पालक होणे म्हणजेच पाल्याचे दायित्व पेलण्यास सर्वार्थाने सक्षम असणे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळात पालकांच्या दायित्वाच्या संकल्पना वेगळ्या होत्या. घरी शेतीवाडी किंवा काही परंपरागत व्यवसाय असेल तर तोच पुढे पाल्याकडे येणार, मग त्याचेच शिक्षण व जुजबी लिहणे-वाचणे आले की, कामच झाले वाटायचे. मुलीचा विवाह करून देताना खातेपिते घर अथवा खंडीभर पिढी असलेले म्हणजे दहा-वीस भावंडं असलेलं किंवा एकत्र कुटुंब असलेलं घर पाहिलं जायचं. अशा काळात एखादे मूल दिव्यांग असले तरी त्याचे आयुष्य असेच हातोपाती कडेला जायचे.
आज पालक खूप जागरूक झाले. कुटुंब विभक्त झालं. घरच्या पारंपरिक व्यवसायावर विसंबून न राहता सुशिक्षित पालक नोकरीला महत्त्व देत आहेत. पाल्यांची जबाबदारी विचारपूर्वक सांभाळत आहेत. स्पर्धेच्या युगात पाल्याला उज्ज्वल भविष्यकाळ देण्याकरता त्याच्या जन्मापासूनच तयारीत राहणारे पालक
आपल्या वार्धक्याचीही सोय करून ठेवत आहेत. असे सगळे सकारात्मक व ऑल वेल चित्र असताना मग चिंता कशाची?
तर जितक्या सोयीसुविधा, जितकी आधुनिक जीवनशैली तितके अचानक समोर येणारे प्रश्न व समस्या अधिक. त्या सोडवणे एक नवे आव्हान. बरे हे प्रश्न मानवनिर्मित, आर्थिक, शैक्षणिक अथवा विशिष्ट पातळीवरचे असले तर त्यातूनही मार्ग काढण्याचे अनेक पर्याय समोर दिसतात. पण जेव्हा नियतीच पाल्याच्या दिव्यांगत्वासह त्याचे पालकत्व देऊन एक अनाकलनीय आव्हान काही पालकांना देते, तेव्हा हे ऑल वेल व सकारात्मक चित्र पार धुळीला मिळते. येथून सुरू होतो एक नवा, न संपणारा वर्तमान, भविष्यकाळ आणि आपलं वार्धक्य ते आपल्या पश्चात आपल्या विशेष पाल्याचे सुरक्षित जीवन या चिंतेने विकल झालेला प्रवास.
पुढचा क्षण जेथे आपल्या हातात नाही तेथे भविष्याच्या सुरक्षेची चिंता वाटणे साहजिक आहे. तो मानवी स्वभाव आणि पाल्यांविषयी वाटणाऱ्या प्रेमाचा आविष्कार आहे. याच प्रेमामुळे आपलं मन मग “आपल्या पश्चात काय?” म्हणून आक्रंदत असते.
पण हा प्रश्नच चक्रव्यूह आहे. एकदा यात अडकलात तर बाहेर निघणे कठीण. “मुलाला तुम्ही लायक बनवलं तर त्याचे भविष्य तो स्वत: घडवेल, आणि मूल नालायक निघालं तर तेच भविष्याला गालबोट लावेल”, हे सामान्यांच्या बाबतीतलं सत्य आहे. पण भविष्याच्या अनावश्यक चिंता आणि काळजीपोटी आजचे वर्तमान झाकोळणार नाही, हे बघायला हवे. जसे आपण रोज रात्री निद्राधीन होतो, त्या अवस्थेत आपल्याला काही आठवते, कळते, चिंता वाटते का? जाग आल्यावर किंवा झोप लागत नाही तोवरच मनाचे द्वंद्व चालू असते. विचार चालू असतात. तसेच मृत व्यक्तीबाबतही म्हणता येईल. ती तर चिरनिद्रा असते. तेथे कसली काळजी, चिंता, आसक्ती, ओढ राहणार? याला अाध्यात्मिक विचार किंवा कुणी पलायनवाद अथवा जबाबदारी टाळण्याचा प्रकार म्हणू शकतात. पण हे सत्य लक्षात घेऊन जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पुढची वाटचाल सुरू ठेवली तर सारासार निर्णय घेण्याची क्षमता नक्कीच वाढेल. चिंतेपेक्षा तुम्ही चिंताविरहित होण्याचे पर्याय लवकर शोधाल अथवा स्वीकाराल. ही मानसिकता होण्याकरता याचे प्रयोजन होते, इतकेच.
आता काही नवीन व योग्य पर्यायांचा आपण विचार करू या. सर्वप्रथम अशा दिव्यांग पाल्यांची जबाबदारी घेणे हे त्यांच्या भावंडांचे कर्तव्यच आहे, हे गृहीत धरू नका. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते. संस्कार, जडणघडण व कौटुंबिक वातावरण, प्रेम, जिव्हाळा व आपलेपणाच्या भावनेवर ते जमेल तितके सहकार्य नेहमीच करतील, पण दिव्यांगांच्या कारणांमुळे सामान्यांच्या कुठल्याही गोष्टीवर त्याचा बाधक परिणाम होणार नाही, याची काळजी पालकांनी प्रामुख्याने घ्यायला हवी.
काही दिव्यांग जसे अंध, अस्थिव्यंग, सौम्य मतिमंद, बहुविकलांग हे अर्थार्जन, वैवाहिक जीवनात सामान्यांप्रमाणेच यशस्वी होतात. त्यातही एक ठळक मानसिकता दिसतेच. अंध मुलाला डोळस मुलगी मिळू शकते, मिळतेही. पण अंध मुलीला डोळस व सामान्य मुलगा मिळणे म्हणजे स्वप्नातले इमले आहेत. आता बऱ्याच संस्था अशा दिव्यांग पाल्यांच्या पालकांनी आपल्या पश्चात काय, या मानसिकतेतूनच सुरू केलेल्या आहेत. त्यातून बरेच सकारात्मक मार्ग आणि योजना कार्यान्वित झाल्या आहेत. त्यात हाॅस्टेल, गार्डियन पॅरेंट्स, कार्यशाळा, उद्योग व्यवसाय, दिव्यांग वधूवर सूचक मंडळ, त्यांचे विवाह, आणि नंतरचे जीवन याकरता अर्थसाहाय्य, मार्गदर्शन, नोकरी यांसह बरेच प्रकल्प, तसेच विकलांग साहाय्य साधने-वाहने, वैद्यकीय सेवा, उपलब्ध झाल्या. संस्थांचे प्रयत्न, शासनाच्या योजना यामुळे बरेच प्रश्न आता मार्गी लागत असले तरी अजून खूप काही बाकी आहे.
जे दिव्यांग सर्वस्वी तहहयात परावलंबी असतात, त्यांची पालकांच्या पश्चातची चिंता फारच जीवघेणी असते. अशा पालकांनी मग अनाथगृहातून एखादे मूल आपले नातवंड आहे, या भावनेने दिव्यांग पाल्यांचे मूल म्हणून दत्तक घ्यावे. त्या अनाथाला एक चांगले घर मिळेल, तुमच्या मायेची-प्रेमाची ऊब मिळेल, त्याला हक्काचे पालक मिळतील. तुमच्या सक्षम स्थिती व संस्काराच्या आधारावर त्याचे जीवन जसे आदर्श घडेल, तसेच त्याचे भावनिक नातेही दृढ होत जाईल. आणि आपले पालक जरी दिव्यांग असले तरी त्यांच्याशी असलेले अतूट बंध त्याला पालकाच्या जबाबदारीतून कधी विभक्त करणार नाही. (दिव्यांगांचे पालक स्वत: सक्षम आहेत, तसेच दिव्यांग व्यक्ती ३०/३५ वयाची आहे तोवरच घेणे गरजेचे आहे. जसे आपण विमा पाॅलिसी भविष्याची अथवा आपल्यानंतर राहणाऱ्या जोडीदार व मुलांची काळजी म्हणून घेतो, तसेच ही ‘नातवंड पाॅलिसी’ समजावी. यामुळे दोन सामाजिक गोष्टी साध्य होतात. अनाथाला हक्काचे घर, आप्त व दिव्यांगाला त्याचे हक्काचे मूल मिळते.)
काही परकीय व भारतीय आपली सांपत्तिक स्थिती उच्च असूनही फक्त दिव्यांग किंवा अनाथ मुला/मुलींना दत्तक घेतात. मग सुस्थितीत असलेल्या दिव्यांगाच्या पालकांनी दिव्यांगाचे मूल म्हणून असे अनाथ मूल दत्तक घेऊन आपले नातवंडं म्हणून वाढवले तर हा एक नवा प्रवाह समाजात रुजेल, यात शंका नाही. दुसरा पर्याय सरोगेट मदर व सरोगेट फादरचा असू शकतो. आपले दिव्यांग मूल हे किती सक्षम, स्वावलंबी, परावलंबी आणि कोणत्या मानसिक जडणघडणीचे आहे, हा अंदाज पालकांना नेमका आलेला असतो. त्याचे स्वप्न, ध्येय त्यांना माहीत असतात. आपले मूल परावलंबी असून यात आता अधिक काही सुधारणा होणार नाही, हे सत्य स्वीकारले तरी पाल्यांचे शारीरिक परावलंबन व वैचारिक क्षमता वेगळी असते. तेही आपल्या विवाह, जोडीदार, मूल या स्वप्नात मनाने गुंतलेले असतात. त्यांच्या भावनिक जीवनाकडे आपण सतत दुर्लक्ष करू शकत नाही. अशा वेळी सर्व परिस्थितीची कल्पना असूनही तशा उत्तुंग विचारांनी भारावलेले काही असतात, जे अशा विकलांगांच्या आयुष्याचा भाग होतात. पण हे जेथे अशक्य आहे आणि दिव्यांग पाल्यांचे स्वप्नच विरून जात आहे, हे लक्षात येताच पालकांनी सरोगेट मदर/फादर या पर्यायाच्या मदतीने दिव्यांगांचे स्वप्न काही अंशी पूर्ण केल्यास पुढची चिंता मिटेल. दिव्यांग/विकलांग असणे हे अानुवंशिक नाही. म्हणूनच सरोगेट मदर/फादर होणे या प्रश्नाकडे जागरुकतेने पाहिले तर लक्षात येईल, ज्याच्यामध्ये तुमचे जीन्स, मन, भावना या नाळेपासूनच आहेत तेथे प्रेम, माया व आपुलकीची, कर्तव्याची भावना जन्मत:च आलेली असते. सहवास, संस्कार यातून ती बळकट होते. असे सरोगसीतले मूल (पालकांचे नातवंड) आपल्या विकल पाल्याची काळजी घेण्यास सक्षम व सर्वांगीण विकसित केले तर “पश्चात निश्चिंती” अवस्था अनुभवता येईल. कुठलेही पाऊल उचलताना ती पहिली सुरुवात असते. प्रयत्न तर करू या.
नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही ज्या ज्या वेळी कोणाला मदत करण्यास वाकाल, त्या प्रत्येक क्षणी तुम्ही ताठ मानेने उभे असाल.
प्रतिभा हंप्रस, औरंगाबाद