आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्यांगांसाठी काय करू शकतो आपण?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांग व्यक्तींकरिता भारत सरकारने सुगम्य भारत योजना सुरू करून विकलांग विकासाच्या दृष्टीने जे पाऊल उचलले ते सकारात्मक व प्रेरणादायी आहे. पुढच्या आठवड्यात असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विकलांग दिवसाच्या निमित्ताने, या क्षेत्रात काय करता येऊ शकतं, याविषयीचं टिपण.


माननीय पंतप्रधान व मुख्यमंत्री 
महोदय, 
सशक्त, सुदृढ, आणि निर्व्यंग मूल असावे व त्याच्या संगोपनात आपण आपलेच सिंहावलोकन अनुभवावे, हे खरे तर प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र काही स्वप्नांना अपंगत्वाचा शाप जन्मत:च लाभतो. किंबहुना नियती, प्रारब्ध, संचित असे काही असेल तर त्याचे भोग जन्मासोबतच येतात आणि मग अवयवांच्या या त्रुटी अथवा विकलांगपणाला कार्यरत करण्याकरता संपूर्ण आयुष्यच पणाला लागते. असे परावलंबी, अवयव-बुद्धी-गती-मतीमधे असहकार असलेले मूल व त्याचे कुटुंबीय नित्य नव्याने वेगवेगळ्या समस्येला आयुष्यभर तोंड देत राहतात. ‘असामान्य म्हणून जन्माला आलेल्या जिवाला सामान्य जिवन जगता येत नाही,’ यापेक्षा नियतीची क्रूर थट्टा कोणती असु शकेल? 


विकलांग, अपंग व्यक्तीमधे एक अतिरिक्त, अनाकलनीय शक्ती असते म्हणुन त्यांना अपंग न म्हणता दिव्यांग म्हणावे, असे आमचे (भारताचे) पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितले. तेंव्हापासुन या दिव्यांगाकडे व त्यांच्या प्रश्नाकडे सरकार व समाजाचे विशेष लक्ष वेधले गेले. अनेक सोयी सुविधा - ज्यांच्याशिवाय दिव्यांगांना घराबाहेर पडणे अशक्य होते - त्यांच्या निर्मितीस गती मिळाली. सरकारी सूत्रे हलू लागली. 


दिव्यांग म्हणजे ठरावीक एक प्रकार नसून यात अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक अपंगत्वांचा समावेश आहे. ज्याला सशक्त, संपूर्ण, परिपूर्ण, निर्व्यंग शरीर म्हटले जाते त्या शरीरातला एखादा अवयव नसणे, बुद्ध्यांक कमी असणे, स्नायूंचा-अस्थींचा असहकार, मेंदूच्या पेशींचे मृत/दुर्बल असणे, बहुविध अवयवांच्या अनियंत्रित हालचाली असणे, असे एक ना अनेक प्रकार सात आढळतात.  विकलांगत्व कुठलेही असो, त्यामुळे बाधित व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय सर्वांनाच त्याचे परिणाम आयुष्यभर ग्रासतात. यातही काही दिव्यांग श्रेणी जसे, मूक-बधीर, कर्णबधिर, मतिमंद-गतिमंद, स्वमग्न, मंगोल, अस्थिव्यंग, अंध-पंगू, यांचे आयुष्य निदान चालणे-बोलणे-खाणे-पिणे, या बाबतीत बहुतांश स्वावलंबी असते. परंतु बहुविकलांग अर्थात सेरेब्रल पाल्सी व तत्सम विकलांग हे पूर्णत: परावलंबी असतात. बौद्धिक क्षमता, आकलन शक्ती, सामाजिक भान चांगले असूनही अवयवांवर स्वनियंत्रण नाही, शारीरिक तोल सांभाळता येत नाही, बोलणे-खाणे-पिणे, म्हणजे त्यांचा स्वत:शीच लढण्याचा प्रकार असतो. आणि त्यांची ही तडफड बघत अगतिक, असाह्य झालेले पालक मनाने विकल होतात. 


या सर्वात ‘दोष ना कुणाचा’ असे असले तरी देशाचे नागरिकत्व असलेली एक व्यक्ती म्हणून त्याला त्याचे नागरिकत्वाचे हक्क व सोयीसुविधा देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. सर्वसाधारण सोयीसुविधा जसे रस्ते, सार्वजनिक ठिकाणी  रॅम्प, आरक्षण, संरक्षण, रेस्टरूम, प्रवासात साह्य, हे तर होईलच. परंतु समाजाची, येणाऱ्या नव्या पिढीची दिव्यांगांकडे बघण्याची मानसिकता बदलणे फार गरजेचे व महत्त्वाचे आहे. 


म्हणूनच काही गोष्टी अग्रक्रमाने करायला हव्यात. 
१.
 अगदी बालवाडी, नर्सरीपासून सामान्य मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सर्व प्रकारच्या दिव्यांगांविषयी विशेष उल्लेख, माहिती, चित्रे समाविष्ट करावीत. 
२. दिव्यांग विशेष सचित्र चार्ट तयार करावेत. ते बालवाडी, अंगणवाडी, नर्सरी तसेच सर्व शाळांच्या वर्गात लावावेत. 
३. पुढच्या प्रत्येक वर्गातल्या अभ्यासक्रमात दिव्यांग समाजाचा एक भाग म्हणून त्यांच्या विशेष माहितीचे तपशीलवार धडे समाविष्ट करावे. 
४. दिव्यांग - असामान्य व्यक्तिमत्त्वे असलेली पुस्तके प्रेरणादायी म्हणून विशेष अभ्यासक्रमात घ्यावी. (उदा. हेलन केलर, तारानाथ शेणाॅय, इत्यादी)  
५. जे दिव्यांग घरातून बाहेर पडण्यास असमर्थ आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, मुख्यत्वे जे “मनाने सक्षम पण शरीराने अक्षम” आहेत त्यांच्याकरता “विशेष प्रयत्न व सुविधा” योजना असावी. या शाळेपासून वंचित असलेल्या, घरातच बंदिस्त असलेल्या दिव्यांगांची, जणगणनेत नोंद व्हावी. 
६. घटनेने जसा सज्ञानांना मतदानाचा अधिकार दिला तसाच “सज्ञान दिव्यांग” कितीही परावलंबी असला तरी त्याला स्वकमाईचा सन्मान मिळावा.  
७. समाजकल्याण विभागाअंतर्गत प्रत्यक्ष दिव्यांग व्यक्ती व त्याचे पालक यांच्याशी समन्वय व संपर्क असावा. जसे परदेशात दिव्यांग व पालकांची समाजकल्याण अधिकारी स्वत: दर तीन महिन्यांनी भेट घेतात. काही अडचणी असल्यास त्या निराकरणास मदत करतात. दिव्यांगांना पालक सन्मानाने वागवत नसतील, त्यावरून पालकांत वाद होत असतील, तर अधिकारी त्यांना समज देतात. तीनदा समज देऊनही पालक दिव्यांगास नीट सांभाळत नसतील तर ते त्या दिव्यांग व्यक्तीस ‘दत्तक’ घेतात. त्याचा सांभाळ सरकारकडून केला जातो.  
८. सेरेब्रल पाल्सी-स्नायूविकार, मेंदूविकार, यांचे निदान होताच सर्वसमावेशक उपचारांचे अत्याधुनिक प्रशिक्षित तज्ज्ञ असलेले पूर्ण वेळचे सेंटर असावे. जेथे फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, संगीत, जलतरण, आदि सर्व थेरपीसह इतर सर्व उपचार एकत्रित मिळतील. ‘एका छताखाली सर्व उपचार’ या योजनेअंतर्गत बहुविकलांग मूल ५/६ वर्षांत बरेच सक्षम व स्वावलंबी होऊ शकते. हा माझा अभ्यास व स्वानुभव आहे. 
घर-संसार, नोकरी, इतर सर्व जबाबदारी सांभाळत कुटुंबातील कोणालाही संपूर्ण वेळ दिव्यांगांकरता देणे शक्य होत नाही. तसेच घरी सर्व अत्याधुनिक व गरजेची साधने उपलब्ध नसतात. त्यामुळे इच्छा, वेळ, आणि इतर सर्व गोष्टींचा समन्वय साधणे अशक्य असते. परंतु सर्व उपचार एकाच ठिकाणी तज्ज्ञांच्या अधिपत्याखाली मिळाले तर ती दिव्यांग स्वावलंबनाची गुरुकिल्ली असेल. 
९. दिव्यांग प्रेरणास्रोत म्हणून एखादे स्मारक वा उद्यान बनवावे, जेथे असामान्य दिव्यांगांची सचित्र जीवनगाथा असावी. दिव्यांगांचे विविध भविष्यकालीन सुखसोयी-साधने, उपचार, यावरचे चित्रपट, तत्सम इतर माध्यमातून दर्शन घडावे. खेळ, वाचन, चित्रकला, कलादालन, स्वयंचलित यंत्रमाध्यमातून भ्रमण, पोहणे, विविधांगी स्पर्धेतून प्रेरणेला वाव असावा. सर्व राज्य व देशांतील सामान्य व विकलांग शाळेतील मुलांच्या सहली तेथे न्याव्या, जेणेकरून दिव्यांग म्हणजे नेमके काय हे कळेल. 
१०. सर्व ठिकाणी दिव्यांगांना उपयुक्त व गरजेची साधने सहज व सवलतीत मिळावीत. 
शेवटी ‘दिव्यांग असे ज्या घरी, तेथे नसावी नाते, माणुसकी व प्रेमात दरी.’ असे समाजात बदल घडावे, समाजाने सहानुभूती नव्हे, नात्याने पुढे यावे, तेव्हाच ‘खरा बदल-खरा स्वीकार’ होईल. प्रत्येक दिव्यांग ‘माणूस’ म्हणून जगेल.


-प्रतिभा हंप्रस, औरंगाबाद 
pratibha.hampras@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...