Home | Magazine | Madhurima | Pratiksha Joshi write about Digital Indian

डिजिटल इंडीयातील कांदे पोहे

प्रतीक्षा जोशी | Update - Oct 10, 2017, 12:00 AM IST

संध्याकाळी कांदेपोह्यांचा कार्यक्रम ठरलाय देशपांडेंच्या घरी. देशपांडे कुटुंब सुशिक्षित आणि खेळीमेळीचं वातावरण असलेलं घर

 • Pratiksha Joshi write about Digital Indian
  संध्याकाळी कांदेपोह्यांचा कार्यक्रम ठरलाय देशपांडेंच्या घरी. देशपांडे
  कुटुंब सुशिक्षित आणि खेळीमेळीचं वातावरण असलेलं घर. घरात आजी, पती-पत्नी (विलास-अनिता) आणि त्यांची दोन मुलं : ऋतुजा आणि विकी. जुन्या परंपरांचा आदर करणाऱ्या आजीचा आग्रह, ऋतुजाने साडी नेसावी. पण बदलत्या काळानुरूप चालणाऱ्या मम्मी-पप्पांमुळे ऋतुजाला पंजाबी ड्रेस घालण्याची संमती मिळाली. पुढे काय झालं?

  (मोदीजींच्या डिजिटल इंडियामध्ये सगळं काही ऑनलाइन झालंय. तरुण पिढी तर या सगळ्यात अग्रेसर. पण म्हणून आपण आपल्या परंपरा विसरलोत असं नाही. उलट प्रेम, संस्कार यासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अद्ययावत, म्हणजे अपडेटेड होणं राहणं म्हणजे उत्तम व्यक्तिमत्त्व. याच सकारात्मक विचारांनी घडलेला हा सुंदर प्रसंग.)

  “मम्मी, हा लाल ड्रेस घालू की पिवळा? नाही, मला वाटतं निळ्या कलरचा जास्त छान दिसेल.”
  “हो गं ऋतू, तो निळाच ड्रेस खूप खुलून दिसतो तुझ्यावर. तोच घाल. शिवाय पप्पांनी गिफ्ट केलाय ना तो, म्हणजे तुला तोच आवडणार.”

  “अगं, काय तुम्ही आजकालच्या मुली! अशा कार्यक्रमाला ड्रेस घालतात होय मुली? मस्त छानशी साडी नेस एखादी. आतापासूनच सवय लागायला हवी. आणि अनिता, तू आई आहेस ना तिची, तू सांगायला नकोस होय? तू अजून तिच्या होमध्ये हो मिळवतेस.”
  “आई, अनिता, ऋतू काय चाललंय तुम्हा तिघींचं? कसली गडबड चाललीय?”
  “काही नाही हो पप्पा, संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी. ताईसारखं अरेंज मॅरेज करण्याच्या भानगडीत तर आपण नाही पडणार बुवा. आपण तर लव्ह मॅरेज करणार.”
  “बघितलंस विलास, ऋतूचं अजून कशात काही नाही आणि या विकीला लग्नाचे वेध लागलेत आतापासूनच. एखादी मुलगी तुझ्यासमोर आणून उभी करंल आणि म्हणंल, पप्पा ही तुमची सून. कसली नातसून आणतोय कुणास ठाऊक?”

  “आई, तू टेन्शन नको घेऊस. माझा मुलगा आहे तो. गॅरंटी आहे मला त्याच्याबद्दल. पण विकी लाज राख बाबा माझी. कमीत कमी खायला तरी बनवता आलं पाहिजे आमच्या सूनबाईंना.”
  “पप्पा, तिला स्वयंपाक नाही आला तरी चालेल. पण ऑनलाइन ऑर्डर करता आली पाहिजे. मी तर अशीच मुलगी बघून घेणार. मोदीजींच्या डिजिटल इंडियामध्ये ऑनलाइन व्यवहार करणारी मुलगीच पटवणार आहे मी.”
  “पटव बाबा पटव. लग्न झाल्यावर तिची सासू, तुझी आई अनिता चांगलं सरळ करेल तिला. २५ वर्षांचा अनुभव आहे मला.”
  “अहो काय हे, मस्करी पुरे झाली. ऋतूचा विषय सोडून दिला आणि तुमचं दुसरंच काय सुरू झालं. चला आवरा, संध्याकाळच्या तयारीला लागा.

  एकंदरीत संभाषणातून लक्षात आलंच असेल, संध्याकाळी कांदेपोह्यांचा कार्यक्रम ठरलाय देशपांडेंच्या घरी. देशपांडे कुटुंब सुशिक्षित आणि खेळीमेळीचं वातावरण असलेलं घर. घरात आजी, पती-पत्नी (विलास-अनिता) आणि त्यांची दोन मुलं: ऋतुजा आणि विकी. जुन्या परंपरांचा आदर करणाऱ्या आजीचा आग्रह, ऋतुजाने साडी नेसावी. पण बदलत्या काळानुरूप चालणाऱ्या ऋतुजा आणि मम्मी-पप्पांमुळे तिने पंजाबी ड्रेस घालावा यावर सगळ्यांची संमती आली. तयारी करता करता संध्याकाळ उजाडली आणि पाहुण्यांचे आगमन झाले. व्यास कुटुंब. हेदेखील सुशिक्षित आणि अत्यंत समजूतदार. घरात आई-वडील आणि दोन मुलं. पण कार्यक्रमाला यांच्यासोबत विशेष अतिथीही आलेले, मुलाची आत्या आणि त्यांचे यजमान. आत्याचा स्वभाव म्हणजे अतिशय कडक आणि शिस्तप्रिय.
  पाहुण्यांचे साग्रसंगीत स्वागत झाले आणि मुलीला बोलवा, अशी मुलाकडच्या मंडळींची सूचना आली. त्यानुसार ऋतुजा अगदी आत्मविश्वासाने बाहेर आली. तिला ड्रेसमध्ये बघताच आत्याच्या बोलण्यातला सूर बदलला.

  “वा, मुलगी ड्रेसमध्येच दाखवणार का?”
  त्यावर पटकन मुलाची आई उत्तरली, “हरकत नाही. आजकाल तसंही मुली साड्या फक्त सणावारांनाच नेसतात आणि ड्रेसमध्ये ती कम्फर्टेबल आहे ना, मग झालं तर.”

  मुलामुलीला बेसिक प्रश्न विचारायला सुरुवात झाली. ऋतुजाचा स्ट्रेट फॉरवर्ड स्वभाव मात्र आत्याला जरा खटकला. इकडे प्रश्न विचारणं सुरू असतानाच मुलाचा भाऊ त्याला म्हणाला, “अरे दादा, एक नंबर वहिनी आहे बघ. आत्याकडे लक्ष देऊ नकोस. तिला काय, काहीतरी चुकाच काढायला हव्यात. तू सरळ हो म्हणून टाक.”

  ऋतुजाचा आत्मविश्वास, चेहऱ्यावरचे तेज मुलाच्या आईवडलांना खूप भावले. आणि हीच आपल्या घरासाठी परफेक्ट सून ठरेल, अशी त्यांची मनोमन खात्री झाली. आता प्रश्न होता तो फक्त आत्याचा. आत्याने ऋतुजाला प्रश्न विचारायला सुरुवात केली.

  “नोकरी वगैरे ठीक आहे. अजून कशाची आवड आहे तुला?”
  “मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं आणि चित्रपट पाहायलाही आवडतात,” ऋतुजा उत्तरली.
  “चित्रपट फक्त आजकालचे पाहत असशील ना?”
  “नाही आत्या, स्मार्टफोन आहे त्यामुळे जुने चित्रपटही खूप पाहिलेत. अगदी तुमच्या काळातल्या सुलोचनादीदींचे देखील.”

  सुलोचनादीदींचे नाव ऐकताच आत्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले.
  “नोकरीच्या निमित्ताने तुम्ही बाहेर असणार, मग बाकीची नातीगोती कशी सांभाळणार?” आत्याचा पुढचा प्रश्न.

  “आत्या, मान्य आहे की नोकरीमुळे प्रत्यक्ष भेटी होणार नाहीत. पण नात्यात प्रेम असेल तर मार्ग निघतोच. आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुविधा आहे ना. तुम्ही आमच्याकडे येऊ शकला नाहीत तरी आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचू शकतोय.”
  ऋतुजाचे हे स्मार्ट उत्तर ऐकून आत्या आनंदल्या.

  कार्यक्रम पार पडला आणि निघताना ऋतुजाने सगळ्या मोठ्या मंडळींना नमस्कार केला. आत्याला नमस्कार करताच त्या म्हणाल्या,
  “विलासराव, चांगले संस्कार केलेत मुलीवर.”
  आणि दुसऱ्या दिवशी देशपांडेंच्या घरी फोन खणखणला,
  “पसंत आहे मुलगी!”
  - प्रतीक्षा जोशी, औरंगाबाद, pratikshajoshi02@gmail.com

Trending