आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहिला का वाघं?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संसाराच्या नेहमीच्या रहाटगाड्यातून स्वत:साठी काही क्षण जगणं बायकांसाठी तसं महाकठीण कर्म. मात्र, या चक्रातून बाहेर पडायचंच असं ठरवून दोन दिवस फिरायला जाऊन आलेल्या मैत्रिणींच्या सहलीच्या आठवणींचा हा ताजंतवानं करणारा अनुभव.

आम्ही जगतोय का, असा प्रश्न मनाला विचारला ना की, पुन्हा पुन्हा वाटतं, हरवतंय सगळं. थांबलाय आपला अवखळपणा, अल्लडपणा, आपल्यातलं गोंडस बालपण. जगतोय आपण, पण एकदम स्वतःला पूर्ण बदलून. माणूस ना आपण? होऊ द्या नं चुका. यंत्र थोडीच आहोत आपण की, सगळं अगदी हवं तसं त्यातून बाहेर येईल? पण चढाओढ लागलीये आजच्या काळात बरोबरीची, चुरशीची स्पर्धा आहे जणू जीवघेणी. सुंदर आयुष्य अजून सुंदरपणे जगावं यासाठी स्पर्धा चालू आहे. अन् अचानक प्रश्न पडतोय आपल्यासाठी हे जीवन आहे की आपण या जीवनासाठी आहोत?
 
याच उत्तर ना तुमच्याकडे ना माझ्याकडे. आम्ही नोकरदार बायका तरी निदान घराबाहेर पडतो, घरच्या कटकटींतून एक निवांत क्षण स्वतःसाठी सापडतोच. बाहेर जातो, मैत्रिणींमध्ये बसतो, काही सुखाचे, तर काही दुःखाचे क्षण एकमेकींशी वाटतो, न त्यात काय चुकलंय, काय करायला नको होतं, ही चर्चा होते न बरेचसे प्रश्न सुटतात. आणि मग पुन्हा ताजंतवानं होऊन आम्ही नांदायला सज्ज होतो. शब्द हे कधी आमचे शस्त्र, तर कधी मलमासारखे. खूप दमकोंडी होते, पण खरं सांगू का? जगतो बरं का आम्ही.
 
शाळेत बसल्या बसल्या आम्ही मैत्रिणी म्हणजे मी, सरू, अंगणवाडीच्या शिंदेताई, न मदतनीस शहाणे बाई एक दिवस विचार केला की, जाऊयात का मैत्रिणी-मैत्रिणी फिरायला. सगळ्या कंटाळून गेलो होतो. सगळ्यांच्या मागे अडचणी होत्याच, पण मनोमन त्यांची कुठे तरी जाण्याची इच्छा मी ओळखली. याआधी पण बऱ्याच वेळा आम्ही प्लॅन केला न तो फुस्स झाला. मग आमचे नवरे पण जा म्हणायचे, कारण एकच होतं. या काही निघत नाहीत, तर वाईट बोलून कशाला भांडण ओढवून घ्यायचे? पण या वेळी मी पक्कं ठरवलंच की, सरू जातेय बदली करून. पुष्पा तर जूनमध्येच देऊळगाव राजाला गेली, तर आपली जास्त भेट पुन्हा होणार नाही. मग आठवणी गोळा करायला काही हरकत नाही  सगळ्यांच्या घरचे हो म्हणले. त्यांना वाटत होत ह्यांचं काय खरं आहे? मैत्रिणींना फोन केला. मग सुरुवात ठिकाण ठरवण्यापासून होती. शेवटी चिखलदरा न येताना शेगाव असं ठरवलं.

मग आमच्यात मी, सरू, पुष्पा, शहाणेबाई न शिंदेबाई पक्क्या ठरलो. काही जणींची चालढकल चालू. मग माझ्या दोन बहिणींना विचारलं. एकीचं लग्न ठरलेलं, नवरा वाशीमचा. ती तर भेट होते की काय म्हणून एका पायावर तयार झाली. दुसरी पण तयार झाली. मग म्हणलं, दुर्गा माझी जाऊ तिलाही न्यावं, आमची माणसं जरा कमीच बोलणारी, न कमी फिरणारी. म्हणलं तिची हौस तरी कोण करणार? तिलाही तयार केलं. पुन्हा वाटलं आपले आजीबाबा त्यांना पण जमेल असं ठिकाण आहे, त्यांना तर आधीच खूप उल्हास आहे. हो-नको म्हणत आम्ही गाडीवाल्याचा नंबर मिळवला. सगळं स्वतः ठरवलं. शाळेतून शनिवारची रजा मागितली. मुख्याध्यापकांची पहिली प्रतिक्रिया हीच, तुम्ही बायका जाताय? दोघींना राजा हवी होती न एकदम. पण मिळाली रजा. गाडीवाला सकाळी येतो म्हणे. आमचा विचार बदलला, रात्रीच शुक्रवारी निघू, सकाळी तिथे पोहोचू. मग गाडीवाल्याला रात्री बोलावलं. एकएक जण दुपारपासून घरी येत होती. नवरा आता ताणातच दिसत होता, खरंच जातेस का? म्हणलं हो अहो, जरा द्या न गार पाणी आणून. त्यांचा चेहरा सांगत होता की, थांब गार पाणी आणतो न डोक्यावर उडवतो तुझ्या, काय चाललंय तुझं? पण हे सगळं मनातल्या मनात हं!
 
निघालो तर नवरा जपून जा म्हणला. काय आनंद झाला म्हणून सांगू. चला म्हणलं तर नको बायकांमध्ये माझं काय काम? मग सरूला घेतलं तर तिचा नवरा म्हणला, एकच बायको आहे, जपून आणा. मग वाटूर फाट्यावरून शिंदेबाईला न शहाणेबाईला घेतलं. त्यांच्या आयुष्यात दोघी पहिल्यांदा लेकरं सोडून निघाल्या होत्या न इतक्या रात्री घराबाहेर पडल्या होत्या. दोघींच्या मागे खूप व्याप आहे. स्वतःसाठी कधी जगल्याच नाहीत. ही सहल त्या दोघींकरता खास होती. भयाण रात्री निघालो, पण सैलानी जत्रेमुळे मंठा ते सुल्तानपूर रस्ता गर्दीचा वाटत होता. रात्रभर जागत न जगत गेलो. गप्पा सुरू न ड्रायव्हरला सल्ले पण. त्यांना पुन्हा पुन्हा चहा देत होतो. पुरुषांसारखं सगळं एन्जॉय करत होतो. सुल्तानपूरला रात्री बारानंतर चहा घेतला. काय सॉलिड हिंमत आलेली म्हणून सांगू. सकाळी चिखलदऱ्याला पोहोचलो. खूप धम्माल केली. कुणाला घरची काहीच आठवण नव्हती येत न मुलाची काळजी होती. प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून वाटत होत की, वर्षातले हे दिवस सुरूच राहावेत, आनंद ओसरू नये. मेळघाट जेमतेमच पाहून आम्ही एका जैन मंदिरात जेवायला थांबलो. निसर्गात विशेष वेगळं काही नव्हतंच, वेगळ्या होतो आम्ही. कारण आम्ही आज स्वतःसाठी जगत होतो. आनंदाने बेधुंद होऊन गाणी गात होतो. ना कुणाचे वर्चस्व ना कुणाची भीती. आजी अन् शिंदेबाई वगळता सर्वांनी पंजाबी ड्रेस घातले होते.
 
शेगावला येताना गाडी बंद पडली. पण भीती नाही. मस्त आम्ही एका गराजवर बसलो. त्या माणसाने इतक्या बायका पाहून कूलर लावून दिला. आम्ही एक रसवंती पाहून उसाचा पांचट रस पण चव घेऊन पिला. कुठंही उतरलो की, माझे आजोबा आरसा न कंगवा काढून भांग पाडायचे न आजीचा पट्टा चालू. मैत्रिणी हे सगळं एन्जॉय करायच्या. रात्री शेगावला पोहोचलो. भक्त निवासात खोली मिळवली. आधार कार्ड न काय काय तपासणी. इतक्या सगळ्या बायका न एकच पुरुष म्हणून गोंधळ नुसता. पण फॉर्म भरून मिटला प्रश्न. दोघातिघांनी तर विचारलं, शिक्षिका का तुम्ही? नाराजीची एक गोष्ट तितकी घडली की, आम्ही गेलो होळीचा मुहूर्त साधून न उद्यान आनंदसागर मात्र बंद असणार होतं. माझा चेहरा पडलाच. पण सर्व मैत्रिणी म्हणल्या सोड ना आपण आनंद तर लुटलाच न. मग थोडा वेळ गेला न आम्ही ते क्षणही जगलो, खूप उशिरापर्यंत रात्री खाली फिरलो, गप्पा मारल्या, आइस्क्रीम खाल्लं. दुसऱ्या दिवशी गजानन महाराजांचे दर्शन घेऊन न लोणारचे तळे पाहून परतलो.
 
बाबांना गाडीत शिकवलं, वाघ दिसला म्हणा म्हणजे आम्हाला काही तरी दिसलं म्हणलं तर पुढच्या वेळी पाठवतील. तर गेलं की, सरूच्या सासूने विचारलं, बाबा पहिला का वाघ? तर ते म्हणले कसला वाघ न काय? आमचे वाजले का बारा? त्यांना म्हणलं, बाबाला लक्ष नाही राहत, आम्ही पाहिला वाघ. मग माझ्या घरी येताना आजीने बाबांची कानउघाडणी केली. माझ्या नवऱ्याने बाबाला तेच विचारलं, आजीचं बोलणं बाबांच्या लक्षात होतं. म्हणले काय मोठा वाघ होता! मी अवाक् झाले, आम्ही हसत होतो. खरंच पटलं तेव्हा, जगावं वर्षात दोनचार दिवस, स्वतःसाठी.
 
 pratimaoingle001@gmail.com
बातम्या आणखी आहेत...