आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसणजोगी! त्याचीच ही कहाणी... मसणबाबाचं जिणं...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भटक्या विमुक्तांच्या कलेच्या अंगाने जाणार्‍या ज्या जाती आहेत, म्हणजे कला किंवा खेळ सादर करून भिक्षा मागणे हा ज्यांचा व्यवसाय आहे, अशा भटक्या समाजाच्या रूढी-परंपरांचा, कलेचा, सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अलीकडेच मी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यापैकीच एक म्हणजे ज्यांच्या नावातच सगळं जिणं सामावलेलं आहे तो हा मसणजोगी! त्याचीच ही कहाणी...

स्मशानात आज आनंदाचे वातावरण पसरले होते... एका कोपर्‍यात पताका लावल्या होत्या. शे-पाचशे माणसे नटून-थटून आली होती. अकराव्याच्या दुखवट्यासाठी स्मशानात अस्थी गोळा करायला आलेल्या काही लोकांना तेथे नेमके काय चाललेय तेच कळत नव्हते. स्मशान म्हणजे नश्वर शरीराचा अंत होण्याचे ठिकाण. मात्र याच स्मशानात आज जीवनातील सुखाची गणिते मांडली जाणार होती. नगर कँटोनमेंट बोर्डाच्या भिंगार येथील वैकुंठ अमरधाममध्ये आज सूर्यभान जाधव यांच्या मुलीच्या, म्हणजे पुष्पाच्या लग्नाचा विधी सुरू होता. आदल्याच दिवशी याच स्मशानात हळदीचा कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात झाला होता...
पुष्पाच्या लग्नाचा हा किस्सा लक्ष्मण शंकर कडमिंचे मोठ्या अभिमानाने सांगत होता...
अलीकडेच मुंबईत ‘पवित्रम’ या स्वाती चांदोरकर यांच्या कादंबरीचे प्रकाशन चक्क स्मशानात झाले! ‘स्मशानात पुस्तकाचे प्रकाशन’ हा विषयच मुंबईच्या मीडियासाठी अनोखा होता. त्यामुळे साहजिकच त्याला प्रसिद्धी मिळाली. ही घटना सांगण्यामागचे कारण म्हणजे अशा अविश्वसनीय, आश्चर्यकारक प्रकारांकडे आपण कसे आकर्षित होतो...? ‘इव्हेंट’ म्हणून प्रसारमाध्यमे कशी त्याकडे बघतात. परंतु जगण्याच्या संघर्षात गावगाड्यात कुठेच जागा न मिळालेल्या, मसणवट हेच राहण्याचे ठिकाण असलेल्या, सरणावरची चैतन्य संपलेली कलेवरं हाच जगण्याचा आधार असलेला मसणजोगी समाज वर्षानुवर्षे याच स्मशानात राहतोय, याकडे मात्र आपण डोळेझाक करतो.
भटक्या विमुक्तांच्या कलेच्या अंगाने जाणार्‍या ज्या जाती आहेत, म्हणजे कला किंवा खेळ सादर करून भिक्षा मागणे हा ज्यांचा व्यवसाय आहे, अशा भटक्या समाजाच्या रूढी-परंपरांचा, कलांचा, सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अलीकडेच मी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यापैकीच एक म्हणजे ज्यांच्या नावातच सगळं जिणं सामावलेलं आहे तो हा मसणजोगी!
‘बेटा सो जा, नही तो गब्बरसिंग आ जायेगा’... ‘शोले’मधला हा डायलॉग तर खूप नंतर लोकप्रिय झाला. त्याच्या कितीतरी वर्षांपासून आया त्यांच्या लेकरांना ‘झोप पटकन नायतर त्यो मसनबाबा येईल’, अशी भीती दाखवायच्या. त्याला कारणही तसेच होते. त्यांचा अवतारच तसा भेसूर असायचा. लांब मोकळे काळे केस, त्यावर देवदेवतांसारखा टोप, डोळ्यांत भरपूर काजळ, कपाळावर कुंकवाचा लाल मळवट, बाकीच्या चेहर्‍यावर राख फासलेली, पायघोळ पांढरा झगा, गळ्यात लांब हिरवा शेला, रुद्राक्षाच्या माळा आणि मानवी हाडांची माळ, काखेत मोठी झोळी, एका हातात मानवी कवटी तर दुसर्‍या हातात लोखंडी घंटा... मसणजोगी गावात आला रे आला की लहानग्यांची पळापळ व्हायची, बाळंतीण बायका पटापट खिडक्या-दरवाजे बंद करून घ्यायच्या. कारण... मसणजोगी पुरलेल्या बाळंतिणीचे मढे उकरून तिची कवटी काढून घेतो, बाळंतीण बाईची कुत्री किंवा गोमाशी बनवतो, चेटूक-भानामती-करणी करतो... अशा अनेक अंधश्रद्धा व गैरसमज मसणजोग्यांबद्दल समाजात पसरलेल्या आहेत.
स्थळ- अमरधाम स्मशानभूमी (लोणी-प्रवरा, ता. राहाता, अहमदनगर)
शंभो हर हर महादेव, जय भोलेनाथ... आली आई आली, या मसणबाबाची फेरी आली दारा म्होरं, दानधरम कर, पीकपाणी चांगलं होईल, लाख रुपयांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सोडून जाणार...
पटकन भीती वाटेल, अशा मसणजोग्यांच्या पारंपरिक पेहरावात लक्ष्मण कडमिंचे हातातली घंटा वाजवत गाऊ लागला. स्मशानातच एक पक्के घर, ज्यात लक्ष्मण शंकर कडमिंचे हा मसणजोगी त्याच्या कुटुंबासोबत राहतो. काही दिवसांपूर्वीच लक्ष्मणच्या भावाला, गैरसमजातून पोलिसांनी उचलले होते. शेजारच्या गावात जी चोरी झाली ती लक्ष्मणच्या भावानेच केली, असा आरोप ठेवत पोलिसांनी त्याला खूप बदडले होते. शेवटी खरा चोर सापडल्यावर त्याला सोडून दिले. ‘गावात कुठेही काही घडले तर आम्हा भटक्यांनाच उचलून घेऊन जाणार, याची आता आम्हाला सवयच झाली आहे,’ असे अतिशय निर्विकार चेहर्‍याने लक्ष्मण सांगत होता. ‘लोक घाबरतील असा पेहराव का करता?’ या प्रश्नाला ‘घाबरत्यात म्हनून तर भीक देत्यात’ असे सांगून लक्ष्मणने मसणजोग्यांच्या आयुष्याचा पेटाराच उघडला...
मसणजोगी समाज मूळचा आंध्र प्रदेशातला. भटकंती करत आलेल्या या जमातीच्या पाच पिढ्या महाराष्टÑात विसावल्या आहेत. उमरगा, सोलापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, अक्कलकोट रोड, बीड अशा सुमारे चोवीस गावांत मसणजोगी समाज अलीकडे गावगाड्याबाहेर थोडा विसावला आहे. सर्वांत मोठी वस्ती शेवगावला (नगर) आहे. कर्नाटकात या समाजाला ‘सुडगाड सिद्धा’ म्हणतात, तर आंध्र प्रदेशात ‘काटी पापलोळ’ म्हणून ओळखले जातात. पूर्वीपासून वस्ती स्मशानातच. तिथंच राहणं, तिथंच खाणं...
जगण्याच्या संघर्षात कुठेही स्थान न मिळाल्याने स्मशानालाच मसणजोग्यांनी जवळ केले. त्यामुळे मृताच्या अंगावरची शाल, साड्या त्यांच्या रोजच्या वापरात. उलट त्यामागे श्रद्धेचे मिथक असते. ताटीवरचं पांढरं कापड, ताटीचे बांबू, सूत, पिंडदानाचं अन्न यावर उपजीविका करणार्‍या मसणजोगी समाजाचा जगण्याचा स्तर खरोखरच अस्वस्थ करणारा.
स्मशान, मृतात्मे, भूत-खेत, करणी, पिंडदान, स्मशानाची व्यवस्था पाहायची, हे आमचे जगणे. काही जण स्मशानात रखवालदाराचं काम करतात. काही सरण रचतात. काही जण सावडल्यानंतर राखेची विल्हेवाट लावतात. मृताचे नातेवाईक बक्षिसी देतात, तीच कमाई. वेगवेगळ्या गावाच्या मसणाच्या वाटा आमच्या बापजाद्यांनी जवळ केल्या. आता गावं मोठी झाली आणि मसणवटा गावात आला... आपल्या पक्क्या घराकडे बघत लक्ष्मण सांगत होता.
स्मशानातच झालेल्या पुष्पाच्या लग्नाचा किस्सा सांगितल्यावर मसणजोगी समाजाच्या रूढी-परंपरा जाणून घ्यायची उत्सुकता शिगेला पोहोचली होती...
मुलीचं लग्न चौदाव्या, पंधराव्या वर्षी होतं. मुलालाच लग्नाचा खर्च करावा लागतो. मुलाकडे पन्नास हजार रुपये असतील तरच लग्न करता येतं. दुसर्‍या जातीत लग्न करता येत नाही, तसं एका कुळातही लग्न करता येत नाही. विभूते, शिरभाटे, मोगटमे, रुद्राक्षी, संकोळ, कल्लमोळ, कडमिंचे अशी कुळं आहेत. प्रत्येकाची कामं ठरलेली, देवता ठरलेल्या. हा समाज वैराग्यशील अशा शंकर आणि दुर्गेला मानतो. पूर्वी मूल पोटात असतानाच त्याचं लग्न ठरत असे. आता तसं नाही. मूल जन्मल्यानंतरचे तीन दिवस महत्त्वाचे मानतात. गाववार, वस्तीनुसार, कुळांनुसार रीतीरिवाजात थोडा बदल होतो. मूल जन्मल्यानंतर तिसर्‍या दिवशी पुरुष माणसं शिकारीला जातात. ग्रामीण भागात आणलेली शिकार सगळ्यांना वाटतात. शहरी भागात बकरे कापतात. मटण, कोंबडी, माशाचं जेवण वस्तीवर द्यावं लागतं. आनंदाच्या प्रसंगात डुकराचं मांस लागतंच. तिसर्‍या दिवशी बाळाचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम करतात. रुद्राक्षी बाळाला आणि मोठ्यांना रुद्राक्षाच्या माळा घालतात. संकोळ शंख वाजवतात. घराभोवती राखेची रेघ आधीच ओढतात. म्हणजे घराबाहेर रात्री न पडण्याचं बंधन असतं. मुलामुलींची नावं शंकर, रामलू, सायम्मा, जयलक्ष्मी, ईशप्रम्मा अशी ठेवतात. बाळाला दोन नावं ठेवण्याची पद्धत आहे. एक आजोबांचं, आजीचं ठेवतात. त्या नावानं कोणी हाक मारत नाही; कारण मुलाला ओरडलं, शिव्या दिल्या तर त्या आजोबांना लागतात, अशी भावना आहे. शिकार हा मसणजोगी समाजाचा आणखी एक पैलू. शिकारीनिमित्त जंगलात बराच काळ वास्तव्य असल्याने वनौषधींचीही चांगली माहिती मसणजोगी समाजाला आहे. पारंपरिक पेहरावात दारोदारी जाऊन भिक्षा मागण्याची पद्धत आजही सुरू असली तरी बाकी सगळे आता इतिहासजमा झाले आहे. 23 ऑगस्ट 1952 हा भटक्या-विमुक्तांचा स्वातंत्र्यदिन. कोणतेही मूल आईच्या पोटातून गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही, असे उद्गार याच दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत काढले आणि ब्रिटिशांनी भटक्यांच्या कपाळावर मारलेला गुन्हेगारीचा शिक्का कायमचा पुसून टाकला. ‘विशेष मुक्त म्हणजेच विमुक्त’ ही नवी संकल्पना नेहरूंनी उदयास आणली. आज तब्बल 60 वर्षांनंतरही स्वातंत्र्याची संकल्पना, व्याख्या भारतातील तब्बल नऊ कोटी आणि एकट्या महाराष्ट्रातील कोटीच्या घरात असलेल्या भटक्या-विमुक्तांना नीटपणे समजलेली नाही. मसणवट्यातील मसणजोगी हा मसणवट्यातच जाणार, की नव्या पिढीची मुले शाळेचा उंबरठा पार करणार, हा प्रश्न या समाजाला पडलेला आहे. (क्रमश:)
shivaprash@gmail.com