आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratik Puri Article About Bhalchandra Nemade's 'Kosla'

'कोसला' प्रौढ झाली; पण...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’ कादंबरीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘पॉप्युलर प्रकाशना’ने सुवर्णमहोत्सवी आवृत्ती प्रकाशित केली आहे. ‘कोसला’ ही मराठी साहित्यातील सर्वाधिक चर्चित कादंबरी. या कादंबरीच्या प्रकाशनानंतर ‘नेमाडे संप्रदाय’ जन्माला आला आणि एक ‘कोसला कल्ट’ही तयार झाला. एका लेखकासाठी म्हटलं तर ही मोठी अभिमानाची परिस्थिती असते; पण साहित्याच्या दृष्टीने समग्र विचार केला, तर याहून मोठी घातक अवस्था नसते. 1997मध्ये मुंबई आकाशवाणीने, सर्वोत्कृष्ट 10 पुस्तकांची निवड करण्याचे आवाहन श्रोत्यांना केले होते. त्यात ‘कोसला’ला दुसरा क्रमांक मिळाला. या निवडीच्या संदर्भात केलेल्या भाषणात नेमाडेंनी आनंद व्यक्त करतानाच एक चिंताही व्यक्त केली. ‘‘...गेल्या तीन पिढ्यांना ‘कोसला’ आवडत आली आहे, याला कारण काय? मराठी समाजच बदलला नाही की काय? ही एक शक्यता. दुसरी शक्यता अशी, की दर पिढीतल्या तरुण मनाला ती स्पर्श करते. पहिली शक्यता खरी असेल तर ती मला आवडणार नाही, कारण समाजानं बदललंच पाहिजे; परंतु दुसरी शक्यता खरी असेल तर मला आनंद वाटेल.’’*
आज 16 वर्षांनंतरही या दोन्ही शक्यता खर्‍याच आहेत. तरुण वाचकाला ‘कोसला’ वाचायला आवडते, हेही खरे आणि मराठी वाचक समाज बदलला नाही, हेही खरे. ही दुसरी शक्यता मराठी साहित्यासाठी घातक आहे. तिला अनेक पदर आहेत, जे ‘कोसला’च नव्हे, तर अन्य गाजलेल्या पुस्तकांशी तसेच नेमाडेच नव्हे, तर प्रकाशक, वितरक आणि वाचकांशीही संबंधित आहेत. एखादं पुस्तक वर्षानुवर्षं गाजत असेल तर ही आनंदाची बाब कमी, आणि धोक्याची जास्त असते. याचा अर्थ असा होतो की, समाजाची समज या काळात वाढलेलीच नाही. एक लेखक व समाज म्हणून ही अनिष्ट गोष्ट असते. याचा अर्थ तुम्ही नव्या प्रयोगांना अनुकूल नाहीत, असा होतो. मराठी वाचकांना आजही ‘ययाती’, ‘स्वामी’, ‘मृत्युंजय’, ‘कोसला’, ‘पानिपत’, ‘बटाट्याची चाळ’ आवडत असते; प्रकाशक याच्याच आवृत्त्या काढतात, वितरकही त्याचीच मागणी नोंदवतात आणि वाचक आजही त्यांनाच आपली पसंती देतो. एकंदरीत साहित्य संस्कृतीसाठी हा बरा व्यवहार वाटत असला तरी प्रत्यक्षात हे एक दुष्टचक्र आहे. प्रकाशक नव्या लेखकांना प्रकाशित करत नाहीत, वितरक नवी पुस्तके वाचकांसमोर नेत नाहीत. परिणामी, वाचक नव्या पुस्तकांची चौकशी करत नाहीत. हे तिन्ही घटक भूतकाळातच रमलेले असतात. व्यावसायिकदृष्ट्या प्रकाशक आणि वितरकांना याचा फायदा होतो; पण वाचक मात्र नव्या साहित्याला, नव्या प्रयोगांना आणि विचारांना कायम मुकतो. उपरोल्लेखित कादंबर्‍या नि:संशय मोठ्या आहेत, पण त्या साहित्याचे नवे प्रवाह रोखणार्‍या धोंडी बनायला नकोत. सध्या तरी असंच झालेलं दिसतंय.
नेमाडे मराठी साहित्यापेक्षा मोठे बनले आहेत. खरं तर कोणत्याही क्षेत्रात असं घडत असतं. त्या व्यक्तीमुळे त्या क्षेत्राचाही विकास घडतो. त्यामुळे नेमाडेंचं असं मोठं होणं एका अर्थाने मराठी साहित्यालाही पोषकच आहे, निदान असायला हवं. पण ते तसं झालं का? की केवळ नेमाडेच मोठे झाले? त्यांचाच आणि त्यांच्या पुस्तकांशी संबंधित प्रकाशक, वितरक, लेखक यांचाच विकास झाला? असे प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. कारण ‘कोसला’ प्रौढ झाली, पण वाचक प्रगल्भ झालेला दिसत नाही. ‘नेमाडेपंथ’ विस्तारला; पण मराठी साहित्य आणि वाचकांची मात्र कुंठितावस्था झाली. अशा वेळी मराठी साहित्याचा विकास झाला का? तिच्या तथाकथित कक्षा रुंदावल्यात का? अशा प्रश्नांना ‘नाही’ हेच उत्तर मिळतं. अधनंमधनं काही पुस्तकं येतात, गाजतात आणि नाहीशी होतात. पण अजूनही ही ‘ययाती’, ‘स्वामी’, ‘कोसला’ मंडळी ठाण मांडून बसलीच आहेत वाचकांच्या उरावर. यात नवे लेखक आणि त्यांचे नवे प्रयोग होरपळले जातात.
एका बाजूला प्रकाशक नव्यांची पुस्तके छापत नाहीत, अशी आजवरची ओरड होती. सध्या ती कमी झाली, कारण प्रकाशन करणे आता तुलनेने सोपे आहे. पण पुस्तकाचे वितरण मात्र आजही मोठी कठीण गोष्ट आहे. यावर उपाय म्हणून काही प्रकाशकांनी स्वत:च वितरणाचं काम सुरू केलंय. पण त्यातही ते त्यांची खपणीय पुस्तकेच विक्रीस ठेवत आहेत. म्हणजे पुन्हा तेच नेमाडे, खांडेकर, वपु, पुल. जणू मराठी साहित्यात नवीन काही लिहिलं गेलं नाही, लिहिलं जाणार नाही, अशा पद्धतीनं हा व्यवहार सुरू आहे. नेमाडे आपल्या उपरोल्लिखित भाषणात वाचकांना अशीही विनंती करतात की, ‘आपण चांगले लेखक निर्माण करावेत. वाचक म्हणून आपल्या (साहित्यिक) जाणिवा क्षुद्र असता कामा नयेत. बुरसटलेल्या, संकुचित, मूल्य नसलेल्या गोष्टी आपण जवळ घेतल्या, तर लेखकही तसेच तयार होतील. आपल्या जाणिवा जितक्या मोठ्या तितके लेखकही मोठे होतील.’* नेमाडेंचे हे विचार केवळ मननीयच नाहीत, तर आचरणीय आहेत; पण यासाठी ते स्वत: असोत किंवा प्रकाशक, वितरक असोत, यांनी जबाबदारी घेऊन मराठी साहित्याच्या जडणघडणीत केवळ भाषणे देण्यापलीकडे किंवा परिसंवाद आयोजण्याव्यतिरिक्त काही केले, असे चित्र दिसत नाही. तेव्हा वाचकांनीच वितरक, प्रकाशकांकडे नव्या सकस, विचार प्रवर्तक, समकालीन लिखाणाची मागणी करायला हवी. जागतिकीकरणाच्या या जमान्यात आपली जबाबदारी अधिकच वाढली आहे, याची जाण ठेवायला हवी. कारण, आता प्रकाशकांनी सर्रास लोकप्रिय अनुवादित पुस्तके काढण्यावर भर दिला आहे. जागतिक साहित्य मराठीत यायलाच हवे, पण त्यात दर्जा आणि निवड हवीच. सध्या वाचकानुनयी आणि सवंग मनोरंजन करणारे साहित्यच मोठ्या प्रमाणात अनुवादित होत आहे. त्याने प्रकाशक आणि वितरकांच्या पैशाच्या थैल्या रुंदावतील; पण मराठी साहित्य आणि वाचकांच्या जाणिवांच्या कक्षा मात्र नक्कीच आक्रसतील. आता विदेशी प्रकाशन संस्थाही देशात येत आहेत. विदेशी, स्वस्त आणि डोक्याला ताप नाही, अशा या साहित्याने मराठीच नव्हे तर भारतीय साहित्यालाच प्रचंड धोका संभवणार आहे. प्रकाशक, वितरक, लेखक आणि वाचकांनी मिळून हे संकट थोपवून धरायला हवे.
जाता जाता ‘कोसला’च्या नव्या आवृत्तीबद्दल. ही सुवर्णमहोत्सवी आवृत्ती आहे, पण त्यात ‘सुवर्ण’ फारच कमी आहे. खरं तर तुम्हाला वगैरे सांगण्यासारखं एवढंच. बाकी प्रकाशकांना अर्थातच, ही सुवर्णसंधी होती आणि त्यांनी ती उत्तमरीत्या साधलेली आहे. ‘कोसला’ने मराठी साहित्यावरच एक गूढरम्यतेचा कोष विणला आहे. त्यातून बाहेर पडायलाच हवं, नाही तर पुढच्या लढाया लढण्याची ताकदच आपण हरवून बसू.
संदर्भ: * ‘क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास’ - ‘सोळा भाषणे’ - भालचंद्र नेमाडे
Pratikpuri22@gmail.com