सालाबादप्रमाणे याही वर्षाचा शेवट आता जवळ आला आहे. सरत्या वर्षाच्या कडू-गोड आठवणी घेऊन आता नव्या वर्षाच्या स्वागताला सज्ज व्हायचे आहे. प्रथेप्रमाणे नववर्षाचे संकल्प काय असावेत, याचे सखोल आणि सरुंद चिंतन-मनन करायलाही आम्ही सुरुवात केली आहे. या वर्षी आम्ही स्वत:साठी काही संकल्प करायचा नाही, असा संकल्प केला आहे. एरवीही केलेले संकल्प हे पाळायचे नसतात, अशी प्रथा आहे. तेव्हा त्यात थोडी सुधारणा करून आम्ही इतरांसाठी काही संकल्प (पक्षी : इच्छा) देवाजवळ व्यक्त केल्या आहेत. त्या पूर्ण व्हाव्यात, हीच आमचीही इच्छा.
राहुल गांधी : पराभवाने यांच्या गालावरची दाढीची खुंटं साफ नाहीशी झाली आहेत; ती तशीच राहोत. त्यांना या वर्षात तरी घरी पोटभर जेवण मिळो; म्हणजे त्यांना लोकांच्या घरी जेवण्यासाठी वणवण फिरावं लागणार नाही.
मनमोहन सिंग : यांचं मौन पुढच्या वर्षी तरी तुटो. त्यांचं बोलणं लोकांना ऐकू येवो. म्हणजे, इतिहासाच्या पुस्तकात देशाचे पहिले मौनी पंतप्रधान कोण होते, असा प्रश्न तरी विचारण्यात येणार नाही.
नरेंद्र मोदी : या माणसाचा इतिहास फारच कच्चा आहे, तो पक्का होवो. ते एकदाचे पंतप्रधान होवो आणि त्यांच्या अर्धवट भाषणांपासून लोकांना मुक्ती मिळो.
अभिषेक बच्च्न : ‘धूम-4’मध्ये याला डबल रोल मिळो आणि नायक व खलनायक या दोन्ही भूमिका त्यालाच मिळो. ‘धूम-4’मध्ये अभिषेक बच्चनच हीरो आहे, याची सरकारतर्फे खास अधिसूचना काढण्यात येवो.
अण्णा हजारे : नवीन वर्षी तरी अण्णांचं हिंदी सुधारो. त्यांच्या अंगावर आणखी मांस चढो. आणखी उपोषणं करण्यासाठी त्यांना नवीन घोटाळे मिळो. त्यांचा टीआरपी याही वर्षी कायम राहो.
फ. मुं. शिंदे : ‘आई’सारखीच यांना आता ‘बाबा’ कविता स्फुरो. साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक कशी जिंकावी, याचं एक गाइड त्यांच्या हातून लिहून पूर्ण होवो. ते एम. ए. (मराठी)च्या अभ्यासक्रमाला लागो.
तरुण तेजपाल : आपलं फक्त नावच तरुण आहे; आपलं वय झालंय, याची याला जाणीव होवो. लिफ्टचा उपयोग वर-खाली येण्या-जाण्यासाठीच असतो, हे याला कळो.
निखिल वागळे : यांच्या तोंडाला आणि पर्यायाने लोकांच्या कानांना आराम मिळो. मराठी भाषेत ‘मला, मी, माझं’ याच्याशिवाय इतरही संबोधनात्मक शब्द असतात, याची त्यांना आठवण येवो.
रामदास आठवले : अंदमान-निकोबार बेटांना पूर्ण राज्याचा दर्जा मिळो आणि रामदास आठवले तिथले तहहयात मुख्यमंत्री बनो. आरपीआय वगळता कोणत्याही अन्य राजकीय पक्षाला तिथे राजकारण करण्यास कायद्यानेच बंदी असो.
दिल्लीकर : एकदाचे ‘आप’चे सरकार आले. आता 700 लिटर्स मोफत पाणी आणि अर्ध्या किमतीत विजेसोबत महिन्याचा किराणा आणि भाजीपालाही 100 रुपयांत मिळो. सरकारतर्फे प्रत्येकाला रोज फुकट दूध मिळो. 10 रुपयाला गॅस सिलिंडर आणि 1 रुपयात दिल्लीत कुठेही प्रवास करण्याची सुविधाही लाभो. होऊ दे खर्च.
कॉमन मॅन : सामान्य माणसासाठी या नववर्षात आम्ही कोणतंही मागणं मागणार नाही. तसेही त्याच्यासाठी कोणीही कोणतेही केलेले संकल्प क्वचितच पूर्ण होतात. त्यामुळे खोटी आश्वासने देण्यापेक्षा त्याला वास्तवाची थोडी जाणीव करून द्यावी, एवढाच आमचा माफक उद्देश आजवर राहिला आहे. या नववर्षात त्याला कोण आपले आणि कोण परके, याची समज येवो. देशानं प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी करायची, ही जशी त्याची अपेक्षा असते; तसेच त्यानंही देशासाठी काही करावं, अशी देशाची अपेक्षा असते, याची त्याला जाणीव होवो. जाती-धर्मापेक्षा माणुसकी मोठी असते, हे त्याला कळो. आपल्याला मोठमोठी स्वप्नं दाखवणारे लोक आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नाही तर त्यांची स्वत:ची स्वप्नं पुरी करण्यासाठी धडपडत असतात, हे त्याला उमजो. या जगात फुकट काही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते आणि त्याची सुरुवात स्वत:पासून करावी लागते, हे त्याला समजो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये जर आपण इतरांसाठी उपयोगात आणली नाही तर आपल्यासाठीही ती कोणी वापरणार नाही, याचे भान त्याला येवो. आणि या वर्षी तरी आपण आम आदमी नाही तर खास आहोत, हे ध्यानात ठेवून या देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक होण्याची आपली भूमिका ते आनंदाने आणि उत्साहाने पार पाडो.
गेले काही महिने आमच्या ‘तिरंदाजी’ने आम्हाला दिसलेल्या काही दोषांवर शरसंधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यात कोणाला इजा पोहोचवण्याचा आमचा कधीच उद्देश नव्हता. तरीही कळत-नकळत कोणास हे तीर टोचल्यास त्यांची आम्ही क्षमा मागतो. आता तुमचा निरोप घेताना संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितले, आम्हीही तेच मागून लेखणीरूपी धनुष्य खाली ठेवतोय...
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी
रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात...
Pratikpuri22@gmail.com