आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकत्वाची सत्त्वपरीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांग मुलांच्या पालकांसमोर आयुष्याच्या सारीपाटावर प्रत्येक वळणावर सातत्याने अज्ञात आणि अकस्मात जीवघेणे दान पडत राहते. पण हे आव्हान पेलण्याचे वरदानही त्यांच्या पारड्यात विधात्याने अलगद दिलेले असते.
आपले मूल कसेही असले तरी आईवडिलांकरता ते जगातले सर्वात सुंदर मूल असते. मात्र असे विकलांग मूल दिसले की, आप्तस्वकीय, परिचित इतक्या चौकश्या करतात की बस. त्यांचे प्रश्न, अनाहूत सल्ले, प्रारब्ध, नशिबापासून कर्म, भोगापर्यंत सगळ्यांचा वेध घेत शेवटी देवधर्म, व्रतवैकल्ये, कुंडली, ज्योतिष, गृहदोष, पितृदोष, पत्रिकेपर्यंत पोहोचतात. पालकांची स्थिती बिकट असते. काय करावे आणि काय नाही, याविषयी संभ्रम असतो. कशाने का होईना आपले मूल स्वावलंबी व्हावे, हाच एक विचार थैमान घालत असतो. त्यामुळे अनेक बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टीही पालक करतात. फक्त वैद्यकीय उपचार सोडले तर इतर सर्व प्रकारांत शेवटी मनस्ताप, आर्थिक नुकसान आणि निराशा हाती येते. वैद्यकीय उपचारातही सतत प्रयत्न करत राहिले तरच मुंगीच्या गतीने प्रगती दृष्टिपथात येते. विविध थेरपी, व्यायाम प्रकार, याव्यतिरिक्त यात आमूलाग्र बदल होणारे काहीच नाही.
दु:खात सुख इतकेच आहे की, कुठलेही विकलांगत्व, दिव्यांग असणे, अपंग असणे हे शारीरिक, मानसिक अथवा अस्थिदोषामुळे आलेले असते. शरीर, मन व हाडांचे असंतुलन आणि अशक्त असण्याने, तसेच मेंदूच्या काही मृत पेशींमुळे आलेले हे परावलंबी जीवन असते. यात जनुकीय दोष नसतो. त्यामुळे हा अानुवंशिक अथवा संसर्गजन्य प्रकारातला आजार नाही. किंवा पालकांच्या कुठल्याही व्याधी, व्यसनांमुळे अपत्यात ही समस्या येत नाही. मुळात हा शारीरिक, बौद्धिक व मानसिक क्षमता व त्यांच्या नैसर्गिक वाढण्याच्या गतीत शैथिल्य असल्याने होणारा प्रकार आहे. आपण पहिल्याच लेखातून याची कारणे जाणून घेतली आहेत. अशा दिव्यांग अपत्यास लहानमोठे भावंड असल्यास ते सक्षम, स्वावलंबी असते. कदाचित कुठे असे दिव्यांगत्व एकापेक्षा जास्त अपत्यांत आढळतेही, पण हा निव्वळ योगायोग आहे. त्यात पालक, पूर्वज, गुणसूत्रे यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. अनेक जण विशेषत: ज्योतिषी, पत्रिका पाहणारे विकलांगाचा संबंध ग्रह, तारे, नक्षत्र व पूर्वजांशी लावतात. तिसऱ्या पिढीत असे अपत्य जन्मतेच, असेही छातीठोकपणे सांगतात. खरे तर अशा दिव्यांग अपत्याला सक्षम, स्वावलंबी करण्याकरता पालक जिवाचा आटापिटा करत असतात. यातलाच एक भावनिक प्रकार भविष्य पाहणे हा असून याकडे पालक ओढले जातात. त्यांच्या याच मानसिकतेचा फायदा हे तथाकथित भविष्यवेत्ते घेतात. भविष्य हे फार गहन शास्त्र आहे. पण त्याचा खोलात जाऊन अभ्यासपूर्वक निष्कर्ष न काढता जे आपल्या आर्थिक स्वार्थाकरता वरवरचे भाकीत सांगून ग्रहताऱ्यांच्या नावावर हा दोष ढकलतात, त्यात काहीच अर्थ नाही. उलट हात दाखवून अवलक्षण व पत्रिका दाखवून आर्थिक नुकसान सोसावे लागते. शिवाय मनस्ताप होतो तो वेगळाच.
या सगळ्यातून काही काळ मानसिक समाधान मिळते, इतकेच. कारण आपले एखादे काम झाले नाही किंवा काही कारणाने आयुष्यात फारच अडचणी आल्या, त्रास झाला, तर या ग्रहांवर बिनधास्त जबाबदारी टाकता येते. या समाधानाव्यतिरिक्त यातून काहीच निष्पन्न होत नाही.
पण आशा एक अशी मायावी शक्ती आहे, जिच्या प्रलोभनाने मन कुठल्याही मार्गावरून धावते. आणि अनेक मार्गांवर असे जीवघेणे चकवे असतातच. त्या चकव्यांना टाळून जो पुढे जातो तो संयमी व त्याला त्रास कमी, पण जो चकव्यात अडकतो त्यांच्या त्रासात अजून भरच पडते.
ही दिव्यांग मुले लहान असतात तोवर विविध उपचार, वेगळे आणि विशेष शिक्षण, यातच पालक आणि मुले गुरफटलेली असतात. मात्र वाढणाऱ्या वयासोबत शरीरात होणारे नैसर्गिक बदल जेव्हा दिसायला लागतात तेव्हा पालकांच्या काळजाचा ठोका चुकतो. दिव्यांग मुलगी असेल तर हे तारुण्यातले वळण अजूनच कठीण होते. मासिक धर्माची सुरुवात म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान व सोहळा असतो. पण दिव्यांग मुलींच्या बाबतीत हे अजून एक धोक्याचे वळण ठरते. तिला सुरक्षित व स्वच्छ ठेवणे पालकांना विशेषत: आईकरता आव्हान असते. निसर्गचक्राच्या क्रमातून विकलांगांना कुठलीच खास सवलत नाही. सामान्यांचेच सगळे नियम या असामान्यांना येथे लागू होतात. मात्र सामान्यांच्या जगात या दिव्यांगांना सामान्यांप्रमाणे आयुष्य जगता येत नाही. तारुण्याच्या उंबरठ्यावर विवाहाची गरज यांनाही वाटते. भावना, प्रेम, भिन्नलिंगी आकर्षण यांच्याही मनात सामान्यांप्रमाणेच असते. मात्र परिस्थिती व पालकांकडून या वळणावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मनातल्या भावनांना मनातच दडपून टाकण्याची शिक्षा विकलांगांना भोगावी लागते. परावलंबी आयुष्यातल्या वेदना अशा सर्वच बाजूंनी प्रत्येक वळणावर दिव्यांगांना अजूनच गलितगात्र करतात. दिव्यांग मुलगी वयात आल्यावर पालकांच्या चिंतेत अजून भर पडते. एखादा नराधम तिच्या विकलतेचा गैरफायदा घेऊन तिचा शारीरिक उपभोग तर घेणार नाही ना, या जीवघेण्या भीतीचे सावट कायम पालकांच्या मनावर असते. त्यामुळे क्षणभरही अशा दिव्यांगांना नजरेआड करता येत नाही. म्हणूनच जर अशा दिव्यांग अपत्याचे दोन्ही पालक नोकरी करणारे असतील तर आईला नोकरी सोडून सतत मुलाचे संरक्षण, उपचार व शिक्षण याकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे आर्थिक बाजूही विकल होते आणि संसाराचे सारे चित्रच केविलवाणे होते. तरीही खंबीरपणे पालक नियतीचे हे आव्हान स्वीकारून पुढे जात आहेत, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण आपल्या सर्व वेदना, चिंता, काळजी व स्वप्नांना ते आपल्या मनात कायमचे बंदिस्त करून ठेवतात आणि नंतरच ते आपल्या परावलंबी पाल्याला स्वावलंबी करण्याच्या शर्यतीत उतरतात. आणि सुरेश भटांच्या ‘एकेक युद्ध माझे, मी हरलो तरीही, मजला अंजिक्य केले, माझ्या पराभवांनी।।’ या शब्दांना शाश्वत सत्याचा अर्थ देतात.
कुठल्याही प्रकारचे दिव्यांग अपत्य म्हणजे पालकांची जन्मजात दु:खाशीच नियतीने अतूट नाळ बांधलेली असते. मग या वेदनेवर विजय मिळवण्याची धडपड करत राहणे, हेच ध्येय त्यांच्यासमोर असते. प्रयत्नाने कधी यश दृष्टिपथात येते, तर कधी अपयशाच्या गर्तेत पुढची वाट धूसर होते. दिव्यांगाचे पालकत्व निभावताना आयुष्याच्या सारीपाटावर त्यांना प्रत्येक वळणावर सातत्याने अज्ञात आणि अकस्मात जीवघेणे दान पडत राहते. पण हे आव्हान पेलण्याचे वरदानही त्यांच्या पारड्यात विधात्याने अलगद दिलेले असल्याने हा प्रवास पुढे चालू राहतो. असे असले तरी एखाद्या गर्भश्रीमंत व्यक्तीचे मूल शिक्षणात ढ असेल किंवा चैनीत जगत असेल तर त्याचे कौतुक “मुले शिकली नाही तरी त्यांना काय फरक पडणार, त्यांच्या सात पिढ्या आरामात बसून खातील,” अशा शब्दांत होते. मात्र ज्यांच्या घरात ढ नव्हे तर कुठल्याही प्रकारचे विकलांग, दिव्यांग मूल असेल व असे पालक श्रीमंत असले तरी त्यांना त्यांच्या सात पिढ्यांत झाला नसेल असा त्रास आयुष्यभर सहन करावा लागतो. सामान्य पालकांचे हाल तर विचारायलाच नको, इतके जीवघेणे असतात. त्यांचे व मुलांचे आयुष्य तहहयात पणाला लागते. ज्या घरात दिव्यांग मूल असते त्या घरातील इतर मुलांना, त्याच्या भावाबहिणींना आयुष्यातल्या वैवाहिक वळणावर याची झळ तीव्रतेने जाणवते. याबाबत पुढच्या लेखातून सविस्तर लिहीनच.
प्रतिभा हंप्रस, औरंगाबाद
pratibha.hampras@gmail.com
बातम्या आणखी आहेत...