आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजय पाटकरची नवी इनिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'लावू का लाथ’ नावाचा नवा मराठी चित्रपट शुक्रवारपासून सगळीकडे प्रदर्शित झाला. प्रत्येक शुक्रवारी एक तरी मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने याच चित्रपटाचा उल्लेख का, असा प्रश्न तुमच्या मनात स्वाभाविकच उमटला असेल. याचे मुख्य कारण हरहुन्नरी अभिनेता विजय पाटकर हा आहे. रंगमंच, मालिका, जाहिराती, मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये चतुरस्र कामगिरी करीत असतानाच दिग्दर्शनात उडी घेऊन एक-दोन नव्हे, तर चक्क पाच चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन आल्यानंतर विजयने निर्मात्याच्या रूपात आपली नवी इनिंग सुरू केली आहे.
25 वर्षांपूर्वी एन. चंद्रा यांच्या ‘तेजाब’मधून अनिल कपूरच्या मित्राच्या भूमिकेतून रुपेरी पडद्यावर आलेल्या विजयने अल्पावधीतच आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. लहानपणापासूनच चॅर्ली चॅप्लिनचा फॅन असलेल्या विजयने स्लॅपिस्टिक कॉमेडीकडेच आपले लक्ष केंद्रित केले होते. सेलो टेपच्या जाहिरातीसाठी विजयला आयफा पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. अभिनयाबरोबरच विजयने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आणि तेथेही चांगलेच यश प्राप्त केले.
‘एक उनाड दिवस’, ‘चष्मेबहाद्दर’, ‘जावईबापू झिंदाबाद’, ‘सासू नंबरी जावई दस नंबरी’ आणि ‘सगळं करून भागले’ या चित्रपटांचे विजयने दिग्दर्शन केले असून हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर बºयापैकी यशस्वीही झाले आहेत. ‘लावू का लाथ’द्वारे विजय निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तीन रूपात प्रथमच प्रेक्षकांसमोर आला आहे. पहिल्या निर्मितीबद्दल विजय फारच उत्सुक आहे. तो म्हणतो, मी प्रत्येक चित्रपट हा पहिला चित्रपट असल्याचे मानतो आणि त्याप्रमाणे काम करतो. ‘लावू का लाथ’ची कथा मला खूपच आवडली होती. हा चित्रपट आपण स्वत:च निर्माण करावा, असे मला वाटले. ही गोष्ट मी माझ्या मित्रांना सांगितली असता ते सगळे लगेचच मदत करण्यास एका पायावर तयार झाले. कथेवर काम करीत असतानाच आमच्या डोक्यात कलाकारांचे चेहरे दिसत होते आणि मी जेव्हा या कलाकारांना विचारले तेव्हा तेही लगेचच तयार झाल्याने हा चित्रपट वेळेवर पूर्ण झाला. खरे तर कोणत्याही निर्मात्याला पहिल्या चित्रपटाच्या वेळी प्रचंड मनस्ताप भोगावा लागतो. मला मात्र असा कोणताही अनुभव आला नाही. माझ्या मते याचे कारण एवढेच की, गेली अनेक वर्षे मी या क्षेत्रात आहे आणि प्रत्येकाशी माझी चांगलीच मैत्री आहे. विजय कदम, प्रदीप पटवर्धन, जयंत वाडकर यांच्याशी माझे 15-16 वर्षांपासून संबंध आहेत. ते मला चांगले ओळखतात आणि मीही त्यांना चांगले ओळखतो. चांगले ट्युनिंग असल्यानेच मला पहिल्या निर्मितीसाठी त्रास झाला नाही.
विजयचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी होतो, ते दोन दिवसांत कळेलच, परंतु प्रथमच निर्माता बनलेल्या विजयला यशासाठी शुभेच्छा देऊया.