरले, तर काहींनी वकिली सुरू केली. ‘मी जे भोगतोय ते तुझ्या वाट्याला कधीच येता कामा नये, अन्यथा पोलिस तुलाही तुरुंगात डांबतील’ असे म्हणत अनेक पालकांनी त्यांच्या मुलांना बेकायदेशीर धंद्यापासून वेगळे केले आणि बुधन थिएटरचा मार्ग दाखवला. पोलिसविरोधी नाटकं केली म्हणून खोट्या केसेस दाखल करणे, शैक्षणिक पात्रतेचा निकष पूर्ण केल्यानंतरी केवळ छारा असल्याचे कळल्यामुळे नोकरी न देणं किंवा नोकरीवरून काढून टाकणं, असे जळजळीत अनुभव असतानाही मुलांनी थिएटर करणं सोडलं नाही. बुधन थिएटरने टिकून राहण्याची, उभं राहण्याची आणि संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. या नाट्य कलावंतांच्याच भाषेत सांगायचे, तर देशाच्या घटनेने जे त्यांना दिले नाही तो सन्मानाने जगण्याचा अधिकार बुधन थिएटरने त्यांना दिला. गुन्हेगारांची शाळा म्हणून ज्या छारानगरकडे पाहिले जात होते, त्या छारानगरला आता काही अंशी तरी कलाकारांची शाळा म्हणून गौरवले जात आहे.

संदर्भ – बुधन बोलता है आणि बुधन थिएटर

फोटो सौजन्य – केरीम फ्रिडमन (तैवानच्या नॅशनल डॉन्ग हुआ विद्यापीठाचे प्राध्यापक)
shivaprash@gmail.com