आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिजन हिताय बहुजन सुखाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुजनांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अभिजन पुढेच सरसावले नाहीत. ते याच भ्रमात राहिले की बहुजन त्यांच्या पाठीमागून येत आहेत. प्रत्यक्षात बहुजनांनी आपला मार्ग कधीच बदलला आहे. जमिनीवरचे प्रश्न आकाशात राहून सोडवता येत नाही, याचं त्यांचं भान पुरतं हरवलं आहे...
 
गोध्रा दंगलीचा कलंक अंगावर असलेले नरेंद्र मोदी नावाचे गुजरातचे मुख्यमंत्री एकट्याच्या बळावर भाजपला बहुमताची सत्ता मिळवून देत देशाचे पंतप्रधान होतील, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण तसं झालं. स्त्रिया, मुसलमान, स्थलांतरितांविषयी मूर्खपणाची वक्तव्ये करणारा, राजकारणाचा कोणताही पूर्वेतिहास वा पूर्वानुभव नसणारा, जवळपास वेडपट आणि बोलभांड असा डोनाल्ड ट्रम्प नावाचा माणूस अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं; पण तसं झालं. एक महत्त्वाची सुधारणा. असं होणार नाही, असं तत्कालीन अभिजनांना वाटलं होतं, पण बहुजन मात्र या दोन्ही नेत्यांच्या बाजूने होते. हे अघटित कसं घडलं, यावर विचार करून करून अभिजनांचे मेंदू फुटायची वेळ आली आहे. बहुजन आपल्या मेंदूंना इतका त्रास देत नाहीत. त्यांना जे करायचं होतं, ते त्यांनी केलं आणि आता ते त्यांच्या नित्याच्या जगण्यात पुन्हा गुंतले आहेत. अभिजन आणि बहुजन यांच्या मानसिकतेवर आणि त्यातही अभिजनांच्या मानसिकतेवर मी या लेखात संवाद साधणार आहे.
 
अभिजनांमध्ये कोणाचा समावेश होतो, तर स्वतःला विचारवंत, बुद्धिवंत, समाजधुरीण, कलाकार, प्रतिष्ठीत, उच्चवर्णीय-उच्चवर्गीय आणि बहुजनांचे स्वयंघोषित तारणहार समजणारे, अशा सर्वांचा. बाकी राहिलेला कचरा म्हणजे, बहुजन. हे अर्थात अभिजनांचं मत आहे. ते जर तसं नसतं तर, त्यांनी स्वतःला अभिजन म्हणवून घेतलं नसतं. या संबोधनांतून त्यांचा अहंकारच जास्त प्रकट होतो, बहुजनांविषयीची कळकळ काही त्यांतून जाणवत नाही. या अभिजनांनी आजवर सत्ताधाऱ्यांवर आपला वचक ठेवला. त्याच वेळी बहुजनांच्या हिताची काळजी घेत असल्याचा आव आणत प्रत्यक्षात त्यांनाही आपल्या टाचेखालीच ठेवलं. त्यांनी जी काही प्रगती करावी असं त्यांना वाटलं, ती त्यांनी आपल्या मदतीनेच करावी व त्यासाठी कायम आपल्या ऋणात राहावं, अशी अभिजनांची लाडकी अपेक्षा आहे. या अभिजनांना आपला मेंदू अत्यंत मोलाचा वाटतो. साऱ्या जगाचं ज्ञान काय ते फक्त यातच साठवलं आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. त्यामुळे मेंदूविरहित बहुजनांनी आपलं म्हणणं ऐकावं, आपल्या सांगण्यानुसार जगावं, आपण म्हणू त्यालाच पाठिंबा द्यावा, आपण परवानगी देऊ त्याच गोष्टींचा स्वीकार करावा, ही अभिजनांची आकांक्षा असते.
 
त्याच वेळी बहुजनांनी आपली पायरी किंबहुना, लायकी ओळखून वागावं, ही सुप्त अपेक्षाही त्यात दडलेली असते. त्यामुळे ते आपल्या फार जवळ येणार नाहीत, त्यांच्यातील अंतर पुरेसं राहील, याविषयी ते कायम सजग असतात. त्यासाठी ते वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करतात. बुद्धिजड, अर्थगहन, शब्दबंबाळ भाषेचा उपयोग करून ते आपल्या विचारांची मांडणी करत असतात. ती बहुजन समाजाच्या हितासाठी असते, असा त्यांचा दावा असतो. प्रत्यक्षात बहुजनांना त्यांच्यासाठीचं हे मौल्यवान विचारधन उपलब्ध नसतं. बहुजनांची भाषा वापरायलाही अभिजनांनी कायम नकार दिलेला असतो. पूर्वी संस्कृत आणि आता इंग्रजीत आणि तेही अतिक्लिष्ट भाषेतच आपले समाजोपयोगी विचार मांडण्याकडे अभिजनांचा कल असतो. साहजिकच बहुजनांना कधीच ही भाषा, त्यांतील विचार व त्यांचे जन्मदाते अभिजन आपले वाटले नाहीत. अभिजन व बहुजन यांच्यातील अंतर गेल्या काही वर्षांत इतकं वाढलं आहे की, अभिजन आता फारच पुढे गेले आहेत आणि बहुजनही आता इतके हुशार झाले आहेत की, त्यांनी कधीच आपला वेगळा रस्ता पकडला आहे; ज्याची अजूनही अभिजनांना जाण नाही. ते त्याच आपल्या वर्चस्ववादी भूमिकेतूनच हे कसं घडलं, याचा विचार करत बहुजनांना शिव्या घालण्याचं काम करत आहेत.
 
बहुजन खरंच चुकीच्या मार्गाने गेले आहेत का? होय. पण त्यासाठी फक्त तेच जबाबदार आहेत का? नाही. भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या घरात आहे. यांतील जेमतेम ५ टक्के लोक हे अभिजनांमध्ये समाविष्ट होऊ शकतील. राहिलेले ९५ टक्के लोक ‘बहुजन’ म्हणून ओळखले जातात. आता तुम्ही कोणत्या वर्गात येता, याचा विचार करू नका. ते स्वातंत्र्य तुम्हाला अभिजनांनी दिलेलं नाही. तुम्ही स्वतःला अभिजन समजत असाल, पण हे अभिजन तुम्हाला कदाचित बहुजनच समजत असतील. या अभिजनांच्या मते, त्यांच्याशिवाय बाकीचे सारे बहुजन आहेत, त्यांना कमी समजतं, चांगलं जगण्याची समजही त्यांच्यात नाही, त्यांच्या प्रगतीसाठी अभिजनांनाच पुढाकार घ्यावा लागेल आणि बदल्यात त्यांनी अभिजनांची सत्ता कबूल करायची. प्रत्यक्षात मात्र, बहुजनांच्या भलेपणाचा ठेका घेतलेल्या अभिजनांनी कधीच बहुजनांच्या मतांची, विचारांची, अपेक्षांची, स्वप्नांची, महत्त्वाकांक्षांची कदर केली नाही. आपण जे सांगू तेच त्यांनी ऐकावं, कारण त्यातच त्यांचं हित आहे अशी अभिजनांची ठाम समजूत होती. जग बदलत आहे, याची त्यांना जाणीवच झाली नाही. जगात आता अभिजनांची नाही, तर बहुजनांची बहुसंख्या आहे ही साधी गोष्टही त्यांच्या लक्षात आली नाही, असं मी म्हणणार नाही पण या बहुजनांची महत्त्वाकांक्षा वाढत चालली आहे, त्यांना आपल्या हिताचे निर्णय घेण्यासाठी अभिजनांची गरज नाही, ही महत्त्वाची बाब अभिजन विसरले आहेत. तेव्हापासूनच या दोघांमधली दरी वाढली आणि आता तर बहुजनांनी अभिजनांना साफ नाकारून आपली वेगळी वाट धरली आहे. या वाटेवर त्यांना ट्रम्प, मोदी, पुतीन, खोमेनी, शरीफ यांसारखे लोक भेटतात, जे बहुजनांच्या महत्त्वाकांक्षांना गोंजारतात, त्यांना कधीही पूर्ण होऊ न शकणारी स्वप्नं दाखवतात.
 
अभिजन म्हणतील की हे फार चुकीचं घडतंय, पण बहुजन म्हणतील की हे योग्य तेच घडतंय. ते चुकीचं असलं तरीही ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. अभिजनांनी विश्वास कधीच गमावलेला आहे. आपण खड्ड्यात जातोय, हे जरी बहुजनांना कळत असलं तरीही ते अभिजनांच्या सांगण्यावरून आपला रस्ता बदलायला तयार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ही परिस्थिती खुद्द अभिजनांमुळेच ओढवली आहे. त्याची कारणं त्यांना कदाचित आवडणार नाहीत, पण ती सांगायलाच हवीत. जग बदलत चाललंय, याचा या शहाण्यांना पत्ताच नाहीये. बहुजनांच्या हिताचा ठेका आपल्यालाच मिळाला आहे, अशा पद्धतीने ते वागत आहेत आणि त्याच वेळी बहुजनांपासून जास्तीत जास्त दूर राहण्यासाठी धडपडत आहेत. प्रत्यक्षात त्यांचा बहुजनांशी संवाद कधीचाच तुटलेला आहे. पण ते ही गोष्ट मानायला तयार नाहीत. बहुजनांकडे जाण्यात, त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यात, त्यांच्यासोबत वावरण्यात यांना आपला अपमान वाटतो, आपली पत घसरण्याची व इतर अभिजनांकडून त्यांनाही बहुजनांमध्ये ढकलले जाईल, याची भीती वाटते. रोजच्या व्यावहारिक प्रश्नांवर सोप्या भाषेत सोपे उपाय, शोधण्यापेक्षा क्लिष्ट भाषेत, अनाकलनीय विद्वत्ताप्रचुर मांडणीद्वारे (जी बहुजनांच्या आकलनापलीकडची असते व त्यांच्या दृष्टीने मृत असते) अव्यवहार्य उपाय सुचवण्याकडे यांचा कल आहे, कारण त्यातून त्यांचं उच्चस्थान आजवर ठळक होत गेलं आहे. चुकीच्या गोष्टी समजुतीने समजावून सांगण्याऐवजी, बहुजनांच्या समजुती कशा मूर्खपणाच्या आहेत, यावर येताजाता ताशेरे ओढण्यात यांना धन्यता वाटते आहे.
 
बहुजन असले तरी तीही माणसं आहेत, आणि त्यांनाही भावना असतात, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा व वरच्या वर्गात जाण्याची त्यांची स्वप्नं असतात, याकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे. परिणामी हा बहुजन वर्ग त्यांच्या मतांचा व भावनांचा आदर करणाऱ्या लोकांकडे वळत आहे. ही माणसं भलेही स्वार्थासाठी यांचा उपयोग करून घेत आहेत, पण ती आपला वेळ देत आहेत, त्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी आपले कान व वेळ देत आहेत, जे करण्याचं अभिजनांनी आजवर नाकारलं आहे. मुख्य म्हणजे, बहुजनांना मान व प्रतिष्ठा देण्याचा खोटा का होईना, पण आव हे स्वार्थी लोक आणत आहेत.  
 
बहुजनांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अभिजन पुढे सरसावले नाहीत. ते याच समजुतीत राहिले की, बहुजन त्यांच्या पाठीमागून येत आहेत, येतील. प्रत्यक्षात त्यांनी आपला मार्ग कधीच बदलला, म्हणूनच मोदी राक्षसी मताधिक्याने निवडून येतात आणि तीन वर्षांनंतरही त्यांना आव्हान द्यायला एकही समर्थ नेता या देशाला मिळत नाही. अमेरिकेत ओबामानंतर ट्रम्प नावाचा विदूषक निवडून येतो. ही मतं कदाचित त्यांच्या बहुजन समर्थकांना पटणार नाहीत. ती चुकीची कशी नाहीत, हे त्यांना समजावून सांगण्यात अभिजनही पुढाकार घेणार नाहीत. कारण ते अद्यापही आपल्याच हस्तीदंती मनोऱ्यात हे सारं कसं घडलं, यावर बुद्धिजड मीमांसा करण्यात गुंतले आहेत. जमिनीवरचे प्रश्न आकाशात राहून सोडवता येत नाहीत; त्यासाठी जमिनीवरच वावरावं लागतं, ही साधी गोष्टही यांच्या लक्षात येत नाहीय.

स्वतःला अभिजन समजणाऱ्या कोणालाही या गोष्टी फार रुचणार नाहीत आणि बहुजनांना कदाचित याचा आनंदच होईल. पण या बहुसंख्येचा चुकीच्या मार्गाने होणारा प्रवास, चुकीच्या लोकांना मिळणारा पाठिंबा, यातून मार्ग शोधायचा असेल तर अभिजनांनाच पुढाकार घेणं अपरिहार्य आहे. पण त्यासाठी आधी स्वतःला अभिजन समजणं त्यांना बंद करावं लागेल. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, अधिक बुद्धिवादी आणि अधिक समजंस आहोत, ही श्रेष्ठतेची भूमिका टाळून लोकांच्या हिताचा विचार करणारी अहंकाररहित, स्वार्थरहित सेवावादी जनसेवी भूमिका घेऊन बहुजनांच्या जवळ जावं लागेल. तरच बहुजनांची फसवणूक टळू शकेल आणि खऱ्या लोकहितवादी विचारवंतांचा मानसन्मान कायम राहील.

लेखकाचा संपर्क : ७०५७३७६६७९
pratikpuri22@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...