आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वांधे-पोहे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीच्या आसपास गुलाबी थंडीची चाहूल लागते. ती या वर्षीही लागली. याच गुलाबी थंडीत अनेक विवाहोत्सुक तरुण-तरुणींना आपल्या विवाहाची स्वप्ने पडतात. ती या वर्षीही पडली. या स्वप्नांमुळे वरपित्यांची फुशारकी आणि वधूपित्यांची अजिजी वाढते. ती या वर्षीही वाढली. सालाबादप्रमाणे मग वधू-परीक्षाही पार पडल्या. या वर्षी नित्यनेमाने न घडलेली एकच गोष्ट म्हणजे कांदे-पोह्यांचा कार्यक्रम. कांद्याच्या वधारलेल्या भावाने वर-पित्यांच्या अपेक्षांनाही मागे टाकल्याने यंदा कांदा कदाचितच चाखायला मिळाला. या वर्षी ‘कांदा’ कर्तव्य असलेल्या अनेकांना कांद्याविनाच आपलं कर्तव्य आटोपण्याची भीषण वेळ आली. या धामधुमीत आमच्यासारख्या वराच्या अवतीभवती वावरणा-यांना कांदे-पोह्याची लज्जत चाखता न आल्यानं भयानक सात्त्विक संताप आलेला आहे. अशा सात्त्विक संतापाच्या झटक्यात आम्ही चक्क चांगले विचार करू लागतो. जसा नुकताच काही राजकीय पक्षांनी निवडणूकपूर्व मतदान चाचण्यांवर बंदी घालणा-या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला मान्यता देऊन केला आहे. अशीच बंदी विवाहपूर्व वधू-वर पाहणी चाचण्यांवर घालण्यात यावी, अशी आमची ठाम मागणी आहे.
कांदे-पोहे न मिळाल्याचं दु:ख आहेच; पण या एकविसाव्या शतकातही अजून अठराव्या शतकाच्या परंपराच टिकून आहेत, याचं आमच्या मनाला जास्त दु:ख आहे. स्वत:ला सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजणारे तरुण परंपरेच्या नावाखाली निर्लज्जपणे वधू-परीक्षेच्या कार्यक्रमाला जातात आणि वर त्याची जाहिरातही करतात. यंदा वीस मुली पाहिल्या, सोळा रिजेक्ट केल्या, चार ठिकाणी बोलणी सुरू आहेत, जिथं जुळेल (म्हणजे देण्या-घेण्याचा व्यवहार जुळेल) तिथं उरकून टाकायचं, हे यांचे स्कोअर कार्ड. आश्चर्य म्हणजे शिकल्या-सवरलेल्या आणि स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या तथाकथित मॉडर्न मुलीही या काळात काकूबाई होऊन माना खाली घालून या कार्यक्रमात स्वत:चं प्रदर्शन मांडवून घेतात. एरवी स्वत:ला बंडखोर समजणा-या या पोरी या काळातच थंड पडतात आणि आईवडील सांगतील त्याच्या दावणीला स्वत:ला मुकाटपणे जुंपून घेतात. वर, ‘आजवर त्यांच्या मनाविरुद्ध वागले, आता मात्र त्रास द्यायला नको म्हणून लग्न करतेय,’ अशी मखलाशीही करतात. एक वेळ राजकारण्यांचा निवडणूक काळातला निर्लज्जपणा आम्ही समजू शकतो; कारण निवडणुका अशा-तशा दरवर्षी होतच असतात. पण आयुष्यात एकदाच होणा-या लग्नात कसलाही विचार न करता केवळ घरच्यांचा शब्द मोडायचा नाही म्हणून स्वत:ची आजवरची तत्त्वे, मुक्त विचारसरणी गुंडाळणारी ही पिढी निर्लज्जपणात या राजकारण्यांवरही मात करते. लग्नाच्या या मोसमातच एखाद्या साथीच्या रोगासारखी पत्रिका बघण्याचीही साथ येते. अर्थात, आधी व्यवहार जुळल्यानंतर पत्रिका आपोआपच जुळल्या किंवा जुळवल्या जातात, हे कोणी सांगायला नको. पण तोवर जो धुमाकूळ घातला जातो, त्याच्यापुढे स्टारवॉरही फिके पडते. पत्रिकेत मंगळ असला म्हणजे तर विचारायलाच नको. आपलं यान सध्या मंगळाच्या दिशेनं प्रवास करतंय; पण आपल्या विचारांची यानं अजून पाताळातच भ्रमण करताहेत. आपल्या बुद्धीच्या कक्षा रुंदावण्याऐवजी आक्रसतच चालल्या आहेत. त्यामुळे साहजिकच आपले आचार-विचारही झेप घेण्याऐवजी झोपण्यातच मग्न आहेत.
खरं तर लग्न ही सामाजिक अभिसरणाची मोठी संधी आहे. पण शतकानुशतके सामाजिक विघटनासाठीच तिचा उपयोग केला जातोय. वर्गीय आणि वर्णीय भेदांच्या वेशी ओलांडण्यासाठी लग्नसंस्थेचा उपयोग करण्याऐवजी जातीपातीच्या भिंती मजबूत करण्यासाठीच तिचा उपयोग केला गेला. परंपरा मानल्यामुळे समाजाचा वर्तमान अबाधित राहतो हे खरे; पण समाजाच्या उज्ज्वल आणि प्रगतिशील भविष्यासाठी चांगल्या परंपरा घडवून त्याची राबणूक करणेही गरजेचे असते. अन्यथा कालविसंगत परंपरांच्या पायी सामाजिक सौहार्दाचा आणि संपन्नतेचाच पहिला बळी जातो. असो.
लाचारीने कांदे-पोहे करणारे असोत किंवा माजोरीपणाने ते खाणारे असोत; त्यांना असले विचार पोह्यातल्या कचाप्रमाणेच जाणवतील, याची आम्हाला खात्री आहेच. जर लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळून येत असतील तर त्यासाठी हे सोपस्कार कशासाठी, या आमच्या प्रश्नालाही उत्तर मिळणार नाही, याचीही आम्हाला खात्री आहेच. तसंही आपल्या देशात कोणी कोणाला गंभीरपणे घेत नाही. नवरे बायकांना, पोरं आई-बापांना, राजकारणी जनतेला आणि जनता स्वत:लाच. कोणत्याही गोष्टीला हसण्यावारी उडवून लावण्याची अचाट क्षमता आपल्यात उपजतच असते. त्यामुळे आमच्या या सात्त्विक संतापोद्भव विचारसरितेला बांध घालून ती कोणी आपल्या डोक्यात खेळवेल, यावर आमचाही विश्वास नाही. तसेही नव्या परंपरा घडवायला आपण काही महापुरुष नाही.
जातिभेदाच्या भिंती तोडण्याची संतांची भाषाही आपल्या जिभेला न पेलवणारी आणि प्रकृतीला न मानवणारी आहे. समाजापुढे आदर्श इतरांनी मांडावे, त्यांच्यापुढे आम्ही फार फार तर टाळ्या वाजवू, आमची धाव इथपर्यंतच. त्याच्यापुढे धावण्याची आमची छाती नाही आणि इच्छा तर नाहीच नाही. त्यापेक्षा कांदे-पोहे करणे आणि खाणे कधीही सोपे असते. त्यामुळे आम्हीही तेच करणार आहोत. तुम्हीही तेच करा. त्यापायी पुढे रडण्याची वेळ आली तरी हरकत नाही. कांदे कापून रडण्यापेक्षा कांदे खाऊन रडणं कधीही चांगलं. कांदा नाही म्हणून यंदा कर्तव्यच नाही, अशी अघोरी वेळ मात्र कोणावर येऊ नये. त्यामुळे कांद्याचे आणि वरांचे भाव कितीही वधारो आणि वधूपित्यांचे कंबरडे त्याखाली कितीही दबो, ही परंपरा आपण सर्वांनी कायम ठेवायलाच पाहिजे.