आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशू जैन : वित्तीय क्षेत्रात भारताचा जागतिक गौरव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीत फ्रँकफर्ट येथे मुख्यालय असलेल्या डॉइश बँकेचा कारभार 70 देशांमध्ये पसरला असून एक लाखाहून अधिक कर्मचारी त्यांच्या ताफ्यात आहेत. सुमारे 34 अब्ज युरो उलाढाल असलेल्या या बँकेची स्थापना 1879 मध्ये बर्लिनमध्ये झाली. विदेशी चलन बाजारातील उलाढालीत या बँकेचा वाटा 21 टक्के एवढा आहे. या बँकेचा इतिहास मोठा मजेशीर आहे. हिटलर सत्तेवर येताच या बँकेतील तिघा ज्यू संचालकांची त्याने हकालपट्टी केली. मात्र दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जर्मनीचा पराभव झाल्यावर 1948 मध्ये या बँकेचे 10 विभागीय बँकांमध्ये विभाजन करण्यात आले. मात्र 1952 मध्ये या दहा बँकांचे विलीनीकरण करून तीन बँकांची निर्मिती करण्यात आली. 1957 मध्ये पुन्हा या तीन बँकांचे विलीनीकरण करून एक डॉइश बँक स्थापण्यात आली. त्यानंतर या बँकेने जगात आपला विस्तार केला. भारतात या बँकेने आपली पहिली शाखा 1980 मध्ये स्थापन केली. सध्या भारतातील 15 शहरांमध्ये त्यांच्या शाखा असून सुमारे आठ हजार कर्मचारी व पाच लाख ग्राहक आहेत.
7 जानेवारी 1963 मध्ये राजस्थानातील जयपूर येथे जन्मलेले अशू जैन यांनी दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात पदवी संपादन केली. त्यानंतर ते अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले आणि तेथे त्यांनी वित्तीय विषयात एमबीए केले. तेथे शिक्षण पूर्ण झाल्यावर किडर पिब्ले अँड कंपनी (आता ही कंपनी यूबीएसचा भाग झाली) मध्ये वित्तीय विश्लेषक म्हणून आपले करिअर सुरू केले. 1985 ते 88 अशी तीन वर्षे येथे नोकरी केल्यावर ते न्यूयॉर्कस्थित नामवंत वित्तीय कंपनीत दाखल झाले. त्यांच्याच काळात सर्वात प्रथम हेज फंडाचे कामकाज सुरू झाले. येथे त्यांना वित्तीय क्षेत्रातील विविध विभागांचा जवळून अभ्यास करता आला. 1995 मध्ये ते डॉइश बँकेत दाखल झाले. तेथे त्यांच्याकडे सुरुवातीला हेज फंडाचे काम होते. त्यानंतर त्यांनी बँकेतील विविध विभागांत अनेक जबाबदारीच्या पदांवर कामे केली. 2002 पासून ते बँकेच्या कार्यकारी समितीच्या सदस्यपदी आहेत. बँकेच्या जागतिक कारभाराचे ते काही काळ प्रमुख होते. डॉइश बँकेबरोबरच दक्षिण आफ्रिकेची आघाडीची तेल व वायू उद्योगातील कंपनी सासूलच्या संचालकपदी आहेत. त्याचबरोबर भारतातील पंतप्रधानांच्या विदेशी गुंतवणूक कार्यकारी सदस्यांच्या गटाचे ते सदस्य आहेत.
अलीकडेच ब्रिटिश सरकारला वित्तीय अडचणींवर मात करण्यासाठी सल्ला देणा-या समितीत त्यांची नियुक्ती झाली आहे. अशू जैन यांनी जागतिक पातळीवरील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात ‘रिस्क मॅगझिन’चा जीवनगौरव पुरस्कार, ‘नॅसकॉम’चा बिझनेस लीडर पुरस्कार, ‘युरोमनी मॅगझिन’चा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.