आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगणं उसवून विणलेलं 'आयदान'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही स्त्रीचं आयुष्य हे एकपदरी, एकसुरी नसतं. ती मग कोणत्याही काळातील स्त्री असो; कोणत्याही समाजातील, आर्थिक, सामाजिक स्तरातील स्त्री असो; याला फारसे अपवाद आढळत नाहीत. हे असे अपवाद न आढळण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे, स्त्रियांना व्यक्ती म्हणून न दिलं गेलेलं स्वतंत्र महत्त्व आणि माणूस म्हणून नाकारण्यात आलेले हक्क. अगदी प्रत्येक स्त्रीनं आपल्या आयुष्यात डोकावून पाहिलं किंवा प्रत्येक पुरुषानं त्याच्या अवतीभवतीच्या स्त्रियांचं जगणं निरखलं तरी याची अनेक उदाहरणं दिसून येतील. फक्त सत्य बघण्याची आणि मुख्य म्हणजे ते स्वीकारण्याची हिंमत हवी. हिंमत यासाठी, की हे सत्य कधी कधी आपल्या स्वतःच्याही विरुद्ध जाऊ शकतं. अशी हिंमत ऊर्मिला पवारांनी दाखवली, तेव्हा त्यातून ‘आयदान’ (बांबूच्या टोपल्या) नावाचं जळजळीत आत्मकथन जन्माला आलं. त्याला आता बराच काळ लोटला आहे. पण दुर्दैवानं ते आजही तितकंच समकालीन आणि धक्कादायक वाटतं. आणि जेव्हा ते प्रत्यक्ष साकारतं तेव्हा त्याची तीव्रता अधिकच जाणवते.

एखादी साहित्यकृती जेव्हा भाषिक, वाचिक अभिनयातून आकारास येते, तेव्हा मूळ कलाकृतीशी असलेलं नातं कायम राहील, याची शाश्वती देता येत नसते. पण तो त्याचा मूळ उद्देशही नसतो. मूळ उद्देश असतो ती कलाकृती अधिक परिणामकारकतेनं लोकांच्या नजरेस आणून देणं. या कसोटीला ‘आयदान’ची रंगावृत्ती सरस ठरली आहे. ‘आविष्कार’ आणि ‘अंजोर’ या दोन रंगसंस्थांनी ‘आयदान’चं नाट्यरूपांतर सादर केलं आहे. स्वतः उत्तम नाट्यकलाकार असलेल्या सुषमा देशपांडे यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे.

केवळ तीन कलाकार, मोजकं नेपथ्य, मोजका प्रकाश आणि श्राव्य माध्यमाच्या वापरातून ‘आयदान’ची कथा रंगमंचावर उलगडत जाते. स्वतः ऊर्मिला पवारांनीच याचं नाट्य रूपांतर केलं आहे. हे आवर्जून सांगण्याचं कारण म्हणजे, त्यांनी आपल्या या नाट्यकृतीची नाळ समकालीन वातावरणाशी जाणीवपूर्वक जोडली आहे. अनेक प्रसंगांतून त्याची ठळक अनुभूती प्रेक्षकांना होत जाते. मूळ नाट्यकृतीत कालसुसंगत बदल करण्याची ही प्रेरणा त्यांना झाली, याचा अर्थ त्यांनी जे आयुष्य भोगलं ते आजही त्यांना इतर अनेक ऊर्मिलांच्या आयुष्यातून जाणवत असेल, असाच होतो. ‘आयदान’ची ऊर्मिला रंगमंचावर मोठी होत जाताना ती अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेते, ते यामुळेच. दलित म्हणून अस्पृश्यतेचे चटके सोसलेल्या, बाई म्हणून घरीदारी अपमानित झालेल्या, आपल्याच लोकांकडून वाळीत टाकल्या गेलेल्या स्त्रीचं आयुष्य हे काही स्वस्थ मनानं बघण्याची गोष्ट नाही. पण हे काटाळलेलं जगणं रंगमंचावर सुसह्य होतं, ते पवारांच्या मिश्कील, तिरकस संवादांमुळे. स्वतःवर, स्वतःच्या जगण्यावर हसण्याची ही प्रवृत्ती ऊर्मिलेला सातत्यानं जगण्याच्या पुढील संघर्षासाठी तयार करत जाते. ‘आयदान’ हे त्यामुळेच रडगाणं बनत नाही, तर एका मनमोकळ्या जगण्याची प्रेरक कथा बनते.

अनेक वर्षांच्या अंतरानंतरही पवारांची आत्मकथा प्रेक्षकांना, त्यातही नव्या पिढीच्या प्रेक्षकांनाही आकर्षित करते, याचं मर्म त्यांच्या प्रांजळ निवेदनात दडलेलं आहे. रंगमंचावरच्या कलाकार जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचं बोलणं केवळ कानातच नाही तर थेट मनातही उतरतं. काही काळासाठी तरी काळाचं भान नाहीसं होतं आणि प्रेक्षकही त्याच काळात जगतो, जिथं पवारांची ‘ऊर्मिला’ जगली होती. पण पवारांमधील सजग लेखिका प्रेक्षकांना केवळ स्वतःबरोबर वाहून जाऊ देण्याचं नाकारते. अनेक ठिकाणी त्या प्रेक्षकांना जाणीव करून देतात की, हे प्रसंग फक्त ऊर्मिलेबाबत घडलेले नाहीत, तर ते आजही घडत आहेत. स्त्री म्हणून ऊर्मिलेनं सोसलेल्या वेदना आजही स्त्रियांना भोगाव्याच लागतात. त्यासाठी दलितच असण्याची अट लागत नाही. मग तो मुलींबाबत होणारा दुजाभाव असो, नवर्‍याचा अहंकार आणि पुरुषी वृत्ती असो, सार्वजनिक जीवनात स्त्रियांना अनुल्लेखानं हिनवण्याची प्रवृत्ती असो, की स्त्रियांनीच स्त्रियांचे पाय खेचण्याचा प्रयत्न असो. आणि या गोष्टी आजही घडतात, याची जाणीव होऊन अस्वस्थ व्हायला होतं.

‘आयदान’कडे आता केवळ एका दलित स्त्रीचं आत्मकथन म्हणून बघण्याची चूक केली जाऊ नये, ते यासाठीच. त्यातला नवेपणा आता गेला आहे. पण आता त्याला गांभीर्य प्राप्त झालं आहे, ते त्याच्या सार्वकालिकतेमुळे. ती पिचलेल्या, अवमानित केल्या गेलेल्या वंचितांची कहाणी बनली आहे. पण ती निराशादायक नाही. आपल्या अस्तित्वातून ती आता अनेकांना जगण्याचं बळ देण्याइतकी सशक्तही बनली आहे. नाटक उत्तम वठण्यासाठी कलाकारांनी आधी त्या नाट्यकृतीशी समरस होण्याची गरज असते. ‘आयदान’च्या बाबतीत ऊर्मिला पवार ही व्यक्तिरेखा तीन कलाकारांनी सादर केली आहे. इतर व्यक्तिरेखाही त्या आलटून पालटून सादर करतात. असं करताना सूत्रधाराची, निवेदकाची भूमिकाही त्या बजावतात. नंदिता धुरी, शिल्पा साने आणि शुभांगी सावरकर या तीन गुणी कलाकारांनी हे अवघड काम लीलया केलं आहे. केवळ मुद्राभिनयातून ऊर्मिलेचं जगणं साकारताना त्या कमी पडत नाहीत. आणि जिथं पवारांना आपलं म्हणणं प्रेक्षकांना थेट सांगायचं आहे, ते तसं सांगतानाही त्या यशस्वी होतात. सुषमा देशपांडे यांनी ज्या वेगात आणि सुसंगतीत हे नाटक रंगवलं आहे, त्यामुळे प्रेक्षक सुरुवातीपासून शेवटपर्यंत या नाटकाशी बांधलेला राहतो.

pratikpuri22@gmail.com