आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवर्तनवादी कार्यकर्याचा जाहिरनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘खैरलांजी ते रोहित दशकाची अस्वस्थता’ हे पुस्तक म्हणजे आंबेडकरी चळवळीत गेलं दशकभर लढणाऱ्या केशव वाघमारे यांच्या संपादकीय, वैचारिक आणि वृत्तपत्रीय लेखांचं सार आहे. येथे जात्यंतक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून भूमिका घेत असताना, चळवळीतल्या अवगुणांना आणि चुकांनाही लेखक धारेवर धरताना संकोच करत नाहीत.

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची सुरवात होते, आम्ही, भारताचे लोक... या वाक्यामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या त्या निर्णायक क्षणाची अस्वस्थता, भविष्य घडवण्याचा निश्चय आणि मानवी मूल्यांवरच्या दृढ विश्वासाचं सार गोंदवलं गेलं आहे. ‘आम्ही, भारताचे लोक.’ जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या, देशाच्या मूलभूत रचनेचा पाय रचणाऱ्या दार्शनिकांनी या देशाची कल्पना केली, तेव्हा भारतीय समाज, ही त्यांच्या कल्पनेतील समाजाची व्याख्या होती. मात्र कोणत्याही सामान्य समूहामध्ये जाऊन त्यांचे संवाद ऐकले, तर जेव्हा ते ‘आमचा समाज’, ‘माझ्या समाजासाठी’ किंवा ‘आमच्या समाजातली’ असा शब्दप्रयोग करतात, तेव्हा त्यांना समाज म्हणजे, ते ज्या जातीसमूहातून येतात, तो जातिसमूह अधोरेखित करायचा असतो. भारत एक राष्ट्र म्हणून एकाच वेळी आधुनिक राष्ट्र, एक भौगोलिक उपखंड, एक ऐतिहासिक भूमी आणि जात-वर्ग-धर्मीय समूहांचा प्रचंड विस्तार अशा समांतर आत्मभावनांमध्ये जगत आहे. अशा वेळी, अस्मितांचे अनेक पदर उलगडत मानवी मूल्यांशी त्यांचा तौलनिक संदर्भ लावत एखाद्या वैचारिक भूमिका मांडणाऱ्याला आपला प्रवास करावा लागतो. 

कोणतंही प्रभावी तत्त्वज्ञान विकसित होताना ते सभोवतालची परिस्थिती, धारणा, मान्यता, अवस्था यांची सांगड घालून एक मूलभूत विश्लेषण निर्माण करतं आणि यातून वाट करून देत एका आदर्शवत स्थितीची कल्पना करतं. भारतीय इतिहासात तत्त्वज्ञानाला, विशेषतः अध्यात्मिक तत्त्वज्ञानाला महत्वाचं स्थान आहे. त्याची मोठी परंपरा या उपखंडाला लाभली. मात्र आधुनिक राष्ट्र-राज्य, नवी मानवी मूल्यं आणि आधुनिक जगाच्या व्यवहारात पारंपरिक शोषणमूल्यांच्या वाढतच जात असलेल्या तीव्रतेचं आणि तिच्यावर मात करण्यासाठीचं आंबेडकरवादाचा अपवाद वगळता कृतिशील परिवर्तनाचं कोणतंही तत्वज्ञान समोर येताना दिसत नाही. अशा वेळी आंबेडकर आणि त्यांची वैचारिक संरचना एखाद्या अभेद्य दीपस्तंभासारखी वाट दाखवत राहते. मात्र, म्हणून आंबेडकरांच्या मांडणीला भौतिक सत्यासत्यतेशी सतत पडताळून न पाहता, तिच्यात वेळोवेळी सुधारणा न करता, आणि त्यातून तिची डागडुजी करत, तिला आणखी अभेद्य न करता, तिचं सनातन वाक्यात रूपांतर करणं, हे एखाद्या चळवळीसाठी आत्महत्येपेक्षा वेगळं ठरत नाही. मार्क्सवादाच्या पारंपारिक मांडणीला औद्योगिक काळाच्या चौकटीत असामान्य महत्व प्राप्त झालं होतं. मात्र उद्योगोत्तर समाजाच्या गरजांनुसार नवी चिकित्सा व नव्या राजकीय कल्पनादृष्टीचा अभाव राहिला. याचा परिणाम म्हणून मार्क्सवाद एक तात्विक चौकट म्हणून कमकूवत होत गेला. आंबेडकरवादी विचारवंतांनी मार्क्सवादी चळवळीनं केलेल्या चुका टाळून आंबेडकरवाद एका कोषात ढकलला जाणार नाही, याची खबरदारी घेणं त्यामुळंच क्रमप्राप्त ठरतं.

‘खैरलांजी ते रोहित दशकाची अस्वस्थता’ हे पुस्तक म्हणजे आंबेडकरी चळवळीत गेले दशकभर लढणाऱ्या केशव वाघमारे यांच्या संपादकीय, वैचारिक आणि वृत्तपत्रीय लेखांचं सार आहे. जात्यन्तक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून खैरलांजीमध्ये घडलेल्या जातीय अत्याचारापासून ते रोहित वेमुला या हैदराबाद विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने व्यवस्थेच्या जाचाला कंटाळून केलेल्या आत्महत्येपर्यंत एका दशकाचा विस्तार लेखकाच्या लिखाणाला आहे. लेखक आंबेडकरी चळवळीतील, एक लोकशाही देशाच्या लोकशाही यंत्रणेतली आणि बहुप्रवाही समाजाच्या मानसिकतेतली अंतर्विरोधी स्वभाववैशिष्ट्य थेट आणि स्पष्ट मांडत राहतो. येथे जात्यंतक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून भूमिका घेत असताना, चळवळीतल्या अवगुणांना आणि चुकांनाही लेखक धारेवर धरताना संकोच करत नाहीत.

भारतीय समाजातल्या कुप्रथा, शोषण आणि साचलेपणाचं कारण म्हणून बाबासाहेब आंबेडकर जातिव्यवस्थेकडं पाहतात. जात ही केवळ धारणा नसून तिची एक व्यवस्था आहे, संरचना आहे व तिचा प्रभाव मानसिकच नव्हे तर भौतिक पातळीवरही पडतो, असं तीक्ष्ण विश्लेषण त्यांनी केलं. तत्कालीन परिस्थितीमध्ये पारंपरिक राज्यव्यवस्थांपेक्षा, आधुनिक पद्धतीची राज्यव्यवस्था इथल्या जातीय अत्याचारांना थांबवून शोषितांना उभारी देण्याचं काम करेल, अशा अपेक्षेतून बाबासाहेबांनी भौतिक परिवर्तनाचा मार्ग म्हणून संवैधानिकता आणि आत्मिक, मानसिक उन्नतीचा मार्ग म्हणून बुद्ध धम्माचा मार्ग योग्य मानला. या मांडणीतून बाबासाहेबांना व्यवस्थात्मक परिवर्तन अपेक्षित नव्हतं, तर तेव्हाची व्यवस्थात्मक मूल्यच क्रांतिकारक स्वरूपाची असल्यामुळं त्यांचा परिणामही मूलभूत पातळ्यांवर क्रांतिकारीच असेल अशी त्यांची अपेक्षा होती. 

मात्र पुढील ७० वर्षात इथल्या पारंपरिक व्यवस्थांनी व बलशाली घटकांनी आधुनिक मूल्यांचा ढाचा वापरून या व्यवस्थेवर ताबा मिळवत या मूल्यांचा प्रभाव कमी केला. सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य या आणि अशा अनेक संकल्पनांना पायदळी तुडवले. या स्थितीत नव्या भांडवली अवकाशात वित्तीय भांडवलाची होणारी वाढ, राज्यव्यवस्था आणि राष्ट्र-राज्याचं बदलणारं स्वरूप, सामाजिक संसाधनांवरती आलेला ताण आणि त्यातून निर्माण झालेली कोलाहलाची परिस्थिती, याबाबत कोणतीच परिवर्तनशील वैचारिक मांडणी पुढं येत नसताना, आंबेडकरवाद ती कमतरता कशी भरून काढेल, याची वारंवार कल्पना करताना लेखक दिसून येतो. आंबेडकरवादी चळवळीला कम्युनिस्ट चळवळीच्या भूतकाळातल्या (आणि बऱ्याचदा वर्तमानातल्या) वागणुकीनं अनेकदा त्रास झाला आहे. त्यामुळं साहजिकच या एकलक्षीय, मात्र भिन्नमार्गीय चळवळीबाबत आंबेडकरी चळवळीत शंका आणि काही प्रमाणात राग असणं स्वाभाविक आहे. मात्र आंबेडकरवादाला मार्क्सवादी चौकटीतून निर्माण होणाऱ्या भौतिक आणि राजसत्तात्मक विश्लेषणाची जोड मिळाली तर आंबेडकरी विचाराचा विस्तार आणखी वाढण्यासह त्याचं शोषितांसाठी नव्या जगाची कल्पना करणाऱ्या एका तीक्ष्ण टोकदार विचारात परिवर्तन होईल, असं लेखक सुचवत राहतात. अस्मितादर्शी होऊ पाहणाऱ्या चौकटीला जर जात-वर्गीय दृष्टिकोन लाभला, तर तो एकाच जातीसाठी नाही, तर अनेक जाती-समूहांच्या शोषणमुक्तीचा विचार बनू शकतो असं या पुस्तकातल्या ‘प्रतिवाद की अज्ञानमूलक असूया’ ‘मराठा समाजाला खरा धोका कोणापासून’ अशा लेखातून लेखक सुचवू पाहतात.  पुस्तक जात्यन्तक विचारांच्या अवकाशात वैचारिक लिखाणाची भूमिका बजावत असलं. तरी हे ‘वैचारिक’ संज्ञा, संकल्पना, पुस्तकीय परिभाषा आणि यांत्रिक विश्लेषणापासून दूर राहतं. 

वाघमारेंचं लिखाण विचाराच्या बांधिलकीतून आलं आहे, ते विरोधी विचाराच्या व्यक्तीस त्रासदायक किंवा एकांगीही वाटू शकेल, मात्र हा व्यक्तिगतपणाच या लेखनाला प्रभावी धार देतो. आजघडीला भारत ज्या संक्रमणावस्थेतून जात आहे, ज्या पद्धतीनं जात आहे, ते पाहता या काळाचं तत्वज्ञान उभं राहणं महत्त्वाचं आहे. या काळाला समजून घेऊन, खंडित अस्मितांच्या उपखंडाला मानवी मूल्यांवर आधारित उन्नतीकडं नेणारा मार्ग दाखवणारे अनेक परिवर्तनशील विचार सोबत येणं गरजेचं होऊन बसलं आहे. त्याचमुळे केशव वाघमारे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या अनुभवातून प्रगल्भ बनलेल्या दृष्टीचं हे संकलन महत्त्वाचं आणि काळसुसंगत ठरतं.

मी सत्याच्या बाजूने आहे, मग ते सांगणारा कोणीही असो. मी न्यायाच्या बाजूने आहे, तो कोणाच्याही बाजूचा असो. मी सर्वप्रथम मानवतेसाठी आहे, आणि अशा गोष्टींसाठी आणि माणसांसाठी, जे संपूर्ण मानवजातीच्या हितासाठी आहेत.
- माल्कम एक्स, अमेरिकी कृष्णवर्णीय क्रांतिकारी

खैरलांजी ते रोहित दशकाची अस्वस्थता
लेखक :
केशव वाघमारे
प्रकाशक : हरिती पब्लिकेशन्स
पृष्ठे : १७२ पानं
मूल्य : १२० रुपये

- प्रथमेश पाटील
editor@thebunkmag.com
बातम्या आणखी आहेत...