आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratik Pure Article On RSS Rashtriya Swayamsevak Sangh

ओम नमोजी आद्या...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागा : सोयीची
वेळ : ओढवून घेतलेली
प्रसंग : बौद्धिक
सारी मुलं चुळबुळुत्सुक होऊन उत्कंठेनं गुरुजींची प्रतीक्षा करत आहेत. थोड्याच कालावधीत गुरुजी वर्गात प्रवेशतात. त्यांच्या तेज:पुंज चेहर्‍यावर एक बौद्धिक आभा झळाळत आहे. त्यांना पाहताच वर्गातील वर्गप्रमुख खणखणीत स्वरात आदेश देतो, ‘एक साथ सारे दक्ष, हातावर ठेवा लक्ष.’ काही मुलं आपल्या हातातील मोबाइल काढून दूर ठेवतात. काही हातातल्या कसल्या तरी पुड्या लपवतात. काही जण काय करावं हे न कळून नुसतेच आपल्या हाताकडे लक्ष द्यावं की शेजारच्या मुलाच्या हाताकडे, या गोंधळात गोंधळलेले. गुरुजींना हे सारं काही पसंत पडत नाही. त्यांच्या चेहर्‍यावरची नापसंती त्यांच्या आवाजात उमटते.

गुरुजी : अरे काय हे? तुम्ही सारे इतके बुद्धिवंत आणि तुम्हाला साधं हातावर लक्ष ठेवायचं म्हणजे कशावर लक्ष ठेवायचं तेही कळत नाही. नतद्रष्ट कुठले! ‘हा’ म्हणता ते काय आहे हे समजायला हवं तुम्हाला. सांगा मला आता ‘हा’ म्हणजे...
मुले : हाताचा.
गुरुजी : वा छान! पण हा हात कोणाचा तेही लक्षात ठेवा. आता सांगा ‘क’ म्हणजे...
एक मुलगा : कतरिना कैफचा.
गुरुजी : कोण रे तो वेडा मुलगा? चल आपल्या ढोपराचं चुंबन घे बघू.
तोच एक मुलगा : पण गुरुजी हे खूपच कठीण आहे हो!
गुरुजी : अरे, आपण बुद्धिवंत आहोत. आपण शिक्षादेखील बुद्धीला पीळ देणार्‍याच भोगायच्या असतात. ते असो. तुझे प्रयत्न चालू ठेव. मुलांनो ‘क’ म्हणजे कमळाचा. आता सांगा ‘अ’ म्हणजे...
मुले चूप.
गुरुजी : अरे सांगा ना. इतकं सोपं उत्तर येत नाही तुम्हाला?
दुसरा एक मुलगा : गुरुजी, दोन दोन उत्तरं आहेत आणि दोन्ही तुम्हाला पसंत पडतील की नाही अशी शंका आहे, म्हणून सांगायचा धीर होत नाही.
गुरुजी : असो असो. आता सांगा ‘न’ म्हणजे?
सारी मुले एका सुरात : नरेंद्रचा.
गुरुजी प्रसन्नपणे हसतात. तेवढ्यात एक चुणचुणीत मुलगा दक्षपणे उभा राहून विनम्रपणे विचारतो : गुरुजी, दोन शंका आहेत आणि दोन्ही मध्यमच आहेत.
गुरुजी अतीव प्रसन्नतेनं त्याच्याकडे पाहून हसतात आणि विचारतात : वा छान हं बाळ. बरं विचार कोणत्या शंका आहेत तुला.
चुणचुणीत मुलगा : पहिली शंका म्हणजे हा नरेंद्र पश्चिम बंगालचा की गुजरातचा?
गुरुजी : वेड्या मुला, आता नरेंद्र हा फक्त गुजरातचा नाही, तर संपूर्ण भारताचा होणार आहे. दुसरी शंका काय आहे तुझी?
चुणचुणीत मुलगा : पण गुरुजी आपण तर राजकारण करत नाही. मग...
गुरुजी : वेडा रे वेडा! अरे, तसं फक्त सांगायचं असतं. आपण बुद्धिवंत आहोत ना, त्यामुळे आपण नेहमी एक बोलायचं आणि दुसरंच करायचं. एक करायचं आणि दुसरंच बोलायचं. तर आता तुझ्या शंका पुरे. आज मी कशासंदर्भात बोलणार आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल.
सारी मुले टकमका एकमेकांकडे बघतात. गुरुजी पुन्हा सात्त्विकपणे संतापतात.
गुरुजी : अरे, काय हे बावळटांनो, तुम्हाला इतकी साधी गोष्टही कळत नाही का? आता लवकरच आपल्या भारतवर्षात निवडणुकीचे पडघम आणि चौघडे वाजणार आहेत. त्यात आपल्या ‘भा’चा म्हणजे कोणाचा माहीत आहे ना?
सारी मुले : हो...
गुरुजी : तर आपल्या ‘भा’चा विजय निश्चित होण्यासाठी आपल्या सर्वांना कटी कसून आपले पाय चालवायचे आहेत. जेणेकरून आपल्या विरोधकांना हातावर हात धरून बसण्याशिवाय गत्यंतरच उरणार नाही. त्यासाठी घरोघरी जाऊन आपल्याला आपल्या ‘न’चा प्रचार करायचा आहे. लोकांना भेटायचं आणि त्यांना आदरपूर्वक ‘नमोनारायण’ असं संबोधून ठेपले आणि जिलेबी खायला सांगायचं. पुण्यातल्या मोदी गणपतीची भक्ती करायला सांगायचं. आणि हे सांगताना अधनंमधनं आपली खुरटी पांढरी दाढी खाजवत राहायचं. ती नसली तरी. पण हे सारं मोठ्या हुशारीनं करायचं बरं का मुलांनो. या हाताचं त्या हाताला कळायला नको. आणि त्यातही कोणी तुम्हाला काही विचारलं तर सरळ नकार द्यायचा; पण तोही मोठ्या चातुर्याने. कारण...
सारी मुले : कारण आपण बुद्धिवंत आहोत.
गुरुजी आनंदाने सद्गदित होतात. उपरण्यानं डोळे पुसून, किंचितच खाकरून पुढे बोलणार; इतक्यात मघाचा चुणचुणीत मुलगा उठतो आणि नेहमीचे सारे सोपस्कार करून विचारतो : पण गुरुजी, असा ‘न’चा प्रचार केलेला ‘अ’ला चालणार आहे का? गुरुजी त्याच्यावर डोळे वटारून बोलतात, ‘इथे जेवढे सांगितले जाईल तेवढे आणि तसेच करायचे. आपली अक्कल पाजळायची नाही.’ चुणचुणीत मुलगा काहीशा नाराजीने खाली बसतो.
गुरुजी : तर मी काय सांगत होतो की, कोणी काहीही विचारलं तर नाकारायचं आणि म्हणायचं, ‘इदंनमोम.’ कारण आपला राजकारणाशी काही एक संबंध नाही. चला, आता सर्वांनी मिळून नवी प्रार्थना म्हणूया.
सारी मुले एका सुरात म्हणू लागतात, ‘ओम नमोजी आद्या...सत्ता आता मिळवून द्या...’

Pratikpuri22@gmail.com