आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratibha Hampras Article About Variety Of Food Outside India

भरपूर व वैविध्‍यपूर्ण खाणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदेशात खाणे, राहणे या सर्वांमध्ये खूपच शिष्टाचार आणि विशिष्ट पद्धती आहेत. सकाळी उठल्याबरोबर चहा हा आपल्याकडचा परवलीचा शब्द आहे. विदेशात हा मान कॉफीने पटकावला आहे. अगदी कडक, दूध कमी अथवा नाहीच; साखर पाहिजे असल्यासच; नसता कडवट, कडक आणि मोठ्ठा मग भरून कॉफी हे तेथील मुख्य पेय आहे. नेसकॉफी नावाने तिकडे कॉफी मिळत नाही. मात्र, स्टारबक्समधील मोक्का, जावाचिप, लाट्टे, कापुचिनो, आइस कोल्ड कॉफी यांचा आस्वाद जिभेवर कायम रेंगाळतो. पिझ्झा, बर्गर, सलाड, वेगवेगळे चीज आणि मांसाहारी पदार्थ फक्त भाजणे, गरम करणे, तेल-तूप-मसालेविरहित; फक्त थोडेसे मीठ आणि काही फ्लेवर्स टाकून शक्यतो अर्धे कच्चे खाण्याकडे त्यांचा जास्त कल आहे. ओव्हन, मायक्रोवेव्ह ओव्हन यांचा जास्त वापर असून आपल्याकडचा फ्लेम (बर्नर) गॅस म्हणजे नैसर्गिक फ्लेमवरचे खाणे हे आउटडोअर म्हणजे बाहेर शक्यतो बार्बेक्यूचा वापर करून, पण तेही त्यांच्या पद्धतीचे फक्त भाजणे, क्वचितप्रसंगी शिजवणे असे असते. हे बार्बेक्यू स्विमिंग पूल, गार्डन, प्रेक्षणीय स्थळाचे मोठे आवार, समुद्रकिनारा, सर्व सार्वजनिक ठिकाणी असतातच; ज्यामुळे पिकनिकचा आनंद वेळेवर आणि स्वत: केलेल्या गरम खाण्यातून तेथे घेता येऊ शकतो. स्वत:चे बार्बेक्यूही आपल्या घरातील बागेत त्यांच्याकडे असतात. चॉकलेट, आइस्क्रीम, वेगवेगळी फळे आणि त्यांच्यापासून बनवलेली स्मूदी, ज्यूस, शीतपेये यांचा वापर विपुल असतो. बिअर, रम, आणि अल्कोहोलिक ड्रिंक हे तेथील थंड वातावरण, त्यातून राहणीमानाचा झालेला एक भाग म्हणून मान्यता पावलेले आहे. मात्र, त्याचा अतिरेक, जास्त ड्रिंक घेऊन वाहन चालवणे यावर निर्बंध आहेतच. त्यांच्या जेवणाच्या वेळा म्हणजे सकाळी भरपेट न्याहारी, दुपारी एखादे फळ, फळाचा रस, अथवा हलके खाणे आणि संध्याकाळी लवकर म्हणजे सहा वाजता डिनर. त्यामुळे तेथील हॉटेल रात्री लवकर बंद होतात. ‘बिगर इज बेटर’ हा त्यांचा खाण्याच्या बाबतीतला महत्त्वाचा मंत्र आहे. जेवणात आधी सूप, अ‍ॅपेटायझर, मुख्य खाणे, नंतर डेझर्ट असे चार भाग असतात. टीव्हीवर खाण्याच्या संबंधित ज्या स्पर्धा आणि कार्यक्रम होतात, त्याही याच पद्धतीच्या असतात. त्यामुळे आपल्यासारखे साग्रसंगीत जेवणाचे ताट नसते; पण जे करतात आणि खातात ते मात्र खूप मोठ्या मात्रेत असते. तेथील टीव्हीवर प्रसारित होणा-या chopped, Iron Chef, थर्टी मिनिट्स मील, 5/10 डॉलर मील यांसारख्या कार्यक्रमांतून अनेक नवीन कल्पना, पद्धती, आधुनिक उपकरणे, सुसज्ज किचन, त्यांची काम करण्याची आणि व्यक्त होण्याची पद्धत समजते. तेथेही स्वच्छता, शिस्त, चपळाई, सजावट (प्रेझेंटेशन) यातील त्यांचे कसब प्रकर्षाने जाणवते. केकच्या स्पर्धा तर अगदीच मनमोहक असतात. प्राणी, पक्षी, निसर्ग, सिनेमातील थीम, पात्रे, अशा विविध संकल्पना घेऊन मोठमोठे केक बनवताना पाहणे हा अनुभव खूप रोमांचक आहे. तसेच कपकेकच्या स्पर्धेत एका टीमला एका वेळी हजार केक बनवून ते अतिशय वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करावे लागतात. त्यातले त्यांचे कौशल्य आजही आपल्याला स्वप्नवत वाटावे असे आहे.
अ‍ॅपल पाय, मॅश्ड पटेटो, जम्बलिया, चिकन, पोर्क, बफेलो विंग्स, नाचोज, हॉट डॉग, वेगवेगळे ब्रेड, हॅम्बर्गर, चीजबर्गर, सर्व प्रकारचे सीफूड, मासे, टॅकोज हे विदेशातील मुख्य खाणे आहे. कांदे, बटाटे, लसूण यांचा वापर सढळ हाताने होतो. वेगवेगळ्या प्रकारचे सलाड, सूप आणि त्यांचे प्रमाण व सजावट पाहूनच आधी मन तृप्त होते. शैक्षणिक संस्थांमधील उपाहारगृहात शुक्रवारी (फ्राय डे) फ्राइड पदार्थ देतात.
तेवढेच वेगळेपण आणि पुढे दोन दिवस सुटी असल्याचे संकेत देण्याची ही एक अभिनव पद्धत. तेथील एका हॉटेल चेनचे नाव TGIFम्हणजे Thank God It's Friday असे आहे. ब्रेडचे अनेकविध प्रकार आणि आकार पाहायचे तर ते विदेशातच, इतके अगणित ब्रेड येथे दिसतात की नेमका कोणता घ्यावा, असा संभ्रम पडतो.
मुंबईप्रमाणेच कोणी कोणत्याही देश, प्रदेश, राष्‍ट्र, राज्य अथवा देशातून विदेशात आले तरी त्यांची क्षुधा त्यांच्या आवडत्या खाण्यातून येथे शांत होते. अमेरिकेचे मांसाहारी खाणे असले तरी शाकाहारी लोकांनाही येथे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. चायनीज, मेक्सिकन, इटालियन, ग्रीक, थाई, व्हिएतनामी, नॉर्थ-साउथ इंडियन, पंजाबी, मद्रासी, गुजराती इ. सर्व प्रकारच्या पदार्थांचा येथे आस्वाद घेता येतो. चिपोटलेमधील बरिटो, ग्रीक रेस्तराँमधील फलाफल, ऑलिव्ह गार्डनमधील पिझा, सलाड, आइस्क्रीम, बेगल हे शाकाहारींनी एकदा तरी घ्यायलाच हवे. विविध प्रकारचे केक, कुकीज, पेस्ट्री, स्मूदी, लेमोनेड आणि योगन फ्रुजमधील फ्रूट योगर्टची चव जिभेवर बराच वेळ रेंगाळते. मांसाहाराची तर येथे विपुल श्रेणी आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक डिशचा आकार आणि त्यातल्या पदार्थाचे प्रमाणही खूप जास्त असते.
आज विदेशातही भारतीय पदार्थ आणि ते मिळणारी हॉटेल्स आहेत. विदेशी लोकही या हॉटेलमध्ये येऊन आपली क्षुधा तृप्ती करत आहेत. आणि तेथे आपल्या पाककृतीकरिता उपयुक्त सर्व प्रकारचे किंबहुना येथल्यापेक्षा चांगले किराणा सामान मिळणारी दुकाने, मॉल आहेत; पण खरे सांगायचे तर जेथे जायचे तेथील संस्कृती, खाणे, राहणे याच्यात समरस व्हायलाच हवे, तेव्हाच आपल्याला पर्यटनाचा खरा आनंद मिळतो. आपल्या पद्धती, खाणे, हे तर आपण कायम करतोच; मग विदेशात गेलो तर जरा हटके विदेशी होऊन बघा, वेगळाच अनुभव मिळेल.