आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कला नावाने भूल प्रसवली, शुद्ध धूळफेक...!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या पंधरवड्यात मुंबईत दोन कार्यक्रम संपन्न झाले. सत्यकथा मासिकाचे संपादक राम पटवर्धन यांच्या पहिल्या स्मृतिदिनाला अभिवादन म्हणून त्यांच्या साहित्याचे रसग्रहण करण्याच्या उद्देशाने काही मान्यवर साहित्यिक-प्रकाशक मंडळींना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आमंत्रित केले होते, तर दुसर्‍या एका कार्यक्रमात साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे लोकशाहीर संभाजी भगतचा नागरी सत्कार करण्यात आला. म्हटले तर या दोन्ही कार्यक्रमांचा तसा एकमेकांशी काहीएक संबंध नाही, परंतु संबंध जोडायचाच म्हटले तर तो खूप वेगळ्या पद्धतीने जोडला जाऊ शकेल. सत्यकथा हे प्रस्थापित व्यवस्थेचे एक प्रतीक होते. सत्यकथेत कथा-कविता प्रकाशित झाली तरच ती श्रेष्ठ, हे मान्यतेचे मानदंड साठोत्तरीच्या दशकात तयार झाले होते.

सांस्कृतिक राजकारणाचा तो एक भाग होता. या सांस्कृतिक राजकारणावर हल्लाबोल करताना प्रस्थापितांना नुसताच विरोध न करता काही करून दाखवायचे, अशा विचारांतून त्या वेळी अनेक लघुनियतकालिके आपापले स्वरूप घेऊन अवतरली. लिटिल मॅगझिन चळवळ असे त्याचे नामकरण झाले. त्या सर्वांनी एकत्र येऊन सत्यकथा या साहित्यजगतात विशेष स्थान पटकावून बसलेल्या नियतकालिकाची होळी केली. निषेध म्हणून केलेली ती एक कृती होती. लघुनियतकालिके आणि दलित साहित्य यांनी या प्रस्थापित व्यवस्थेला हादरे दिले. आपण लिहू शकतो, आपलं लेखन आपण प्रकाशित करू शकतो आणि हे लेखन प्रस्थापित व्यवस्थेच्या तोडीस तोड म्हणून मान्यताही मिळवू शकतं, हे आत्मभान तळागाळातल्या माणसांना मिळालं, ते याच लघुनियतकालिक आणि दलित साहित्य चळवळीमुळे...

या घटनेला चार दशकं उलटून गेली... सांस्कृतिक राजकारणाचे गढूळ पाणी आहे तसेच आहे आणि आता याच प्रस्थापित व्यवस्थेला हादरे देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, लोकशाहीर संभाजी भगत याने. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या तुफान लोकप्रियतेनंतर संभाजीचे संगीत दिग्दर्शन असलेल्या ‘कोर्ट’ या चित्रपटाला राष्ट्रीय सुवर्ण कमळ मिळाले, तर ‘नागरिक’ या चित्रपटासाठी त्याला राज्य शासनाचा उत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला. कलेच्या क्षेत्रात प्रस्थापितांनी जे शास्त्र आखून दिले होते, त्याच्या विरोधात संभाजीने उठाव केला आणि एक वेगळी रसरशीत-जळजळीत कला जगासमोर आणली. कलेतला रफनेस काय असतो हे दाखवून देणार्‍या संभाजीच्या रूपाने आलेल्या या वादळामुळे म्हणूनच प्रस्थापितांच्या तंबूत घबराट निर्माण झाली आहे. कारण एका हातात डफ आणि दुसर्‍या हातात लॅपटॉप घेऊन लोकशाहीर संभाजी भगत इथल्या सांस्कृतिक राजकारणाविरुद्ध हाकारे पिटतोय... रान रान रान चला उठवू सारे रान रे... जान जान जान दुश्मनाला जान रे...

मुळात, ही जी काही तथाकथित प्रस्थापित व्यवस्था आहे तिला प्रस्थापित म्हणायचे का, इथून खरं तर सुरुवात झाली पाहिजे. आणि जर का मुळापासून सुरुवात केली, तर मग त्यात ब्राह्मण्य-अब्राह्मण्य, अभिजन-बहुजन, प्रस्थापित-विस्थापित या वादांच्या खोलात गेले पाहिजे. ब्राह्मण किंवा उच्चवर्णीय म्हणजेच अभिजन आणि अभिजनांची संस्कृती हीच खरी प्रस्थापितांची संस्कृती, हा समज का समाजात पसरला, त्यावर शिक्कामोर्तब का झाले आणि तेच अंतिम सत्य आहे का? मुळात, जो संस्कृती घडवतो तो अभिजन आणि त्याचे अनुकरण करतो तो बहुजन, अशी व्याख्या अभिजनाच्या बाबतीत केली जाते. सिंधू संस्कृती ब्राह्मण समाजाने घडवली नव्हती... सम्राट अशोक ब्राह्मण नव्हते, जगाला नवी संस्कृती देणारे गौतम बुद्ध, महावीर ब्राह्मण नव्हते, अनेक संत, शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी हेदेखील ब्राह्मण नव्हते; परंतु या सगळ्यांनी नवी संस्कृती घडवली होती. असे असतानाही मग ब्राह्मण किंवा उच्चवर्णीय म्हणजेच अभिजन आणि अभिजनांची संस्कृती हीच खरी संस्कृती, ही व्याख्या निरर्थक असल्याचे वारंवार सांगितले जाते आणि हे सांगतो कोण तर, ज्यांनी गेल्या कित्येक दशकांपासून सांस्कृतिक राजकारण केले, तीच ही मंडळी...

या सगळ्यांचे मूळ इथल्या सांस्कृतिक वर्चस्वाच्या राजकारणात आहे आणि प्रत्येक टप्प्याटप्प्यावर घडलेल्या सांस्कृतिक राजकारणामुळे अभिजन-बहुजन किंवा प्रस्थापित-विस्थापित असे प्रवाह तयार झाले आहेत. रयतेचा राजा असतानाही शिवाजी महाराजांना ‘गो ब्राह्मण प्रतिपालक’ असे संबोधणे हा इथल्या सांस्कृतिक राजकारणाचा कट आहे... शिवाजी कोण होता? या पुस्तकाने एक नवी संस्कृती निर्माण करू पाहणार्‍या गोविंद पानसरेंना गोळ्या घालून ठार करणे आणि दुसर्‍या बाजूला शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास जगासमोर मांडूनही तोतया शाहिरांना मानमरातब मिळणे, हा इथल्या सांस्कृतिक राजकारणाचा भाग आहे... नागराज मंजुळेच्या ‘फँड्री’मध्ये प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जब्याने भिरकावलेल्या दगडाने घायाळ न होता हीच व्यवस्था हेच दगड-धोंडे घेऊन जातीय अत्याचाराचा कळस गाठतात, तोही इथल्या सांस्कृतिक राजकारणाचा डाव असतो. चैतन्य ताम्हणेच्या ‘कोर्ट’ चित्रपटाने इथल्या समाजव्यवस्थेचा जो विद्रूप चेहरा आरशात दाखवण्याचा प्रयत्न केला, त्या आरशात ढुंकूनही न पाहता आई-बाबा आणि साईबाबाची शप्पत... आपुन आपुन हाय... दगडू शांताराम परब... अशा थुकरट डायलॉगवर गुबगुबीत खुर्च्यांवर बसून पॉपकॉर्न खात जो प्रेक्षक टाळ्या-शिट्या वाजवत असतो, तोदेखील इथल्या सांस्कृतिक राजकारणाचा एक भाग असतो. आयआयटी मद्रासच्या आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कलवर बंदी टाकणे आणि पुण्याच्या एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहानची निवड करणे, याला सांस्कृतिक राजकारण नाही म्हणायचे, हे कशाचे द्योतक आहे?

ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर या सांस्कृतिक वर्चस्वाच्या राजकारणावर व्यवस्थित टिपण्णी करतात. ते म्हणतात की, सांस्कृतिक राजकारण हे मुद्दाम ठरवून केलेलं असतं. त्यामागे निश्चित असा एक हेतू असतो. एका विशिष्ट वर्गाचे हितसंबंध त्यात असतात. राजकारणाच्या अनेक अंगांपैकी सांस्कृतिक राजकारण हे एक महत्त्वाचे अंग आहे. कलेच्या बाबतीत निर्माण केलेल्या काही ठाम आणि चिरेबंदी धारणांमागे हे राजकारण कार्यरत असतं. हे वर्चस्व निर्माण करण्यासाठी काही हत्यारं ही जाणीवपूर्वक वापरली जातात. सत्तेत थेट सहभाग, सत्तेच्या आजूबाजूच्या साधनांचा वापर आणि अभिजनांची संस्कृती प्रत्येकामध्ये रुजवण्याचा प्रयत्न, अशा प्रकारे हे राजकारण खेळले जाते. इतरांना आपल्यासारखे करायचा प्रयत्न, हा त्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. हे सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण काय करतं तर कला क्षेत्रात येणार्‍या प्रत्येकाचं एक शास्त्र तयार करतं, चौकट तयार करतं, कविता कशाला म्हणायचं, कथा कशाला म्हणायची, गाणं नेमकं कसं असायला पाहिजे, नाटकाची चौकट काय असते, चित्रपट म्हणजे नेमके काय... अशा वेगवेगळ्या व्याख्या तयार करतं. मग कलेतलं बरं-वाईट ठरवण्याचा अधिकार आणि कलेचा दर्जा ठरवण्याचा अधिकार आपोआप ठरावीक लोकांकडे किंवा वर्गाकडे जाऊन उरलेले सगळे बाद ठरतात आणि त्या सगळ्याच्या पाठीशी आर्थिक सत्ता, राजकीय सत्ता, धार्मिक सत्ता असतेच. सांस्कृतिक वर्चस्वाचं राजकारण हे असं ठरवलं जातं.

आपल्याकडे संस्कृतीचे दोन समांतर प्रवाह आहेत. एक हुकमत गाजवणार्‍यांचा, तर दुसरा दबलेल्यांचा. या दोन्हींची प्रतीकं आणि अभिव्यक्ती यात अफाट विभिन्नता आहे. ती आपल्याला शिक्षणापासून कलेपर्यंत आणि भाषेपासून खाण्या-पिण्याच्या सवयीपर्यंत दिसते. शुद्ध, सर्वगुणसंपन्न, व्यक्तिवादी, अधिकृत आणि सर्वमान्य असलेल्या या हुकमत गाजवणार्‍यांच्या सांस्कृतिक वर्चस्वामुळे जो दुसरा प्रवाह आहे, तोदेखील स्वत:कडे गौणत्व घेत असतो. प्रस्थापित चौकटीतच त्यांना आपली कलामूल्ये बसवावी लागतात.

ज्यांना रोजच्या भाकरीची चिंता आहे, ते या शास्त्रात कसे काय प्रावीण्य मिळवणार? ते त्यांच्या आयुष्याशी जोडलेल्या साधनांबरोबर जगत सांस्कृतिक निर्मिती करतात. साहित्यातल्या शास्त्राला म्हणूनच पहिला हादरा दिला तो, दलित साहित्याने. मराठी साहित्याला समृद्ध करण्याचे काम दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी, भटक्या जमातीने केले. जगाला त्याची दखल घ्यावी लागली. साहित्य हे केवळ सौंर्दयमूल्यांची जोपासना करीत नसून ते अशा रीतीने जीवनमूल्यांचीही जोपासना करू शकते, हे या जनसाहित्याच्या चळवळीने दाखवून दिले. प्रस्थापित व्यवस्था न्यायाची असेल तर तिच्या विरुद्ध केलेला उठाव हा द्रोह ठरतो, परंतु प्रस्थापित व्यवस्था अन्यायकारक असेल तर तिच्या विरोधात उठलेला आवाज हा विद्रोह असतो. जनसाहित्याने हा विद्रोहाचा उठाव केला. विद्रोहाची कृती ही प्रत्येकामध्ये असते. मात्र व्यवस्था हा विद्रोह पद्धतशीरपणे दाबत असते. तुमचं जे काही चाललंय ते उत्तम चाललंय, त्यात बदल करण्याची काहीएक गरज नाहीये, असे ही व्यवस्था सतत, वारंवार भासवत असते आणि समाजाला अल्लद ‘अच्छे दिन’च्या जाळ्यात अडकवते. रोजच्या गरजांसाठी माणसाला प्रचंड श्रमात गुंतून ठेवते आणि दमून आल्यावर संध्याकाळी मनोरंजनाच्या नावाखाली सांस्कृतिक राजकारणाने जो काही कलेचा दर्जा ठरवून दिलेला आहे, त्यात अडकवून ठेवते. एकूणच तुमचा जगण्याचा विचार प्रगल्भ कसा होणार नाही, याची पुरेपूर काळजी ही व्यवस्था घेत असते. कलेची अभिव्यक्ती आणि रसिकांची अभिरुची यात सध्या जी कमालीची सरमिसळ झाली आहे, ती याच कारणामुळे झाली आहे.

एका विशाल छत्राखाली एकत्र येऊन सांस्कृतिक वर्चस्वाविरुद्ध दोन हात करणार्‍या सत्तरीच्या दशकातल्या साहित्यिक-सामाजिक-सांस्कृतिक चळवळी आज इतिहासजमा झाल्या आहेत. आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर व्यवस्थेसाठी आता तर हे काम अधिकच सोपं झालं आहे. आज चळवळींना मोठमोठी भगदाडं पडली आहेत... प्रागतिक चळवळीच्या तीन मुख्य धारा असलेल्या आंबेडकरी, कम्युनिस्ट आणि समाजवादी चळवळींमध्ये प्रचंड वैचारिक गोंधळ माजला आहे. प्रत्येकाने स्वत:ची वेगळी चूल मांडली आहे. प्रागतिक चळवळीमध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या ‘इझम’मध्ये अडकलेला आहे. सांस्कृतिक वर्चस्व गाजवणारे राजकारणी मात्र त्यात जराही गफलत करत नाहीत. ते दाभोळकरांनाही मारतात आणि पानसरेंनाही... मात्र तरीही प्रागतिक चळवळी त्यातून काही शिकत आहेत, असे सध्या तरी दिसत नाही. संभाजी भगत म्हणतो, त्याप्रमाणे आता पुन्हा एकदा एकत्र कुटुंब व्यवस्था स्वीकारणे गरजेचे झाले आहे. आज प्रत्येकाने आपले वेगळे कुटुंब थाटल्यामुळे शेजारच्या घरातला माणूस मेलाय, असं समजून आपण पुढे जात आहोत. राजकीय सत्तेचे काय वाटेल ते होऊ दे, मात्र सांस्कृतिक राजकारणाविरुद्ध तरी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. म्हणूनही संभाजी गातो. गाताना म्हणतो,
कला कला का केला कल्ला, सत्य दिसे नेक
कला नावाने भूल प्रसवली, शुद्ध धूळफेक...

गोविंद पानसरे म्हणायचे, त्याप्रमाणे रेषेच्या अलीकडे असलेल्यांमध्ये सुसंवाद, मैत्री आणि विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. मांडणीतील मतभेदाचे मुद्दे अनेक असू शकतील; परंतु सार्‍यांना अखेर भेदाभेदरहित, बहुजन हिताय बहुजन सुखाय अशाच समाजाकडे जायचे आहे, हे विसरता कामा नये...

प्रशांत पवार
shivaprash@gmail.com
बातम्या आणखी आहेत...