आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratibha Hampras Article About Healthcare Facilities In The West.

रुग्णसेवेचे व्रती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाश्चिमात्य देशांमध्ये रुग्णालयात जाण्याचा अनुभव ज्यांनी घेतला आहे त्यांना इकडच्या व तिकडच्या सुविधा, सेवा, उपचार आणि रुग्णाशी डॉक्टरांचे वर्तन यातला फरक तीव्रतेने जाणवतो. अतिशय स्वच्छ, सुंदर, मोठी; आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टर, सेवाभावी ब्रदर-सिस्टर, परिपूर्ण इलेक्ट्रॉनिक सुविधांनी सज्ज अशी रुग्णालये तेथे सर्वच ठिकाणी आहेत. प्रत्येक ठिकाणी पुरेशी पार्किंग व्यवस्था पहिल्यापासूनच केलेली आहे.
रोजवेल पार्क हे कॅन्सर हॉस्पिटल सर्वात जुने म्हणजे 150 वर्षांपूर्वीचे असून तेथे सुरुवातीपासूनच या सर्व सुविधा आहेत. याचा अर्थ, प्रगतीच्या शिखरावर आणि आधुनिकतेच्या रथावर ते केव्हापासून स्वार आहेत, ते सहज लक्षात येते.
हॉस्पिटलला जाण्याआधी डॉक्टरांची भेटीची वेळ ठरवून घेणे अनिवार्य आहे. आपत्कालीन सेवा मात्र तत्काळ मिळतात. त्याकरिता खास सुविधा उपलब्ध आहे. तेथे रुग्णांना आपला आजार, तो कशामुळे झाला, त्यावर काय उपचार आहेत, त्यामुळे कोणते परिणाम व दुष्परिणाम शरीरावर होतात, हे जाणून घेण्याचा आणि डॉक्टरांनी त्यास संपूर्ण माहिती देण्याचा हक्क मानव अधिकार संविधानातूनच आहे. त्याचे पालन करणे डॉक्टर व रुग्ण दोघांनाही बंधनकारक आहे. त्यामुळे डॉक्टर रुग्णास त्याच्या आजार व उपचारांची आधी पूर्ण कल्पना देऊन हे उपचार करायचे का, हे विचारतात. रुग्णाच्या संमतीशिवाय ते त्याच्या शरीरावर कोणतेही प्रयोग करत नाहीत. अर्थातच त्यांना वैद्यकीय अद्ययावत ज्ञान असते, म्हणूनच रुग्ण तेथे जातात; परंतु अंधविश्वास ठेवून ते उपचार करून घेत नाहीत, तर ते डॉक्टरकडे जाण्याआधीच इंटरनेटवरून आपल्या आजाराबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतात. त्यानंतरच्या शंका ते डॉक्टरांना विचारतात आणि योग्य उपचार आता मिळतील, ही खात्री पटल्यावरच ते डॉक्टरवर विश्वास ठेवून पुढची ट्रीटमेंट घेतात. डॉक्टर गरज असेल तरच जास्त क्षमतेच्या वेदनाशामक गोळ्या देतात. अँटिबायोटिक औषधींचे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन रुग्णाजवळ असले तरी मेडिकल स्टोअरमधून फार्मासिस्ट ते औषध डॉक्टरांना पुन्हा फोन करून विचारून घेतल्यावरच रुग्णास देतात. प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतेही औषध मेडिकल स्टोअरमधून नुसतेच मागितले तर मिळत नाही. अगदी सर्दी-खोकला, ताप असेल तरी. त्याकरिता डॉक्टरांकडेच जावे लागते.
माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या प्रसूतीच्या वेळचा अनुभव सांगते. डॉक्टरांनी तिला विचारले, तुम्हाला मुलीच्या प्रसूतीवेळी काही विशेष मदत हवी का? तेव्हा मैत्रिणीने ‘मला मुलीच्या समोर प्रसूतीवेळी देवाचा फोटो ठेवायचा आणि मृत्युंजय मंत्राची कॅसेट लावायची आहे,’ असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी प्रसूती टेबलासमोर मुलीला सहज दिसेल असा गणपतीचा फोटो (जो मैत्रिणीने सोबत आणला होता) लावला आणि मृत्युंजय मंत्राची कॅसेटही लावली. तेथे प्रसूतीच्या वेळी आई, पती नातेवाइकांना जवळ थांबता येते.
रुग्णसेवा हा तर तेथील नर्स, सिस्टर, सर्व्हंट यांचा स्थायीभाव असल्याचीच भावना मनात रुजते; इतक्या आत्मीयतेने ते रुग्णांची सेवा-शुश्रूषा करतात. अत्यंत ममतेने, मायेने ते रुग्णांचे कोणतेही काम सुहास्य वदनाने करतात. हे ममत्व त्यांच्या रक्तातून आलेला वारसा आहे, याची खात्री पटते. नाहीतर आम्हाला वर्षानुवर्षे येथे आया आणि दाया यांचे खेकसणे ऐकून घेण्याचीच सवय झालेली असते. कोणत्याही हॉस्पिटलच्या कर्मचा-यास (आया-नर्स-सर्व्हंट) यांना अतिरिक्त चिरीमिरी देण्याची प्रथा तेथे अस्तित्वातच नाही. आपण स्वेच्छेने दिली तरी ते घेत नाहीत.
हॉस्पिटलमध्ये जेव्हा रुग्ण भरती होतो, तेव्हा जेवण तेथेच घेणार का, हा एक प्रश्न भरती फॉर्ममध्ये असतो. अर्थात ज्यांना घरचेच पाहिजे ते ‘नाही’ म्हणतात; पण ज्यांच्याकडे घरी करावयास कोणी नाही ते हा पर्याय निवडतात. तेथे जेवणात दूध, अंडी, ज्यूस, ब्रेड, पिझ्झा, फळे, सलाड, ग्रिल्ड व्हेजिटेबल्स, वेगवेगळे सूप, पास्ता आणि सामिष पदार्थ असे असते. अगदी कोणतीही शस्त्रक्रिया झालेली, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती ते प्रसूती झालेल्या स्त्रियांनाही हाच आहार असतो.
तेथे बाटलीमधून टॅब्लेट्स मिळतात. या बाटलीचे झाकण ओढून काढावे लागते, जे सहजासहजी लहान मुलांच्या हाती लागले तरी त्यांना काढता येत नाही. शक्यतो प्लास्टर घालणे, लहानसहान शस्त्रक्रिया टाळून नुसत्या औषधाने रुग्ण बरा करण्याकडेच त्यांचा कल असतो. संशोधन शास्त्राकडे तेथे विशेष लक्ष दिले जाते. आजार झाल्यावर काय करायचे, यापेक्षा आजार होऊच नये हे शोधण्यावर तिकडे जास्त भर आहे.
त्याकरिता सरकारी अनुदानही भरपूर मिळते. डॉक्टरकडून एखादी चूक झाली आणि त्यामुळे कोणत्याही रुग्णाला, नवजात शिशूला काही त्रास झाला, तर डॉक्टर शिक्षेस पात्र असतो आणि समाजही या बाबतीत खूप जागरूक आहे. म्हणूनच तेथे खोटी, फसवणुकीची, नीम हकीम खतरे जान, अल्पज्ञान आणि मनानेच वैद्य झालेले, अशी प्रॅक्टिस चालतच नाही. आपल्याकडील एमबीबीएस डॉक्टरलादेखील तेथील यूएसएमएलई परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तेथे डॉक्टर म्हणून मान्यता मिळत नाही. स्वतंत्र डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करता येत नाही. तो कायद्याने गुन्हा ठरतो.
विदेशातील वैद्यकीय क्षेत्र हे आपले कसब पणाला लावणारे आणि खरोखरच लोकहित जपणारे, नैतिक मूल्यांवर आधारित परिपूर्ण असे आहे. डॉलरमध्ये फी आणि तीही खूप जास्त, म्हणून तेथे वैद्यकीय सेवा अतिशय महाग असली तरी प्रामाणिक आणि परफेक्ट असते. त्यामुळेच आपल्याकडच्या उच्च श्रीमंत व उच्च अधिकार श्रेणीतल्या सर्वांची ओढ आजारी पडल्यावर परदेशी जाऊन उपचार घेण्याकडे असते. आपण विदेशात पर्यटनास, वास्तव्यास जाताना मेडिसिन पॉलिसी काढणे खूप गरजेचे असते. पॉलिसी असेल आणि अशी बेसावध आजार, अपघात यांची वेळ आलीच तर या पॉलिसीमुळे ती सहज निभावते आणि आपण सुसज्ज, सुंदर हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार घेऊन सुखरूप मायदेशी परत येतो.