एक विशेष सूचना...
प्राणीमित्र संघटनेचे एकंदरीत ‘कार्य’ लक्षात घेता जाणीवपूर्वक ही घटना कुठे घडली आणि त्यात कोण सहभागी झाले होते, याचा तपशील उघड करत नाहीये. अन्यथा आधीच गावगाड्याबाहेर फेकल्या गेलेल्या या समाजाचे भले करण्यापेक्षा प्राणीमित्र संघटना त्यांना नाहक तुरुंगात डांबतील... पोटाला पडलेले फाके बुजविण्यासाठी जो खटाटोप हा समाज करत आहे, तोदेखील त्यांच्याकडून हिरावून घेतला जाईल...
उन्हं वाढायला लागली की सावज मिळायला त्रास पडतो, तेव्हा शक्यतो पहाटे पाचलाच निघायचे ठरले. मसणजोगी समाजाच्या सरपंचांनीच शिकारीसाठी पुढाकार घेतला होता. पहाटे पाचला वस्तीवर पोहोचलो तेव्हा वस्तीला जाग आली होती. वस्तीच्या तोंडावरच एक टेम्पो उभा होता. याच टेम्पोतून आम्ही शिकारीला जाणार होतो. वस्तीवरची तरणी पोरं आणि पुरुष मंडळी जाळे बाहेर काढत होती, हत्यारं तासत होती... या शिकारीचे शूटिंग करण्याचे मी ठरवले होते, त्यामुळे माझ्यासोबत कॅमेरामनची टीमदेखील होती. कौटुंबिक मालिकांचे चित्रीकरण करणार्या माझ्या कॅमेरामनसाठी हा एक ‘डिस्कव्हरी चॅनेल’सारखा थ्रिलिंग अनुभव होता.
निघायची वेळ झाली. किमान ३०-३५ मसणजोगी शिकारीला येणार होते. इतके लोक कशाला? या माझ्या प्रश्नाला थेट उत्तर न देता सरपंच म्हणाले की, तिकडे गेल्यावरच तुमच्या लक्षात येईल. या सगळ्या मसणजोग्यांसोबत चार शिकारी कुत्रेही तयार होते. सगळे जण टेम्पोत चढले, तरुण पोरांनी त्यांच्या मोटारसायकली काढल्या होत्या. पुढे चार-पाच मोटार सायकली, मध्ये शिकारी मसणजोगी आणि मागे आमची गाडी, असा आमचा प्रवास सुरू झाला. साधारणपणे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगली रानांच्या दिशेने आम्ही चाललो होतो. आज रानडुकरांची शिकार करण्याचा बेत त्यांनी आखला होता. एका उजाड माळरानाजवळ सगळ्या गाड्या थांबल्या. बाईकवाली पोरं पुढे निघून गेली होती.
बसा साहेब आता हिथं थोडा वेळ... पोरं पुढं गेली हायती जनावराचा माग काढायला, त्यांचा निरोप आला की जाऊ मंग... सरपंचांनी सांगितले.
अर्ध्या तासाच्या या वाट बघण्याच्या कार्यक्रमात मग शिकारीचेच किस्से ऐकायला मिळाले. सावजाचा माग काढणं, सावज हेरणं, जनावरांच्या सवयी, पावलांच्या ठशांवरून जनावरांच्या वयाचा-वजनाचा अंदाज बांधणे, ऋतुमानानुसार जनावराची बदलणारी दिनचर्या, अचूक नेम धरणे, सापळे रचणे, जनावराच्या प्रकारांप्रमाणे वेगवेगळे सापळे तयार करणे, बिळं उकरणे, पकडायला गेल्यावर जनावर प्रतिकारासाठी काय करू शकतं, यांसारख्या शिकारीशी संबंधित गोष्टींचं शिक्षण हे आम्हाला अगदी लहान वयापासूनच माहीत असतं. शिकार करणे ही आमची पिढ्यान्पिढ्यांपासूनची पद्धत... आता शिकारीवर पूर्णपणे बंदी आलेली असतानाही आम्ही लपूनछपून शिकार करतोच. कारण शिकार करणे ही आमच्यासाठी शौर्याची, बहादुरी दाखविण्याची किंवा अभिमानाची बाब नाहीये, तर जिवावर उदार होऊन शिकार करणे ही आमच्या समाजाची अपरिहार्यता आहे. भीक मागून आणि भंगाराच्या किरकोळ धंद्यातून १५-२० जणांच्या भल्यामोठ्या कुटुंबाची गुजराण होणे अशक्य असल्याकारणाने पोटाला पडलेले फाके बुजविण्यासाठी शिकार आम्हाला उपयोगी पडते आणि म्हणूनच रानडुक्कर, हरीण, ससे, घोरपड, उदमांजर, साळिंदर या प्राण्यांची आणि करकोचा, पारवे, होला या पक्ष्यांची आम्ही शिकार करतो...
गप्पा रंगल्या असतानाच पुढे गेलेल्या पोरांकडून निरोप आला, की रानामध्ये पाच-सहा डुकरं लपून बसली आहेत. पावलांच्या ठशांवरून आणि डुकरांच्या विष्ठेवरून त्यांनी साधारणपणे किती रानडुकरं आहेत आणि त्यांचा आकार किती मोठा आहे, याचा अंदाज लावला होता.
रानाजवळ पोहोचलो. ते आयताकृती जंगली झुडपांचे रान होते. चार गटांत विभागणी करण्यात आली होती. रानाच्या भोवती काहींनी खड्डे पाडायला सुरुवात केली. खड्डा खणून झाल्यानंतर त्यात लोखंडी कांब रोवली. बाकीच्यांनी तोपर्यंत जाळे उघडले होते. एकेक जाळे किमान ६०-७० फुटांचे होते आणि ते लावण्यासाठी किमान सात-आठ जण लागत होते. इतके लोक का लागतात, हे आता माझ्या लक्षात आले होते. जाळं सोडवल्यानंतर रानाला अगदी चिकटून रोवण्यात आलेल्या लोखंडी कांबेला जाळ्यांची टोकं घट्ट बांधण्यात आली आणि रानाच्या चारही बाजूला ही जाळी रचण्यात आली. साधारणपणे बॅडमिंटनची जाळी कशी असते, तशा प्रकारची परंतु मजबूत दोरखंडाची ती जाळी होती. रानाच्या तिन्ही बाजूला अगदी चिकटून ही जाळी बांधण्यात आल्यानंतर चौथ्या बाजूला मात्र बरीच मोकळी जागा शिल्लक ठेवून काही अंतरावर जाळे लावण्यात आले होते. एकप्रकारे रान पूर्णपणे बंिदस्त केले होते, जेणेकरून सावजाला रानाच्या बाहेर निसटून जाता येणार नव्हते.
जाळी बांधून झाल्यानंतर काही जण हातात लोखंडी कांब घेऊन जी मोकळी बाजू होती तिथे दबा धरून बसले. वातावरणात एकाएकी सन्नाटा पसरला. सगळ्यात प्रथम शिकारी कुत्र्यांना आत सोडण्यात आले. न भुंकता कुत्रे रानात शिरले. (जोपर्यंत रानडुकरं दिसत नाहीत तोपर्यंत हे कुत्रे भुंकत नाहीत. एकदा का त्यांच्या नजरेला जनावर दिसले की मग हे जोरजोरात भुंकत
आपल्या सहकार्यांना निरोप देतात की, येस्स...जनावर दिसलं, आता शिरा आतमध्ये.) कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकायला येताच तिन्ही बाजूंनी जोरजोरात हाकारे देत मसणजोगी रानात शिरले आणि रानडुकरांना चौथ्या दिशेने पळवून लावण्यास उद्युक्त केले. कुत्रेही त्यांच्यावर हल्ला न करता त्यांना मोकळ्या बाजूकडे पळवून लावण्याचा प्रयत्न करत होते. अखेर सगळ्याच बाजूने आक्रमण झाल्यानंतर जी मोकळी जागा होती त्या दिशेने पळण्यावाचून रानडुकरांना गत्यंतर नव्हते. एका पाठोपाठ एक अशी ही रानडुकरं मोकळ्या बाजूने पळत पळत आली.
रानडुकरं ही नेहमी सरळ, एका रेषेतच पळतात. रानातून बाहेर पडल्यानंतर सरळ पळत असतानाच समोर जे चौथे जाळे लावण्यात आले होते, त्यात ही डुकरं अडकली. समोरचा मार्ग बंद झाला, हे जाणवल्यानंतर या डुकरांनी ‘यु टर्न’ घेतला आणि मुद्दाम थोडंसं सैल बांधण्यात आलेलं हे जाळं डुकरांच्या अंगावर पडलं. डुकरांचे अणकुचीदार दात जाळ्यामध्ये अडकून बसले होते. जाळं डुकरांच्या अंगावर पडताच क्षणी दबा धरून बसलेला प्रत्येक जण डुकरांच्या दिशेने धावला आणि बेधडक त्याच्या अंगावर उडीच मारली. ठरावीक अंतराने चार-पाच ठिकाणी हेच दृश्य दिसत होते. डुकरांच्या अंगावर उडी मारून हातातल्या लोखंडी कांबेने त्यांनी या डुकरांच्या बरोबर माथ्यावर असे काही तीन-चार फटके मारले, की डुक्कर जागीच गतप्राण झाले. या झटापटीत एक जण जखमी झाला होता. डुकराच्या टोकदार दाताने त्याच्या छातीवर ओरखडे केले होते. छातीतून रक्त वाहत होतं. हेदेखील त्यांच्या अंगवळणी पडलं होतं. त्यांच्या दृष्टीने हा खूपच किरकोळ हल्ला होता.
दीडशे किलो वजनाची चार रानडुकरं मसणजोग्यांनी मारली होती. एखाद्-दुसर्या डुकराची शिकार करून मसणजोगी थांबत नाहीत. शिकारीला आल्यावर किमान पाच-सहा डुकरं तरी मारायचीच, असा त्यांनी निश्चय केलेला असतो. कारण तसे केल्यानेच इतक्या मोठ्या त्यांच्या वस्तीचे पोट भरणार असते.
जाळी मोकळी करण्यात आली, तोवर काहींनी काठीला डुकरांचे पाय बांधून त्यांना खांद्यावर घेऊन टेम्पोच्या दिशेने जाण्यास सुरुवातही केली होती. काठीला उलटं टांगलेलं डुक्कर पाहून मला ‘फँड्री’ चित्रपटातल्या प्रसंगाची आठवण आली. मसणजोग्यांच्या वस्तीवर मला उकिरड्यावरचे अनेक फँड्री दिसले होते, परंतु मसणजोगी त्यांना हातदेखील लावत नाहीत. रानडुकराच्या मटणाची बातच वेगळी असल्याचे ते सांगतात.
शिकारीचा थरारक अनुभव घेतल्यानंतर पुढचा सगळा अनुभव मात्र अंगावर काटा आणणारा होता. नागर संस्कृतीत वाढल्यामुळे मसणजोग्यांची शिकार झाल्यानंतरची पद्धत खूपच अमानवीय वाटत होती. अर्थात, त्याला काहीएक अर्थ नव्हता. कारण नागर संस्कृती आणि भटक्या समाजामधले सांस्कृतिक अंतर हे हजारो वर्षांचे होते.
एका ओढ्याजवळ टेम्पो थांबला. बाजूला एक माळरान होते. झाडाखालची सावली बघून सरपंचांनी तिकडेच बसकण मारली. इतरांनी झाडांच्या फांद्या तोडून, काटक्या गोळा करून चार ठिकाणी जाळ लावला. जाळ व्यवस्थित पेटल्यानंतर त्यात रानडुकरांना भाजण्यासाठी टाकण्यात आले. तासाभराने पूर्णपणे काळपट झालेली ती रानडुकरं जाळातून बाहेर काढण्यात आली आणि हातानेच त्यांच्या अंगावरचे केस उपटून काढण्यात आले. भाजल्यामुळे डुकरांचे शरीर एकदम कडक झाले होते. केस साफ झाल्यानंतर त्यांना बाजूच्या ओढ्यावर घेऊन गेले. ओढ्यामध्ये या डुकरांना स्वच्छ धुण्यात आले. सगळे जण गोलाकार बसले. मधोमध झाडांच्या पानांचा गालिचा अंथरण्यात आला होता. त्यात या डुकरांना ठेवण्यात आले आणि प्रत्येकाने आपल्यासोबतच्या पिशवीमधून धारदार चाकू-सुरे बाहेर काढले.
अतिशय सफाईदारपणे या लोकांनी डुकरांना कापायला सुरुवात केली. तोवर दुसर्या बाजूला विटांची चूल तयार करून काही मंडळींनी सोबत आणलेल्या मोठ्या टोपात भात शिजवायला आणि दुसर्या भांड्यात मसाला परतवायला सुरुवात केली होती. डुकराचे बारीक तुकडे करताना काहींनी तर त्याची कलेजी कच्चीच तोंडात टाकली होती. मग सुरू झाल्या वाटण्या. एकूण ३५ जणं वाटणीला बसले होते. प्रत्येकाला समसमान मटण मिळालेच पाहिजे, हा त्यांचा नियम. त्यामुळे परत परत वाटण्या होत होत्या.
भात तयार झाला, रस्सा तयार झाला... झाडांच्या पानांनी जो गालिचा तयार केला होता, त्यावर भाताचा टोप उलटा करण्यात आला आणि त्यावरच मग डुकराचे मटण टाकण्यात आले. तोवर सगळ्यांच्याच पोटात मोहाची दारू गेली होती. सगळे पुन्हा गोलाकार बसले आणि आडवा हात मारायला सुरुवात केली.
जेवण झालं होतं... चेहर्यावर समाधान घेऊन प्रत्येक जण थैलीत मटण घेऊन आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांकडे निघाला होता... आज त्यांच्या घरची चूल पेटणार होती...
shivaprash@gmail.com