आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तू सप्तसूर माझे'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भावसंगीताचे विश्व सुधीर फडके, श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर अशा संगीतकारांनी समृद्ध केले. मिलिंद इंगळे, सलील कुलकर्णी, अवधूत गुप्ते, अजय-अतुल या नव्या दमाच्या संगीतकारांनी मराठी संगीताला नवा साज देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना रसिकांनीही पसंतीची दाद दिली. मात्र, मध्यंतरीच्या काळात भावसंगीताची पीछेहाट झाली. मराठी चित्रपटांचा दर्जा ढासळत गेला. अशा या विपरीत परिस्थितीत आपल्या प्रतिमेचा आविष्कार घडवत संगीतकार अशोक पत्की यांनी भावसंगीत, जाहिराती आदी प्रकारात आपला ठसा उमटवला. मात्र, आपल्या आजवरच्या कारकीर्दीत संगीत क्षेत्रात मौलिक योगदान देऊनही त्यांच्या वाट्याला फारशी प्रसिद्धी आली नाही. प्रसिद्धीच्या झोतात न राहण्याचा पिंड असलेले पत्की खरे म्हणजे एक चतुरस्र संगीतकार. त्यांच्याएवढी वैविध्यपूर्ण कामगिरी मराठीतल्या एकाही संगीतकाराने साधलेली नाही. म्हणजे बघा, भावगीते, चित्रपटगीते, नाटकांचे पार्श्वसंगीत, टीव्ही मालिकांची शीर्षकगीते याशिवाय कमांडर, श्रीमान-श्रीमती, तेरी भी चूप मेरी भी चूप, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, खामोशी इ. मालिकांचे संगीत असे वैविध्यपूर्ण संगीतकार्य त्यांच्या हातून घडले. किंबहुना, ‘मोरुची मावशी’ या नाटकातली त्यांची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती.
परंतु अशोक पत्कींचं थक्क करणारं योगदान म्हणजे त्यांनी संगीतबद्ध केलेली सुमारे 5000च्या वर जाहिरात जिंगल्स! जाहिरात क्षेत्रातला सर्वाधिक यशस्वी संगीतकार म्हणजे अशोक पत्की ही त्यांची खरी ओळख. त्यांच्याइतक्या जिंगल्स आजपर्यंत कोणीही केल्या नाहीत. झंडू बाम, ये ढेर से कपडे (डबल बीस साबण), धारा, संतूर, विको वज्रदंती, मेरा सपना मेरी मारुती, लाजरी, रूपसंगम, रूपमिलन, गोदरेज स्टोअरवेल, मंजिरी यांसारख्या जाहिराती ज्यांनी छोट्या-मोठ्या पडद्यावर पाहिल्या आहेत, त्यांनी पत्कींच्या जिंगल्सची श्रवणीयता पुरेपूर अनुभवली आहे. संगीतकाराचे कस पाहणारे काम म्हणजे जिंगल्स. जाहिरात करताना सतत नावीन्य, ताल-आवाजाचे वेगवेगळे परिणाम साधताना सर्जकतेची खरी कसोटी असते. जाहिरातींना संगीत देणे हे प्रचंड अवघड काम आणि हेच अवघड काम गेली कित्येक वर्षे लीलया अशोक पत्की यांनी पेलले. एका अर्थाने ते जिंगल्सचे सम्राटच होत. शंकर महादेवन, लुई बँक्स, रणजित बारोट यांच्या बरोबरीनेच अशोक पत्कीचं नाव जिंगल्सच्या प्रांतात आदराचे व आघाडीचेही बनले आहे. गंमत पाहा, जाहिरातीसारख्या झगमगाटाच्या क्षेत्रात राहूनही पत्कींनी मात्र स्वत:ची जाहिरात कधीही केली नाही, होऊ दिली नाही, हे त्यांच्या स्वभावाचं वेगळंपण!
‘राधा ही बावरी’ या गाण्याने स्वप्निल बांदोडकरची गायक म्हणून कारकीर्द त्यांनी घडवली, तर ‘आईशप्पथ’मधलं ‘झिम्मड पाण्याची’ (साधना सरगम) हे गाणे वाद्यवृंद संयोजनाचा अनोखा आविष्कार ठरले. ‘सावली’ या मराठी-कोकणी चित्रपटातल्या (नील रंगी रंग ले, मोहे घर आए, सांवरिया घर नहीं आए) त्यांच्या गाण्यांनी शास्त्रीय संगीतावरची त्यांची हुकूमत अधोरेखित केली. आश्चर्याची बाब म्हणजे, पत्की यांनी संगीताचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. केवळ अनुभव, निरीक्षणशक्ती आणि आपल्या उपजत प्रतिभेच्या जोरावरच संगीताचे सखोल ज्ञान त्यांनी प्राप्त केले आहे.
‘पूरब से सूर्य उगा’ या साक्षरतेचे महत्त्व सांगणार्‍या दूरदर्शनवरील जाहिरातीने ते जाणकारांपर्यंत पोहोचले, तर ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या रचनेने अशोक पत्कींना जगभरातल्या भारतीयांच्या घराघरात पोहोचवले. ‘आपली माणसं’ या चित्रपटात कवी सौमित्र (किशोर कदम) यांनी लिहिलेल्या गाण्यात पत्कींनी अद्वितीय
चाल बांधली. ‘न कळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दु:ख चाहूल घेते’
(आशा-सुरेश वाडकर) या गाण्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार लाभला.
पं. जितेंद्र अभिषेकी आणि संगीतकार वसंत प्रभूंचा संस्कार पत्कींच्या संगीतावर झाला आहे; पण असे असले तरी पत्की हे स्वतंत्र प्रतिभेचे संगीतकार आहेत, हे निर्विवाद. ‘दर्याच्या देगेरे’, ‘नशा तुजी’ हे त्यांचे कोकणी अल्बमही प्रसिद्ध आहेत. गोवा हिंदू असोसिएशन, मुंबई मराठी साहित्य संघ, चित्रलेखा, सुयोग, गणरंग आदी नाट्यसंस्थांच्या नाटकांना त्यांचेच संगीत असते. ‘शास्त्रीय संगीतातील भावनांच्या अनेक छटा दाखविण्याची किमया साधणारा विरळा संगीतकार’ अशा शब्दांत यशवंत देव यांनी पत्कींचा गौरव केला आहे. तो नक्कीच सार्थ आहे.
gprawin@hotmail.com