आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratibha Javalikar Article About Positive Senior Citizens

संध्याछाया नव्हे, संधिप्रकाश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज क्लासमध्ये गुरुजींनी शिकवलेल्या मनाच्या श्लोकांनी माझे मन भारावून गेले होते. प्रत्येक प्रसंगी मनाला संयमित ठेवून भावनांच्या कल्लोळात न सापडता कसे सुंदर व सहज, आनंदी व समाधानाने जीवन जगता येईल हे आम्हाला प्रत्येक धर्माच्या धर्मग्रंथांनी व संतांनी शिकवले आहे. त्या शिकवण्याचा व उपदेशांचा आमच्या रोजच्या जगण्यात, वागण्यात उपयोग करून घेतला जातो का, याची तपासणी आमची आम्हालाच करायची आहे.
क्लासमधून घराकडे जात होते. रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. रस्त्याने जाणार्‍या प्रत्येक वाहनाला पुढे जाण्याची घाई होती, कुणी थांबायलाच तयार नव्हते. शेवटी दोन वाहनांच्या मधले अंतर पाहून मी रस्ता ओलांडू लागले. माझ्या रस्ता ओलांडण्याने एकाला वेगाला आवर घालावा लागला. तो माझ्यावर थोडासा चिडलाच. एवढंच नाही तर जाता जाता एक मौलिक सल्लाही त्याने मला दिला, आजी! या वयात घरात आराम करायचा सोडून बाहेर का फिरताय? तो तरुण माझ्या पुढून वेगाने निघून गेला. मी घर गाठले. पण त्याच्या बोलण्याने माझ्या विचारांनी अध्यात्माकडून आमच्या अस्मितेच्या जाणिवांचे भान याकडे झेप घेतली. विचार आला की कुटुंबातील व कुटुंबाबाहेरच्या तरुणांची व आम्हा ज्येष्ठांची भेट क्रॉसिंगवरच का होते? कुठे तरी समविचारांचे सिग्नल्स असतीलच ना? मग दोघेही एखाद्या थांब्यावर थांबून, एकमेकांच्या अडचणींचा विचार मिळून केला तर दोन्हीही पिढ्यांसाठी त्यांचे प्रश्न हे प्रश्नच राहणार नाहीत. कुणीच कुणाच्या वेगातला अडसर असणार नाही. आम्हा ज्येष्ठांना तरुण पिढी वावरत असलेल्या नव्या जगाला आमच्या कुवतीनुसार समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते वापरत असलेल्या नव्या टेक्नॉलॉजीची तोंडओळख का होईना, करून घेऊन त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. म्हणूनच आम्ही घरात बसून कसे चालेल?
नव्या पिढीसाठी संगणक म्हणजेच जीवन. ते व्यवस्थित चालावे, त्यात बिघाड होऊ नये, त्याच्यात व्हायरस शिरू नये, म्हणून अँटिव्हायरस टाकून त्यातले व्हायरस काढून त्यांच्याकडून संगणकाची गती वाढवली जाते. संगणकात वेगवेगळे प्रोग्राम्स घातले जातात व संगणक अद्ययावत केला जातो.
आम्ही ज्येष्ठ नागरिक घरात बसून राहिलो तर नव्या जगाची कशी ओळख होणार? नवे विषय बोलायला नसल्यामुळे कुटुंबातल्या लोकांशी संवाद साधता येत नाही. मग एकटेपणामुळे स्मृतिभ्रंश वा हृदयरोगासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. म्हणूनच प्रवचने, व्याख्याने, गाण्यांचे कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांमध्ये जातो, तिथे समवयस्क लोक भेटतात. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते व आमचंही ज्ञान अद्ययावत व्हायला मदत होते. वरील सगळ्या संघटना अँटिव्हायरसचे काम आमच्यासाठी करतात.
म्हणूनच ज्येष्ठांना रस्त्यावर फिरण्यासाठी सुरक्षितता व सुविधा असल्या की ते सहज रस्त्यावरून फिरू शकतील, फळे, औषध आणण्याची छोटी-मोठी कामेही ते करू शकतील. कुटुंबाला मदत केल्याचा आनंद मिळेल.
ज्येष्ठांनाही स्वत:च्या बाबत जागरूक असणे गरजेचे आहे. या वयात असणार्‍या अडचणींचा, आजारांचा विचार करून त्याच्यावर स्वत:च उपाययोजना कराव्यात (अर्थात शारीरिक स्वास्थ्य असणार्‍यासाठी.) थोड्याथोड्या गोष्टीसाठी कुणावर तरी अवलंबून राहण्याची वृत्ती ज्येष्ठांनी सोडावी. अवलंबन वाढले की अपेक्षाही वाढतात. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की राग, धुसफुस, नाराजी व कुटुंबात ताणतणाव, भावनांचा नुसता कल्लोळ. मग हातात खूप असूनही जे नाही त्याच्या मागे धावणे सुरू होते. आपला आनंद ते दुसर्‍यात शोधायला बघतात आणि हातातलेही घालवून बसतात.
अशा स्वभाव असणार्‍या ज्येष्ठांवरून मला आठवण झाली ती अमेरिकेत माझ्या मुलीच्या घराच्या शेजारी राहणार्‍या 80 वर्षांच्या डोलारिसची. माझ्या मुलीमुळे तिची माझी दाट मैत्री झाली. तिच्याच आग्रहाखातर मी तिच्याकडे क्विल्ट (रजई) करण्याची कला शिकयला जात असे. या वयातही तिचा वक्तशीरपणा, कामाची पद्धत, संयमित वागणे मला फार आवडायचे. क्विल्ट करायला बसले की त्यासाठी लागणार्‍या लहान-मोठ्या सुया, डिझाइन्सचे कागद, कापडाचे तुकडे, त्यांच्या आकारानुसार व डिझाइननुसार वेगवेगळ्या बास्केटमध्ये संगतवारीने छान लावलेले असायचे.
वाढत्या वयानुसार विस्मृती व त्यातून दैनंदिन कामाचा गोंधळ होणे हे बहुतेक वृद्धांसाठी ठरलेलेच आहे. पण त्या त्रुटीवर मात करण्याची कल्पना मला खूप भावून गेली. उद्या सकाळी स्वयंपाक काय करायचा हे ती आदल्या रात्रीच ठरवायची. त्यासाठी लागणार्‍या वस्तू, मसाले, पदार्थ व ते पदार्थ ज्या डब्यात असतील त्या डब्यांचे नंबर किचनमध्ये एका बोर्डवर रात्रीच लिहून ठेवायची. विसराळूपणावर सकारात्मकतेने तिने केलेली मातच होती.
या वयात मी हे करू शकणार नाही, मला मदत करायला कुणी नाही म्हणून तक्रारही कधी तिच्याकडून मी ऐकली नाही. तिच्यातली आनंदी-समाधानी वृत्ती, मनाची टवटवी, उत्साह तिला जगण्याला ऊर्जा पुरवतो म्हणून 82 वर्षांची डोलारिस नेहमी टवटवीत दिसायची.
आमच्यातल्या बर्‍याच जणी वयाच्या 50व्या वर्षीच आमच्याने आता काही होत नाही हे, असे म्हणत, मनाने म्हातारे होऊन जगतो. हे मनाचे म्हातारपण आम्हाला एखाद्या विनोदावर खळखळून हसू देत नाही की गाण्याच्या सुरावटीवर डोलू देत नाही. मरगळलेले, उदासवाणे, मृत्यूला भीतभीत मृत्यू येईपर्यंत कसे तरी जगणे हीच आमची शैली बनते.
शेवटाचे स्वागत कसे करायचे, तर पानगळीच्या पानापासून स्मोकी माउंटनवरच्या घनदाट जंगलातल्या मेपलच्या ट्रीच्या पानासारखे. वसंत ऋतूमध्ये या झाडाची पाने पिकतात. पिकलेली पाने लाल-केशरी- पिवळ्या रंगाची होऊन जमिनीवर बरसतात व जगभरातले हजारोंच्या संख्येने लोक इथे हा पानगळीचा रंगपंचमी सोहळा पाहायला येतात. जगणे थोडेच, मरण मात्र अर्थपूर्ण.
असे अर्थपूर्ण जगणारे आमच्यातही ज्येष्ठ आहेत. मी भगवद्गीता शिकायला जाते त्या सरांचं वय 80 वर्षांपेक्षाही जास्त असेल. ते कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक होते. जेव्हा निवृत्त झाले तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा हा ज्ञानेश्वरी, गीता व इतर बरेच काही शिकवण्याचा ज्ञानयज्ञ आजही चालूच आहे. या ज्ञानयज्ञामुळे दिवसभर त्यांच्याकडे वेगवेगळे ग्राफ्स येतात. यामुळे या वयात एकाकी वाटणे, बोलायला कुणीही नाही हे असे प्रश्न त्यांना पडतच नाहीत. आपल्यातल्या एकटेपणाच्या पोकळीला किती सुंदर सृजनात्मक अर्थ मिळवून दिला आहे. अगदी मेपल ट्रीच्या पानांसारखा रंगीबेरंगी.