आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratibha Joshi Short Story About Bogus Investment Companies

फुकट्यांचे सांत्वन का करावे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भर दुपारी दोन वाजता दारावरची घंटा वाजली. आता या वेळी कोण असेल? कुरिअर नाही तर पोस्टमन... असा विचार करत रजनीने दार उघडले. दारात एक तरुणी उभी होती. सुरेख भरतकाम केलेला डिझायनर टॉप, जीन्स, खांद्याला लटकवलेली महागडी पर्स आणि डोळ्यांवर मोठा ब्रँडेड गॉगल, कानाला लावलेला अत्याधुनिक स्मार्टफोन, माफक मेकअप. कोण असेल ही असे प्रश्नचिन्ह मनात उमटते आहे तोच त्या तरुणीने फोनवरील बोलणे संपवून मानेला हलकासा झटका देऊन कपाळावरील बट उडवत झोकात डोळ्यावरील गॉगल काढला आणि तिचा विश्वासच बसेना.
‘कालिंदी तू? कशी काय अचानक? मध्यंतरी गायबच होतीस ती?’
‘का गं, असं एकदम भांबावायला काय झालं? मीच आहे, नशीब गॉगल काढल्यावर तरी ओळखलंस! किती ही प्रश्नांची सरबती? घरात आत तरी घेशील की नाही?’
रजनी एकदम भानावर आली, हसत मैत्रिणीला हाताला धरून तिने घरात आणले. सोफ्याकडे निर्देश करून तिला बसायला सांगत, ती पाणी आणण्यासाठी आत गेली. तिच्या मनात गोंधळ उडाला होता. ही तीच? विश्वास बसत नाही. तिला कालिंदीचे पूर्वीचे रूप आठवले. मध्यमवर्गीय घरातली. साधी पण नीटनेटकी, स्मार्ट व पापभिरू. दोन मुले व नवरा बायकोचा छोटासा संसार नेकीने व टुकीने करणारी. मग अचानक हा बदल...
रजनीने पाण्याचं भांडं आणेपर्यंत कालिंदीने पर्समधून मिनरल वॉटरची वाटली काढून तोंडाला लावली होती. रजनी समोरच बसली, मैत्रिणीचं निरीक्षण करत. कालिंदी ऐसपैस बसली होती. मैत्रिणीचं घर म्हणून बसली असेल, तिने विचार केला. पर्स, फोन, गॉगल बेफिकिरीने फेकल्यासारखेच ठेवले होते. हा वागण्यातला निर्धास्तपणा रजनीला जरुरीपेक्षा जरा जास्तच वाटला. ‘अगं, वेळी-अवेळी फिरावं लागतं, मग कुठे तहान लागली तर आपलीच बाटली असते बरोबर. कोणाकोणाच्या घरी जावं लागतं, पाणी स्वच्छ असेल नसेल. म्हणून ही सवय लागली बघ.’ ‘किती तरी दिवसात तुझा फोनही नाही. आज अचानक कशी आलीस? काही कार्य काढलंस की काय?’
‘कार्य नाही. काम आहे, पण ते तुझ्या भल्याचं!’
तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह! कालिंदीने तडक विषयालाच हात घातला. सराईत एजंटाचे सारे कसब पणाला लावत ती सांगू लागली.

‘हे बघ, मी एक गुंतवणूक कंपनीची एजंट आहे. आमची कंपनी तुमच्या गुंतवणुकीवर खूप चांगला परतावा देते. अगदी दोन-अडीच वर्षांत जवळजवळ चौपट, पाचपट. सुरुवातीला अगदी छोटी रक्कम भरायची, फक्त पंधरा हजार. मग आणखीन दोन गुंतवणूकदार आणायचे, ती साखळी अशीच पुढे वाढत जाते. जशी साखळी वाढेल तसा तुमचा परतावा वाढतो. कमिशनही मिळते. तुझ्यासाठी ही रक्कम काही मोठी नाही.

तेवढ्यात तिच्या फोनची मंजुळ घंटा किणकिणू लागली. ‘हॅलो!’ ‘हं, होहो, किती वाजता? तीन? ठीक आहे. मी पोहोचलेच हं!’ फोन बंद करत पर्स व गॉगल गोळा करत कालिंदी म्हणाली, ‘मग केव्हा येऊ पैसे घ्यायला?’ ती अजूनच गोंधळून उभी राहिली. तीच पुन्हा म्हणाली, ‘तीन-चार दिवसांनी येते हं. बाय! भावजींना, मुलांना, सांग मी आठवण काढली म्हणून!’ आणि आली तशीच भर्रकन नवीन टू व्हीलरवर स्वार होऊन गेलीसुद्धा!

हे सारे आटोपले फक्त अर्ध्या तासात! एक झंझावातच आला होता, असे तिला वाटले. सुन्न होऊन ती तशीच बसून राहिली. विचार करत पाचदहा मिनिटांनी ती भानावर आली. इतका परतावा इतक्या कमी मुदतीत? आपण गुंतवावेत का पैसे? छे! हे सारे कठीणच आहे पचायला. असे शक्यच नाही. मानेला झटका देत तिने ते सारे विचार डोक्यातून काढून टाकले आणि आपल्या कामाला लागली.

चार-पाच दिवसांत कालिंदी पुन्हा टपकली. या वेळी तिने सावध पवित्रा घेतला होता. आल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या. मग म्हणाली, ‘काय करतेस सध्या नवीन?’
‘नवीन काही नाही. माझे पूर्वीचेच शिवण व शिवणाचे वर्ग चालू आहेत. मुलांचा अभ्यास घरच्या जबाबदाऱ्या यात दिवस कसा संपतो कळतच नाही.’
‘मग मी सांगते त्याचा विचार कर ना! तुझ्याकडे शिवण शिकायला येणाऱ्या महिलांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त कर. तुलाही कमिशन मिळेल.

या शिवणात असे काय कमावतेस? आणि वेळही किती जातो. माझ्याकडे बघ. आधी मलाही तुझ्यासारखेच वाटायचे, पण केले धाडस! गुंतवले पैसे आणि झाले एजंट आता बघ मला कमिशनही तगडे मिळते. जेवढे गुंतवणूकदार वाढतील तेवढे कमिशन वाढणार. पैसे, टू व्हीलर,
फोर व्हीलर, वगैरे वगैरे...’
पुढचे शब्द रजनीला ऐकूच येईनात. तिचे कान बधीर झाले आणि मन सुन्न! तिने कालिंदीच्या खांद्यावर हात ठेवला, तेव्हा ती बोलायची थांबून तिच्याकडे बघू लागली. आपल्या या साध्यासुध्या मैत्रिणीचे हे काय झाले आहे. क्षणात तिच्या मनात कालिंदीबद्दल अतीव माया दाटून आली आणि आईच्या किंवा मोठ्या बहिणीच्या मायेने तिने समजावणीच्या सुरात म्हटले, ‘अगं, तू थोडा तरी विचार कर. हे सारे पैसे, गाडी, टू व्हीलर, वगैरे तू किती कमी दिवसांत मिळवलंस? याचा मार्ग खरंच राजरस्ता आहे? की धोक्याचा शॉर्टकट? जरा विचार कर गं. तू गुंतवलेले पैसे तुला परत मिळाले असतील तर तूच हा मार्ग सोड. ही झटपट श्रीमंती आणि तीही कमी कष्टात, यात काही तरी काळेबेरे आहे, अशी शंका मला येतेय. हे तुझे आताचे रूप राजस, राजबिंडे, गोजिरे आहे गं! पण ते मला भ्रामक वाटते. मला माझी पूर्वीची पापभिरू, साधी, नीटनेटकी कालिंदीच आवडते. ती आहे तुझ्या आत, पण तुझ्या पैशाच्या मोहापायी तू तिला एका कोपऱ्यात ढकलली आहेस. बघ जरा आपल्या आत डोकावून!’

कालिंदीचा चेहरा कसनुसा झाला. डोळ्यात एक वेगळीच भावना दिसू लागली. कुठे तरी आत तिला ते पटत असावे असे वाटले. पण प्रत्यक्षात तिने रजनीचे बोलणे धुडकावून लावले. मग ती उठली आणि रजनीशी निरोपाचे हस्तांदोलन करून निघाली. ती हतबल होऊन कालिंदीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली.

सात-आठ महिन्यांचा कालावधी लोटला आणि एक दिवस कालिंदीचा फोन आला, रात्री दहा वाजता. ‘हॅलो, काय म्हणतेस? बरेच दिवसांनी आठवण आली.’ कालिंदीचा सूर रडवेला. ‘तू, सांगत होतीस, पण मी ऐकले नाही. आता मात्र...’ नुसते हुंदके ऐकू आले आणि फोन बंद झाला. व्हायचे तेच झाले असणार. तिने विचार केला, पण आपण काय करू शकतो? तिच्या मनात निराशा दाटून आली. रात्र कशीबशी सरली आणि सकाळी उठल्यावर वर्तमानपत्र सारी कहाणी सांगून गेले. कालिंदीची कंपनी एक कंपनी होती. एजंटांना आकर्षक कमिशन देऊन गुंतवणूकदारांना तिने फशी पाडले होते. त्यांच्या पैशावर आपली तुंबडी उतू जाईस्तोवर भरून घेतली होती.

पुढचे काही दिवस हीच बातमी नवीन तपशिलांसह विस्तृतपणे छापून येत होती. एजंट असलेल्या माणसांचे धाबे दणाणले होते. त्यातच कालिंदीही होती. बिच्चारी! फोन करून तिने सांत्वन करावे अशी रजनीला इच्छा झाली, पण तिनेच स्वत:ला दटावले. नाही, समजावूनही जी समजली नाही, पैशांच्या, कमी कष्टांच्या मोहापायी, छानछोकी व भपक्याला भुलून स्वत:हून खड्ड्यात पडणाऱ्यांचे सांत्वन कशासाठी, असा विचार करून रजनी पुढच्या कामाला लागली.