आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायी जोतिबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उक्ती आणि कृतीमध्ये साधर्म्य जपलेले, महाराष्ट्रातील बंडखोर समाजसुधारक जोतिबा फुले यांंच्या  नुकत्याच झालेल्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे स्मरण...


बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले...ही उक्ती सार्थ करणारे महात्मा फुले हे भारतीय इतिहासातले आद्य समाज क्रांतिकारक होत. त्यांचे कार्य बहुपेडी आहे. आपल्या वैचारिक मांडणीतून आणि कृतीमधून त्यांनी अनेक आघाड्यांवर लढा दिला. जातिप्रथा, ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व, स्त्रियांचे शोषण, शेतकरी-कष्टकरी यांची पिळवणूक, सांस्कृतिक गुलामगिरी ह्या सर्व आघाड्यांवर संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष सत्यशोधनावर आधारलेला होता. ‘हिंदू समाजातल्या बहुजन समाजात आत्मप्रत्यय आणि आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे जोतिबा फुले होय.शतकानुशतके अज्ञानाने, दारिद्र्याने व हीन संस्कृतीने ग्रासलेल्या हिंदू समाजातल्या जनतेला आत्मपरीक्षण करण्याचा पहिला आदेश जोतिबांमुळे मिळाला,’ अशा शब्दांत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जोतिबांना गौरवलं होतं.


जोतिबांचे ध्येय होते ‘एकमय लोक’ आणि त्यांना समाजाचे नेमके दुखणे काय आहे, याची जाण होती. म्हणूनच शोषित, पराभूत समाजाचा पर्यायी इतिहास त्यांनी लिहू पाहिला. स्त्रिया, दलित, कष्टकरी आणि शेतकरी यांचे  होत असलेले शोषण सर्वात प्रथम फुलेंना जाणवले. जोतिबांनी १८४८मध्ये मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात सुरू केली. बहुजन समाजाला, अस्पृश्यांना आणि त्यातही प्रामुख्याने स्त्रियांना शिक्षण द्यावे असा आग्रह त्यांनी केला. आजही कुपोषण, बालविवाह, प्रसूतीदरम्यान होणारे मृत्यू, मारहाण, अन्याय हेच सर्वसामान्य स्त्रीच्या जीवनाचे प्राक्तन आहे. अलीकडे तर गर्भातच स्त्रीला मारले जात आहे.


भारतीय समाजरचना बहुपेडी आणि विषम आहे. या शोषित-पीडित-वंचित समाजाला आहे तेथेच ठेवून फक्त कल्याणकारी सुधारणांच्या नावाखाली वरवरच्या उपाययोजना करून प्रश्न सोडवणे जोतिबांना मान्य नव्हते. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची नवीन संकल्पना मांडली. अंधश्रद्धा, चमत्कार यांच्यावर ताशेरे ओढले. सत्य आणि विवेक या नवमूल्यांचे रोपण केले.


१८९१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकातला ‘स्त्री आणि पुरुष’ हा संवाद त्यांची विचारधारा सांगणारा आहे. मानव जातीला जन्म देणारी, संगोपन करणारी, संवर्धन करणारी स्त्री पुरुषापेक्षा निर्विवाद श्रेष्ठ आहे असे मत स्पष्टपणे नोंदवतात. स्त्रियांच्या दुय्यमत्वाची कारणे त्यांच्या नैसर्गिक शरीरधर्मात नसून पुरुषांच्या कावेबाजपणात आहेत असे फुल्यांनी म्हटले आहे. स्त्रियांना खरी सत्ता मिळण्यासाठी त्यांना सारासार विवेकाचे बळ मिळणे आवश्यक आहे. यासाठी स्त्रियांना शिक्षण देण्याचा ते आग्रह धरतात. या पुस्तकात उच्च-नीच उतरंडीचा विरोध करणारी, श्रमिकांना सन्मान देणारी, लोकशाहीपूरक आणि शोषणविरोधी मूल्ये आपल्या विशिष्ट शैलीत मांडली आहेत. स्त्रियांचा विशेषत्वाने केलेला उल्लेख हे या मांडणीचे अजून एक वैशिष्ट्य! स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व आग्रहाने मांडले आहे. ‘आज आपल्याकडे मतदानाचा हक्क न झगडताच मिळाला, पण त्याने आमच्या समाजव्यवस्थेला धक्कासुद्धा पोहोचत नाही. मुकेपणाने सोसणाऱ्या स्त्रियांच्या हाती घराचा, समाजाचा आणि राज्याचा कारभार द्यायचा झाला तर त्यांना आपल्याला काय हवे, काय नको हे बोलण्याचे बळ आणि निर्भयता हवी. हे निर्माण करण्याचा पहिला प्रयत्न जोतिरावांनी केला हे त्यांचे फार मोठे श्रेय आहे,’ असे मत ज्येष्ठ स्त्रीवादी विचारवंत विद्युत भागवत यांनी व्यक्त केले आहे.


सावित्रीबाई, फातिमाबी, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी  यांच्या कार्यामागची प्रेरणा फुलेच आहेत.


- प्रवीण घोडेस्वार, नाशिक
 gpraveen18feb@gmail.com

बातम्या आणखी आहेत...