आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करारी आणि कर्तव्यदक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसाला किमान चार - पाच सोनसाखळ्यांची चोरी, तीन ते चार घरफोड्या, दोन -चार दुकानांची लूट, पाच-सात प्रवासी वा वृद्धांची तोतया पोलिसांकडून होणारी लुटीची प्रकरणे, टोळक्यांकडून शिक्षक-प्राध्यापकांवर हल्ले आणि तडीपार गुंड, राजकीय प्रतिष्ठा लाभलेल्या गुंडांकडून धुमाकूळ घालत दुचाकी, मोटारींच्या जाळपोळीसारख्या गुन्ह्यांनी नाशिककरांचे जीवन त्रस्त झाले होते. महिलांना तर दिवसाढवळ्या त्यांचे सौभाग्यलेणेदेखील गळ्यात घालून बाहेर पडणे मुश्कील बनले होते. इतकी असुरक्षितता आणि बेबंदशाही माजलेल्या शहराध्ये एक बदल झाला आणि बघता बघता जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे कायद्याचे राज्य प्रस्थापित होण्यास प्रारंभ झाला तो केवळ यंत्रणेच्या प्रमुखपदी झालेल्या ‘कुलवंतकुमार सरंगल’ यांच्या नियुक्तीने !
तेच पोलिस दल, तेच अधिकारी असूनही गुंडांसह अवैध धंदे करणा-यांप्रमाणेच त्यांना पाठबळ लाभलेल्या राजकारण्यांना धाक वाटू लागला. चौका-चौकांत दिवस -रात्र दिसणारे पोलिस, एकापाठोपाठ एक राबवल्या गेलेल्या कोम्बिंग आॅपरेशनच्या मोहिमा, गुंडांच्या अड्ड्यांवर जाऊन त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणे, नगरसेवकासह इतर गुंडांची तडीपारी, चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळणे, सराईत गुन्हेगारांवरील स्थानबद्धतेची कारवाई, असे सर्व काही नाशिकमध्ये अचानक घडू लागले. एका कर्तव्यदक्ष अधिका-याच्या नियुक्तीने शहरात कशा पद्धतीने शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित होऊ शकते त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सरंगल होय. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर किंवा कॉर्पोरेट सीईओ म्हणून शोभून दिसू शकणा-या सरंगल या करारी व्यक्तिमत्त्वाचा दरारा आता नामचीन गुंडांनाही वाटू लागला आहे.
पंजाबातील अमृतसरनजीक मुस्तफाबाग या खेड्यात शेतक-याच्या कुटुंबात जन्मलेल्या सरंगल यांचे वडील फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात स्थायिक झाले. घरात अशिक्षित आई-वडील असले तरी कुलवंतकुमार यांच्या दोन्ही मोठ्या भावांनी जिद्दीने मेहनतीने आयएएस परीक्षेत मिळवलेले यशच त्यांच्यासाठी प्रेरणादायी आणि जीवनाला वळण देणारे ठरले. त्यांचे मोठे बंधू नुकतेच मध्य प्रदेश शासनातून प्रधान सचिव पदावरून सेवानिवृत्त झाले, तर त्यानंतरचा भाऊ सध्या पंजाब शासनात समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव पदावर कार्यरत आहेत, तर तीनही बहिणी केंद्रीय खात्यात चांगल्या पदावर कार्यरत असून त्यांचे सासरे आयपीएस व साडू बंगलोर येथे प्रशासकीय सेवेत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. डोळ्यांसमोर कुठलाही रोल मॉडेल अथवा करिअर घडवण्यासाठी आर्थिक स्रोत नसताना भावांच्या मार्गदर्शनाने स्पर्धा परीक्षा दिल्याचे ते सांगतात. सनदी सेवेत दाखल होण्यापेक्षा
आव्हानात्मक वाटणा-या पोलिस दलाची निवड केल्याचे कारण म्हणजे त्यांना कायमच पोलिस दलाविषयी विशेष आकर्षण आणि आदरयुक्त भीती वाटत असे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत 1990 मध्ये आयपीएस होऊन त्यांची पहिली नियुक्ती यवतमाळ येथे प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून झाली.
सेवेची 22 वर्षे पूर्ण करणा-या सरंगल यांनी पंढरपूर, नांदेड, सांगली, लातूर, नागपूर गुन्हा शाखेचे उपआयुक्त आणि जळगावमध्ये अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावले. विशेष म्हणजे वाढत्या गुन्हेगारीने अधीक्षकांच्या बदलीसाठी ज्या ज्या ठिकाणी जनता रस्त्यावर उतरली त्या त्या ठिकाणी सरंगल यांच्या हाती तेथील सूत्रे सुपूर्द करण्यात आली असल्याचे आजवर निदर्शनास आले आहे. अर्थात, कायदा व सुव्यवस्थेची घडी विस्कटलेल्याच ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली आहे. यात नागपूर, जळगाव व सांगली आणि त्यापाठोपाठ नाशिकचाही समावेश आहे. जळगाव येथे सिमी या अतिरेकी संघटनेचे जाळे उद्ध्वस्त करण्यात आणि नागपूर येथे राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात बॉम्ब ठेवणारे अतिरेकी जेरबंद करण्यात सरंगल यशस्वी ठरले होते. गेली नऊ वर्षे केंद्र शासनाच्या गुप्तचर विभागाच्या सेवेत लाहोर-भारत बससेवेच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणे असो की सिलीगुडी, चंदीगड भागात त्यांनी अतिरेक्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची कामगिरी केली. पोलिस अधीक्षक व उपआयुक्तपदाच्या कार्यकाळात त्यांनी प्रत्येक ठिकाणी पोलिसिंगवर आणि अवैध धंदे बंद करण्यास प्राधान्य दिले. त्याचबरोबर नागरिकांची मालमत्ता, व्यक्तिगत सुरक्षिततेसाठी जर पोलिस पुढे येत असतील तर जनतेनेही एक पाऊल पुढे येऊन यंत्रणेला सहकार्य केले तर निश्चित गुन्हेगारी कृत्याला आळा बसू शकतो, ही भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी जनता दरबार, झोपडपट्ट्यांमध्ये स्वत: उपस्थित राहून बैठका घेतल्या. आगामी काळातही शहरातील सुरक्षितता अशीच अबाधित राहण्यासाठी अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करणार असून पोलिस कर्मचारीदेखील कायमस्वरूपी लोकसेवेत हजर दिसतील असे ते अभिमानाने सांगतात.
आजवरच्या आपल्या यशस्वी कारकीर्दीविषयी बोलताना ते अत्यंत नम्रतेने सांगतात, पोलिस दलातील यश हे एकट्यादुकट्याचे कधीच नसते. गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सहकारी अधिकारी व नागरिकांचा सक्रिय पाठिंबाच आवश्यक असतो. पोलिस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पेलणे या दोन्हीही बाबींच्या शिवाय केवळ अशक्यच असल्याचे ते आवर्जून नमूद करतात आणि आजन्म सत्याचे रक्षण करण्यासाठी व दुष्टांचा नाश करण्यासाठी झोकून देण्यास तत्पर असल्याचे ते सांगतात.