आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईनी मीनी मिनी मो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तर... आजच्या वादाचा विषय काही विशेष नव्हता, तसा नेहमीचाच होता - अन्वीने कोणता ड्रेस घालायचा?
माझा हात एका ड्रेसवर होता तर अन्वीचा दुसऱ्या. अर्थातच आम्हा दोघांनाही परस्परांनी निवडलेले ड्रेस नापसंत होते. 
मी निवडलेलाच ड्रेस कसा चांगला आणि आज घालण्यासारखा आहे (बाहेरचे हवामान, प्रोग्रॅम्स वगैरे विचारात घेता) यावर दोघांनीही एकमेकांची पुरेपूर तालीम घेतली. त्यानंतर आरडून-ओरडूनही झाले. 
कोणत्याही एका ड्रेसवर संमती होणे शक्य नाही हे माझ्या आधी तिनेच ताडले आणि समझोत्याचा प्रस्ताव समोर ठेवला.
- बाबा, आपण ईनी मीनी मिनी मो करू या.
मला आक्षेप घ्यायचे कारण नव्हतेच, दुसरा मार्गही नव्हता.
मी ईनी मीनी मिनी मो करायला घेणार इतक्यातच अन्वीने मला हातांच्या खुणेने थांबवून स्वतः चालू केले.
Eeny, meeny, miny, moe,
Catch a tiger by the toe.
If he hollers, let him go,
Eeny, meeny, miny, moe.

माझं दुर्दैव असं की, यातसुद्धा मीच हरलो आणि अन्वीने निवडलेल्या ड्रेसवरच शेवटचे बोट टेकले.
हरलेल्या उमेदवाराचा गरीब बिच्चारा चेहरा घेऊन मी ड्रेस घालायला घेतला.
विजयी उमेदवाराला अचानक काय झाले काय माहीत.

हळूच माझ्या कानाजवळ येऊन (आमच्यापासून दहा फुटांच्या अंतरात दुसरं कोणी नसतानाही) अगदी फुसफुसण्याच्या आवाजात सांत्वनाचे शब्द आले - बाबा, तुला एक सांगू?
पडेल चेहऱ्याने ‘सांग’ बोललो.

‘सिक्रेट आहे.’
‘बरं, सांग तरी.’
‘माँ की सौगंध’ वगैरे घातल्यासारखे डोळे उघडझाप केले.
मी त्यावर मान हलवून ‘कबूल है’ केले.
आता डोळ्यात मिश्किली चमकली.

‘आपल्याला जे win व्हायला पायजे ना तिथूनच ईनी मीनी मिनी मो बोलायला सुरुवात करायची, मग आपण जिंकतो.’
आणि त्यावर तोंडावर हात ठेवून फुसफुसतच हीहीही खिखिखी हसून घेतलं गेलं.
 
- प्रवीण क्षीरसागर, न्यू याॅर्क postboxpravin@gmail.com
बातम्या आणखी आहेत...