आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदावर विरजण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशेष मुलांचा जन्म अनेकदा आई-वडिलांसाठी आयुष्यभराची विषादाची किनार घेऊन येतो. जन्मजात व्यंग वा विकृती असलेल्या मुलांना वाढवताना येणाऱ्या आव्हानांविषयचीचे हे नवे सदर.. या सदरातून दर पंधरवाड्यात तुमच्या भेटीला येणार आहेत औरंगाबादच्या प्रतिभा हम्प्रस आणि अंबिका टाकळकर. या लेखमालेतील हा पहिला लेख..

कळा ज्या लागल्या जिवा, मला की ईश्वरा ठाव्या! या कळांचा, प्रसववेदनांचा अनुभव शब्दातीत आहे. तो प्रत्यक्ष घेतल्यावरच समजतो. त्यानंतरचा आनंद अवर्णनीय आहे. सर्व घरदार या नव्या बाळाच्या स्वागतात रममाण झालेले असते. परंतु काहींचा हा आनंद निखळ राहतो, तर काहींच्या आनंदावर विरजण पडते, ग्रहण लागते. बालजन्मानंतर त्याला काही संसर्गजन्य आजार होतात, उपचारानंतर ते बरे होतात आणि पालकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंदाचे तेज झळकते. पण काही बालके व्याधीच नव्हे तर व्यंगाचे दान सोबत घेऊनच जन्मतात. हे दान जेव्हा पालकांच्या लक्षात येते, तो क्षण काळीज पोखरणारा असतो. या पालकांची ही वेदना “जावे ज्याच्या वंशा” त्यांनाच सर्वार्थाने कळते.

आपले मूल असणे, हे प्रत्येकाचे एक अमूल्य स्वप्न असते. ते स्वप्न सत्यात येते आणि सुरू होतो त्याला वाढवण्याचा प्रवास. बालपण, शिक्षण, खोड्या, त्याचा प्रत्येक क्षण पालकांना एक सुखद अनुभव देणारा असतो. मात्र हा अनुभव काही पालकांसाठी विषादाची एक किनार सोबत घेऊन आलेला असतो. त्यांच्या मुलांमध्ये जन्मजात किंवा काही अपघात, औषधांच्या परिणामाने व्यंग वा विकृती असतात. हे व्यंग मतिमंदत्व, अस्थिव्यंग, मूकबधिरत्व, बहुविकलांगत्व, आॅटिझम, डाउन्स सिंड्रोम अशा अनेक रूपांत समोर येते. अर्थातच पालकांचा विषाद हा लेकरू विकलांग असल्याचा नसून त्याला वाढवताना आलेल्या अनुभवांचा आहे. त्यात नातेवाईक, आप्तस्वकीय, सखे-शेजारी, समाज या सर्वांचाच समावेश आहे. व्यासपीठावरून बोलणारा समाज आणि प्रत्यक्षातला समाज यात प्रचंड तफावत आहे. उपचारांच्या बाबतीतही क्षणोक्षणी उदासीनता जाणवते. डॉक्टरही अशा मुलाच्या बाबतीत शोध आणि संशोधनाच्या मर्यादेमुळे उदासीन आहेत. शासनाकडे ठोस योजना नाहीत. भोंदू बाबा व आर्थिक कमाईवर लक्ष ठेवून व्यवसाय करणाऱ्यांचे मात्र अमाप पीक आलेले आहे. त्यामुळे पालकांची गत “भीक नको पण कुत्रा आवर” अशी होते. पालकांची आशा कायम जिवंत असते, कशाने का होईना आपल्या मुलाला गुण यावा, म्हणून ते अहोरात्र धडपडत असतात. अशा आशावादी पालकांकरता आणि समाजाचा या मुलांकडे विकलांग म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा, या दृष्टीने अनेक पैलूंची चर्चा करणारी ही लेखमाला असेल.

पालकांच्या वाट्याला आर्थिक, मानसिक त्रास आणि विकलांग मुलाच्या जगण्याची धडपड असहायतेने पाहणे हेच येते. या सर्व दुष्टचक्रातून आम्ही गेलो आहोत, आणि अजूनही हा संघर्ष चालूच आहे. परंतु हतबल न होता व्रतस्थ राहून शांतचित्ताने या मुलांसोबत प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर बरेच (संपूर्ण नाही) स्वावलंबनाचे श्रेय दृष्टिपथात येते.

अनेक कार्यप्रसंगी लोक बोलावतात, जाणे अपरिहार्य असते. परंतु विकलांग मुलाला सोबत घेऊन जाणे सहज शक्य नसते, तसेच यजमानासही त्या विकलांगाने यावे यात स्वारस्य नसते. अशा वेळी ते तुम्ही एकट्याच आलात, मग तुम्ही घरी गेल्यावर साहेबांना पाठवा, असे बिनदिक्कत सांगतात. हे शक्य नाही म्हटल्यावर त्यांना ते पटत नाही. घरी असलेले मूल शरीर व बुद्धीने विकलांग आहे; मनाने नाही, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. जर घरातून एकेकदा करून आईवडील बाहेर कार्यक्रमास जाऊन आले, मिष्टान्न भोजन करून आले तर त्या “मनाने सक्षम पण शरीराने विकलांग” मुलांना काय वाटेल, हे फक्त त्याचे पालकच जाणू शकतात. एकेक अनुभव चार पावले पुढे गेलेले असताना दहा पावले मागे ओढणारे असतात. मुलासमोरच येणारे काही पाहुणे, स्नेही, ओळखीचे यांना सगळे कळते का? तो शाळेत जातो का? घरातच असतो? म्हणजे तुम्हालाही कुठे जाता येत नसेल नाही का? एकच आहे का हे मूल तुम्हाला? असेल तर अरेरे, अवघड आहे मग तुमचे! असे बोलतात. त्या वेळी धरणी दुभंगून सीतेप्रमाणे आपल्यालाही पोटात घेईल तर बरे, असे पालकांना, विशेषत: आईला, वाटते. कारण समोर असलेल्यांना कळत नाही की ते जाणूनबुजून असं बोलतात, हा संभ्रम होत असतो. मात्र या सर्व गोष्टींचा मानसिक परिणाम मुलांवर होत असतो. अशा वेळी त्यांचे मनोबल वाढवत आपणही शांत राहायचे, ही दैनंदिन परीक्षाच असते. यालाच जीवन ऐसे नाव हे पटते. म्हणूनच या विकलांग मुलांना वाढवणे म्हणजे नियतीने पालकांना दिलेले एक आव्हान असते.

हे नियतीचे आव्हान स्वीकारून काश्मीर ते कन्याकुमारी व इंग्लंड, अमेरिका, कॅनडापर्यंत उपचाराकरता फिरलो. परंतु प्रयोग, संशोधन अगणित सुरू असले तरी खात्रीने बरे करणारे उपचार अजून कोठेच नाहीत. सगळीकडे विकलांगांसाठीचे सेंटर, शाळा हे त्यांच्या पालकांनी नैतिक जाणिवेतून सुरू केलेले आहेत. तात्पर्य, जिथं सक्षम मुलाला वाढवताना आज खूप समस्या येतात, त्यांना तोंड देता देता जीव मेटाकुटीला येतो, तिथं विकलांगांचे जीवन तर पूर्ण परावलंबी असते. त्यात सोयीसुविधांचा अभाव, शासनदरबारी उदासीनता, आणि समाजाचा, आप्तस्वकीयांचा असहकार याची भर पडते.

पालकांच्या या मन:स्थितीला काही अंशी या लेखातून दिलासा मिळेल, असा प्रयत्न आहे. अनभिज्ञ समाजाला या विकलांगांची वेदना समजेल, काही समाधान निश्चित हाती लागेल, हा विश्वास आहे. दिव्यांगांच्या समस्या वाढत्या वयानुसार, शारीरिक रचना व नैसर्गिक बदलांमुळे अधिकच बिकट होतात. मुली वयात आल्यावर त्यांची सर्व जबाबदारी आईवरच असते. तसेच आपल्या पश्चात काय, ही चिंता असतेच. शारीरिक विकलता असली तरी त्यांचेे मन, भावना आणि सर्व संकेत सामान्य मुलांप्रमाणेच असतात. त्यांचे पुनर्वसन, विवाह, मुलं, संसार आणि आपल्या व विदेशातल्या विकलांगांचे जीवन यावर पुढील लेखातून आशावादी विचारांचे चित्र स्पष्ट होईल.
(pratibha.hampras@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...