आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratibha Hampras Article About Married Life In The Western Countries

विवाह आणि त्यानंतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाह आणि कुटुंबसंस्था या दोन भावनिक, मानसिक स्थैर्य देणा-या भक्कम पायावर आपल्या भारतीय जीवनाची इमारत दिमाखाने उभी असते. तर या पायाशिवाय जीवन जगण्याची पाश्चिमात्यांची वृत्ती आहे. येथूनच त्यांची स्वतंत्र राहण्याची, नात्याच्या, भावनेच्या बंधनात
अडकून न पडण्याची जडणघडण झाल्याचे दिसते. त्यामुळे एकत्र कुटुंब ही संकल्पना तेथे नाही असे सकृतदर्शनी वाटत असले तरी विभक्त कुटुंबातल्या सदस्यांशी त्यांचे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध मात्र निश्चितच आहेत. म्हणूनच तेथे फादर्स डे, मदर्स डे, व्हॅलेंटाइन डे, यांचे विशेष महत्त्व आहे.
मात्र तहहयात विवाहबंधनात अडकून एकमेकांसोबत राहणे, पालकांनी मुलांचा विवाह ठरवणे, विवाहानंतरच मूल असणे, या आपल्या नैतिक आणि सामाजिक जीवनाचा तिकडे मागमूसही दिसत नाही. जन्मलेली प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असून त्याच्या जीवनातले सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी त्याचीच असते. यात आईवडील/पालक हस्तक्षेप करत नाहीत. अर्थातच आईवडीलही आयुष्यभर एकमेकांची साथ देतातच असेही नाही. आपले विचार पटत नाहीत, किंवा कोणतेही कारण असले, ज्यामुळे ते सोबत राहू शकत नाहीत असे वाटले तर ते लगेच विभक्त होतात. मुळात ते विवाहानंतरच आईवडील झाले होते हेही गरजेचे नाही. असे असले तरी यात बदल होत आहे, कुटुंबसंस्थेचे बीज तेथे रुजत आहे.
आपल्या मुलांचे संगोपन ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. किंबहुना खूपच चांगल्या प्रकारे करतात. तरीही त्यांचा मूलभूत हक्क हा स्वतंत्र व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्वाचा तसाच अबाधित आहे. शाळेत जाणा-या मुलामुलींपासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सगळे आपल्या बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडच्या वलयात असतात. डेटिंगला जाणे यात अव्यवहार्य काही नाहीच. शालेय जीवनातच सेक्सचा उपभोग घेणे, पालक होणे, यात त्यांना काही गैर वाटत नाही. मात्र अशा मुलांचा सांभाळ ते स्वत: आणि घरातले इतरही सदस्य, त्यांचे मूल म्हणून करतात. अशा मुलांच्या जन्मानंतर, किंवा पुढेही 10/5 वर्षांनंतर त्या दोघांना आपण विवाह करावा वाटले तर ते विवाह करतात. अन्यथा दुसरीकडेही त्यांचे संबंध येऊन ते दुस-या कुणासोबत विवाहबद्ध होतात. नातिचरामि म्हणत आयुष्यभर एकाच व्यक्तीसोबत पटत नसतानाही कुढतकुढत संसार करायचा हा मन मारून जगण्याचा प्रकार त्यांना भावत नाही. मुक्त विचारसरणी आणि मुक्त जगणे, जगण्यातला आनंद उपभोगणे, हे त्यांचे जीवन जगण्याचे सूत्र आहे. त्यामुळेच आपल्या संस्कारी मनाला हे आचारविचार रुचत नाहीत. परंतु अशा आधुनिक विचारप्रणालीतही त्यांचे नातेसंबंध आणि एकमेकांवरचे प्रेम दृढ आहे.
जेव्हा केव्हा ते विवाह करतात तेव्हा विवाह समारंभ हा वैयक्तिक, मोजक्या लोकांसमवेत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करतात. चर्च, गार्डन, हॉटेल येथे अत्यंत जवळच्या परिवारासह हा विवाह संपन्न होतो. विवाहात फक्त आमंत्रित उपस्थित असतात. त्यांच्याकरिता खास आसनव्यवस्था त्यांच्या नावाने राखीव असते. आपल्याकडे भव्य अवॉर्ड फंक्शन पाहतो ना, त्या धर्तीवर तेथील विवाहप्रसंगी व्यवस्था असते. विवाहापूर्वी वर-वधूचा wedding vows हा कार्यक्रम असतो. त्यात दोघेही एकमेकांबद्धल त्यांना काय वाटते, भविष्यात ते काय करणार आहेत, आणि त्यांच्या एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत हे सांगितले जाते. wedding dinner
हे खास लोकांकरिता असते. जेवणापूर्वी ‘फादर बॉल’ हा डान्स असतो. त्या वेळी वधू आपल्या वडिलांसोबत डान्स करते. नंतर ती आपल्या पतीसोबत डान्स करते. या वेळी वेगवेगळे band असतात. वर सुटाबुटात तर वधू खास पांढ-या पायघोळ वेडिंग गाउनमध्ये असते. तिकडेही करवलीला (ग्रूम & ब्राइड) विशेष मान आहे. त्यांचा ड्रेसही वधूवराप्रमाणेच आणि त्यांनीच पसंत केलेला असतो. त्यांच्याजवळ wedding ring असते. तेथील फादरच्या साक्षीने wedding ring घालून विवाह संपन्न होतो. बाकी कुठलेच सोपस्कार विवाहात नसतात. ज्या कोणाला जोडप्याला भेट द्यायची असेल त्यांच्याकरिता या जोडप्याने आधीच ठरवलेल्या शॉपमधूनच ती घेता येते. त्यामुळे त्यांना हवी ती, आवडीची व उपयोगी भेट दिली जाते. या शॉपमध्ये जाऊन आपण भेटवस्तू निवडायची, त्याचे पैसे द्यायचे, बस्स. नंतर ती भेट आकर्षक वेष्टनातून आपल्या नावाने योग्य व्यक्तीस योग्य वेळेवर पाठवली जाते.
मुलाने मुलीला पाहायला येणे, कांदेपोहे, पसंती, विहिणीचे कौतुक, हळद, संगीत, वाजंत्री, कार्यालय, मानपान, जेवणावळी, पाय धुणे, व्याहीभेट, भेटबकरा, कानपिळणे याच्याशी दुरान्वयानेही त्यांचा संबंध येत नाही. मुख्य म्हणजे मानपान व आहेर हा प्रकार तेथे अजिबात नसतो. वैवाहिक जीवनात पती-पत्नी दोघेही घरातील कामे एकत्रित करतात. पालक होताना बाळाची काळजी कशी घ्यायची याचे प्रशिक्षण दोघांना घ्यावे लागते. बाळाची जबाबदारी दोघांची सारखीच असते. आई नोकरी करणारी असेल आणि तिला जास्त रजा मिळत नसेल तेथे बाळाचे वडील सुट्टी घेऊन बेबीसिटिंग करतात म्हणजे बाळाला सांभाळतात. पाश्चिमात्य देशांतील समाजजीवनावर आपण सहसा एकाच बाजूने विचार करतो असे वाटते. म्हणूनच त्यांच्याकडील अनेक चांगल्या गोष्टी, विचार, स्वच्छता, शिस्त, शिष्टाचार यांच्याकडे आपण सहेतुक दुर्लक्ष करतो आणि वेगळ्याच दृष्टिकोनाने त्यांच्याकडे पाहतो. त्यांच्याकडचे सकारात्मक, चांगले ते निदान निकोप नजरेने माहीत तर करून घेतले पाहिजे.