आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या चार टक्‍क्‍यांनी जायचे कुठे?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेलं दीड वर्ष प्रतिभा हंप्रस आणि  अंबिका टाकळकर यांनी विशेष मुलं व त्यांचं विश्व यासंबंधी लिहिलेले लेख आम्ही प्रसिद्ध केले. आज वाचू या सदराचा समारोपाचा भाग.

समाज बदलतोय. सुधारणा होतायेत. तद्वतच औरंगाबादच्या अनेक संस्थांनी आणि काही स्वयंसेवी लोकांनी पुढाकार घेऊन येथील अपंग, विकलांग मुलामुलींना व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याच्या क्षेत्रात प्रगती केली. अनेक विकलांग व परावलंबी असलेल्यांना आशेचा किरण दिसला. काही सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या व्यक्तींच्या आणि अशा विकलांग पालकांच्या प्रयत्नातून अनेक संस्था येथे सक्रीय कार्य करू लागल्या. त्यांच्या प्रयत्न व संस्थांना अमिताभ बच्चन, गझलगायक स्वर्गीय जगजीतसिंह, गुलाम अली, आदींचे आशीर्वाद आणि अर्थसाह्यदेखील येथील काही संस्थांना लाभले. आजही विविध प्रसारमाध्यमे अशा संस्थांना मदत करण्यास प्रायोजक म्हणून पुढे येत आहेत. त्यातून अशा संस्था विकलांग मुलामुलींच्या आयुष्याला आकार देण्याचे काम जोमाने करू शकतात.
 
पण तरीही अपंग, विकलांग यांचे प्रश्न सुटलेले नाहीत, हे प्रकर्षाने जाणवते. विदेशातले अपंग व्यक्तींना मिळणारे शिक्षण, साधने, नोकऱ्या, सरकारी मदत, आदि पाहिल्यावर तर आपण किती मागे आहोत, याची जाणीव तीव्रतेने होते. विकलांगही याच समाजाचा भाग आहेत. या चार टक्क्यांना घरात कोंडून नाही ठेवता येत कारण जे शाळा, संस्था, सेंटर, येथे जाऊ शकतात, काही शिक्षण घेऊन अल्प का होईना रोजगार मिळवू शकतात, त्याशिवाय अजून चार टक्के असे विकलांग आहेत ज्यांना प्रत्येक क्षणाला कोणाचा न कोणाचा आधार लागतोच. ना शिक्षण, ना स्वावलंबन, अशी त्यांची दयनीय अवस्था व पालकांची हतबल मनःस्थिती असते. ज्यांची जणगणनेतही नोंद घेतली जात नाही ते विकलांग म्हणजे हे चार टक्क्यातले दुर्लक्षित, उपेक्षित, असहाय लोक आहेत. परदेशात मात्र हा चार टक्क्यांचाही सर्वंकष विचार केलेला दिसतो.
 
परदेशात विकलांगांकरता असलेल्या सेवा कल्पनातीत आहेत. त्या सुविधांचा विचार आम्हाला येथे स्वप्नात करणेही शक्य नाही. तेथे पालकांवर विकलांगांचा आर्थिक भार नसतो. विकलांगांकडे एक सन्माननीय व्यक्ती म्हणूनच पाहिले जाते. त्यांच्याकरता सरकारचे धोरण सकारात्मक असून असे मूल ज्या घरात असेल त्यांच्या पालकांचे उत्पन्न लक्षात घेऊन त्या प्रमाणात विकलांगांना लागणारा खर्च शासन देते. या रकमेतून अशा विकलांग व्यक्तीचे शिक्षण, खेळाचे साहित्य, त्यांच्या मदतनिसाचा पगार, आणि हॉस्पिटलचा खर्च भागतो. त्याचप्रमाणे विकलांग मूल सज्ञान झाल्यावर शासनाकडून त्यास स्वतंत्र सदनिका व मदतनीस देण्यात येतात. तहहयात त्यांचा खर्च शासन करते. (२ वर्षांपूर्वी माझी एक इंग्लंडमधील मैत्रीण वारली, तिचा मुलगा विकलांग (सेरेब्रल पाल्सी) आहे. आज तो शासनाकडून मिळालेल्या घरात मदतनिसासह आनंदात राहतो आहे. आठवड्यातून एकदा वडील आणि बहीण त्याला भेटून जातात.) विकलांगांच्या शाळेत (तेथे अशा शाळेस फर्स्ट चाइल्ड होम, फिजिकल ट्रेनिंग सेंटर म्हणतात) भरपूर अत्याधुनिक साधने आहेत. गरजेचे साहित्य, खेळणी तेथील स्थानिक दिव्यांगांना विनामूल्य उपलब्ध होते. अशाच सोयीसुविधा ज्येष्ठ नागरिकांनाही आहेत. सर्व ठिकाणी विकलांगांकरता सोयीचे रस्ते, रॅम्प, सुविधा असून सार्वजनिक ठिकाणी पार्किंग लाॅटमध्ये समोरच्या काही जागा खास दिव्यांगांकरता राखीव असतात. प्रत्येक गर्दीच्या किंवा प्रेक्षणीय ठिकाणी अपंग व्यक्तीस सन्मानाने आधी प्रवेश दिला जातो. विकलांगांकडे मुद्धाम कोणीही वळून पाहत नाहीत.
 
अनेक देशांत प्रत्येक ठिकाणी विकलांगांकरता अत्यंत स्वछ आणि आधुनिक सोयींनी परिपूर्ण अशा “रेस्टरूम” आहेत. (रेस्टरूम म्हणजे नैसर्गिक विधीकरता असलेली जागा) रेस्टरूम प्रत्येक ठिकाणी स्त्री, पुरुष आणि कुटुंब अशा तीन प्रकारचे असतात. स्त्री आणि पुरुष रेस्टरूम आपण समजू शकतो पण कुटुंब रेस्टरूम म्हणजे काय, असा प्रश्न साहजिकच मनात डोकावतो. जर आपल्या सोबत एक विकलांग किंवा व्हीलचेअर वापरणारी व्यक्ती असेल, आणी ती व्यक्ती पुरुष असून सोबतची व्यक्ती स्त्री असेल तर ती विकलांग व्यक्तीला घेऊन स्त्रियांच्या रेस्टरूममध्ये जाऊ शकत नाही, आणि पुरुषांच्याही रेस्टरूममध्ये जाऊ शकत नाही. अशा वेळी वापरण्यासाठी या कुटुंब रेस्टरूम असतात. व्हीलचेअरवरची व्यक्ती आणि बरोबरची व्यक्ती भिन्नलिंगी असली तरी त्यांना या रेस्टरूम वापरता येतात. विकलांग लोकांना तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत जाणीवपूर्वक सुयोग्य सुविधा देणे हा नियमच आहे आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. रेल्वेचे दार फलाटाच्या समांतर असते, त्यामुळे व्हीलचेअर सहज आत नेता येते. सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये व्हीलचेअरकरता दारासमोरची जागा राखीव असून बाजूची सीट त्याच्या सोबतच्या व्यक्तीकरता असते.

विकलांगांप्रती सहानुभूती किंवा हळहळ व्यक्त करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची ही वृत्ती अमेरिका वा युरोपातील मुलामाणसांच्या नसानसात भिनलेली आहे, विकलांगांचा आत्मसन्मान कायम जपला जावा ही भावना तेथील शासनाची आणि लोकांची आहे. त्यामुळेच तेथे विकलांगांना नोकरी मिळू शकते. अर्थात त्यांचे रोजचे उत्पन्न आणि त्यांचे काम यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही, पण त्यामुळे ते लोकांच्या संपर्कात राहतात, सकारात्मक विचार त्यांच्या मनात राहतात, त्यामुळे “शरीर विकलांग असले तरी मन सक्षम राहते” आणि जीवन जगण्याची नवी ऊर्जा मिळत राहते.  पुष्कळदा वाटते या चार टक्यांना परदेशातच पाठवावे. निदान त्यांचे आयुष्य थोडे तरी सुसह्य होईल. काय वाटते तुम्हाला? नक्कीच तुम्हालाही अशा दिव्यांग मुलांमुलींचे हितच हवे आहे. पण त्याकरता सर्वांना परदेशात जाणे सहज शक्य नाही. मात्र येथेच हळूहळू का होईना दिव्यांगांना सन्मानाने स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगता यावे अशा सोयीसुविधा लवकर मिळाव्यात, शासन, समाज व संस्थांच्या प्रयत्नात आपला सद्भावनेचा सहभाग असावा, हेच या समारोपाच्या लेखातून मी आपणास सांगते. गेले वर्षभर विशेष मुलांच्या या लेखमालेत मी व अंबिकाने शक्य तितके सर्व विषय घेऊन त्यावर सकारात्मक दृष्टिकोनातून जनजागृतीचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी वेळोवेळी आमचे मनोबल वाढवले. कार्य करण्यास नवी ऊर्जा, प्रेरणा मिळाली. सर्वांचे आभार.
 
pratibha.hampras@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...