आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या सर्वांचं, आपल्या काळाचं अख्यान...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जातीसाठी लढणं, जातीवादी असणं हे आता समाजसेवेचं काम झालं आहे. धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे तुम्ही भेकड आहात, ‘त्यांना’ सामील आहात, असं समजलं जातंय. प्रश्न विचारणं हा देशद्रोह मानला जातोय. या पार्श्वभूमीवर प्रवीण दशरथ बांदेकर यांची ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ ही कादंबरी खूप महत्त्वाची आहे.
 
जात-धर्म-देव-राष्ट्रवाद-संस्कृती यांच्या अस्मितेचं एक भयानक वादळ सध्या देशात घोंघावत आहे. या वादळाला तोंड देताना सर्वच सुजाण लोकांची दमछाक होते आहे. या वातावरणात ‘फुरोगामी’ नावाचा नवीन टवाळखोर शब्द जन्माला आला आहे. ‘निवडक समर्थन’ व ‘निवडक विरोध’ असे दोन वाक्प्रचार तयार झाले आहेत. जातीसाठी लढणं, जातीवादी असणं हे आता समाजसेवेचं काम झालं आहे. प्रश्न विचारणं हा देशद्रोह मानला जातोय. या पार्श्वभूमीवर प्रवीण दशरथ बांदेकर यांची ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ ही कादंबरी खूप महत्त्वाची आहे. 
कादंबरीची सुरुवात होते, अर्पण पत्रिकेपासून. 
 

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या आठवणींना...डाव्या, उजव्या, सोंडवाल्या, बिनसोंडवाल्या सगळ्या प्रकारच्या बाहुल्यांना समजून घेता आलं पाहिजे, शत्रू-मित्र विवेक जपता आला पाहिजे. तुमच्या अखेरच्या दिवसांत हे एवढंच शिकता आलं...

ही अतिशय मोलाची शिकवण आहे. अलीकडच्या संघर्षाच्या वातावरणात सारे विचारवंत, पुरोगामी हे दुसरी बाजू समजून घेण्यात मागे पडले का, त्यांनी तसा प्रयत्नच केला नाही का, की त्यांचं चूकच आहे त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही, असा त्यांचा ठाम समज आहे का, हे सारे प्रश्न याच्याशी संबंधित आहेत. या अभिजनांनी उर्वरित सामान्यजनांच्या मनातील आशा, विचार, मतं जाणून घेण्याचा सहसा प्रयत्न केला नाही. ही सारी माणसं चुकीचीच आहेत, नालायक आहेत, त्यांच्यात सुधारणा होणं अशक्य आहे, असं समजणं किंवा त्यांनी फक्त आमच्या मतानुसारच वागावं, अशी अपेक्षा ठेवणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत.
 
अभिजनांकडून त्या घडल्या आहेत. त्याचाच फायदा आपली सत्तास्थानं कायम ठेवू इच्छिणाऱ्या चाणाक्षांनी उचलला. त्यांनी सामान्यजनांना मनं न दुखवता पद्धतशीरपणे आपल्या बाजूनं फितवलं. त्यांनी बुद्धिवंतांनाही फितवलं. त्यासाठी या धर्मांधांनी विज्ञानाचा आधार घेतला आहे. हे विज्ञानाधारित तत्त्वज्ञान इतकं परिणामकारक ठरलं की, लाखो बुद्धिवंतांनी त्यापुढे सपशेल सहर्ष शरणागती पत्करली आहे. ही कादंबरी अशाच एका कालखंडाकडे आपल्याला घेऊन जाते. त्यातील पात्रं, घटना, प्रसंग हे काल्पनिक दाखवण्यात आले असले, तरीही ते काल्पनिक नाहीत, त्या सत्य गोष्टी आहेत. ती पात्रं आपल्या अवतीभवती वावरत आहेत. 

‘शास्त्रीय परिभाषेत धर्मशिक्षणाचा प्रसार अन् हिंदूहित यांसाठी कार्यरत’ हे सनातन संस्थेचं ध्येयवाक्य आहे. ही कादंबरी या अशा कोणत्याही असू शकणाऱ्या संस्थेविषयी आहे. पण सनातन व गोवा इतक्यापुरतीच ही कादंबरी मर्यादित नाही किंवा ती फक्त भारतापुरतीही मर्यादित नाही. कारण यात जोझे सारामागो आपल्याला भेटतो. हारूकी मुराकामी आपल्याला भेटतो. कोकणातील बाहुलीचे खेळ या प्रतीकाचा वापर करून ही कथा सुरू होते. यात रूढार्थानं कोणी मानवी नायक नाही. काळ हाच यातला नायक आहे. तोच खलनायकही आहे. बाकी सारी मानवी पात्रं या काळाच्या प्रभावाखाली, कधी यांतील प्रभावशाली व्यक्तींच्या प्रभावाखाली, तर कधी स्वतःच्या अगतिकतेच्या फेऱ्यात सापडून स्वतःचं आत्मभान विसरली आहेत. ती कोणीही असू शकतात. त्यांच्या नावांना, कामांना अर्थ नाही. कारण प्रत्येक जण आता एकमेकांसारखाच वागत आहे. विचारांची लढाई कुविचारांनी जिंकलेली आहे, अशा जडत्व आलेल्या वातावरणातच कादंबरी सुरू होते. या कादंबरीतल्या पात्रांना विस्मरणाचा रोग झाला आहे. हे विस्मरण तीन प्रकारचं आहे. एक आहे ते सनातनी प्रचारामुळे सामान्य लोकांना आलेलं विस्मरण. दुसरं आहे ते सुजाण लोकांना त्यांच्या सुजाणतेचं व सद्यकालीन कर्त्यव्याचं झालेलं विस्मरण. तिसरं विस्मरण आहे, सत्ताधाऱ्यांचं विस्मरण. सत्ताधाऱ्यांचं विस्मरण हे सोयीचं विस्मरण आहे. बांदेकरांनी ‘अक्षरपेरणी’ या २०१६ दिवाळी कादंबरी निर्मितीप्रक्रिया विशेषांकात आपल्या या कांदबरी लेखनामागची भूमिका मांडताना म्हटलंय की, “कॉम्रेड अण्णा (गोविंद पानसरे) यांच्याशी बोलताना ते असं म्हणाले की, ‘आपल्या सगळ्यांना विस्मरण होऊ लागलंय. माझी नक्की भूमिका काय आहे, आणि मी काय करतोय, कुणी मला हे असं बहकवत नेऊन माझ्या भूमिकेचा विसर पाडलाय, हेच मला कळेनासं झालं आहे.’ हे विस्मरण नेमकं कशाचं आहे, कधीपासून सुरू झालंय, कोणाकोणाला विस्मरण होत आहे, ते यांतून बाहेर पडणार आहेत की नाही, त्यांच्या या विस्मरणाचा गैरफायदा घेणारे लोक कोण आहेत, या सर्वांवर यात भाष्य आहे, एका बाहुली खेळाच्या सूत्रधाराकडून. हा सूत्रधार केवळ कादंबरीतला काल्पनिक सूत्रधार नाही. तो प्रत्यक्षातला आहे. तो मी, तुम्ही, आपण यापैकी कोणीही असू शकतो.”]

या कादंबरीत जी प्रतीकं वापरली आहेत, त्यांपैकी एक महत्त्वाचं प्रतीक आहे सोंड. उजव्या सोंडेच्या बाहुल्या म्हणजेच, उजव्या कट्टर विचारसरणीचे लोक. कादंबरीत ते सोंडवाली माणसं म्हणून येतं. हे हत्तीचंही प्रतीक आहे. बांदेकरांचे मित्र आणि कवी अजय कांडर हे कोकणातलेच. त्यांनी ‘हत्ती इलो’ ही दीर्घकविता लिहिली आहे. कोकणातील सांस्कृतिक विनाशाचं, राजकीय संघर्षाचं, वैचारिक पडझडीचं, सामाजिक विध्वंसाचं आणि नैसर्गिक अपरिवर्तनीय हानीचं वर्णन या कवितेत आहे. माणसाची सांस्कृतिक विचारशीलताच नष्ट झाल्यामुळे ही परिस्थिती ओढावते, असं कांडर या कवितेविषयी सांगतात. कांडरांचे हे हत्ती समकालीन परिस्थितीचे विदारक, विध्वंसक प्रतीकचिन्हेही आहेत. या हत्तींनी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैयक्तिक असा सर्वत्रच धुमाकूळ घातला आहे. या हत्तींच्या जिवावरच इथलं धार्मिक वातावरण संतप्त ठेवण्यात धर्मांधांना यश आलं आहे.  राजकीय नेत्यांनी याच हत्तींचा धाक दाखवून सामान्यांना आपल्या मुठीत ठेवलं आहे. परिणामी, सामान्य जनताही या हत्तींनाच पूज्य मानू लागली आहे आणि आता विचारवंतही त्यांनाच सामील होत आहेत. समाजमन दुभंगलं की त्याचा सर्वाधिक फायदा राजकारणी उठवत असतात.  बांदेकर त्यांच्या ‘अक्षरपेरणी’तील लेखातच पुढे म्हणतात, “या कादंबरीमध्ये ढोबळमानाने बोलायचं झालं तर, आपल्या आजच्या दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या वेगवेगळ्या अस्मितांमुळे निर्माण होत जाणारे प्रश्न मी चर्चेला घेण्याचा प्रयत्न केला आहे. जात, धर्म, संस्कृती अशा वेगवेगळ्या गटागटांत आपला समाज विभागला जात आहे. प्रत्येक गटाला आपापली ओळख या संकुचित कोंडाळ्याच्या पलीकडे जाऊन विस्तारावी, असं वाटण्याजोगं वातावरण आसपास दिसत नाहीये. यातूनच एकमेकांविषयीची तुच्छता, अनादर, अविश्वास, द्वेष, असहिष्णुता अशा गोष्टी वेगाने वाढत चालल्या आहेत. याहून भयंकर म्हणजे ज्या बुद्धिजीवींनी, लेखक, कलावंत, विचारवंत यांनी या आपापल्या माध्यमांचा अचूक वापर करून समाजाला दिशा दाखवली पाहिजे, तेही या बाबतीत एकतर प्रचंड उदास आहेत, किंवा त्यांना आपल्या माध्यमाच्या सामर्थ्याचे विस्मरण होताना दिसत आहे. यातून जी काही एक प्रकारची कॅऑटिक परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे, त्याविषयीही ही कांदबरी बोलू पाहते आहे.”

प्रवीण दशरथ बांदेकर यांची समकालीन मानवी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, नैसर्गिक भवतालातील विखारी परिवर्तनाची नोंद घेणारी ही कादंबरी आपल्या काळाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आपण आपल्या लिखाणांतून अशा समकालीन नोंदी सहसा करत नाही किंवा जिथे आपल्याला त्रास न होण्याची खात्री आहे, अशाच गोष्टींच्या नोंदी आपण करत असतो. बांदेकरांनी त्रासाची चिंता न करता आपल्यातील लेखकीय जबाबदारीला प्राधान्य देत हे लिखाण केलं आहे. आता वाचकांनाही तसाच त्रास घेण्याची गरज आहे.

पुस्तकाचे नाव : उजव्या सोंडेच्या बाहुल्या
लेखक : प्रवीण दशरथ बांदेकर
प्रकाशक : शब्द पब्लिकेशन्स
किंमत : रु ३८०/-

- pratikpuri22@gmail.com
बातम्या आणखी आहेत...