आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षा संवादाची, वितंडवादाची नाही !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘एखादा गंभीर मुद्दा कुणी मांडला तर तो बिल्कूल माझ्या लक्षात येत नाही किंवा मी तिकडे लक्षच देत नाही. किंवा मी म्हणतो, एकदा बसू चर्चा करायला. मात्र, मी कध्धीच चर्चा करायला बसत नाही.’ (कळ - श्याम मनोहर)
जातीयतेचा चश्मा डोळ्यांवर चढवूनच प्रत्येक गोष्ट बघण्याची सवय आता लोकांना लागली आहे. कोणी काहीही बोलला, की तो कोणत्या जातीचा आहे ते आधी शोधून काढा, तो विरुद्ध जातीचा असेल तर त्याला जातीयवादी म्हणून निकालात काढा, आपल्याच जातीचा असेल तर मूर्ख, गद्दार म्हणून वाळीत टाका, आणि या सर्वांत चर्चेचा जो मुद्दा आहे, तो अगदी अभिनिवेशानं अडगळीत फेकून द्या, अशी वादाची नवी पद्धत सगळीकडे रूढ होताना दिसते आहे. विचारांची लढाई विचारांनी करायची असते, याची जाणीव हरवून बसलेले लोक एक तर त्या व्यक्तीलाच संपवून टाकतात किंवा मग त्याच्यावर जातीयतेचा ठप्पा मारून त्याला बाद करतात. प्रा. डॉ. शिवानंद भानुसे यांनी माझ्या लेखावर जी प्रतिक्रिया दिली आहे, ती वाचल्यानंतर कोणाही सुजाण माणसाच्या याच भावना (हा प्रतिवाद नाही, हे मी सांगू इच्छितो) होतील. भानुसे यांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे माझ्या लेखाचा परामर्श घेण्याच्या नादात फ. मुं. शिंदे यांचं व त्यांच्या साहित्याचं जे गौरवगान गायलं आहे, त्याला माझाच काय, कोणाचाही आक्षेप असण्याचं कारण नाही. पण त्याची जागा फ. मुं. शिंदे गौरव स्मरणिकेत उचित ठरली असती. माझा लेख त्यांना कळलाच नाही, मी कोणावर टीका केली हे त्यांना समजलं नाही, आणि का केली, तेही उमगलं नाही. भानुसे मला थेट जातीयवादी आणि विकृत ठरवतात; त्यावर हसायचं की चिडायचं, हा प्रश्न पडला आहे. माझ्या लेखाचा तो विषय नव्हता; त्यामुळे मी त्यात अधिक लक्ष घालणार नाही. आता इतर मुद्द्यांविषयी.
० भानुसे म्हणतात, की महापुरुष किंवा प्रतिभावंत यांची बदनामी करणं ही विकृती आहे. ते खरं आहे; पण भानुसे असं लिहून शिंदेंची तुलना थेट संत तुकाराम, शिवाजी महाराज आणि यशवंतराव यांची उदाहरणं देत त्यांच्याशी करतात, हेही अयोग्य आहे.
० भानुसे हे मराठीचे प्राध्यापक आहेत, डॉक्टर ऑफ फिलॉसफी आहेत. आणि असं असूनही ‘पूजा विचारांची बांधायची असते, व्यक्तीची नाही’ हे त्यांना उमगलेलं नाही. माझ्यावर (माझ्या मुद्द्यांवर नाही) हल्ला चढवताना, तो लेख नीट वाचण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. त्यामुळे माझंच वाक्य त्यांनी शिंदेंच्या तोंडी घालून शिंदेंची अडचण केली आहे. ते लिहितात, ‘सुजाणता हरली आणि सवंगपणा जिंकला आहे, हे फ.मुं.चे वाक्य समर्पकच आहे.’ हे वाक्य माझं होतं. फमुंचं वाक्य होतं, ‘लोकप्रियता जिंकली आणि अंतर्मुखता हरली,’ असं.
०यशवंतरावांच्या अपमानाचा उल्लेख भानुसे करतात. आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्‍ट्राच्या चळवळीत आणि आणीबाणीच्या काळात दुर्गा भागवत आणि पु. ल. देशपांडे यांनी यशवंतरावांवर टीका केली होती. तो त्यांचा अपमान नव्हता. त्याची
कारणंही राजकीय होती; वैयक्तिक नव्हती. भानुसेंनी इतिहासाचा विपर्यास करणे टाळायला हवे होते.
०भानुसेंनी त्यांच्या लेखाला, ‘वाघाची कातडी पांघरलेले कोल्हे’ असं शीर्षक दिलं आहे. मूळ म्हण आहे, ती इसापच्या एका गोष्टीतून निघालेली, ‘अ डाँकी इन द लायन्स स्किन,’ अशी. त्याचं शब्दश: पण भ्रष्ट आणि अर्थाचा पूर्णत: विपर्यास करणारं शीर्षक भानुसे आपल्या लेखात वापरतात. मूळ अर्थ असा आहे की, ‘एखादं गाढव जोवर आपलं तोंड उघडत नाही, तोवर त्याचं सिंहाचं सोंगही सुरक्षित राहतं.’ याच अर्थाची दुसरी एक इंग्रजी म्हण आहे की, ‘तोंड उघडत नाही, तोवर मूर्खाचा शहाणपणा कायम राहतो.’ आपण कशाच्या संदर्भात कोणती म्हण वापरतोय, हेही भानुसेंना उमगले नाही. त्यांना माझ्या लेखाचे शीर्षकही उमगले नाही, जे मराठीच आहे. भानुसे हे मराठीचे प्राध्यापक आहेत, त्यामुळे त्यांना ‘संदर्भासहित स्पष्टीकरण’ दिले तर कळेल, यासाठी हे विवेचन.
‘झूल पांघरलेले मठ्ठ काळे बैल’ हे शीर्षक भालचंद्र नेमाडे यांची ‘झूल’ कादंबरी आणि श्याम मनोहर यांच्या ‘कळ’ या कादंबरीतील ‘अंधारात मठ्ठ काळा बैल’ या प्रकरणावर बेतलेलं आहे. आधी मनोहरांच्या ‘कळ’मधील या प्रकरणाविषयी बोलूया. ज्येष्ठ समीक्षक संजय भास्कर जोशी याविषयी लिहितात की, ‘एकुणातच समाजातल्या विसंगतीवर ‘ब्लॅक कॉमेडी’च्या अंगानं केलेलं विदारक चित्रण आहे. एखाद्या मठ्ठ बैलाने अंधारात सुस्त बसून राहावं, तसं आपण निष्क्रियतेने आणि सांस्कृतिक मांद्याने बसून आहोत, याची फार अस्वस्थ करणारी जाणीव ही कादंबरी देते. आपण आपल्या जगण्यात किती विविध प्रकारे सांस्कृतिक षंढत्व आणि उदासीनपण सांभाळतो, याची अफलातून उदाहरणं यात आहेत. उदा. ‘महान काम करण्याची मला भीती वाटते. महान काम करणा-याला मी भिववून सोडतो.’
जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रातली दांभिकता, खोटेपणा आणि कचखाऊपणा बाळगत आणि याचबरोबर भव्यदिव्य किंवा खरं श्रेष्ठ आहे ते नाकारतच आपण जगतो, याचं हे जबरदस्त चित्र आहे.
विश्राम गुप्तेही नेमके याच मुद्द्यांना स्पर्श करत लिहितात की, ‘मी कसा आदर्श माणूस असावा? हे सांगताना श्याम मनोहर वास्तवात मी कसा माणूस आहे? हे सांगून मराठी माणसाच्या बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दिवाळखोरीला उघडं पाडतात.’ त्याची उदाहरणंही ते देतात.
‘‘मी जगण्यासाठी छोटे छोटे माफिया तयार करतो. छोटा का होईना, पण मी गट करतोच.’’, ‘‘माझ्या मताशी ज्यांची मतं जुळतात अशी माणसेच मला आवडतात. माझ्यापेक्षा वेगळी मते असणारी माणसे मला आवडत नाहीत.’’, ‘‘श्रेष्ठ म्हणजे काय, हे मला कधीही कळलेले नाही.’’
मराठीच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरणावरची ही टीका मी नव्हे तर श्याम मनोहरांनी केली आहे आणि तीही 1996मध्ये. माझ्या लेखात मी नेमक्या याच वातावरणाचा संदर्भ देत लिखाण केलं आहे. नेमाडेंनी ‘बिढार’, ‘हूल’, ‘जरीला’ आणि ‘झूल’ या कादंबरी चतुष्ट्यातून ‘चांगदेव पाटील’ याच्या माध्यमातून मराठी अध्यापन आणि अध्यापक आणि एकंदरीत मराठी शिक्षण व्यवस्था यांवर कडाडून कोरडे ओढले आहेत. भानुसेंनी या सर्व कादंब-या एकदा जरूर वाचाव्यात, म्हणजे माझा लेख त्यांना अधिक उमगेल. नेमाडेंनी मुंबई विद्यापीठाच्या ‘साहित्यवेध’ कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून (मराठीच्या अध्यापकांस विज्ञापना- ‘सोळा भाषणे’- भालचंद्र नेमाडे) मराठीच्या अध्यापकांची जी शाळा घेतली आहे, तिचाही भानुसेंनी अभ्यास करावा. प्रतीक पुरी यांची काही लायकी नाही, असं भानुसे म्हणतात; पण श्याम मनोहर आणि नेमाडे यांची काहीतरी लायकी आहे, असं भानुसेंना वाटत असेल तर त्यांनी या दोघांच्या म्हणण्याचा अवश्य विचार करावा. टीका ही कार्यावरची असते आणि ती करताना समोरची व्यक्ती कोण आहे, याचा विचार करायचा नसतो. टीका ही व्यक्तिनिरपेक्षही असते, असावी. आजवर ती परंपरा आपण सांभाळली आहे. यापुढेही ती सांभाळली जावी, हीच अपेक्षा. कारण, वादाला प्रतिवाद करण्यातून संवाद साधला जातो; पण वितंडवादातून भांडणेच होतात. अपेक्षा संवादाची आहे; वितंडवादाची नाही!
pratikpuri22@gmail.com